Monday, January 21, 2019

।। समाधि साधन संजीवन नाम।।

।। समाधि साधन संजीवन नाम।।

कार्तिक वद्य त्रयोदशी शके १२१८ या दिवशी ज्ञानेश्वर माऊली समाधिस्त झाले. त्यांच्या संजीवन समाधीदिनाचा  सोहळा आज दिनांक 05  डिसेंबर 2018  रोजी श्री क्षेत्र आळंदीत साजरा होईल.  त्यानिमित्त...

जिवितकार्य पूर्ण झाल्यावर ज्ञानेश्वरांना या देहाच्या पलिकडे जावं असं वाटू लागलं. ज्ञानेश्वरीचे सारस्वताचे झाड देशी लेण्यात सजवून त्यांनी ब्रह्मविद्येचा सुकाळ केला होता. भक्तीभावात डुंबणारी पंढरीची वारी त्यांनी पवित्र केली होती. आजचे तिचे विराट भक्तीस्वरूप हे तिचे फलित आहे.

अमृतानुभव हा त्यांचा ग्रंथ स्वतंत्र तत्वज्ञानच आहे. हरिपाठाचे अभंग लिहून त्यांनी हरिभक्तांसाठी नामस्मरणाचे साधन दिले. भक्तीभावपूर्ण असे रसाळ अभंग लिहिले. सातशे वर्षांनंतर देखील हे संतसाहित्य पिढ्यान्‌पिढ्या वारकरी संप्रदायाचे रत्नभांडार आहे. 

"पसायदान' ही प्रार्थना म्हणजे मराठी सारस्वताचा झळाळणारा एक कौस्तुभ अलंकारच ! ज्ञानेश्वरी हा सुवर्णकलश आहे तर पसायदान ही महन्मंगल विश्वकल्याणाची प्रार्थना ! थेट हृदयाशी संवाद करणारी भाषा.  रसकल्लोळ आणि भक्तीचा महिमा यांद्वारे ज्ञानदेवांनी अवघे तत्वज्ञान सोपे करून उलगडून मांडले. आईच्या वात्सल्याने ब्रह्मरसाचे अमृतपान सामान्यातल्या सामान्य माणसाला घडविले. आपले आयुष्य केवळ समाजाच्याच नव्हे तर विश्वाच्या कल्याणासाठी समर्पित केले. 

एवढे केल्यानंतर आता जगण्यासाठी काय उरले? अशी उत्कट भावना ज्ञानदेवांनी व्यक्त केली. या समाजकार्यातून वेळीच बाहेर पडलं पाहिजे अन्यथा मोठेपणाचा मोह होऊन अहंकार वाढेल. हा गंभीर विचार त्यांच्या मनात आला असावा. आता या जगापासून वेगळं होऊन विश्वात्मतेत विलीन झालं पाहिजे. या संकल्पनेचा शोध घेण्यासाठी त्यांनी चिंतन केलं. या चिंतनातूनच त्यांनी संजीवन समाधीचा कठोर निर्णय घेतला. 

लाखो भाविकांची मांदियाळी संजीवन समाधी घेण्यामागची कारणं काहीही असू शकतात. पण समाधी घेणं ही काही सामान्य घटना नाही. ज्ञानदेव मात्र या समाधी सोहळ्याला शांतपणे आणि धीरोदात्तपणे सामोरे गेले. अनंतात विलीन झाले आणि देवरूप झाले! ज्ञानदेव तुम्हा आम्हा सर्वांचे देव झाले. या देवाचं दर्शन घेण्यासाठी आळंदीत लाखो भक्तांची मांदियाळी त्यांच्या समाधीभोवती भक्तीभावानं जमते.

संजीवन समाधीचा हा सोहळा घडला, हे पुढच्या पिढ्यांना कळावे यासाठी प्रत्यक्ष पाहिलेल्या समाधीविषयीचे अभंग संत नामदेव महाराजांनी लिहून अध्यात्माची ही शिदोरी सामान्यांच्या हाती सोपवली. 

ज्ञानदेवांनी स्वत:च्या मनाशी केलेला निर्णय प्रथम निवृत्तीनाथांना सांगितला. विजेचा धक्का बसावा तसे निवृत्तीनाथ हादरलेच. "अरे ज्ञानदेवा, असा काय विचार करतो आहेस? जरा शुध्दीवर ये'.

