//जय जय रामकृष्ण हरि //
आजपासून चातुर्मास सुरू होतोय.
देवशयनी एकादशी.
देव झोपतात, चार महिने ! ही आमची श्रद्धा !
कार्तिकी एकादशीला देव जागे होतील.
तोपर्यंत काय करायचे भक्तांनी ?
स्वतःचे रक्षण आता स्वतःच करायचे.
घरातील जाणता मनुष्य जर झोपला असेल तर त्याची झोपमोड होऊ नये म्हणून बाकीची मंडळी दक्षता घेत असतात. ( अशी दक्षता घ्यायची असते..... हे आताच्या पिढीला सांगायला हवंय)
कुणाचीही झोपमोड होऊ नये म्हणून आपण किती काळजी घेतो ना ? जरा सुद्धा आवाज होणार नाही याची काळजी घेतो. पावलांचा, बोलण्याचा, भांड्यांचा, गाण्याचा, मोबाईलचा.....
का ?
तर, "तो" उठेल. आत्ताच कुठे डोळा लागलाय. झोपूदेत ना जरा. नऊ महिने एवढे काम केलंय, आता चार महिन्याची विश्रांती.
12 महिन्यातील चार महिने विश्रांती घ्यायची असते, हे भगवंत सांगताहेत.
यातलं गणित लक्षात येतंय का ?
12 महिन्यातील 4 महिने विश्रांती म्हणजेच 12 तासात 4 तास. आणि 24 तासात 8 तास विश्रांतीचे !
जुळतंय की नाही अध्यात्म आणि आरोग्य !
ही विश्रांती अत्यंत आवश्यक असते. सुतार आपल्या हत्यारांना धार लावण्यासाठी काही काळ आपले मुख्य काम थांबवतो, तो टीपी नसतो, पुढचं काम चांगलं होण्यासाठी ती छोटी विश्रांती आवश्यकच असते. एवढं लक्षात ठेवूया......
पण आजच्या लेखनाचा उद्देश जरा वेगळाच आहे.
देव झोपलेत, मग आपली जबाबदारी वाढली नाही का ?
अध्यक्ष हजर नसतील तर उपाध्यक्ष कार्यवाह यांची जबाबदारी वाढतेच ना ! तस्संच आहे. या देवांचे छोटे रूप, प्रतिरूप म्हणजेच आपण. स्वतः ! तो परमात्मा मी आत्मा ! परमात्माच जर झोपला असेल तर आत्म्याची जबाबदारी वाढणारच ना ! त्यांची सर्व कामे आता आपल्यालाच पार पाडावी लागणार. आता आपल्यालाच परमात्मा व्हावे लागणार.
जर परमात्मा व्हायचे असेल तर त्याचे गुणदोष अभ्यासावे लागणार. ( चुकलंच. फक्त 'गुणच' ! कारण "तो" पूर्ण आहे ना, त्याच्याकडे 'दोष' असणारच नाहीत. )
आणि आपल्यातील दोष काढून टाकावे लागणार.
यासाठीच तर आहे,
*चातुर्मास संकल्प !*
आपले आरोग्य शंभर वर्षे टिकून रहावे, यासाठी काहीतरी योग्य विचार करावा लागेल...
यासाठी ही चार महिन्यांची विश्रांती !
पुनः नव्याने, आपलं काय चुकतंय हे शिकण्यासाठी !
आधी आणावा लागेल *संयम*
त्यासाठी करावा लागेल *संकल्प*
संकल्पपूर्तीसाठी करावे लागेल *तप*
मिळवायचंय *वैराग्य*
कारण.....
उपभोग घ्यायचाय *आयुष्याचा*
आणि मिळवायचाय *आनंद*
*शाश्वत आनंद*
कुछ पाने केलिए कुछ खोना पडता है, कुछ छोडना पडता है ....
या निमित्ताने काही संकल्प करावेत !
मनावर संयम येण्यासाठी
इंद्रियावर संयम येण्यासाठी
अवयवांना ताब्यात ठेवण्यासाठी
शतायुषी होण्यासाठी
केवळ शतायुषी नव्हे, तर औषधांशिवाय शतायुषी होण्यासाठी !
अध्यात्मिक ग्रंथात अनेक संकल्प दिलेले आहेत, वांगी, पावटे, गाजर, बीट, हरभरे, गहू, पडवळ, कांदा, लसूण, मटण, चिकन, मासे, इ.इ. खाऊ नयेत, आपल्याला ही सगळी यादी वाचली तर प्रश्न पडतो, मग खायचे काय ? कारण आपण एवढे विषयाच्या आहारी गेलेलो आहोत, की क्षणभर सुद्धा हे विषय बाजूला जाऊ नये असे आपल्याला वाटते. हे पदार्थ बंद करायचे म्हणजे शक्यच नाही असे वाटते, हा *मोह*. जीभेला मोह आहे.
जीभ हा एकमेव अवयव असा आहे, जो ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय. म्हणून एका जीभेवर संयम ठेवला तर ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये ताब्यात येतात.
यातून जे मिळते त्याला म्हणतात *वैराग्य* इंद्रियांचे विषय त्यांना उपभोगायला द्यायचे नाहीत, समोर असून खायचं नाही, उपभोग घ्यायचा नाही, हा संयम येण्यासाठी *चातुर्मास* करावा. आपल्याला जसा जमतोय तसा करावा, एखादी गोष्ट भगवंतासाठी सोडावी, फक्त चार महिने.
शारिरीक आणि मानसिक आरोग्याचा विचार केला तर काही संकल्प सुचवतो.
बघा, एखादा संकल्प फक्त चार महिन्यांसाठी करायला झेपतोय का ?
* कोणताही एक आवडीचा खाद्यपदार्थ सोडणे.
* आठवड्यातून एक दिवस मौनात रहाणे.
* नियमितपणे बारा सूर्यनमस्कार घालणे.
* बारावेळा लोटांगण, बारा प्रदक्षिणा.
* रात्रीचे जेवण सूर्यास्तापूर्वी करणे.
* हाॅटेलिंग / विकतचे बाहेर खाणे बंद.
* बेकरी पदार्थ विकत घेणे बंद.
* जाणीवपूर्वक दररोज एका गरजूला मदत करणे.
* दररोज सत्पात्री दान करणे.
* कोणत्याही आध्यात्मिक ग्रंथाचे नियमितपणे वाचन करून त्यावर दिवसभर चिंतन करणे.
* जागेपणी ठरवून घेतलेल्या वेळेत मोबाईलला हातही न लावणे.
* कोणाही एका नवीन व्यक्तीला योग शिकवणे
* स्वतःचे जेवलेले ताटवाटी कप ग्लास धुवुन ठेवणे.
* घरातील दोन कामे, जी आधी करत नव्हता, ती जाहीरपणे करणे.
* जेवताना शिजलेल्या अन्नाची निंदा न करणे
* अन्न ताटात न टाकणे.
यासारखा आणखी कोणताही एक संकल्प आपण ठरवून तो घरात जाहीर करावा, म्हणजे तो पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू होतील.
आपली सेवा पांडुरंगा चरणी नक्की कामी येईल, असा विश्वास आहे.
पांडुरंग हरि वासुदेव हरि
वैद्य सुविनय दामले कुडाळ सिंधुदुर्ग
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"