*दानपेटी*
तो त्या दानपेटीत दररोज पांच रुपये टाकायचा .
त्याचे ते नियमित देवळात येणे , देवाला नमस्कार करणे आणि दानपेटीत पांच रुपये टाकणे तिथल्या विश्वास्थांच्या ध्यानात आले होते . त्याच्या साध्या कपड्यावरून व सायकलच्या वापरावरून तो निम्नवर्गीय गरीब भक्त आहे हे सहज लक्षात येत होते . कधी कधी तो आपल्या बायकोला व एका मुलीला बरोबर घेऊन यायचा . तेंव्हासुद्धा कापूर , बुक्का , उदबत्ती न घेता पाच रुपये पेटीत टाकायचा . एखाद्या दिवशी नाही आला तर दुसऱ्या दिवशी दहा रुपये पेटीत न चुकता पडायचे . त्याच्या या नित्यक्रमात कधी खंड पडल्याचे तिथल्या पुजाऱ्याने आणि विश्वस्थानी पाहिले नव्हते . त्यामुळे तो आदराचा विषय झालेला होता .
अशी वीस वर्षे संपली . महागाई किंवा उत्पन्नातील वाढ याचा त्याने आपल्या दानपेटीतील पाच रुपयात कधी बदल केला नाही किंवा वाढ केली नाही . आता तर रस्त्यावर लहानमोठे सर्व स्कुटर , मोटार सायकल घेऊन दिमाखात येत व ऐटीत निघून जात . मात्र त्याच्या सायकलीवरून येण्याजाण्यात कधी फरक पडला नाही . सध्या त्याचे आयुष्य थोडे ओढग्रस्त असावे असे जाणवत होते . तरीही दानपेटीतील पाच रुपयांचा नित्यक्रम त्या गरीबाने चुकविला नाही . त्याची मुलगी मोठी झाली होती व कदाचित तिची काळजी त्याला सलत असावी . कधी कोणाजवळ बोलला मात्र नाही . त्याला देवळाच्या ओट्यावर शून्यात नजर लावून बसलेला अनेक वेळा त्या विश्वस्थानी पाहिले देखील . मात्र हा आपणहून कोणाशी बोलत नसे किंवा आपले दुखडे सांगीत नसे . सध्या तो जास्तच चिंताक्रांत दिसत होता .
एके दिवशी देवळाच्या विश्वस्थानी हिय्या केला व आपुलकीने त्याला विचारले की सध्या असे चिंताक्रांत का असता ? तुमचे काम सुटले आहे काय ? कसली चिंता भेडसावत आहे ? तो कसनुसे हसला . बोलला ," कांही नाही हो , मुलीचे लग्न ठरलेय व पैशाची जोडणी कांही झालेली नाही . स्थळ चांगले आहे . हातचे जाऊ नये असे वाटतेय . पण आता हात तरी कोणाकडे पसरायचे ? मी हा असा पैशाने दुबळा . कामाचा मालकही फारसे कांही उचलून द्यायला तयार नाही . म्हणून काळजीत आहे , इतकेच . बघू देव यातून कसा काय मार्ग काढतोय ते ?"
" अरे पण खर्च तरी किती आहे ?" विश्वस्थ .
"पंचवीस-तीस तरी नक्की लागणार हो ." तो
त्या दिवशी काय झाले कुणास ठाऊक . त्या विश्वस्थाच्या डोक्यातून तो विषय कांही जाईना . रात्री झोपतानाही त्याचाच विचार . रात्री वरचेवर जाग आल्यामुळे झोपदेखील नाही झाली . पहाटे त्याला एक स्वप्न पडले . स्वप्नात पाच रुपयांची नाणी तो मोजत होता . जागा झाला व स्वप्न जसेच्या तसे त्याला आठवू लागले , खाऊ लागले . त्याने देवाकडे पाहिले . तो चोरासारखा बेरकी हसत असलेला त्याला दिसला . तो पटकन उठला . वही घेतली व हिशोब करू लागला . एकूण वर्षे वीस . एकूण दिवस ७३०० . दररोज रुपये पाच ने झाले ३६५००/- . त्याने ३६५००/- ची एक थैली तयार केली व शांतपणे झोपी गेला . झोपेत पुन्हा तेच स्वप्न ! तो जागा झाला व आठवू लागला . पाच रुपयांची नाणी आपण मोजत होतो हे स्वच्छपणे त्यास आठवले . दानपेटीतील जमा पैसे आपण एफडी'त ठेवतो हेही त्यास आठवले . त्यांनी हिशोब केला . सरासरी जमा रुपये १८२५०/-. वर्षाचे अंदाजे व्याज २०००/- . वीस वर्षांचे झाले ४००००/- म्हणजे सरळ व्याजाने त्या गरीबाच्या दररोजच्या पाच रुपयांचे मुद्दलासह होतात रुपये ७६५००/- आणि हा चिंताक्रांत आहे पंचवीस हजारासाठी !
