*अभंग_चिंतन_वारी...*
सुख अनुपम संतांचे चरणीं ।
प्रत्यक्ष अलका भुवनी नांदत असे ॥१॥
तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली ।
जेणें निगमावली प्रगट केली ॥२॥
संसारी आसक्त माया-मोह रत ।
ऐसे जे पतीत तारावया ॥३॥
चोखा म्हणें तेच ज्ञानदेवी ग्रंथ ।
वाचिता सनाथ जीव होती ॥४॥
संत चोखोबा यांचा चार चरणाचा संतांचा महीमा सांगणारा अतिशय सुंदर अभंग आहे.
संसारातील प्रत्येक जीव सुखासाठी जगत असतो परंतु संसारात मिळणारे सुख हे क्षणिक आहे. म्हणजे संपणारं आहे.
सुख पाहता जवापाडे |
दुःख पर्वता एवढे ||
खरं पाहीलं तर आपल्याला ( अज्ञानी जीवाला ) फक्त सुखाचा भास होतो कारण मुळातच संसार हा दुःख रुप आहे असे संत तुकाराम महाराज सांगतात.
संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ |
विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ |
किंवा
दुःख बांदवडी आहे हा संसार |
सुखाचा विचार नाही कोठे ||
असो खुप प्रमाण आहेत.
ज्या प्रमाणे एखाद्या उंदीराने आपल्याला काही खायला मिळेल या आशेने डोंगरात कीती ही उकरले तरी खायला मिळणे अशक्य आहे आणि काही मिळाले तरी भुक भागणे अशक्य आहे त्या प्रमाणे आपण कितीही नीटनेटका संसार केला तरी थोडे फार सुखाचा आभास होईल परंतु खरे सुख मिळणे अशक्य आहे .
मग खरे सुख कोठे आहे ?
संत तुकाराम महाराज सांगतात खरे सुख संतांच्याच पायाशी आहे.
सुख वसे हेचि ठायी |
बहु पायी संतांच्या ||
सुख सतत संतांच्या ठिकाणी वास करते म्हणजे सुखाचे राहण्याचे ठिकाण संतच आहेत. हेच अभंगाच्या पहील्या चरणात सांगतात.
सुख अनुपम संतांचे चरणीं ।
प्रत्यक्ष अलका भुवनी नांदत असे ॥
अनुपम असलेले सुख संतांच्याच चरणी आहे.
अनुपम म्हणजे ज्या सुखाला कशाचीच उपमा देता येत नाही असे,
जे सुख प्राप्त झाले असता कधीच सरत नाही, विटत नाही नव्हे नव्हे त्या सुखाचा कधीच नाशही होत नाही. अशा प्रकारचे सुख संतांना मनोभावे शरण जाऊन त्यांची मनोभावे सेवा करुन आपण ( अज्ञानी जीव ) प्राप्त करून घेऊ शकतो. परंतु असे संत कोठे भेटतील , कोठे राहतात हे पहील्या चरणाच्या उत्तरार्धात सांगतात
प्रत्यक्ष अलका भुवनी नांदत असे ॥ १ ॥
अलका भुवनी म्हणजे अलंकापुरीत , आळंदी मध्ये माऊली ज्ञानोबारायांनी संजीवन समाधी घेतली आहे.
म्हणजे ज्ञानोबा माऊली आज सुद्धा जिवंत आहेत हो फक्त त्यांनी समाधी लावली आहे .
म्हणजे आज सुद्धा ते प्रत्यक्ष अलंकापुरीत नांदत आहेत . असे संत चोखोबा आपल्याला सांगत आहेत.
त्यांना माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हेच अभंगाच्या दुसर्या चरणात सांगतात.
तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली ।
जेणें निगमावली प्रगट केली ॥२ ॥
ज्या प्रमाणे एखाद्या गावातील लोक आपली तहान भागवण्यासाठी पाणी पिण्याकरीता इकडे तिकडे भटकत आहेत तोच ( तेवढ्यात ) त्या गावात एखाद्या नदीचा उगम होवाव . आणि कुणीही या अन आपली तहान भागुन घ्या.
त्या प्रमाणेच आत्मसुखरुपी तहान भागवण्यासाठी पाणीरुपी ज्ञानगंगा माऊली ज्ञानोबारायांनी आपल्या ज्ञानेश्वरी ग्रंथ रुपाने प्रगट केली आहे हो असे संत चोखोबा महाराज सांगतात.
आता कुणीही यावे म्हणजे संसारात आसक्त असलेला असो वा माया मोहात रमणारा असो अशा पतीत जीवांनी यावे अन ज्ञान प्राप्त करून आत्यंतिक सुखाची प्राप्ती करून घ्यावी या हेतूने ती ज्ञानगंगा प्रगट केली आहे. हे अभंगाच्या तिसर्या चरणात सांगतात.
संसारी आसक्त माया-मोह रत ।
ऐसे जे पतीत तारावया ॥ ३ ॥
जे संसाराला चिकटलेले आहेत म्हणजे संसारात आसक्त आहेत, माया मोहामुळे जे संसारात रमलेले आहेत अशा पतीत जीवांना दुःख रुपी भवसागरातुन तरुण नेण्यासाठी माऊली ज्ञानोबारायांनी जणू काही ज्ञानरुपी नावच प्रगट केली आहे हो असे संत चोखोबा महाराज सांगतात.
तेच ज्ञानरुपी ग्रंथ ज्ञानेश्वरी वाचली असता जीवाला शिवाची प्राप्ती होते हेच अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात.
चोखा म्हणें तेच ज्ञानदेवी ग्रंथ ।
वाचिता सनाथ जीव होती ॥ ४ ॥
शेवटी संत चोखोबा महाराज सांगतात जे ज्ञान ज्ञानेश्वरी ग्रंथ रुपाने प्रगट झाले आहे तो ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचला असता जीव हा शिव स्वरुप होतो, सनाथ होतो म्हणजे जीवाला आत्यंतिक सुखाची प्राप्ती होते, आत्यंतिक आनंदाची प्राप्ती होते म्हणजे जो आनंद प्राप्त झाला असता इतर जिवनात काहीही प्राप्त करायची इच्छा राहत नाही नव्हे नव्हे जीव हा सनाथ होतो म्हणजे सर्व विश्वाचा स्वामी , नाथ म्हणजे विश्वनाथ होऊन जातो असे संत चोखोबा महाराज सांगतात.
कितीही मुर्खातला मुर्ख दगड असला म्हणजे कितीही माणूस अज्ञानी असो, निरक्षर असो , पापी असो, दुष्ट असो एवढच नाही हो कसाही असो परंतु त्याने जर मनोभावे ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचला तर त्याला ज्ञान होऊन अविनाशी सुखाची प्राप्ती होते.
ज्ञान होय मुढा |
अतिमुर्ख त्या दगडा ||
*रामकृष्णहरि*
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"