-----------------------------------------------------
*भक्तांशी प्रत्यक्ष संवाद साधणारा पंचमुखी श्रीगणेश, सातारा.*
---------------------------------------------------
सातार्याच्या शहरभागात सदाशिव पेठ आहे. बाजारपेठेचा हा विभाग असून येथे प्रताप मंडळाचे पंचमुखी श्रीगणेश मंदिर आहे. दुतर्फा विविध दुकानांची दाटी असलेल्या रस्त्यावरील या मंदिराचे व्यवस्थापन 'पंचमुखी श्रीगणेश मंदिर ट्रस्ट' पाहते. श्रीगणेश मूर्ती अत्यंत विलोभनीय, पंचमुखी, संगमरवरी आहे. हा गणपती बाजारपेठेत स्थापिला असल्याने मंदिराची लांबी-रूंदी फारच मर्यादीत असून पुढे भाविकांची गर्दी वाढू लागल्यानंतर मंदिर काही वाढविता येणारे नाही.
गर्भगृहाबाहेर दानपेटीसमोर पादुका ठेवलेल्या आहेत. त्यावर फुले वाहिली जातात. या पादुका श्रीगणरायाच्या आहेत, असे मानून भाविक भक्तिभावाने त्यांची पूजा करतात. अर्थात, हा प्रकार थोडा वेगळा व इतर कोणत्याही गणपती मंदिरात पाहावयास मिळणार नाही, अशा स्वरूपाचा आहे. श्रीगणेश मूर्तीची प्रतिष्ठापना कोणाच्या हस्ते झाली, याची माहिती मिळताच पादुकापूजन पद्धतीचा उलगडा होतो!
या पंचमुखी श्रीगणेश मूर्तीची स्थापना माघ शुद्ध चतुर्थी शके १८९८, रविवार दि. २३ जानेवारी १९७७ ला अक्कलकोट क्षेत्रीचे सद्गुरू श्रीगजानन महाराज यांच्या हस्ते झाली. श्रीगजानन महाराज हे अक्कलकोटच्या श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या गादीवरील हे अधिकारी पुरुष. त्यांना गणेशावतार मानणारे भक्तगणही आहेत. त्यांच्या हस्ते श्रीगणेश मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर भाविकांना गर्भगृहासमोर उभे राहून पूजा करताना समाधान मिळावे या अर्थाने पादुका ठेवण्यात आल्या. वस्तुत: छोटी धातुची गणेशमूर्ती ठेवणे, जास्त इष्ट ठरले असते. मुख्य मूर्तीच्या पुढ्यातच त्याचीच पंचधातुची प्रतिकृती असलेली उत्सवमूर्तीही बर्यापैकी मोठी आहे.
या मूर्तीसमोर उभे राहिल्यावर मन प्रसन्न होते. गणरायाच्या तीन शुंडा डावीकडे वळलेल्या तर दोन शुंडा उजवीकडे वळलेल्या आहेत. हे असेच का, याचे उत्तर मूर्ती बनवताना तसे सांगितले म्हणून, अथवा मूर्तीकाराने ती तशी बनविली, यापलिकडे मिळणारे नाही. याप्रमाणेच सांगली जिल्ह्यातील विटा येथे पंचमुखी श्रीगणेशाचे मंदिर आहे. मध्यप्रदेशात नर्मदा तीरावर ओंकारमांधाता श्रीॐकारेश्वर मंदिराच्या प्रांगणात श्रीगणेश मंदिर पंचमुखी गणरायाचे आहे.
आज मंदिर असलेल्या ठिकाणी पूर्वी उकिरडा होता. त्याला प्रतिबंध करावा, असे येथील कार्यकर्त्यांनी ठरविले. त्याप्रमाणे १९७७ला हे गणेश मंदिर बांधण्यात आले. फार सुंदर, उंच असे हे मंदिर आहे. आतल्या बाजूस साधारण बारा फूट उंचावर महिरपवजा कोनाडे असून त्यात महाराष्ट्रातील प्रसिद्ध अष्टविनायकाच्या मुर्ती आहेत. मंदिराच्या बाहेरच्या अंगास दोन्ही बाजूला पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. त्यावर सिद्धिबुद्धिच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. अपुर्या जागेमुळे अशी ही तोड काढण्यात येऊन सिद्धिबुद्धिची बाहेर व्यवस्था करण्यात आली असावी. कोरलेली चित्रे म्हणून पाहाणार्यास भले आनंद मिळत असेल; गणेशपत्नी असलेल्या या देवतांसाठी ती जागा योग्य नव्हे, असे वाटते.
या गणेशासमोर धार्मिक विधी मोठ्या प्रमाणावर केले जातात. दरवर्षी माघगणेश जयंतीला फार मोठा उत्सव साजरा केला जातो. प्रतिपदेपासून चतुर्थीपर्यंत श्रीगणेश याग, सहस्त्रावर्तने, श्रीसत्यविनायक महापूजा केल्या जातात. अनेक मनोरंजनपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
या मंदिरात श्रीगणेशाला सांगितला जाणारा नवस वैशिष्ट्यपूर्ण असतो. आपला नवस मोठ्या आवाजात श्रीगणरायाला सांगण्यात येतो.
माहिती संदर्भ :-जागृत व नवसाचे गणपती- १०८ गणेश दर्शन
------------------------------------------------
*संकलन :- सतीश अलोणी @*
-------------------------------------------------
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"