Friday, May 17, 2019

श्रीपाद वल्लभ चरित्र अमृत :- अध्याय -43

॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ 
अध्याय -४३
श्री अनघालक्ष्मी वर्णन - श्रीपादांची वैष्णवी माया
श्री भास्कर पंडितांनी रात्रीच्या वेळी आपली आराधना वगैरे संपवून बोलण्यास सुरवात केली. ते म्हणाले ''अहो महोदय ! विद्योपासना ही सर्वश्रेष्ठ आहे. विद्योपासनेला वयाचे बंधन नसते. श्रीपाद श्रीवल्लभ वास्तवीक पहाता महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली स्वरूप आहेत.'' या वक्तव्यावर मी म्हणालो, ''श्रीपाद प्रभू श्री पद्मावती वेंकटेश्वर स्वरूप आहेत असे आपण पूर्वी सांगितले होते. आता या त्रिमाता सुध्दा तेच आहेत असे म्हणता. तसेच त्यांना अनघालक्ष्मी समवेत अनघदेव असे सुध्दा म्हटले जाते. मला याचा बोध होत नाही तेंव्हा सर्व कांही विस्तार पूर्वक सांगा.''
श्रीपाद प्रभूंचे विराट स्वरूप
तेंव्हा ते महा पंडित म्हणाले, ''बंधुनो ! परमात्मा सर्व जीवराशी मध्ये विद्यमान आहे, असे शास्त्राचे वचन आहे. पिपीलिकेपासून ब्रह्मापर्यंत तो सर्वांत व्यापून आहे. श्रीपाद प्रभूंच्या अवतारात ते पिपीलिका रूपात आणि ब्रह्म रूपात दोन्ही मध्ये आहेत. म्हणून सर्व सृष्टीत सृष्टी रूपाने ते उभे आहेत. ते संपूर्ण जीवराशीतील चैतन्यात तादात्म्य स्थितिशी एकरूप होऊन असतात. हीच त्यांची विशेषता आहे. ते सर्व राशीत जीवराशी रूपाने राहून सुध्दा कोणत्याही जीवात त्यांचा स्पर्श जाणवत नाही. हीच त्यांची वैष्णवी माया आहे. सृष्टीची मर्यादा, परिमितता या संबंधी कांही नियम मानण्यात येतात. श्रीपाद प्रभूंचे महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली रूपात असणे म्हणजे त्या चैतन्य रूपात ते व्यक्त होतात. ते चैतन्य रूप ते स्वत:च असतात. ज्या रूपाची अभिव्यक्ति होते त्या स्वरूपात ते आपल्या योगमायेने निरंतर तादात्म्य स्थितीत असतात. ते जेंव्हा महासरस्वतीचे चैतन्य घेऊन तादात्म्य स्थितीत असतात, तेंव्हा चर्तुमुखी ब्रह्म स्वरूपाशी तादात्म्य पावतात. महासरस्वती असो अथवा हिरण्यगर्भरूपाने असो, ते स्पर्श बंधनात असतात. याच प्रमाणे एकच आत्मा चार-पाच पुरुष रूपात सुध्दा अविर्भूत असू शकतो. या आत्म्याची शक्ति स्त्री रूपाने एकाच वेळी चार-पाच रूपात सुध्दा आविर्भूत होऊ शकते. तसेच पुरुष रूपाला, स्त्री सुध्दा सगुणसाकार रूप घेऊन विधि निर्णयानुसार निश्चित केलेल्या मर्यादेचे कटाक्षेने पालन करते. या प्रमाणे श्रीपाद प्रभू अनघालक्ष्मी समवेत अनघदेव होऊन वास्तव्य करतात ते त्यांचे अर्धनारीश्वर रूप आहे. सध्या ते श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने यतीश्वराच्या रूपात आहेत. सगुण साकार रूपातील मर्यादा, परिमितता, ते न चुकता पाळतात ही धर्माची सूक्ष्मता