ज्ञानदेव म्हणाले, "गुरुनाथदादा, आजपर्यंत आपण आत्मसात केलेलं अध्यात्माचं तत्वज्ञान समाजाला सांगितलं. त्याचा प्रचार, प्रसार केला. संतांच्या मनातही ते रुजविण्याचा प्रयत्न केला. आपणंच हे तत्वज्ञान आचरणात आणलं नाही तर आपणच आपल्या तत्वज्ञानाशी बेईमानानं वागलो असं होईल. म्हणून चिरस्वरुपाची संजीवन समाधी घ्यावी असं मनोमन वाटतं आहे'.

"ज्ञानदेवा, तुझ्या या निर्णयाच्या आड कसा येऊ? पण ज्या संतांना तू आधार वाटतोस त्यांना पटवून देणं आवश्यक आहे. त्याहीपेक्षा सोपान, मुक्ताला अधिक समजून सांगितलं पाहिजे.'

निवृत्तीनाथांची संमती मिळाल्यावर आनंदानं चरणावर मस्तक ठेवून आशीर्वाद मागितला. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना मिठी मारली. सोपान, मुक्ताला ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीचा निर्णय सांगताना निवृत्तीनाथांना भडभडून आले. दोघांनीही आक्रोश केला. दादा आता आम्हाला सोडून जाणार म्हटल्यावर मुक्ताईचा धीरच खचला. 

कार्तिक वारीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे वद्य एकादशीला निवृत्तीनाथांनी सर्व संत मंडळींना आळंदीत एकत्र बोलावून ज्ञानदेवांचा हा संकल्प सांगितल्यावर सगळे संत हडबडून गेले. ज्ञानदेवांनी नामदेवाला हा निर्णय आधीच सांगितला होता. नामदेवांनी त्यांना समजावण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. पण व्यर्थ. 

नामदेव, गोरोबा, चोखोबा, सेना, बंका, सावता, जनाबाई ही संत मंडळी आळंदीच्या सिध्दबेटावर उतरल्याची बातमी गावात समजताच सगळा गाव वाळवंटात लोटला होता. संत मंडळी अभंग, किर्तनात दंग होती. ज्ञानदेवांच्या कुटी भोवतालचं वातावरण हरिनामाच्या गजराने भारून गेलं होतं. 

समाधीस्थानाची तयारी तीन-चार दिवस आधीच झाली होती. सिध्दबेटावरील सिध्देश्वर मंदिराजवळच असलेल्या पुरातन गुहेत ज्ञानदेव समाधी घेणार होते. ही गुहा आतून स्वच्छ करून घेतली होती. आतली भिंताडं शेणामातीनं लिंपून सारवून घेतली होती. समाधीच्या बैठकीची जागा सपाट केली होती. कार्तिकी द्वादशीच्या संध्याकाळी ज्ञानेश्वर माऊली संत मंडळींसमोर अखेरचं कीर्तन करणार होते. त्यानंतर ते संपूर्ण मौन पाळणार होते. त्यांचे अखेरचे शब्द ऐकण्यासाठी वारकऱ्यांचा मेळा वाळवंटात लोटला होता.

ज्ञानदेवांनी किर्तनाला सुरुवात केली. "संतसज्जनहो मी आपला निरोप घेण्यासाठी बोलणार आहे. आता मी शिवस्वरूपात विलीन झालो आहे. आपल्यापुढे मी नाममात्र उरलो आहे. मीच भक्त अन मीच देव होऊन बसलो आहे. आता मी निघावं म्हणतो. आपल्या आशीवार्दानं आम्हास चिरशांती, शुध्द स्वरुपातला आनंद निरंतर मिळत राहील. आपणा सर्वांना माझा अखेरचा नमस्कार'. एवढं बोलून ज्ञानदेव उठून आपल्या झोपडीकडे निघून गेले.

