*।। श्री राम जय राम जय जय राम ।।*
*🚩श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर🚩*
*🌸 प्रवचने :: १३ जुलै 🌸*
*देव आणि नाम भिन्न नाहीत .*
आपल्या अनुभवाला येईल तेच खरे जरी असले, तरी आपण त्या प्रमाणे वागतो का ? पुष्कळ गोष्टी वाईट आहेत असे आपल्या अनुभवाला येते, परंतु त्या करण्याचे आपण टाळतो का ? हाच तर आपला दोष आहे.
थोर पुरुषांचे मात्र तसे नसते. त्यांना जे अनुभवाला आले ते त्यांनी आचरणात आणून दाखविले, आणि म्हणूनच ते संत पदवीला गेले.
खरोखर संतांचे आपल्यावर केवढे उपकार आहेत !
जगातले सुख हे खरे सुख नव्हे, दुःखानेच सुखाचा घेतलेला केवळ वेष आहे तो, असे जेव्हां त्यांच्या अनुभवास आले, तेव्हा त्यांनी त्या सुखाकडे पाठ फिरविली आणि खर्या सुखाच्या शोधाला ते लागले.
परमेश्वर प्राप्तीतच खरे सुख आहे, असे त्यांना आढळून आले. त्या प्राप्तीचा अगदी सोपा मार्ग म्हणजे ईश्वराचे नाम. हेच, वेदकाळापासून तो आतापर्यंत सर्व साधुसंतांनी अनुभव घेऊन सांगितले आहे.
सद्गुरूकडून मिळालेले ईश्वराचे नाम प्रेमाने, भक्तिने आणि एकाग्रतेने घेतले, तर परमेश्वर आपल्याजवळ येऊन उभा राहतो, असा सर्व संतांनी आपला अनुभव कंठरवाने सांगितला आहे.
आपण तसे नाम घेतो का ? नामाकरिता नाम आपण घेतो का ? का मनात काही इच्छा, वासना ठेवून घेतो ?
कोणतीही वृत्ती मनात उठू न देता जर नामस्मरण केले तर देव काही लांब नाही. देव आणि नाम ही दोन्ही भिन्न नाहीतच; नाम म्हणजे देव आणि देव म्हणजेच नाम. एकदा मुखात आले म्हणजे देव हातात आलाच.
मुले पतंग उडवितात, एखादा पतंग आकाशात इतका उंच जातो की तो दिसेनासा होतो. तरी तो पतंग उडविणारा म्हणतो, 'माझ्या हातात आहे पतंग.' कारण पतंगाचा दोरा त्याच्या हातात असतो.
जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे, तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहे. ती दोरी सुटली की परमेश्वर सुटला.
आपल्या नामस्मरणाला एक गोष्टीची अत्यंत जरूरी आहे. आपल्या जीवनात परमेश्वरावाचून नडते असे जोपर्यंत आपल्याला वाटत नाही, तो पर्यंत आपले नामस्मरण खरे नव्हे. परमेश्वरच आपल्या जीवनाचा आधार, त्याशिवाय आपण जगूच शकत नाही, अशी वृत्ती बाणल्यावर होणारे नामस्मरण तेच खरे नामस्मरण. आपली स्थिती तर याच्या अगदी उलट ! परमेश्वरावाचून आपले कुठेच अडत नाही अशा वृत्तीने आपण नामस्मरण करतो. मग परमेश्वर तरी कसा येईल ?
परमेश्वराचे नाम हेच आपल्या जीवनाचे सर्वस्व समजून नाम घेतले, तर जीवनाचे सार्थक झाल्यावाचून राहणार नाही.
नामाने भगवंताची प्राप्ती होणारच ही खात्री असावी. अशा नामालाच 'निष्ठेचे नाम' असे म्हणतात.
*१९५. भक्त, भगवंत व नाम ही तिन्ही एकरूपच आहेत. जेथे नाम आहे तेथे भक्त आहे, व तेथेच भगवंत आहे .*
*।। श्री राम जय राम जय जय राम ।।*
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"