आहे. धर्म वेगळा आणि धर्मसुक्ष्मता वेगळी असते. श्रीपाद प्रभूंनी दिव्य अनुभवांचा विशेष वर्षाव करण्यासाठी सृष्टीरूप धारण केले आहे. सृष्टीत असलेल्या तादात्म्य स्थिती मुळे मानवाला त्वरित गती मिळू शकते. हे त्याचे तात्पर्य आहे. श्रीपाद प्रभू जप, ध्यान, तपस्या करीत आणि त्याचे सर्व फल स्वत: न घेता सृष्टीला देत. भक्तांची आधिव्याधीतून सुटका करण्यासाठी ते आपले तपोफळ वाहून त्यांची कर्मबंधनातून सुटका करतात. जगन्नाथ आपल्या चार शक्ति महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली, राजराजेश्वरी या विश्वातील दैवाभिव्यक्तीसाठी , विश्वपरिपालनासाठी अविर्भूत करतात. अंबिका देवीला तीन स्थिती असतात 1) अतीत स्थिती 2) विश्व स्थिती 3) शक्ति स्थिती. सृष्टीचे कार्य चालण्यासाठी पराशक्ति अतीत स्थितीत असते. परमात्म्यात असलेल्या अनंत सत्त्याना ती आपल्यात आकर्षित करून आपल्या चैतन्यात मिसळून त्यानंतर सृष्टीत जन्म घेते. नुसते जन्म घेऊन तिचे कार्य पूर्ण होत नाही. ती सर्व जीवांना निर्माण करून त्यांना आपल्यात घेऊन, त्यांच्यात प्रवेश करून बळ देते. हा तिचा विश्वस्थायी स्वभाव आहे. व्यक्ति स्थायी असल्याने ती मानवी व्यक्तित्वाला दिव्य प्रकृतीच्या मधे मध्यवर्ती अशी राहते. हेच अनघालक्ष्मीरूपांत अविर्भवण्याचे रहस्य आहे. तिच्या मूलतत्वातून थोडासा अंश भाग घेऊन ती अवतार घेते. त्या अंशाच्या निर्वाहण्याचे काम पूर्ण झाल्यावर त्या अंशाला पुन्हा मूळ तत्त्वात आकर्षुन घेते. अनघदेवाच्या संकल्पाशिवाय अनघालक्ष्मी एखादे छोटे कार्य सुध्दा करू शकत नाही. पण तीच प्रभूंचा प्रत्येक संकल्प पूर्णपणे पूर्णत्वास नेते. श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात माता आणि पिता ही दोन्ही रूपे असल्याने त्यांचा विशेष अनुग्रह असतो. अनघालक्ष्मीच्या मुख्यत: तीन भूमिका आहेत. पदार्धगोलाविषयी असणारी सच्चिदानंद भूमिका. या भूमिकेत या ठिकाणी अनंत अशी स्थिती, अनंत अशी शक्ति , अनंत असा दिव्य आनंद भरून असलेले लोक असतात. या भूमिकेतून या जीवाचे वर्णन करण्यास शब्द असमर्थ ठरतात . या सच्चिदानंद भूमिकेत खालच्या स्थितीत परिपूर्ण असा दिव्य चैतन्य सृष्टी लोक आहे. या भूमिकेत अनघालक्ष्मीची दिव्य चैतन्य महाशक्ति असते. वेदामध्ये या विश्वाचे महाश्लोक असे वर्णन केले आहे. या लोकातील कर्माना अपयश नसते. प्रत्येक प्रक्रियेत ज्ञान, शक्ति प्रयत्न न करता परिपूर्णतेस जाते. येथे दिव्य अशा आनंदाचा अनुभव निरंतर येतो. येथे असत्य, बाधा, दु:ख, पिडा ह्यांचा संपूर्ण अभाव असतो. या भूमिकेच्या खाले एक अज्ञान भूमिका आहे. येथील जनसमुदायात अज्ञान असते. येथील लोकामध्ये सुध्दा मन, जीव, शरीर असते परंतु त्यांचा अनुभव अपरिपूर्ण, परिमित आणि वैफल्याने युक्त असतो.
