Tuesday, May 21, 2019

श्रीपाद वल्लभ चरित्र अमृत :- अध्याय -45

॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ 
अध्याय -४५
श्री हनुमंताला भूमीवर अवतार घेण्याची अनुज्ञा-काशी क्षेत्रातील श्रीपाद प्रभूंच्या लीला
श्री भास्कर पंडितांच्या घरी आमचे मध्याह्न भोजन झाले. त्यानंतर त्यांनी सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले ''श्रोते हो ! श्रीपाद प्रभूंच्या लीला अतर्क्य आहेत. त्यांनी काशी नगरात अनेक महापुरुषांना आशिर्वाद दिले. त्यांना हव्या असलेल्या योगसिध्दि प्राप्त करून दिल्या. ते ऋषींच्या समुदायास उद्देशून म्हणाले, ''मी नृसिंह सरस्वती नावाने अजून एक अवतार धारण करणार आहे. मी पीठिकापुरत अदृश्य होऊन काशी क्षेत्री येण्याचे प्रबल कारण हे महापुण्य क्षेत्र आहे. सिध्द संकल्पाची येथे पूर्तता होते. मी दररोज गंगेत स्नान करण्यासाठी योग मार्गाने येत असतो. मी नृसिंह सरस्वती अवतारात येथेच संन्यास दीक्षा स्वीकारणार आहे. येत्या शतकात क्रिया योगाचे ज्ञान इच्छिणाऱ्या गृहस्थाश्रमी लोकांना बोध करण्याच्या निमित्ताने श्यामाचरण नावाच्या एका साधकाला येथे काशीत जन्म घेण्याचा आदेश देत आहे. येणाऱ्या युगात ब्रह्मज्ञानी हनुमंताला श्यामा चरणांजवळ क्रिया योग शिकण्यास सांगितले आहे. हे त्रिवार सत्य आहे.''
हनुमंताला सीता, राम, लक्ष्मण आणि भरताचे दर्शन
तेवढयात श्रीपाद प्रभू ऋषिसंघा बरोबर योगमार्गाचे अनुसरण करीत बदरिका वनात येऊन पोहोचले. तेथे त्यांनी नर-नारायण गुहेत अनेक शिष्यांना क्रिया योग दीक्षा दिली. तेथून बारा कोस दूर असलेल्या उर्वशी कुंडाजवळ ते आले. ऋषिगंगेत सुध्दा त्यांनी स्नान केले. पाच हजार वर्षा पासून तपस्या करीत असलेल्या सर्वेश्वरानंद नांवाच्या महायोग्यास श्रीपाद प्रभूंनी आशिर्वाद दिला. तेथून ते नेपाळ देशात गेले. तेथे एका पर्वतावर रामनामाच्या ध्यानांत मग्न असलेल्या हनुमंतास श्रीराम, सीता, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या सर्वाचे दर्शन एकत्रितपणे श्रीपादांनी घडविले. ते हनुमंताला म्हणाले, ''हे हनुमंता, तू रामनामाचा किती कोटी जप केलास याचा अंदाज लागत नाही. इतक्या थोडया काळात तू रामनामाचा एवढा महान जप केलास की चित्रगुप्ताला सुध्दा त्याचा हिशेब ठेवणे अशक्य झाले. या मुळेच तू चिरंजीव पदास प्राप्त झालास. तू कालातीत आहेस. तुझे आयुष्य किती लक्ष वर्षे आहे ते चित्रगुप्ताला सुध्दा लिहिणे अशक्य आहे. तू कलियुगात अवतरीत हो, जितेंद्रिय होऊन सर्वांना वंदनीय होशील.''
