Tuesday, July 9, 2019

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - १० जुलै 🙏

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  १० जुलै  🌸*

*सद्गुरूस  जावे  शरण ।  संशयविरहित  वृत्तीने  घ्यावे  नाम ॥*

राम ठेवील जी स्थिति । त्यात समाधान राखे ज्याची वृत्ति । त्या नाव खरी विरक्ति ॥

रामाआड जें जें कांही । तेथून दूर ठेवी वृत्ति । या नांव विवेकाची प्राप्ति ॥ 

वृत्ति न होऊं द्यावी विषयीं फार । चित्तीं चिंतावा रघुवीर ॥ 

जेव्हां वृत्ति होते विषयाकार । तेथें न राहे सारासार विचार ॥
वृत्ति राही अभिमानाला धरून । तेथें न कधीं अनुसंधान ॥

जें जें पाहावे तें तें रामच होईजे । ऐसी ठेवावी वृत्ति । रघुनंदन आणावा चित्तीं॥

काळोख अत्यंत मातला । घालवावयास उपाय दुजा न सुचला ।होतां सूर्याचे आगमन । काळोख जाईल स्वतः आपण ॥
तैसें 'राम कर्ता' हा भाव ठेवता चित्तीं । उपाधीरहित बनते वृत्ति ॥

वृत्ति असावी शुद्ध, संतसज्जनांना प्रमाण । त्याने संतुष्ट होईल नारायण ॥
जग स्वार्थमूलक खरें । हे आपले वृत्तीवरून ओळखणें बरे॥

वृत्ति अलग करावी सर्वांहून । आलेली ऊर्मि करावी सहन । सर्व कर्ता जाणून रघुनंदन ॥

निःसंशय करावी वृत्ति आपण । सद्गुरूस जावें शरण ।संशयविरहित वृत्तिने घ्यावें नाम । जें सुखाचे आहे धाम ॥

शुद्ध ज्याचे अंतःकरण । शुद्ध ज्याचे आचरण । परमात्म्याबद्दल शुद्ध ज्याची वृत्ति । त्याच्याहून दूर न राहे रघुपति ॥

सर्व कांही करावें आपण । पण वृत्तीनें त्यांत न गुंतावे आपण ॥

नामांत ठेवावें प्रेम । तेथें प्रकटेल पुरुषोत्तम ॥ 
देहाचें चलन ज्याचे सत्तेनें । त्या रघुपतीचें स्मरण असावे आनंदाने ॥ 
वासना नामापायीं जडली । धन्य धन्य सज्जनीं मानिली ॥ 

पाणी माती एक झाले । वेगळें नाही करतां आले । निवळी घालावी पाण्यांत । पाणी स्वच्छ होते जाण ॥ 
तैसा विषयांत राहून जगती । नामाची ठेवावी संगती ॥ 
विषयाचें विष शोषून घेई । ऐसी आहे नामाची प्रचीति ॥ 

शक्य तितकें राहावें नामांत । याहून दुसरे न आणावे मनांत ॥ 
परा पश्यंती वैखरी वाणी । याच्याही पलीकडे नाम ठेवा स्मरणीं ॥ 

नामापरती उठेल वृत्ति । तेथें सावध असावें तुम्ही ॥ 
जो नामांत राहिला दंग । त्याने लुटला रामरंग ॥ रामनाम बोलावें वाचा । काळ न येऊं द्यावा काळजीचा ॥ 

नामाविण राम । जैसें पाकळ्याविण फूल जाण ॥ 
नाम ज्यानें घेतले सर्वकाळ । जिंकला त्यानें एक अंतराळ ॥ 
भगवंत ठेवील त्यांत हित मानावें । अखंड नामस्मरण घ्यावें॥ 
नामांत स्वतःचा विसर । हेंच देईल रघुवीर ॥ 

भगवंताची प्राप्ति, संतांची संगती, नामाचे प्रेम, । हे भगवत्कृपेवांचून नाही साधत जाण ॥
सतत करावे नामस्मरण । सर्व इच्छा राम करील पूर्ण ॥

*१९२.  त्राता  राम  जाणून  चित्ती ।  निर्भय  करावी  आपली  वृत्ति ॥*

*।‌।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"