राजराजेश्वरी महिमा
राजराजेश्वरी चैतन्य मातृमूर्तीमध्ये अनंतमयी करुणा ओतप्रोत भरलेली आहे. सर्व भक्तगणांना ती आपल्या बालका प्रमाणे मानते. प्राणमयी, मनोमयी भूमिकेत अज्ञानी असणाऱ्या जीवांना ''असुर'' म्हटले जाते. ते भित्रे, आत्मनिग्रही आणि तपस्वी असलेले अहंकारी असतात. प्राणमयी भूमिकेत अधिकारी पक्षात असलेल्याना राक्षस असे म्हणतात. त्यांची शक्ति अचाट असून त्यांचे भाव प्रचंड आणि तीव्र असतात. या शिवाय कांही खालच्या स्तरातील निम्न प्राणमय भूमिकेत असणारे जीव असतात त्यांना पिशाच किंवा प्रमादी असे म्हणतात. ते कोणतेही असुरी रूप आणि वेष धारण करू शकतात. खरे पाहता पिशाच ही कोणी व्यक्ति असू शकत नाही. केवळ एखादी इच्छा किंवा दुराशा अपूर्ण राहिली असता ती मनाचे काल्पनिक रूप असते. राक्षसांना बलवंत अशी प्राणमयी स्थिती असते. त्यांना ''मन'' असे काही नसते. जे दिसेल त्यालाच घट्ट पकडून धरण्याचा ते प्रयत्न करतात. कालीमातेचे रूप आपणास काळया, श्याम अशा प्राणमयी स्थिती द्वारा दिसणारे रूप असते. ''काली'' म्हणजे ''विध्वंसक शक्ति '' असते. सर्वाना दु:खी कष्टी करून, त्यांची छिन्न-भिन्न अवस्था करणारी ही अज्ञानी प्रकृती शक्ति आहे. महाकाली ही उन्नत भूमिकेत असते. ती साधारणपणे सुवर्ण रूपात असते. ती राक्षसांना महाभयंकर स्वरूपात दिसते. राजराजेश्वरी विवेकाची प्रतिनिधी आहे तर महाकाली बलशक्तीची प्रतिनिधी आहे. या मातेमध्ये विनाशाची अफाट शक्ति असते. ही शक्ति प्रकट झाल्यास विनाश आणि संघर्ष करूनच शांत होते. महाकाली ही काली माते पेक्षा वेगळी देवता आहे. ज्यावेळी साधकाला आपल्या साधनेत विघ्न आल्याचे समजते तेंव्हा त्याने आपल्या अंतरंगात असलेल्या महाकाली शक्तीला आव्हान करावे.
असुरी, काली, श्यामा, महाकाली इत्यादींचे स्वरूप
काली, श्यामा या आद्य प्राणशक्ति होत. काली ही विध्वसंकशक्ति होय, महाकाली ही सुवर्णवर्णा आणि असुरांना महाभयंकरी अशी आहे. राजराजेश्वरी विवेकाची स्वामिनी, तर महाकाली बलाची स्वामिनी आहे. महालक्ष्मीचे सौंदर्य अप्रतिम असते. विवेक आणि शक्ति संपूर्णपणे मिळविण्यासाठी सौंदर्य असणे आवश्यक आहे. हे नसल्यास आपल्या प्रयत्नांना पूर्णत्व येत नाही. परंतु कांही कांही ठिकाणी एखाद्या प्रकाराची समतोल अवस्था असते. या वेळी आपणास ती परिपूर्ण वाटते. यापेक्षा थोडया उन्नत अवस्थेत पोहोचल्यावर पुन्हा तेथे आपणास नविन परिस्थिती अनुभवास येते. त्यांना अनुसरून नविन समतोल स्थिती प्राप्त होते. ही अवस्था आपणास परिपूर्ण वाटते. या अवस्थेची महालक्ष्मी प्रतिक आहे. विवेकामध्ये परिपूर्णता येऊन बल आणि शक्तिमध्ये परिपूर्णता न आल्यास पूर्व सिध्दी अनुकुल नसते. याच कारणाने परिपूर्ण परिपूर्णता साधण्यासाठी विवेक, बल, सौंदर्य आणि परिपूर्णता या चार गुणांची आवश्यकता असते. मनुष्याला गूढ असलेले रहस्य म्हणजे दिव्य सामरस्यपूर्ण सौंदर्य. हे संपूर्ण विश्वाला व्यापून असणारा चिद्विलास आहे. केवळ महालक्ष्मीच्या अनुग्रहाने या विविधतेने नटलेल्या सृष्टीतील वस्तु, शक्ति आणि जीवजंतु एकात्मतेने राहतात. या एकात्म स्थितीतच त्याना आनंदाचा लाभ होतो ती विविध प्रकारच्या वस्तु, शक्ति आणि जीव यांची लयबध्द आणि रूपबध्द वाढ करते. महालक्ष्मी परमप्रेम आणि परम आनंदाची आदि देवता आहे. त्याच प्रमाणे लक्ष्मी ही भौतिक वस्तुंच्या संचयाची प्रतिक आहे. महालक्ष्मी म्हणजे भौतिक वस्तु, जीव शक्ति यांना दिव्यानंदाच्या साम्राज्याकडे वळवून दिव्य जीवनाचा आनंद प्रदान करणारी महाशक्ति आहे. अनघालक्ष्मीची शक्ति पुर्णत: प्राप्त करण्यासाठी विवेक, बल आणि सौंदर्य या बरोबरच कर्मामध्ये सुध्दा कौशल्य असावे लागते. वेदामध्ये सरस्वती मातेची प्रशंसा आहे. दशविद्येमध्ये तिला मातंगी म्हणतात. तिची वैखरी वाणी असते. महासरस्वती निराळी असते. दिव्य नैपुण्य आणि आत्मचैतन्य कर्माचे महासरस्वती प्रतिक आहे. या महामातेच्या करूणेने आणि कृपा प्रसादाने आपली इष्ट कर्मे पूर्णत्वास जातात. तिने प्रसादिलेल्या दिव्य ज्ञानामुळे आपली कर्मसिध्दी होण्यासाठी उपयोग होतो. आत्मचैतन्याचा अन्वय कसा करायचा याचे ज्ञान होते. अनेक शक्तींच्या सामरस्याने आनंदाची प्राप्ति कशी होते ते कळते. परिवर्तनता, परिपूर्णता या सारख्या अति दुर्गम अशा विषया बद्दल तसेच अति सूक्ष्म विषया बद्दलचे ज्ञान महासरस्वतीवर दृढ श्रध्दा ठेवल्याने आपणास प्राप्त होऊ शकते. हे श्रोत्यांनो ! आनंद हा परमेश्वराशी संबंधित विषय आहे परंतु अत्युच्च आनंद हा योग्यांनाच येणारा अनुभव आहे. निरीच्छ योग्याला मिळणारा हर्ष हाच होय. सर्व जीवांना सुख आपापल्या पूर्व सुकृतानुसार प्राप्त होते परंतु प्रत्येक सुखाच्या मागे दु:ख हे ठरलेलेच असते.