रामबीज महिमा
यावर हनुमंत म्हणाला ''प्रभु राम बीज हे अग्निबीजच आहे. त्यांच्या मुळेच मला अग्नि सिध्दि प्राप्त झाली. मी देहबुध्दिने तुमचा अंश आहे. आत्मबुध्दिने मी तुमचेच स्वरूप झालो आहे. मी कोणत्या स्वरूपात अवतार घ्यावा ते मला सांगा.'' श्रीपाद प्रभु मंदहास्य करून म्हणाले. ''तू शिवांश रूपाचा रामभक्त हो. अरबी भाषेत अल म्हणजे शक्ति आणि अहा म्हणजे ती शक्ति धारण करणारा म्हणून अल्लाह म्हणजे शिवशक्ति स्वरूप असा त्याचा अर्थ आहे. इतकी वर्षे सीतापती म्हणून माझी सेवा केलीस आता यवन जातीच्या लोकांनी अंगिकार करण्यायोग्य असा शिवशक्ति स्वरूप अल्लाह नावाने माझी आराधना कर.'' यावर हनुमंत म्हणाला, ''प्रभो मला भारद्वाज महर्षी त्रेतायुगात सावित्रीकाठक पिठपुरात करणार असल्याचे ज्ञात होते. त्यावेळी दिलेल्या वरामुळे तुम्ही भारद्वाज गोत्रात जन्म घेणार असल्याचे मला समजले होते. त्यामुळे मी तुम्हाला सोडून कोणत्याही परिस्थितीत राहू शकत नाही. तुमचे आणि माझे गोत्र एकच आहे. त्यामुळे मी तुमचा मुलगाच आहे होय ना ?''
श्रीपाद प्रभू आणि हनुमंताचा संवाद
यावर श्रीपाद प्रभू म्हणाले ''बालका हनुमंता तू धारण केलेला देह हा भारद्वाज गोत्राचा आहे.'' यावर हनुमंत म्हणाला ''अल्ला मालिक'' याचा अर्थ अल्लाच सर्वाचा मालक आहे असाच ना ? श्रीपादानी मोठ्या प्रेमभराने हनुमंतास आलिंगन दिले व म्हणाले ''हनुमंता, तू देहबुध्दि सोडून दे. तू माझाच अंश आहेस. ''प्रभो, याचा मी अंगिकार करतो, की मी तुमचाच अंश आहे,'' हनुमंत म्हणाला, ''मी या भूमीवर तुमचे कार्य करून नंतर मूळ तत्वात विलीन होऊन जाईन तेंव्हा अंश अवतार ही पूर्णपणे नष्ट होईल. अंश अवतारात मूळ तत्त्व निरंतर माझ्या सोबतच राहतील ती तत्वे जेंव्हा फोफावतील तेंव्हा तुमच्या शक्ति संपदा आणि मूळ तत्त्वांनी मला धरून ठेवा .'' यावर श्रीपाद म्हणाले, ''अरे हनुमंता, तू फारच बुध्दिवान आहेस. ज्या माझ्या शक्ति आहेत त्या तुझ्याच आहेत. मी नृसिंह सरस्वती अवतारात श्रीशैल्या जवळील कदळीवनात गुप्तपणे तीनशे वर्षे योग समाधि मध्ये राहीन. त्यानंतर प्रज्ञापूर (सध्याचे अक्कलकोट गांव) येथे स्वामी समर्थ या नांवाने प्रसिध्द होईन. हा अवतार समाप्त करते वेळी साई रूपाने तुझ्यात अवतरीत होईन. मी हे स्पष्टपणे सांगतो की माझा अवतार तुझ्या स्वरूपात प्रकट होईल. त्यावेळी तू एका समर्थ सदगुरुंच्या अवतारात प्रसिध्दि पावशील. यानंतर हनुमंत म्हणाला ''प्रभू मी तुमचा सेवक अल्ला मालिक है ! असे म्हणत संचार करीन. जीवत्व बुध्दिमुळे मी आपला अंश असून सुध्दा आपल्या प्रमाणे प्रवर्तन करू शकणार नाही. आपले