॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
अध्याय -५०
गुरुनिंदा केल्याने दारिद्रय प्राप्ति
एक वृद्ध ब्राह्मण पोटदुखीच्या त्रासाने कुरुगड्डीस श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आला. त्याच्या वेदना एवढया असह्य होत्या की त्याला त्या वेदना सहन करण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरे असे वाटू लागले.
नामस्मरण महिमा
त्या ब्राह्मणाने श्रीपादांचे दर्शन घेऊन आपली व्यथा दूर करण्याची अत्यंत कारूण्य पूर्ण वाणीने प्रार्थना केली. तेंव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले ''अरे विप्रा, तू पूर्वजन्मी अनेक लोकांना आपल्या कठीण वाणीने दुखविलेस. अनेकांना आपल्या हृदयभेदी कठोर शब्दांनी घायाळ केलेस. त्या कर्माचे फलस्वरूप तुला या जन्मी ही पोटदुखीची व्याधि जडली आहे मानवास या कलियुगात वाकदोषा पासून मुक्त होण्याचा ''नामस्मरण'' हा एकच मार्ग आहे. भगवंताच्या नामस्मरणांने वायुमंडळ शुध्द होते. मी कुरुगड्डी येथे नामस्मरण महायज्ञाची सुरवात करणार आहे. त्या नामाबरोबर ''श्रीकार'' ही जोडणार आहे. यामुळे चिरस्थायीपणे परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी अशा चारी वाणी नियंत्रित होतील. जे भक्त ''दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा'' आणि ''श्रीदत्ता दिगंबरा'' असे मन:स्फुर्तीने नामस्मरण करतील त्यांना मी अत्यंत सुलभ पणे प्राप्त होऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करीन.'' त्या व्याधिग्रस्त ब्राह्मणाला श्रीपाद प्रभूंनी तीन दिवस तीन रात्री कुरुगड्डी येथे राहून ''दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा'' असा जप करण्यास सांगितला. या आदेशा प्रमाणे तो वृद्ध ब्राह्मण तीन दिवस व तीन रात्री कुरुगड्डीस राहिला व अत्यंत श्रध्दाभावाने त्याने जप केला. त्या ब्राह्मणाची पोटदुखी कमी झाली. श्रीपाद म्हणाले, ''वायुमंडलास आज पूर्वीसाखेच वाग्जल भरून आहे. आपण उच्चारलले प्रत्येक वाक्य प्रकृतीतील सत्व, रज, तम या तिन्ही गुणांनी किंवा एक अथवा दोन गुणांनी परिपूर्ण असते. या त्रिगुणात्मक सृष्टीचा पंचमहाभूतांवर वाईट प्रभाव पडतो. ही पंचभूते दुषित झाली की संपूर्ण अंतराळ दुषित होते. यामुळे मानवाकडून पापकर्म घडून तो दरिद्री होतो. या दारिद्रयामुळे त्याच्याकडून पुन्हा पापकर्म घडते. या पापामुळे मन दूषित होऊन दान, धर्म लोकसेवा अशी सत्कर्मे त्याच्या कडून न घडल्यामुळे पुन्हा दारिद्रय येते. हे दुष्ट चक्र असे चालूच राहते.
त्रिकरण शुध्दीची आवश्यकता
मानवास दारिद्रयापासून मुक्तता अथवा पापकर्मापासून विमुक्ति हवी असल्यास त्याचे काया, वाचा, मन शुध्द असावयास हवे. यालाच त्रिकरण शुध्दि असे म्हणतात. आपल्या मनात जे असेल तेच वाणीतून बाहेर पडावे. मनात दुष्ट भाव आणि वाणीने अगदी मधुर बोलणे असा दुटप्पीपणा नसावा. आपल्या वाणी प्रमाणेच आचरण सुध्दा अगदी पवित्र असावे. त्रिकरण शुध्दि पावलेला मानव महान पदाला जाऊन पोहोचतो. मनात एक असणे, वाणीतून दुसरेच उच्चारण करणे आणि या दोहो पेक्षा वेगळेच आचरण करणे अशा व्यक्तीस दुरात्मा असे म्हणतात. या कलियुगात जीवन सागर तरून जाण्यास ईश्वराने अनेक मार्ग सांगितले आहेत. यात ''नामस्मरण'' हे अत्यंत सुलभप्राय साधन आहे. नामस्मरण करणाऱ्या साधकाची वाणी मधूर असते. नामस्मरण न करणाऱ्याचे मन सुध्दा अशुध्द असते. नामस्मरणाच्या योगाने पवित्र कर्म करण्याची प्रेरणा मिळते.
कर्म विमोचन
एक क्षयरोगाने ग्रस्त असलेला गृहस्थ कुरवपुरला आला. त्याला मधुमेहाचा आजार आणि त्या बरोबर दुसऱ्या अनेक व्याधी होत्या. त्याला पाहून श्रीपाद प्रभूंना खूप राग आला. तो पूर्वजन्मात एक कुख्यात चोर होता. त्याने अनेक निरपराध लोकांची संपत्ती हिरावून घेऊन त्यांना निर्धन केले होते. एका उपवर कन्येच्या पित्याने तिच्या विवाहासाठी संपत्ती जमा करून ठेवली होती. ती या दुष्ट चोराने हिराऊन नेली. त्यामुळे त्या कन्येचा विवाह होऊ शकला नाही. वर दक्षिणा देण्यास धन नसल्याने योग्य वर मिळू शकला नाही. शेवटी एक वृद्ध वर वरदक्षिणे शिवाय लग्नास तयार झाला. या विवाह प्रस्तावामुळे त्या तरूण उपवर कन्येने आत्महत्या केली होती. पूर्वजन्मीची अशी कर्मे असलेला तो क्षय रोगी अत्यंत दीन अवस्थेत श्रीपादांच्या जवळ आला आणि त्याने मोठ्या कारूण्यपूर्ण वाणीने श्रीपाद प्रभूंना त्या दुर्धर व्याधीतून सुटका करण्याची विनंती केली. दयावंत श्रीपाद प्रभूंनी त्याला पंचपहाड येथील गोशाळेत झोपण्यास सांगितले. तेथे डासांचा अत्यंत त्रास होता. तहान लागल्यास पिण्यासाठी पाणी सुध्दा नव्हते. त्या रात्री त्याला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात एक राक्षस त्याचा गळा दाबून मारत असल्याचे दिसले. तो घाबरून उठला इकडे तिकडे पाहिले आणि ते स्वप्नच असल्याची खात्री झाल्यावर पुन्हा झोपला. त्याला पुन्हा एक स्वप्न पडले. एक मोठा दगड त्याच्या छातीवर ठेवला असून त्याच्यावर एक बलवान मल्ल बसलेला दिसला. या दोन्ही स्वप्नामुळे त्याच्या कर्म फलाचा परिष्कार होऊन तो आपल्या क्षय रोगापासून व दुसऱ्या व्याधिपासून मुक्त होऊन निरोगी झाला. अनेक वर्षे क्षयरोगाने ग्रस्त अशा रोग्यास श्रीपाद प्रभूंनी स्वप्नात शिक्षा देऊन कर्मविमुक्त केले.
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"