Thursday, January 24, 2019

स्वानुभव हीच खात्री*


**स्वानुभव हीच खात्री*

एक फकीर फिरत फिरत एका गावात येतो. दमून भागून एका झाडाखाली विश्रांतीसाठी बसतो. तेवढ्यात त्या झाडाचं एक पान त्याच्या डोक्यावर पडतं आणि त्याच क्षणी त्याला आत्मज्ञान प्राप्त होतं. तो आनंदाने बेभान होऊन नाचायला लागतो. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आर्किमिडीज जसं "युरेका, युरेका" म्हणत नग्न अवस्थेतच बाथरूम मधून रस्त्यावर नाचत नाचत आला होता ना तसं...सगळ्यांना आश्चर्य वाटतं. त्यापैकी एक जण त्याला विचारतो, "बरंय ना बाबा तुला? आला तेव्हा बरा वाटत होता, असं अचानक काय झालं तुला?" मग त्यानं घडलेली हकीगत सगळ्यांना सांगितली. हा..हा म्हणता बातमी पसरली. मग काय...झाला ना गाव गोळा सगळा.. बसले सगळे वेडे झाडाखाली. कारण करायचं तर काहीच नव्हतं, पान पडलं डोक्यावर की झालं...मिळालं आत्मज्ञान.

विनासायास, फुकट मिळायला लागलं ना की स्वतःची अक्कल चालवायची गरजच वाटत नाही कुणाला. असो.

काही जणांच्या डोक्यावर पान पडलंही वाऱ्यामुळे.. 
पण कुठं काय झालंय? बरं खोटं म्हणावं तर फकीराचं उदाहरण तर डोळ्यासमोरच होतं.. पण मग आपलं का नाही झालं, याचं उत्तर मात्र कुणाकडेच नव्हतं. फकिराचं झालं, कारण त्याची वेळ आलीच होती, पान पडणं हे तर निमित्तमात्र होतं..

"निमित्त", म्हणजे खोटं कारण. जसा अर्जुन होता महाभारतात, निमित्तमात्र.. असो.

आपलंही तसंच होतंय... कुणी आपल्याला त्याचा अनुभव सांगितला की आपल्यालाही वाटतं की, मला पण तो अनुभव यावा. कुणी म्हटलं की हे स्तोत्र खूप प्रभावी आहे, हा मंत्र खूप भारी आहे, की लागले मागे त्या मंत्राच्या... अनुभव ही व्यक्तीसापेक्ष गोष्ट असते, त्याला आला तसाच आपल्याला कसा येईल बरं?? प्रत्येकाचं प्रारब्ध, पापपुण्य, संचित, भाव हा वेगवेगळा असणार की नाही? 

तुमची जिथं श्रद्धा, प्रेम आहे ना त्याच शक्तीचा तुम्हाला अनुभव येईल नेहमी. असं कोण न कोण तुम्हाला भेटत राहीलच आणि त्यांचे अनुभवही सांगत राहतीलच, त्यानं एवढं हुरळून जाऊ नये. 

अनुभव हा श्रद्धेतून जन्म घेत असतो. आपण जी उपासना करतोय, त्यावरच आपली श्रद्धा नाही, त्यामुळेच अनुभव येत नाही. प्रत्येकाला दुसऱ्याचीच बायको सुंदर वाटते ना, तसाच हा काहीसा प्रकार आहे... विचित्र मानसशास्त्र आहे.

काही दिवस रामरक्षा म्हणायची, कुणी अजून काही म्हटलं की शाबरी कवच म्हणायचे. कुणी अजून काही... आयुष्य संपून जाईल, पण काहीच मिळणार नाही. जर १०० फुटांवर पाणी लागणार असेल तर एकाच ठिकाणी १०० फूट खणाल का १ फुटाचे १०० खड्डे खणाल??