श्रीचरण म्हणजे प्रत्यक्ष दत्त प्रभूच. आपणांत आणि माझ्यात अंतर असणे कसे शक्य आहे. मी तुमच्या स्वरूपात आणि तुम्ही माझ्या स्वरूपात बदलल्यास आपणातील अद्वैत सिध्द होईल. यासाठी आपण मला दत्त प्रभूंच्या सायुज्यतेचा प्रसाद द्या.'' श्रीपाद प्रभूंनी कालपुरुषास आपणाजवळ येण्याची आज्ञा केली. कालपुरुष श्रीपाद प्रभू समोर हात जोडून उभा राहिला. तेंव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले ''हे कालपुरुषा ! हा हनुमंत कालातीत आहे. मी याला माझी सायुज्यता प्रसाद रूपाने दिली आहे. त्याला नाथ असे संबोधन देत आहे. आता पासून तो साईनाथ या नावाने संबोधन केला जाईल. आज दत्त जयंती साजरी करू या
हनुमंतातील चैतन्य दत्त स्वरूपात प्रकट झाले. हे पाहून ऋषि समुदाय श्रीपाद प्रभूंकडे आश्चर्याने पाहू लागला. तेवढयात हनुमंताच्या शरीरातील जीवाणुंचे विघटन झाले. त्यातून अनसूया माता प्रकट झाली. ती श्रीपाद वल्लभांना पाहून म्हणाली, ''बाळ, कृष्णा ! तू किती उत्तम मुलगा आहेस. तुला जन्म दिला तेंव्हा सर्व साधारण मातेला होणाऱ्या प्रसव वेदना मला झाल्या नाहीत. मातेला अशा वेदनेमध्ये सुध्दा एक प्रकारचे सुख असते. त्यात माधुर्याची अनुभूति येत असते. परंतु तुझ्या जन्माच्या वेळी मी या सुखापासून वंचितच राहिले. तू माझ्या पोटी पुन्हा जन्म घेणार नाहीस ना ? ही तुझी वैष्णवी माया मला समजत नाही.'' यावर श्रीपाद प्रभू म्हणाले ''हे माते ! पुत्राने मातेची धर्मबध्द इच्छा पूर्ण करायचीच असते. तुझ्या गर्भातून प्रकट झालेला हा हनुमान आहे. त्याला माझी सायुज्य स्थिति प्राप्त करून दिली आहे. एका प्रकारे सांगायचे म्हणजे माझ्या मायेने मी तुझ्या पोटी पुन्हा जन्म घेत आहे. थोडयाच वेळात तुला तीव्र प्रसव वेदना होतील. अनसूया मातेने तीन शिरे असलेल्या दत्तमूर्तीस जन्म दिला. थोडयाच वेळात ती मूर्ती अंर्तधान पावून तिच्या मांडीवर एक शिशु प्रकट झाला. त्या नवजात शिशूला अनसूया देवीने स्तनपान करविले. ही घटना घडल्यानंतर थोडयाच वेळात हनुमंताचे स्वरूप दिसले. त्यांच्या समोर श्रीरामचंद्र उभे होते. त्यानंतर हनुमान म्हणाला ''म्लेंछ धर्मातील चांगली तत्वे व सनातन धर्माची उत्तम तत्वे या दोघांचा समन्वय करण्याचा मी प्रयत्न करीन. म्लेंच्छ लोकांचा सुध्दा गुरु असावा ना ?'' यावर श्रीपाद म्हणाले ''मेहबूब सुभानी नांवाचा एक महाज्ञानी माझ्यात समावलेला आहे. तो वारीफ अलिफ या नांवाने अवतरीत होईल. तो तुझा गुरु होऊन योगरहस्याचे ज्ञान देईल. क्रिया योगाचे ज्ञान शामाचरण नांवाचे गुरु देतील. त्यांच्या कडून तुला हवे असलेले वर प्राप्त होतील.''
