Sunday, January 20, 2019

समाधी स्थितीच्या अनुभवाचे उदाहरण

समाधी स्थितीच्या अनुभवाचे उदाहरण

डॉ. बी.जी. दामले यांच्या शब्दात संक्षिप्त स्वरूपात.
"१९२० सली पुण्याच्या नूमवि मध्ये ड्रॉइंग मास्तर गुळवणींची माझी पहिली भेट. मला त्यावेळी त्यांच्याबद्दल आदर वाटत नव्हता.
 पुढे 1957 मध्ये मी मुंबईच्या बाल मोहन विद्या मंदिरात मुख्याध्यापक असताना इंडियन सायकॉलॉजी(भारतीय मानसशास्त्र) या विषयावर पुस्तक लिहावयास घेतले. या पुस्तकासाठी मला पातंजल योगदर्शन सूत्रांचा अभ्यास करावा लागला. हा पुस्तकी अभ्यास करताना या अष्टांग योगाचा कृतिरूप अनुभव घेण्याची तीव्र इच्छा झाली. माझी जिज्ञासा वाढत राहिली. पुण्याचे श्री सोनोपंत दांडेकर यांना भेटलो. माझी अडचण सांगितली तेव्हा त्यांनी पुण्यात योगविद्या पारंगत असलेले गुळवणी महाराज आहेत, ते अधिकारी पुरुष आहेत, त्यांना जाऊन भेटा म्हणजे तुमचे काम होईल असे सांगून त्यांचा पत्ताही दिला. 
मी २० नारायण पेठेत आलो. पडवीवजा दोन खोल्यात त्यांचे बिऱ्हाड होते. ड्रॉइंग सर गुळवणी आणि श्री गुळवणी महाराज यांच्या चेहऱ्यात फरक जाणवला. पण खूण पटण्याइतके साम्य होते. ३५ वर्षांपूर्वीची अनादराची भावना आठवली आणि खंत वाटून शरमलो. विनम्रतेने नमस्कार केला. श्री. सोनोपंतांचा संदर्भ दिला. भेटीचे प्रयोजन सांगितले. पुस्तकाचे हस्तलिखित दाखवले. समाधी विषयावर सविस्तर माहिती मिळावी अशी विनंती केली. त्यांनी एक दिवस थांबण्यास सांगितले. आणि दुसरे दिवशी दोन वाजता येण्यास सांगितले.
ठरल्याप्रमाणे गेलो. श्री गुरु महाराजांनी हाताने खूण करून आत येण्याचे सूचित केले. आतल्या खोलीत दोन साधक साधनेला बसले होते. मला मात्र त्यांच्या मागे बसण्यास सांगितले. तासभर मी त्या दोघांना पाहत होतो. ते ताठ बसले होते. डोळे बंद. हालचाल नाही काही नाही. त्या दोघांपैकी एक माझ्या ओळखीचे केळकर आहेत हे पाहून मला आश्चर्य वाटले. एका तासाने महाराज आत आले. हलक्या आवाजात मला म्हणाले," तुम्ही त्या दोघांना गदागदा हलवून जागे करा."  मला संकोच वाटला. पण महाराजांनी सांगितले म्हणून मी त्यांना खूप हालवून- धक्के मारून जागे करण्याचा प्रयत्न केला. पण ते जागे झाले नाहीत. ५:३० वाजता त्यांनी डोळे उघडले. महाराज म्हणाले, हे १ वाजल्यापासून बसले आहेत. मी अक्षरश: दिग्मूढ झालो. हा सर्व प्रकार माझ्या जाणीवेच्या क्षितिजा पलीकडचा होता. माझे स्नेही केळकर उठले व मला पाहिल्यावर आश्चर्याने म्हणाले, इकडे कुणीकडे? आमचा परिचय पाहून महाराज म्हणाले," तुमच्या पुस्तकाचे काम झाले.केळकरांना हवे ते स्पष्टीकरण विचारा. तुमचे स्नेहीच आहेत." महाराजांच्या पाया पडलो. कृतज्ञतेने केळकरांच्या बरोबर त्यांचे घरी गेलो. केळकर म्हणाले,"मी ज्या अवस्थेत होतो त्याचे वर्णन मला शब्दात आणता येणार नाही. पण तेव्हा मी भोवतालच्या वातावरणातून अलग होतो. मी पूर्ण जागृत असून मला जाणीवही होती. पण मी अत्यानंदाच्या गूढ गुहेत होतो. त्या आनंदाच्या बाहेर मी जाऊ शकत नव्हतो."
अशी ही दिव्य साधना आहे. या अनुभवातून आपण साधनेला जीवनात अग्रक्रम देण्याचा निश्चय करायचा हीच आपली गुरुचरणी कृतज्ञतेची दक्षिणा आहे. याचबरोबर सद्गुरु आपले सामर्थ्य आपल्या शिष्यांमार्फत व्यक्त करीत असतात हे सत्य -रहस्य ध्यानी घेतले पाहिजे. 'मी गुरू आहे' असे खऱ्या गुरूला म्हणताच येत नाही. त्याचे शिष्य म्हणतात 'हे आमचे गुरु आहेत'. अशा या गुरुत्वाला कशाची मर्यादा घालता येणार आहे? विराटपण हेच गुरुत्वा चे लक्षण!

श्री सदगुरु योगीराज गुळवणी महाराज यांची जीवन गंगा (तृतीय कलश)
श्री वासुदेव निवास प्रकाशन.

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"