अनघा देवीच्या व्रताचे दत्तभक्तांकडून आचरण
श्री अनघा देवीचे रूप हे लक्ष्मी देवीचेच प्रतिरूप आहे. तिच्या मध्ये राजराजेश्वरी, महालक्ष्मी, महाकाली या देवतांची लक्षणे ओतप्रोत भरलेली आहेत. श्री अनघा देवीचे एक विष्णुरूपही आहे. त्याच्यात परमेश्वराची, दत्तात्रेयाची लक्षणे परिपूर्ण भरलेली आहेत या मुळेच अनघा देवीच्या आराधना समवेत विष्णुरूप अनघाची आराधना केल्यास सर्वफल प्राप्ति होते. ''अनघाष्टमी'' हे व्रत दत्तभक्तांना अत्यंत आदरणीय आहे. या व्रताच्या आचरणाने सर्व सुखांची प्राप्ति होते.
''श्रीपाद प्रभूंची महती-दत्त आराधनेचे माहात्म्य''
हे श्रोतेहो ! श्री अनघादेवीच्या समवेत असणारे अनघरूप विष्णु म्हणजेच श्री श्रीपाद प्रभूंचा अवतार आहे. ते सर्व सामान्य जनांच्या बौध्दिक, मानसिक आणि आत्मिक चैतन्याच्या अत्यंत निकट असतात. ते सर्वगामी असून भक्तांच्या हाकेला तत्काळ धावून येतात. ते आपल्या भक्तांची आणि आश्रितांची दु:खे नष्ट करून त्यांना सुखाची प्राप्ति करून देतात. दशमहाविद्यांची आराधना केल्याने मिळणारे फळ केवळ श्रीपादांची किंवा दत्तात्रेयांची आराधना केल्याने तत्काळ प्राप्त होते. दुसऱ्या देवांची श्रध्दाभावाने आराधना केल्यास इष्ट फल प्राप्ति होते परंतु श्री दत्तात्रेयांची आराधना तत्काळ फलदायिनी आहे. दत्तात्रेय हे सर्व देवांचे स्वरूप असून ते चतुर्युगातील महान अवतार आहेत. त्यांचा महाअवतार समाप्ति नसलेला असून ते अत्यंत सुलभ साध्य आहेत.
श्रीपाद चरित्रामृत लीला
हे शंकरभट्टा ! तू रचना करीत असलेल्या पवित्र ग्रंथाचे महापुरुष आणि महायोगी सुध्दा अध्ययन करतील. ते त्यांच्या संबंधित व्याकरणाने त्याचा अर्थ लावतील. योग संपन्न विभूती या ग्रंथाचा अभ्यास करून ज्ञान संपादन करतील. सर्व सामान्य भक्त या ग्रंथाचे पारायण करून इहलोकीचे व परलोकीचे सुख, वैभव आणि समृद्धी प्राप्त करतील. हा अक्षर सत्य ग्रंथ असल्याने त्या मधील प्रत्येक अक्षर हे बीजाक्षर, शक्ति युक्त आहे. या ग्रंथाचे कोणत्याही भाषेत श्रध्दा, भक्तियुक्त अंत:करणाने पारायण केल्यास इष्ट फल प्राप्ति होते. हा महाग्रंथ त्या महाप्रभूंचे प्रत्यक्ष अक्षर स्वरूप आहे.
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"