माणिक प्रभूंचा अविर्भाव
हनुमंत म्हणाले, ''प्रभू तुम्ही पद्मावती वेंकटेश्वर स्वरूप असल्याचे मी ऐकले होते. तुमची आराधना जाणणाऱ्या वैष्णव स्वामींना सुध्दा तुमचा अनुग्रह प्राप्त झाला.'' यानंतर श्रीपाद प्रभु म्हणाले ''निरंतर माझे स्मरण करून माझ्या चैतन्य रूपात तुझ्या मनाला सदैव लीन कर. गोपालराव नावाचे महावैष्णव तुझे गुरु होतील असा मी तुला वर देत आहे. ते श्री वेंकटेश्वराचे भक्त होऊन व्यंकन्ना या नांवाने संबोधित होतील. त्यांच्या महा प्रयाणानंतर त्यांच्या अस्थि कांही काळपर्यंत एका मातीच्या भांडयात घालून भूमीमध्ये सुरक्षित ठेव . माझी सूचना मिळाल्यानंतर तू ते भांडे उघडून पहा त्यात वेंकटेशाची मूर्ती असेल. त्या मूर्तीची तू पूजा कर. मी प्रसन्न होईन आणि तुला इच्छित वर प्रदान करीन.'' यावर हनुमंत जानकी मातेस म्हणाला ''माते तू मला अत्यंत प्रेमाने व वात्सल्यभावाने एक माणिक मोत्यांचा हार दिला होतास. त्या हारातील माणीक मोत्यात राम शोधण्यासाठी मी दगडाने ते माणिक मोती फोडले. परंतु त्यात श्रीराम दिसले नाही म्हणून तो हार मी फेकून दिला. या महान अपराधाची मला क्षमा करावी.'' यावर श्रीपाद प्रभू म्हणाले ''देवाच्या सान्निध्याशिवाय कोणतेही कार्य पूर्णतेस जात नाही. तो माणिकांचा हार मी व्यवस्थित ठेवला आहे. तो हार दत्त स्वरूप आहे यात शंकाच नाही. माझ्यात असलेल्या आत्मज्योतीने मी त्या हारात प्राण ओतले आहेत.'' तो माणिकांचा हार गुरुस्वरूपाच्या दिव्य तेजाने तळपत होता. ते गुरु स्वरूप माणिक प्रभूंच्या स्वरूपात प्रसिध्द पावेल. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे बदरिनाथ क्षेत्रातील नारायण स्वरूपच आहेत. ते पुन्हा मानव देह धारण करणार आहेत परंतु त्यांचे नाम व रूप कसे असेल ते कोणीच जाणू शकत नाही.
श्रीपाद प्रभूंचे द्रोणागिरी पर्वताजवळील शंबलगिरी ग्रामात वास्तव्य
श्रीपाद प्रभूंचे मामा वेंकावधानी महाराज विद्यार्थ्यांना वेदांचे शिक्षण देत असत. त्या स्थळाच्या जवळच एक नारळाचे झाड होते. त्या वेदशाळेच्या दिव्य परिसरात एक वानर वेदाध्ययनाकडे आकर्षित झाले होते. ते झाडावरील नारळ न तोडता किंवा इतर कोणत्याही वस्तुला हात न लावता मोठ्या श्रध्दाभावाने वेदांच्या पाठाचे श्रवण करीत असे. श्रीपाद प्रभूंनी मोठ्या निरागस भावाने विचारले ''मामा, भगवंताच्या अवतारा प्रमाणे नारळाच्या झाडाचा अवतार असतो का ?'' ''कृष्णा, हा कसला तुझा प्रश्न ? प्रश्नाला सुध्दा अर्थ असावा.'' यावर श्रीपाद म्हणाले ''तसे नव्हे मामा झाडांना फळे येतात. त्या फळातील बीजापासून पुन्हा नवीन झाडाची उत्पत्ती होते. या प्रमाणे ही प्रक्रिया बीजापासून झाड व त्याच्या पासून पुन्हा बीज निर्मित चालूच असते.'' येवढयावर त्यांचे संभाषण थांबले. त्याच वेळी त्यांच्या शेजारी असलेल्या झाडाचे एक मोठे नारळ खाली पडले. ते नारळ श्रीपादानी आपल्या हातात घेतले. त्या वानराकडे पाहून श्रीपाद म्हणाले ''तुला रिक्त हस्ताने पाठवणे मला योग्य वाटले नाही. माझ्या