॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
अध्याय -४६
श्रीपादांच्या चरण पादुकेवरील मंत्राक्षता-मध्येवाढ पादुकांची श्री भास्कर पंडिताना भेट
आम्ही भास्कर पंडिताकडून परवानगी घेऊन प्रयाणास सिध्द झालो. भास्कर पंडित थोडया वेळ ध्यानस्थ झाले. श्रीपादांच्या पादुका भास्कर पंडितानी आपल्या देव घरात ठेवल्यास होत्या. त्या पादुकावर वाहिलेल्या अक्षता वाढत होत्या. ते पाहून आम्ही आश्चर्य चकित झालो. भास्कर पंडित म्हणाले ''हे श्रोत्यांनो ! श्रीपादांच्या लीला अगम्य आहेत. श्री पद्मावती मातेचे जन्मनक्षत्र मृग आहे. आणि श्री वेंकटेश्वराचे जन्मनक्षत्र श्रवण आहे. उत्तर फाल्गुनी नक्षत्र पद्मावती मातेस मित्रतारा आहे तर श्री वेंकटेश स्वामीना ते परममित्र तारा असल्याने त्यांचे लग्न नक्षत्र उत्तरा फाल्गुनी आहे. आजसुध्दा उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे. या दिव्य नक्षत्रावर श्रीपाद प्रभूंच्या चरण पादुकां वरील मंत्राक्षता वाढल्या. यावरून श्रीपाद प्रभू साक्षात पद्मावती आणि श्री वेंकटेश स्वरूपच आहेत. हे कळण्यासाठी त्यांनी ही लीला केली. यातील थोडया मंत्राक्षता तुमच्या जवळ ठेवा . त्या तुम्हाला शुभ ठरतील आणि श्री प्रभूंची कृपा तुमच्यावर सदोदित राहील.''
शंकरभट्ट आणि धनगुप्त यांच्या बरोबर देश पर्यटन
आणि विविध क्षेत्राचे दर्शन
आम्ही प्रवासाचा संकल्प करून बैलगाडीने प्रवास सुरू केला. ती बैलगाडी एका लग्न्राच्या वरातीची होती. या वरातीतील वैश्य प्रमुख, घोडा गाडीतून प्रवास करीत होते. ते ''कोंडविडू'' गावी जात होते. ते वैश्यप्रमुख धनगुप्ता म्हणाले ''आज फार शुभ दिवस आहे. तुम्ही बैलगाडीतून प्रवास करून श्रीपाद प्रभूंच्या मंत्राक्षता लग्न घरी दिल्या व नंतर आम्हालाही दिल्या.'' ते पुढे सांगू लागले ''मी एकदा व्यापाराच्या निमित्ताने पीठिकापुरमला गेलो होतो. तेंव्हा मला श्रीपाद प्रभूंचे दर्शन श्री वेंकटप्पा श्रेष्ठींच्या घरी झाले होते. त्या वेळी श्रीपाद प्रभू प्रेमभराने म्हणाले ''तुझ्या पुत्राच्या विवाह समयी मी मंत्राक्षता आशिर्वाद स्वरूप तुला पाठवून देईन. ज्यांच्याकडून मंत्राक्षता पाठविन त्या ब्राह्मणास दोन वराह दक्षिणा दे. या नंतर आम्ही कोंडविडू गावी पोहोचलो. तेथे धनगुप्ताच्या मुलाचे लग्न मोठ्या थाटात पार पडले. या ठिकाणी आमची ओळख एका हिरे मोत्याच्या व्यापाऱ्याशी झाली. धनगुप्त कोंडविडू या गावी थोडे दिवस राहिले. मी मात्र घोडागाडीने विजय वाटिका (सध्याचे विजयवाडा) या स्थळी आलो. या महाक्षेत्रात कृष्णा नदी असून श्री कनकदुर्गा व श्री मल्लेश्वर स्वामी यांचे मंदिर आहे. कृष्णानदी मध्ये स्नान करून मी देवदर्शन घेतले. देवीच्या देवळात मला एक वृद्ध संन्यासी भेटले. त्यांना अनेक दिवसांपासून पीठिकापुरमला जाऊन श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेण्याची तळमळ लागली होती. विजयवाटिकेतून निघून आम्ही दोघे कांही दिवसांनी राजमंडी क्षेत्री येऊन पोहोचलो. तेथे गोदावरी नदीत स्नान करून श्री माडेश्वराचे आणि कोटी लिंगेश्वराचे दर्शन घेतले. आमचा प्रवास श्रीपादाचे कृपेने अत्यंत सुखकर होत होता. मी माझ्याबरोबरच्या संन्याशाला म्हणालो, ''थोडयाच दिवसात आपण पीठिकापुरमला पोहोचू. तेथील श्रीपाद प्रभू अवतरीत झालेले त्यांचे घर पाहू. श्री वेंकटप्पा श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मा यांची भेट घेऊ या. श्रीपादांचे आजोबा श्री बापनाचार्युलु यांचे आशिर्वाद घेऊ. श्रीपाद प्रभूच्या माता सुमती महाराणी, पिता अप्पलराज शर्मा यांची भेट घेऊ या. त्यानंतर आपण पीठिकापुरमहून कुरगड्डीस जाऊन श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेऊ.''