संत ज्ञानदेवांनी चिरंतन आनंद वाटावा म्हणून इंद्रायणीच्या वाळवंटात विठोबाचा जागर घालण्याची विनंती केली. विठ्ठलाच्या अन्‌ ज्ञानदेवांच्या जयजयकाराच्या गजरात द्वादशीची रात्र हरिनाम संकिर्तनातच संपली.
कार्तिकी वद्य त्रयोदशीला ज्ञानदेवादी भावंडांनी इंद्रायणीत पवित्र स्नान केलं. ज्ञानदेव आता कोणाशीही बोलत नव्हते. नामदेव सकाळीच समाधीस्थान पाहण्यासाठी गेले होते. त्यांनी आत जाऊन साऱ्या गोष्टी नजरेखाली घातल्या. ज्ञानदेवांचे आसन तुळशी, बेल, दुर्वा, दर्भ आणि फुले अंथरूण सिध्द केलं होतं. समाधीस्थळावर वारकऱ्यांची भजनं टाळमृदुंगाच्या गजरात सुरू होती.
समाधीस्थानाकडं निघताना संत जनाबाईंनी ज्ञानदेवांना पंचारतीनं ओवाळलं. त्यांना मांड्याचा एक घास भरविला. अन्य स्त्रियांनी त्यांना ओवाळले. नंतर मुक्ताईनं ज्ञानदेवांस गंधाक्षता लावल्या. मांड्याचे अखेरचे दोन घास भरवून त्यांना भरल्या डोळ्यांनी पंचारतीनं ओवाळलं आणि ज्ञानदेवांना मिठी मारून हंबरडा फोडला. ज्ञानदेवांनी मुक्ताईच्या पाठीवरून शेवटचा प्रेमाचा हात फिरविला. सोपानकाकांनाही स्वत:ला सावरणं कठीण झालं. 

ज्ञानेश्वर माऊलींना अखेरचा निरोप :-
जमलेल्या लोकांनी ज्ञानेश्वर महाराजांचा जयजयकार केला. टाळमृदुंगाच्या गजरात विठ्ठलनामाचा गजर सुरू झाला. ज्ञानदेव समाधीस्थानाकडे चालू लागले. त्यांच्या एका बाजूला निवृत्तीनाथ तर दुसऱ्या बाजूला संत नामदेव चालत होते. वाटेत लोक ज्ञानदेवांच्या पाया पडत होते. काहीजण दुरुनच हात जोडून त्यांना नमस्कार घालत होते. अखेर ज्ञानदेव समाधीस्थानापाशी आले. सच्चिदानंद बाबांनी ज्ञानदेवांची मनोभावे पूजा केली. ज्ञानदेवांनी समाधीस्थानाला तीन प्रदक्षिणा घातल्या. अजान वृक्षाला प्रेमानं कुरवाळलं. संतांनी चरणाला स्पर्श केला. लोकांची नमस्कारासाठी झुंबड उडाली. 

निवृत्तीनाथांनी प्रार्थना केली. 
आता विश्वात्मके देवें। येणें वाग्यज्ञे तोषावें।
तोषोनि मज द्यावें। पसायदान हे।।...

ज्ञानदेवांनी जनतेला शेवटचा नमस्कार केला. निवृत्तीनाथ व नामदेवांनी ज्ञानदेवांचे हात धरून समाधीस्थानात प्रवेश केला. बसण्यासाठी शुभ्र वस्त्र अंथरले होते. तुळशी, बेल, फुले यांची शय्या तयार होती. ज्ञानेश्वरांच्या इच्छेनुसार त्यांनी स्वहस्ते लिहिलेली ज्ञानेश्वरीची अगदी पहिली प्रत त्यांच्या आसनासमोर ठेवण्यात आली होती. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना हळूवारपणे त्या आसनावर बसवले. नामदेवांनी त्यांना पंढरीचा बुक्का लावला. समाधीसाठी ज्ञानदेवांनी पद्मासन घातले आणि डोळे मिटून हात जोडले. दीर्घ स्वरांत ॐ चे उच्चारण केले. निवृत्तीनाथांनी हुंदके देत जड अंत:करणाने समाधीच्या द्वारावर शिळा लावली. द्वार कायमचं बंद झालं. निवृत्ती, सोपान, मुक्ताईनं हंबरडा फोडला. कार्तिकी वद्य त्रयोदशीला हा ज्ञानसूर्य मावळला.

समाधि साधन संजीवन नाम। 
शांति दया सम सर्वांभूती।।1।।

शांतिची पै शांती निवृत्ती उतारु। 
हरिनाम उच्चारु दिधला तेणेें।।2।।

शम दम कळा विज्ञान सज्ञान। 
परतोनी अज्ञान न ये घरां।।3।।

ज्ञानदेवा सिध्दी साधन अवीट। 
भक्तीमार्ग नी हरिपंथी।।4।।

🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"