हातांनी तुला हे नारळ प्रसाद म्हणून देत आहे.'' श्रीपादांनी ते नारळ त्या वानराच्या हाती देऊन मोठ्या प्रेमभावाने त्याच्या पाठीवरून हात फिरविला व म्हणाले, ''तू माझ्याकडून अजून एक नारळ मागू नकोस. तुला हे मान्य असल्यास मी तुला नारळ देईन.'' वानराने होकारार्थी मान हालवली तो नारळ घेऊन ते वानर आनंदाने निघून गेले. प्रत्यक्षात ते वानर कोण होते ? श्रीपादांनी ते नारळ त्याला का दिले ? अजून एक नारळ देणार नाही असे ते का म्हणाले ? कांही प्रयत्न न करीता ते नारळ खाली कसे पडले ? आणि कोणासाठी ? या सर्व प्रश्नाची उत्तरे कोण देऊ शकेल ? श्रीपाद प्रभूंच्या लीला अद्भूत, अगम्य आणि अनाकलनीय आहेत हेच खरे. श्रीपाद प्रभू द्रोणागिरी नांवाच्या संजीवनी पर्वतावर गेले. काही दिवस तेथील ऋषि मुनींच्या समुदाया बरोबर आनंदात राहिले. तेथे असलेल्या महायोग्यांना अनुग्रह देऊन कृतार्थ केले. तेथून ते कल्कि प्रभूंचा जन्म ज्या गावी होणार आहे. त्या गावी गेले. तो प्रदेश महायोग्यांनी सुध्दा न पाहिलेला होता. हिमालयात हजारो वर्षापासून तपश्चर्या करणारे महापुरुष या ग्रामात आहेत. संबल गावातील स्फटिक पर्वतावरील शुध्द जल श्री प्रभूंनी प्राशन केले. ते जल पिणाऱ्याचे वय वाढत नाही असे येथील या जलाचे माहात्म्य आहे. या मुळेच श्रीपादांचे वय सोळा वर्षाच्या कुमारा सारखेच राहिले. त्यात वयानुसार कोणताच बदल झाला नाही
श्रीपाद प्रभूंचे गोकर्ण क्षेत्रातून दिव्यलोकात प्रयाण
यानंतर श्रीपाद प्रभू अनेक दिव्य स्थानांना भेट देत साधकांना, भक्तांना , महापुरुषांना अनुग्रह देत गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रास येऊन पोहोचले. या क्षेत्री प्रभू तीन वर्षे राहिले. ह्या पुण्य क्षेत्रात त्यांनी अनेक अगम्य लीलांचे प्रदर्शन केले. परंतु त्यांचे वर्णन करणे केवळ अशक्यच आहे. गोकर्ण क्षेत्राहून निघून श्रीपाद प्रभू श्री शैल्य क्षेत्रास येऊन पोहोचले. श्री बापनाचार्युलूंनी येथे एक महायज्ञ केला होता. या यज्ञाचे फलस्वरूप श्री मल्लिकार्जुनाच्या लिंगामध्ये सूर्य मंडलातून शक्तिपात झाला होता. त्या योगानेच श्रीपाद प्रभूंचा अवतार झाला. श्रीपाद प्रभू योगमार्गाने महाअग्नि गोलका सारखे लाल तप्त होऊन सूर्य मंडलात गेले. तेथून ते धु्रव नक्षत्रातून, सप्तऋषि मंडलातून आद्र्रानक्षत्रातून फिरून चार महिन्यानंतर श्री शैल्यास परत आले. त्यांच्या बरोबर त्या नक्षत्रावर वास्तव्य करणारे महर्षी अत्यंत नूतन असा योग इये शिकण्यासाठी आले. श्रीशैल्यामधील सिध्द पुरुषांची, ऋषींची श्रींनी एक सभा बोलावून सर्व ऋषीना, दुसऱ्या ग्रहावरून आलेल्या महर्षीना त्या नूतन महायोगाचा, सिध्दयोगाचा बोध केला. त्या बोधाने सर्व ऋषि , मुनीगण अत्यंत आनंदित झाले. या ज्ञानामृत प्राशनानंतर आद्र्रानक्षत्रातील ऋषि स्वस्थानी परतले. श्रीपाद प्रभू श्रीशैल्याहून कांही दिवसानी कुरुगड्डी या पवित्र क्षेत्री येऊन पोहोचले.
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"