Friday, May 17, 2019

श्रीपाद वल्लभ चरित्र अमृत :- अध्याय -41

॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ 
अध्याय -४१
परिव्राजकाचा वृतांत
श्री भास्कर पंडित म्हणाले ''श्रीपाद श्रीवल्लभ हे महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली, राज राजेश्वरी स्वरूप आहेत. त्यांच्यातील देवीतत्व त्यांचे अनुष्ठान करणाऱ्यांना कळते.'' मी भास्कर पंडिताना प्रश्न केला ''हे आर्य ! परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी अशा चार वाणी असतात असे मी ऐकले आहे. त्या बद्दल कृपा करून विस्ताराने सांगा. यावर भास्कर पंडित म्हणाले'' अंबिका प्रतिवाक्यद्वारा व्यक्त होत असते. ती प्रत्येक मनुष्या द्वारे, प्रत्येक व्यक्तिद्वारे बोलत असते. आपणास कानाद्वारे ऐकू येणारे वाक्य स्थूल असते. एखादे वेळी वाक्य मुखाच्या बाहेर अजिबात ऐकू येत नाही, आतच केवळ ओठांच्या हालचाली वरून आपणास अर्थबोध होतो तेंव्हा तिला ''मध्यमा'' वाणी म्हणतात. या मध्यमा पेक्षा अजून थोडी सूक्ष्म असणारी वाणी तिला ''वैखरी'' म्हणतात. कंठाच्या आतील वाणी गळया पर्यंत येते. तेथून बाहेर येऊ शकत नाही अशी वाणी जी आतच म्हणजे मनातच घोळते तिला ''पश्यंती'' वाणी असे म्हणतात. या पश्यंतीहून सुध्दा सूक्ष्म असणारी, नाभीत निर्विकलपणे राहून संकल्प मात्र असणारी वाणी म्हणजे ''परा'' वाणी होय. अंबिकेची त्रिपुरभैरवी स्वरूपात सुध्दा आराधना करतात. गुणत्रय, जगत्रय, मूर्तीत्रय, अवस्थात्रय या सर्वांची आदिशक्ति त्रिपुरभैरवी आहे. बाळांनो ! आपण श्रध्देने आत्मसमर्पण करून संपूर्ण शरणागती पत्करली असता, या लोकात किंवा अदृश्य लोकात कोणत्याही प्रकारचे शत्रुत्व आडवे आले असता आपले काहींच नुकसान होत नाही. विरोध शक्ति केवळ भौतिक जगतातच परिमित नसतात तर त्या प्राणमय, भौतिकमय, मानसिकमय, अध्यात्मिकमय सुध्दा असतात. आपण जेवढी प्रगति करू इच्छितो तेवढी प्रगती साधल्यावर त्या त्या लोकात आपण भौतिक प्रपंचात ज्या प्रकारे जीवन जगतो त्या लोकात सुध्दा तसेच जीवन जगू शकतो.मनुष्याला प्रगति करावयाची असेल तर श्रध्दा हवी, जीवन मूल्यांवर संपूर्ण विश्वास हवा. आपण आपले जीवन विश्वासाच्या आधारावरच जगत असतो. आपल्या संकट काळी परमेश्वराचे सहाय्य नक्की मिळेल आणि तोच त्या संकटातून मुक्तता करेल असा आपला दृढ विश्वास असावा. हा विश्वासच आपणास एक प्रकारच्या सुरक्षिततेची जाणीव उत्पन्न करून आपला आत्मविश्वास वृध्दिंगत करतो. शक्तिहीन ज्ञान निर्लेपतेकडे वहात जाते. ज्ञानहीन शक्ति आंधळी असून ती विनाशाला कारणीभूत होते. यासाठी आपण ज्ञान संपादन करून प्रकृतीच्या बंधनातून मुक्त झाले पाहिजे. शक्ति अनुग्रहानंतर परिपूर्णता साधली पाहिजे. सांख्य मार्गात चैतन्याला पुरुष म्हटले आहे. कर्म करणाऱ्याला