*🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹*
*🏵श्री स्वामी समर्थांची बखर🏵*
*--------------------------------------------*
*संकलन - सदानंद पाटील, रत्नागिरी.*
*--------------------------------------------*
*७) महाराजांचे रुपवर्णन (पुढे चालू)*
*श्रीस्वामी महाराजांचा जन्म कोठे झाला, ते लहानाचे मोठे कोठे झाले, त्यांची मातापितरे कोण होती, जात कोण, देश कोण, त्यांनी दिक्षा कुठे घेतली यांतील एकाही गोष्टीचा पत्ता लागला नाही. त्यांनी संन्यास कुठे व केव्हा घेतला, त्याचाही पत्ता लागला नाही. ते संन्यासी होते आणि केव्हा केव्हा वेदांतील किंवा पुराणातील वाक्ये म्हणत. यावरून ते ब्राम्हण असावे, असे अनुमान होते. ते ब्राम्हण- शूद्र- यवनाकडेही भोजन करीत. त्यांची कांती दिव्य, तेज:पुंज होती. शरीराचा वर्ण गौर असून तांबूस होता. ते आजानुबाहु होते. त्यांचे अंगचे तेज इतके प्रखर होते की, त्यांजकडे एकसारखी दृष्टी लावून कोणाच्यानेंही पहावत नसे. दर्शनास लोक येत ते त्यांच्या पायांवर डोके ठेवून देवाप्रमाणे दर्शन घेत. एकदा पायांवर डोके ठेवू लागला म्हणजे एखादेवेळेस मोठा चमत्कार होई. तो असा की, डोके व महाराजांचे हात यांत एका जवाएवढे अंतर राहिले आणि महाराजांचे मनांत दर्शन देण्याचे नसल्यास एकदम "हाट् " असें म्हणत. त्याचबरोबर दर्शन घेणारा घाबरून उलथा- पालथा मागल्या मागे पडून जाई. याप्रमाणे अनेक वेळा अनेक जनांची धांदल उडे. महाराजांचे दर्शन म्हणजे मोठे दिव्य होते. विशेषकरून जारिणी स्त्रिया समोर जाण्यास फार भीत असत. केलेल्या पापांची महाराजांपुढे तेव्हाच झाडणी होई. गालीप्रदान देऊन जारीणींचे व जाराचे नांवही महाराज प्रकट करीत. एकवेळ एका थोर घराण्यातील, पुत्र मागून घेणारी बाई, महाराजांजवळ आली. बरोबर दास- दासी, सेवकजन पुष्कळ होते. त्यांनी "पुत्र व्हावा" म्हणून श्रींची प्रार्थना केली. महाराजांनी उत्तर दिले, "अगे, मज जवळ कशाचा मुलगा ? तो तुझा यार बसला आहे, तो तुला मुलगा देईल !" सदर बाईचा व एका ग्रहस्थाचा फंद असल्याचे मग कळून आले. राजा व रंक महाराजांस सारखे होते. अक्कलकोट चे मामलेदार, न्यायाधिश, कोतवाल, फारतर काय, राजेसाहेब यांसही श्रीमुखात खाण्याचे प्रसंग केव्हा केव्हा येत असत. डोकीचे पागोटे काढून फेकून देणे, शिव्या देणे वगैरे खेळ महाराजांचे हमेशा चालायचे. पण कोणाची बिशाद होती की, महाराजांपुढे कोणी ब्र काढील किंवा हुकुमाची अवज्ञा करील !*
*अहाहा ! वाचक हो, हे लिहित असतां मूळ लेखक म्हणतो, 'महाराजांचे रागाची आठवण होऊन मलाही कापरे भरले व लेखणी चालत नाहीशी झाली. श्री समर्थांचे चरणीं मस्तक ठेवून, माफी मागून, त्यांचे आज्ञेने गुणानुवाद वर्णन करीत आहे.' महाराजांस पाहिल्याबरोबर ते देवरुपी आहेत, अशी मनाची खात्री होई. दुसरी गोष्ट अशी की, महाराज वाटतील तशी अचाट कृत्ये करीत ; परंतु कोणत्याही वेळी त्यांचे अमृतदृष्टीने अपघात किंवा विपरित गोष्ट घडून आल्याचे एकही उदाहरण कोणाचे ऐकण्यात आलेले नाहीं.*
*🌹स्वामीभक्त वैकुंठवासी श्री.गोपाळबुवा केळकर यांचे श्री स्वामीसमर्थांची बखर मधून साभार.*
*🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"