संन्यासी अत्यंत आनंदित झाला होता. मार्गातील अनेक देवालयाचे दर्शन घेत आम्ही थोडयाच दिवसात पीठिकापुरमला पोहोचलो. श्री बापनाचार्युलुच्या घरी आमची राहण्याची व जेवणा खाण्याची व्यवस्था झाली. श्रीपादांच्या अनेक बाललीला आम्ही भक्त जनांच्या मुखातून ऐकल्या. श्रीपाद प्रभूंच्या असंख्य लीलांचे वर्णन करणे सहस्त्रमुखे असलेल्या आदि शेषाला सुध्दा कठीण आहे तेथे माझ्या सारख्या य:कश्चित ब्राह्मणाची काय कथा ?
श्रीपादांच्या भक्तांचे कुरगड्डीस प्रयाण
श्री नरसिंहवर्माच्या धर्म पत्नीने कुरगड्डीस जाऊन श्रीपादांचे दर्शन घेण्याचा संकल्प केला. याच संदर्भात त्यानी श्री वेंकटप्पा श्रेष्ठी आणि बापनाचार्युलु बरोबर चर्चा केली. सर्वानी मिळून एक मताने कुरगड्डीस जाण्याचा निश्चय केला. श्रीपादांचे माता-पिता, सुमती महाराणी आणि अप्पळराज शर्मा आपल्या पुत्राच्या भेटीची अत्यंत उत्सुकतेने प्रतीक्षा करीत होते. या सर्व मंडळींनी अठरा घोडागाडया ठरविल्या , त्यात बसून सामानासह एका शुभ दिनी प्रात:काळीच सर्वांनी प्रयाण केले. पिठापुरम् ते कुरगड्डी अंतर बरेच असल्याने प्रवासास कित्येक दिवस लागणार होते. सुमती महाराणीस आपल्या लाडक्या पुत्राचे मुख केंव्हा पाहीन असे झाले होते. त्यांच्या आठवणीने त्या मातेच्या डोळयात पाणी तरळले. सर्वांनी तिला आता आपण श्रीपादांना लवकरच भेटणार आहोत ना, असे सांगून तिचे समाधान केले. प्रवास चालूच होता.
आईवडील, आजी आजोबा यांना श्रीपाद प्रभूंचे पुन:दर्शन
सर्वांतर्यामी आणि मायानाटकसुत्रधारी असलेले त्रिकालदर्शी श्रीपादांना बसल्या ठिकाणी पीठिकापुरमहून येणारी मंडळी घोडा गाडीसह दिसत होती. प्रात:काळी निघालेल्या गाडया दुपारचे बारा वाजेपर्यंत चालतच होत्या. अचानक एक अद्भूत घटना घडली. गाडीवानासह सर्व मंडळींना एकदम मूर्च्छा आल्या सारखी वाटले. त्या सर्वांना आपल्या गाडया आकाश मार्गाने जात असल्यासारखा भास झाला. थोडया वेळाने मर्च्छा गेल्यावर आम्ही पाहिले तर एका अनोळखी प्रांतात आल्याचे जाणवले. गाडीतून खाली उतरून तो कोणता प्रांत आहे ते आम्ही पाहू लागलो. रस्त्याने येणाऱ्या एका वाटसरूस ते कोणते गाव आहे ते विचारले. तो म्हणाला, महाराज, ''हे पंचदेव पहाड गांव आहे. आज गुरुवार असल्याने आम्ही श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास गेलो होतो. त्या महाप्रभूंनी त्यांच्या दर्शनास आलेल्या प्रत्येक भक्ताला क्षेम कुशल विचारून त्याच्या आधिव्याधी दूर केल्या. दर्शनास आलेल्या सर्व भाविकांसाठी जेवणाची उत्तम व्यवस्था होती.'' असे सांगून तो वाटसरू आपल्या मार्गाने निघून गेला. आम्ही प्रात:काळी पिठापुरमहून घोडागाडीने निघालो होतो. आता दुपारचे साडेबारा वाजले होते आणि एवढया थोडया वेळात येथे कसे येऊन पोहोचलो याचे महदाश्चर्य वाटत होते. आम्ही नावेतून नदी पार करून कुरगड्डी गावात प्रवेश केला. हे स्वप्न आहे का वस्तुस्थिती आहे याचा आम्हाला भ्रम पडला होता. परंतु ही वस्तुस्थिती होती. आम्ही सर्वजण प्रभूंच्या दरबारात गेलो. सुमती मातेने श्रीपादांना मोठ्या वात्सल्यभावाने आपल्या हृदयाशी धरले. तिच्या नयनांतून आनंदाश्रू ओघळत होते ते श्रीपादांच्या पाठीवर पडत होते. श्रीपाद म्हणाले ''आई तू निर्गुण निराकार असलेला परतत्वाच्या मुलाची माता आहेस. तू अनसूया माते प्रमाणे पतिव्रता शिरोमणी आहेस.'' असे म्हणून त्यांनी आपल्या हाताने मातेचे अश्रु पुसले.
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"