प्रकृती म्हटले आहे. खालच्या अवस्थेत या दोघात विरोध असतो. चैतन्य असते ते कर्म करीत नाही आणि प्रकृतीला ज्ञान नसते. प्रकृती आणि पुरुष ही दोघे मिळूनच सृष्टीचे कार्य चालवितात. या दोघांनाही अपंगत्व आहे. चैतन्य पाहिले तर ते लंगडे आहे आणि प्रकृती आंधळी आहे. सर्व लोकांत आंधळेपण आणि लंगडेपण कसे व्यापून आहे हे समजावून सांगण्यासाठी श्रीपाद प्रभूंच्या कुटुंबात एक भाऊ आंधळा आणि एक भाऊ लंगडा जन्माला आले होते. हे दोघे आंधळे आणि लंगडेपणाचे प्रतीकच होते. उन्नत स्थितित पोहोचल्यावर पुरुष व प्रकृती हे दोन्ही ''ईश्वर'' ''ईश्वरी'' या नांवाने ओळखले जातात तेंव्हा या दोघांमध्ये विरोध नसतो. श्रीपाद प्रभू योग्य वेळी, योग्य काळी आपल्या बंधूंचे अपंगत्व दूर करतील यात शंकाच नाही. लोकांमधील अंधत्व आणि पंगुत्व घालविण्याच्या बृहहदत्तर कार्याची सूचना स्वरूप म्हणून ते हे कार्य करतील. अतीत अशा स्थायी रूपात असलेल्या पुरुष-प्रकृतींना ब्रह्म माया असे संबोधिले जाते. श्रीपाद प्रभूंनी वयाच्या सोळाव्या वर्षी वैराग्य धारण करून घराचा त्याग केला आणि धर्म प्रचारासाठी घराबाहेर पडले. ते स्वत: ब्रम्ह आणि तेच माया असल्याचे सामान्य जनास समजावून सांगण्याचा उद्देश त्यांच्या गृहत्यागामागे होता. अपरिमित आणि अनंत गुण असलेल्या ब्रह्म स्वरूपास परिमितता आणणारी शक्ति म्हणजे माया. श्रीपाद प्रभूंचा पीठिकापुरम येथे जन्म घेण्याचा उद्देश, ते अपरिमित ब्रह्म स्वरूपाचे असल्याने मायेसमोर न झुकता परिमित व्यवहार केल्याचे सूचित करणे, हा होता. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ते मायेच्या बंधनात न पडता केवळ भक्तांचा उध्दार करायचा हा संकल्प करून घरातून बाहेर पडले.संपूर्ण विश्वात श्रीपाद प्रभूंचा महिमा विस्तार पावल्यानंतर येणाऱ्या शताब्दीमध्ये त्यांच्या संकल्पाप्रमाणे पीठिकापुरमच्या रहिवाशांचा सुध्दा ज्ञानोदय होणार आहे. श्रीपाद प्रभूंची दिव्य चैतन्य शक्ति मानव चैतन्याचे अपंगत्व आणि प्रकृतीचे अंधत्व दोन्हीचे निवारण करील. श्रीपाद प्रभूंच्या लीला सामान्य मानवांना अनाकलनीय आहेत.एकदा एक संन्यासी कुक्कुटेश्वराच्या मंदिरात आला. तो दत्तात्रेयांचा भक्त होता. तो दत्तदीक्षा सुध्दा देत असे. दत्तदीक्षा घेतल्याने आपले नियोजित कार्य अडचणी न येता सिध्दिस जाते असे त्याने आपल्या वक्तव्यात सांगितले होते. पीठिकापुरमच्या अनेक ब्राह्मणांनी दत्तदीक्षेचा स्विकार केला. तो संन्यासी दीक्षा देऊन साधकाकडून दक्षिणा स्वीकारीत असे. त्या दक्षिणेतील कांही भाग तो त्याच्या कडून दीक्षित झालेल्या ब्राह्मणांना देत असे. अनेक ब्राह्मण आणि इतर कुलस्थांनी विचार विनिमय करून दत्तदीक्षा घेतली आणि गुरुदक्षिणा दिली. परंतु मंदिरात आलेल्या कांही लोकांत दत्तदीक्षा घ्यावी