तुलना करायची घाणेरडी सवय असते प्रत्येकाला. प्रत्येकाचं आपलं एक वैशिष्ट्य असतंच की नाही?? गुलाबाचं फुल डोक्यात घालतात, झेंडूच्या माळा करतात, मोगऱ्याचा गजरा करतात. झेंडूचा गजरा करायचा प्रयत्न नका करू. प्रत्येक उपासना आपल्या जागी श्रेष्ठ आहे, पण आपल्या विचारानेच त्याला आपण कमीपणा आणतो. मन हे फार बेइमान असतं बरं. आपलं काम झालं नाही की देवच बदलायचा, हे कुठलं गणित? शेवटी सगळ्या नद्या समुद्रालाच जाऊन मिळतात ना??

एकदा समर्थ श्रीरामदास स्वामींकडून ज्याने गुरुमंत्र घेतला होता, असा माणूस श्रीतुकाराम महाराजांकडे आला आणि म्हणाला की, "मला गुरुमंत्र द्यावा." तुकाराम महाराजांनी आपल्या अंतर्ज्ञानाने सगळं जाणलं आणि म्हणाले की, "ठीक आहे, पण तू तुझ्या गुरूंना मंत्र परत देऊन ये, मग मी देतो." मग आला हा दिडशहाणा समर्थांकडे आणि म्हणाला की, "मला तुमचा गुरुमंत्र परत करायचा आहे, याच्यात ताकद नाही." समर्थ हसले आणि म्हणाले की, "ठीक आहे. जा आणि चूळ भरून टाक त्या दगडावर." त्यानं तसं करताच त्या दगडावर सुवर्ण अक्षरात गुरुमंत्राची अक्षरे उमटली. मग त्याला पश्चात्ताप झाला आणि त्याने समर्थांची माफी मागितली.

चंचलता आणि अस्थिरता हे मनाचं स्वरूप आहे. जितकी घाई कराल, तितकाच उशीर होत जाईल, हे विचित्र सत्य आहे. फलाकांक्षा ठेवून केलेली भक्ती माणसाला अधीर बनवते. जितकं मन फळासाठी आतुर, तितकंच ते श्रद्धाहीन असतं.

परमार्थातील एक खूप मोठं सूत्र/ रहस्य सांगतोय आता, ते म्हणजे सोपवणे. तुमच्या हातात जे काही आहे, ते केलंय ना तुम्ही? मग आता सोपवून द्या. कुणावर..? ते महत्वाचे नाहीय, नसतंच. देवावर सोपवा किंवा एखाद्या दगडावर सोपवा, त्यानं काहीच फरक पडत नाही. तुमचं काम सोपवण्यात होतं... कुणावर? हा प्रश्नच नसतो. त्याच्याशी तुम्हाला काय घेणं आहे? सोपवणे म्हणजे काय?? तर निर्धास्त असणं, काळजी सुटणं. आपण फक्त तोंडाने म्हणत असतो की, देवावर सोपवलंय, स्वामींवर सोपवलंय आणि रात्रभर काळजीनं झोप येत नाही. ह्याला सोपवणे म्हणायचं का? आपण काळजी करायची नसते, फक्त घ्यायची असते. आपण काळजी केली की, मग तो नाही करत काळजी. त्याचं काम त्याला करू द्या ना. तुम्ही काळजी करून काही होणार आहे का? होतं का? झालंय का कधी? काळजी वाटणं स्वाभाविकच आहे, ही चुकीची धारणा आधी मनातून काढून टाका. आपणच खांबाला धरून बसायचं आणि खांबच मला सोडत नाही म्हणून रडत बसायचं, याला काय अर्थ आहे? 

काळजी सोडली की, 'काळ', पण आपल्यापुढे 'जी', 'जी' करत हाथ जोडून उभा रहातो. 

म्हणून तर शिख बांधव म्हणतात ना, "सत् श्री अकाल".
म्हणजे काय... तर जो कालातीत आहे, तोच सत्य आहे.

।। श्रीगुरुदेव दत्त ।।
🌸🌷🌳

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"