तो विश्वस्थ आता निश्चिन्त झाला होता . त्याने देवाच्या तिजोरीतून शहाहत्तर हजार पाचशेची थैली तयार करून ठेवली . आता त्यास शांत झोप लागली . नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो गरीब देवळात आला . त्याने देवाला नमस्कार केला . तिथल्या दानपेटीत रुपये पाच टाकले व ओट्यावर जाऊन बसला . तो विश्वस्थ देवळातील आणखी कांही सज्जनांना घेऊन तिथे आला व त्याने ती थैली त्या गरिबाला दिली . सांगितले ," बाबा रे , तू दररोज देवाला पाच रुपये प्रमाणे या वीस वर्षांत ३६५००/- रुपये वाहिलेस . वीस वर्षांत त्याचे ७६५००/- रुपये झालेत , जे देवाकडे सुरक्षित आहेत . आज तुझी नड आहे व देवाची इच्छा आहे की ते तुला उपयोगी पडू देत . म्हणून तुझे पैसे तू मोजून घे !"
गरीब चकित झाला . त्याला दिवसा उजेडी जसे कांही मोठे स्वप्न पडले होते . तो ती थैली घेऊन देवाजवळ गेला व रडू लागला . सर्वजण खूप भावूक झाले . देव प्रसन्न हसत होता . गरीबाचा पाय देवळाबाहेर निघत नव्हता . तो मात्र थैली घेऊन तिथेच बसून राहिला . त्याची पत्नी व मुलगी त्याला शोधत देवळात आली . त्याने घडलेले वर्तमान त्या दोघींना सांगितले . त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले . बघणारे सर्वजण देवाचा जयजयकार करू लागले . आता पत्नी व मुलगी त्याला घरी चला असे विनवू लागली . पण त्याचा पाय तिथून निघत नव्हता . 'माझे दान देवाने परत तर नाही केले ?' असे त्याचे मन त्यास खाऊ लागले . काय करावे त्याला सुचेना . त्याने विश्वस्थाना बोलावले व मी जे देवाला पाच रुपये वाहिले त्याचे वीस वर्षात किती होतात असे विचारले . त्यांनी सांगितले की ३६५००/- होतात . गरीबाने थैलीतील ३६५००/- रुपये काढले व पुन्हा त्या दानपेटीत टाकले . आता त्याच्या चेहऱ्यावरील ताण नाहीसा झाला . सर्व उपस्थित चकित झाले . त्यांनी त्याला विचारले की हे तू काय केलेस ? तो बोलला ," मी देवाला जेवढे वाहिले तेवढे परत करतोय . तो माझ्यासाठी देवाला मी दिलेला नैवद्य होता . उद्याचा माझा पाच रुपयांचा नैवद्य आता मी निश्चिन्त मनाने देवास वाहीन . अन्यथा माझ्या येणाऱ्या रात्री मी तळमळत काढल्या असत्या . आता मला शांत झोप लागेल . देवाने दिलेल्या या उरलेल्या पैशात माझ्या मुलीचे लग्न थाटामाटात होईल . आता मी घरी जातो आहे ."
आणि प्रसन्न चेहऱ्याने ते कुटुंब घरची वाट चालू लागले . देवाचा प्रसन्न चेहरा मात्र आणखी उजळला होता ! थेंबाथेंबाने साठविलेली कोणतीही गोष्ट ; मग ते पैसे असोत किंवा देवाचे आशीर्वाद असोत , कालांतराने अशी महाकाय होत असते व आयुष्यातील कठीण वेळा सहज दूर करते ! ओम नमः शिवाय ।।
आनंद बावणे . इचलकरंजी .
मो . ९४२०१५२११० .
(आवडल्यास अवश्य शेअर करा .)
...
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"