का नाही यावर वाद सुरु झाला. ब्राह्मण परिषद, क्षत्रिय परिषद, वैश्य परिषद यांचे एक संयुक्त संम्मेलन झाले. त्या सम्मेलनाचे अध्यक्ष श्री बापनाचार्युलु होते. ते म्हणाले श्री दत्तात्रेय प्रभु सर्वांचेच आहेत. त्यामुळे सर्वजण दत्त दीक्षा घेऊशकतात. अष्टादश वर्णांच्या सर्व लोकांना संन्यासी महाराजांकडून दीक्षा घेता येते. दीक्षा घेण्याची ही सुवर्णसंधि सगळयांना उपलब्ध आहे. यावेळी ब्राह्मण परिषदेतील काही लोकांचे असे मत होते की ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य लोक आचार संपन्न असल्याने ते दीक्षेस पात्र असतात. परंतु शूद्र वर्णाचे लोक अनाचारी असल्याने ते दीक्षा घेण्याचे अधिकारी नाहीत. त्यांच्या कडून दक्षिणा घेऊन आपण आपल्या तप:शक्तीने त्यांना शुध्द करू शकतो. यावर बापनाचार्युलु म्हणाले ''सर्व कुलामध्ये आचारवंत आणि अनाचारवंत दोन्ही लोक असतात. कोण आचारवंत आणि कोण अनाचारवंत हे सांगणे कठीण असते. त्यामुळे सामूहिक कल्याण, स्थैर्य, क्षेम यावर दृष्टी ठेऊन आपण दत्तहोम किंवा इतर यज्ञ यागादी कार्यक्रम करून संघातील क्षेम, स्थैर्य साधू शकतो. दक्षिणा घेऊन शूद्रांना दीक्षा न देणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय केल्या सारखे मला वाटते. दक्षिणा घेऊन आपण आपल्या तप:शक्तीने शूद्र लोकांना शुध्द करून घेतल्यावर ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य लोकांचा सुध्दा उध्दार करू शकतो. या प्रमाणे कोणत्याही कुळातील लोकांना व्यक्तिगत स्वतंत्र दीक्षा देण्याची आवश्यकता नाही. या शिवाय दक्षिणेची रक्कम खूप अधिक ठेवली आहे. प्रत्येक कुलात गरीब लोक असतात. ते एवढी रक्कम दक्षिणा म्हणून देऊ शकणार नाहीत. आपल्याला एवढी मोठी रक्कम दिल्यावर त्यांना कांही दिवस उपाशी राहावे लागेल. दक्षिणा ही ऐच्छिक असली पाहिजे. यथाशक्ति आणि श्रध्दायुक्त अंत:करणाने दिलेली दक्षिणाच दक्षिणा म्हणून स्वीकारली पाहिजे. तरच श्री दत्त प्रभू संतोष पावतील.''यावर तेथे जमलेले ब्राह्मण म्हणाले, आपण महाराज आपल्या गावी आल्यावर त्यांचे स्वागत पूर्णकुंभाने, वेद मंत्रानी केले नाही. महाराजांनी स्वत: जनहित भावनेने आपणा सर्वांना दत्त दिक्षा दिली. परंतु आपल्या ब्राह्मण परिषदेने मात्र त्यांना काही दिले नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे.यावर बापनाचार्युलु म्हणाले ''खरे तर परमहंस परिव्राजकाचार्य यांचे स्वागत करण्याची एक विशिष्ट पध्दत आहे. प्रथम त्यांच्या प्रधान शिष्यांकडून कांही दिवस अगोदर ब्राह्मण परिषदेस सूचना मिळाली पाहिजे. त्यावर परिषद संपूर्णपणे विचार करून, प्रधान शिष्यांशी बोलणी करून सर्व गोष्टी निश्चित करते. यामुळे प्रधान शिष्याची सर्वांशी ओळख होते. त्या नंतर परिषद एक निर्णय घेऊन