*।। श्री राम जय राम जय जय राम ।।*
*🚩श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर🚩*
*🌸 प्रवचने :: ११ जुलै 🌸*
*सत्पुरुष व त्यांचा अनुग्रह .*
सत्पुरुषाचा अनुग्रह झाला म्हणजे त्या व्यक्तीच्या प्रापंचिक आणि पारमार्थिक बाबतीत त्या सत्पुरुषाचीच सत्ता असते.
सरकारच्या हातात सर्व सत्ता असते, आणि राज्ययंत्र सुरळीत चालण्याकरिता एकेका खात्याकडे एकेक कामगिरी सोपविलेली असते.
कायद्याला धरून जोपर्यंत ते खाते आपले काम करीत असते, तोपर्यंत सरकार त्यात ढवळाढवळ करीत नाही.
फक्त क्वचित् प्रसंगी आणि विशेष कारणामुळेच, हस्तक्षेप करून सरकार आपल्या सत्तेचा उपयोग करते, आणि इच्छेप्रमाणे गोष्टी घडवून आणते. तोच नियम इथेही लागू आहे.
प्रापंचिक बाबतीत 'प्रारब्ध' हे एक खाते आहे, त्याचा संबंध देहापुरताच असतो.
प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार त्याला बऱ्यावाईट गोष्टी भोगाव्या लागतात.
सत्पुरुष होता होईल त्यांत ढवळाढवळ करीत नाही.
फक्त व्यक्तीच्या कल्याणाकरिताच जर जरूर असेल, तर सत्पुरुष त्यात ढवळाढवळ करील.
पण परमार्थाच्या बाबतीत त्याची सर्व सत्ता असते. आपण मात्र त्याने सांगितलेल्या साधनात राहून, त्याला त्याची कामगिरी करण्यात अडथळा न येईल असे वागणे जरूर असते.
हा अडथळा अनेक प्रकारचा असतो.
एक म्हणजे, त्याने सांगितलेल्या साधनाबद्दल शंका घेणे;
दुसरे, दुसर्याला अमुक एक दिवसात साधले, मला अजून का साधत नाही, असा विचार मनात येणे; आणि
तिसरे, सांगितलेल्या साधनापेक्षा काही अधिक किंवा कमी करण्याचा प्रयत्न करणे.
थोडक्यात म्हणजे, एकदा संताच्या पायावर डोके ठेवल्यावर, आपला प्रपंच आणि परमार्थ ही दोन्ही त्याच्याकडे सोपवून, प्रपंचात घडणार्या गोष्टी त्याच्याच इच्छेने घडताहेत अशी भावना ठेवून, आपले कर्तव्य करीत, त्याने सांगितलेल्या साधनात एकनिष्ठेने राहणे, हाच खरा मार्ग आहे.
संताच्या देहाकडे पाहण्याचे कारण नाही; त्याचा देह आमचे काम करीतच नाही. तो परमात्मस्वरूप आहे ही जी आपली भावना, ती आपले काम करते. संत अत्यंत दयाळू असतात.
सत्पुरुषाला भगवंत भेटलेला असतो. म्हणून, सत्पुरुष हा देहाने या जगात राहतो असे दिसले, तरी अंतर्यामी तो भगवंतापाशीच असतो. म्हणून आपण सत्पुरुषाकडे जात असताना या जगातल्या वस्तूविषयी वासना धरून गेलो, तर ते योग्य नव्हे.
सत्पुरुषाला त्याच्या लक्षणांवरून ओळखता येणार नाही. पुस्तकामध्ये दिलेली जी लक्षणे असतात, त्यांच्या पलीकडे संत असतो. त्याला ओळखायला आपल्या अंगी थोडे तरी भगवंताचे प्रेम आवश्यक आहे.
भगवंताचे प्रेम हे एक मोठे वेड आहे. जे ज्याला लागेल तो भाग्याचा खरा !
*१९३. भगवंताच्या दास्यात जे प्रेम आहे ते जगाच्या मालकीत नाही .*
*।। श्री राम जय राम जय जय राम ।।*
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"