योग्य अशा परिव्राजक शिष्याची निवड करते. त्यानंतर परमहंस परिव्राजक येण्याचे ठरवितात . तेंव्हा त्यांचे स्वागत वेदमंत्राने, पूर्णकुंभाने केले जाते. त्यानंतर त्यांच्या बरोबर शास्त्रचर्चा होते. यानंतर परिव्राजक महोदयाच्या सूचनेनुसार यज्ञ, याग, दीक्षा, किंवा प्रवचनाचे आयोजन होते. या प्रकारे पूर्वसूचना न देता परिव्रजकाचार्य कुक्कुटेश्वरास आले. आल्याबरोबर त्यांनी दीक्षेचा प्रस्ताव मांडला व गुरुदक्षिणा सुध्दा मागितली. हा सर्व आपल्या नियमांविरुध्द घडलेला प्रकार आहे.''यावर ब्राह्मण म्हणाले, ''नियमांचे उल्लंघन झाले या विषयावर चर्चा करण्याची ही वेळ नाही. आता तुम्ही किंवा तुमचे जावाई अप्पळराज शर्मा दीक्षा घेऊन दक्षिणा देणार आहात किंवा नाही ?'' यावर बापनाचार्युलु म्हणाले, ''सामुहिक स्थैर्यासाठी दीक्षा घ्यायचा आमचा विचार आहे. व्यक्तिगत क्षेम स्थैर्य या साठी नाही. आम्ही दीक्षा घेत नाही त्यामुळे दक्षिणा देणार नाही. ब्राह्मण लोकात ज्यांना दीक्षा घ्यायची आहे ते स्वेच्छेने घेऊ शकतात. ब्राह्मण परिषद ही सामूहिक समस्येसाठी असते. सामूहिक प्रयोजन असलेल्या विषयावर परिषद विचार विनिमय करते. व्यक्तिगत दीक्षा किंवा व्यक्तिगत समस्या या बद्दल विचार विनिमय करीत नाही.'' श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मा यांनी दीक्षा घेण्यास नकार दिला. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांना दीक्षा घेणे किंवा न घेणे हे त्यांच्या इच्छेवर सोडले होते.
श्रीपाद प्रभूंकडून दत्तदिक्षा
श्रीपाद प्रभूंवर श्रध्दा-भक्ति असणाऱ्या लोकांमध्ये काही शेतीचा व्यवसाय करणारे होते. या मध्ये प्रमुख असे वेंकटप्पय्या श्रेष्ठी होते. श्रीपाद वेंकटप्पय्याच्या घरी गेले आणि म्हणाले ''दत्तदीक्षा मिळाली नाही म्हणून कोणी निराश होऊ नका. मी दत्त दीक्षा देतो एवढेच नव्हे तर यथाशक्ति दक्षिणा सुध्दा मीच देईन. मंडल (40 दिवस) दीक्षेची गरज नाही. एक रात्री दीक्षा घेतली तरी पुरे.''श्रीपाद प्रभू एक दिवस वेंकटप्पय्याच्या घरी अष्टदशवर्णाच्या लोकांना दीक्षा देत होते. ही दीक्षा घेणाऱ्या साधकांत कांही ब्राह्मण, थोडे क्षत्रिय आणि कांही वैश्य होते
श्रीपाद प्रभूंचे दत्त स्वरूपात प्राकटय
श्रीपाद प्रभू बहुरूपी असून दत्त स्वरूपात प्रगट होण्याचा तो दिवस होता. तो श्रीदत्त प्रभूंचा आवडता वार, गुरुवार होता. दीक्षा दिलेल्या सर्व भक्तांना त्यांनी मंगलमय आशिर्वाद दिले. सर्वभक्तांनी मोठ्या श्रध्दा भावाने श्रीदत्त प्रभूंचे भजन अर्चन केले. यानंतर श्रीपाद प्रभूंनी आपल्या पुढील कार्यक्रमा बद्दल विस्तृत माहिती आपल्या भक्तगणांना सांगितली. श्रीदत्त प्रभूंचे स्मरण करता क्षणीच ते भक्तांना दर्शन देतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात असे त्यांनी भक्तांना सांगितले. त्यानंतर दुसरे दिवशी (म्हणजे शुक्रवारी) सकाळी मी नरसिंह वर्माच्या घरी गेलो. तेथे श्रीपादांचे मंगल स्नान चालू होते. स्नानानंतर नरसिंह वर्मानी श्रीपादांना खाण्यासाठी अनेक फळे आणून दिली. परंतु त्यांनी केवळ एकच केळी घेतली. ते सुध्दा वर्माच्या घरी असलेल्या गोमातेस दिली. यानंतर ते वेंकटप्पय्या श्रेष्ठींच्या घरी आले. येथे सुध्दा त्यांना मंगल स्नान घालण्यात आले. येथे श्रीपादांनी लोणी, दूध, ताक आणि सायीचा स्वीकार केला. तेथे ते म्हणाले ''माझे भक्त मला बोलावित आहेत. पीठिकापुरम् सोडून जाण्याची वेळ आता आली आहे.''वेंकटप्पय्यांच्या घरून निघून ते आपले आजोबा बापनाचार्युलुच्या घरी आले. तेथे सुध्दा त्यांनी मंगल स्नान केले. श्रीपाद श्रीवल्लभ प्रत्यक्ष दत्तस्वरूप आहेत. त्यांनी आपल्या भक्तांची दु:खे, पीडा, अडचणी दूर करण्यासाठी अवतार धारण केला आहे. त्यांनी आपल्या वक्तव्यात अनेक वेळा असे स्पष्टपणे उच्चारण केले होते. आपल्या दिव्य लीलांद्वारे जनता जनार्दनाच्या उध्दारासाठी निश्चित केलेल्या कार्यक्रमाची माहिती श्रीपाद प्रभूंनी आपल्या भक्तांना सांगितली. यानंतर ते स्वगृही आले. श्रीपाद प्रभूंचा पीठिकापुरम सोडून जाण्याचा मनोदय त्यांच्या आई वडिलांना कळला होता. त्यांनी श्रीपादांना समजावून सांगण्याचा पुष्कळ प्रयत्न केला परंतु श्रीपाद प्रभू आपल्या निर्णयावर अटळ होते. यानंतर श्रीपाद प्रभूंच्या माता-पित्यांनी त्यांच्या विवाहाविषयी बोलण्यास प्रारंभ केला त्यावेळी श्रीपाद म्हणाले ''मी आतापर्यंत अनेक वेळा श्रेष्ठी आजोबांना, वर्मा आजोबांना अनघालक्ष्मी समवेत दर्शन दिले आहे. त्या दिव्य दंपतीनी श्रेष्ठी आजोबांच्या आमराईत विहार केलेला सर्वांनी पाहिला आहे. हे पहा माझे अनघा लक्ष्मी समवेत दिव्य मंगलमय स्वरूप'' असे म्हणून श्रीपादांनी त्या दिव्य स्वरूपाच्या दर्शनाचा लाभ माता पित्यांना घडवून आणला. ते मंगलमय स्वरूप पाहून माता-पिता अगदी भारावून गेले. त्याच्या मुखातून शब्दच निघेना. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले ''मी अवधूत स्वरूपात आलो असताना सांगितले होते की माझा विवाह प्रस्ताव मांडताच मी घर सोडून निघून जाईन.'' एवढे बोलल्यानंतर श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या दोन मोठ्या भावांना स्पर्श केला आणि आपल्या अमृतमय दृष्टीने त्यांच्या कडे पाहिले. तत्काळ अंध असलेल्या बंधूस दृष्टी प्राप्त झाली आणि पायाने अधू असलेला बंधू अव्यंग होऊन चांगला चालू लागला. त्या दिव्य स्पर्शाने त्या दोघा बंधूना ज्ञान प्राप्ति सुध्दा होऊन ते ज्ञानतेजाने तळपू लागले. हे सर्व दृष्य पाहून श्रीपादांच्या माता-पित्यांना आश्चर्ययुक्त आनंदाचा धक्का बसून त्यांच्या मुखातून शब्दच फुटेनात. तेवढयात तेथे आजी राजमांबा आणि आजोबा बापनाचार्युलु तसेच वेंकटप्पा श्रेष्ठी आणि त्यांची धर्मपत्नी वेंकट सुब्बम्मांबा, नरसिंहवर्मा व त्यांची धर्मपत्नी अंमाजम्मा आले. श्रीपाद प्रभू सर्वाबरोबर आनंदात थट्टा मस्करी करीत बोलत होते. सुमती महाराणी तेंव्हा म्हणाल्या ''बाळा, श्रीपादा ! तू सर्व जवाबदाऱ्या पूर्ण करून जाईन असे म्हणाला होतास. तू अजून वेंकटप्पय्या श्रेष्ठींच्या घरची दुधबाकी, वत्सवांची दुधबाकी, मल्लादींची दुधबाकी पूर्ण केली नाहीस.'' यावर श्रीपाद म्हणाले ''आई ! तू म्हणतेस ते बरोबर आहे. या तीन वंशातील लोकांना मी कधी विसरणार नाही. मी जरी विसरलो तर तू आठवण करून दे. त्यांच्या कडून योग्य ती सेवा करवून घेऊन मी त्यांना वर प्रदान करीन. तुझ्या माहेरच्या कोणत्याही एका घरी मी जेवणासाठी येत जाईन परंतु दक्षिणा मात्र स्वीकारणार नाही. तुझ्या माहेरची माणसे माझ्याशी वात्सल्यपूर्ण भावाने वागतात आणि मला जावाई असे संबोधतात. मी हा मानवी संबंध स्वीकारून त्यांच्या बरोबर जावयास शोभेल असे प्रवर्तन करीन.'' एवढे बोलून श्रीपाद प्रभू आपल्या पित्याकडे वळले आणि त्यांना उद्देशून म्हणाले ''तात, आपल्या दंडिकोट वंशात अनेक वर्षा पासून वेदपरंपरा चालू आहे. आता माझे दोन्ही ज्येष्ठ बंधू वेदशास्त्र संपन्न होऊन मोठे पंडित झाले आहेत. ते आपली वेद परंपरा चालवतील. दंडिकोट वंशातील लोकांना मी कधीच विसरणार नाही.'' श्रीपाद प्रभू कांही क्षण डोळे मिटून बसले व नंतर म्हणाले, ''आपले श्रीधर शर्मा पुढील एका जन्मी ''समर्थ रामदास'' या नावाने एक महापुरुष होऊन महाराष्ट्र देशात जन्मास येतील. नरसिंह वर्मा छत्रपती शिवाजी या नावाने जन्म घेऊन महाराष्ट्रात राज्य स्थापित करून श्री समर्थ रामदासांचे शिष्यत्व पत्करतील. या प्रमाणे आपले पूर्व संबंध बंधुरूपात स्पष्टपणे कायम राहतील. समर्थ रामदास स्वामीच्यानंतर श्रीधरशर्मा शिवग्राम (शेगाव) क्षेत्रात गजानन नावांचा महायोगी होईल. त्याच्या मुळे शिवग्राम क्षेत्र महिमा अपरंपार वाढेल. रामराज शर्मा ''श्रीधर'' नांवाने जन्म घेऊन महायोगी होतील. श्रीधराची शिव परंपरा असलेल्या ह्या पीठिकापुरातील माझ्या अंगणात महासंस्थान निर्माण होणार आहे. वेंकटप्पय्या श्रेष्ठी बरोबर असलेले आपले ऋणानुबंध स्थिर स्वरूपाचे होतील. एवढेच नव्हे तर त्यानंतर वत्सवाई कुटुंबातील लोक सुध्दा येतील. येथे सावित्र पन्नाचे पारायण होईल.'' असे बोलून श्रीपाद प्रभू थांबले. त्यांना वेदाचे पठन अत्यंत प्रिय होते. कित्येक वेळा श्रीपाद प्रभू वेदांचे पठन चाललेले पाहून अंतर्लिन होत. त्यावेळी वेदपठन करणारे विप्रगण अत्यंत श्रध्दाभावाने श्रीच्या दिव्य मुखाकडे एकटक पहात वेदपठन चालू ठेवीत
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"