Sunday, June 2, 2019

*श्री क्षेत्र पीठापूरम् महती*

जय गुरुदेव -
⛳🕉🔥🙏🏼🙏🏼🙏🏼🔥🕉⛳
🌷    *श्री क्षेत्र पीठापूरम् महती*    🌷

भारतामध्ये अनेक शक्तीपीठं आहेत. त्यापैकी पिठापूर हे जगातील अत्यंत शक्तीमान व महान असे पीठ आहे. कुठल्याही मानवाच्या जीवनाची दिशा बदलणारे असे हे एकमेव शक्तीपीठ आहे. हे गोदावरी जिह्यात आंध्र प्रदेशमध्ये सामालकोटाहून १२ कि.मी. दूर वसलेले एक अती लहानसे गाव आहे. सन १३२० साली श्रीपादांचा जन्म भाद्रपद शु. चतुर्थी (गणेश चतुर्थी) च्या दिवशी कृष्णा यजुर्वेद शाखा, आपस्तंब सूत्र, भारद्वाज गोत्रोद्भव ब्रह्मश्री घंडिकोट अप्पल्लराजु शर्मा तथा अखंड सौभाग्य लक्ष्मी महाराणी सुमतीदेवी यांच्या पोटी झाला. साधारणत सन १९८३ साली पू. रामस्वामी यांनी एक लहानशी जागा खरेदी केली व सन १९८५ साली त्या जागेमध्ये एक औदुंबराचे रोपटे लावले. तसेच सन १९८७ साली भक्तांच्या देणगीतून जागा खरेदी केली व त्या जागेवर सुंदर व डौलदार असे मंदीर म्हणजे महासंस्थानाची स्थापना केली व सन १९८८ साली २२ फेब्रुवारी रोजी श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मस्थानी म्हणजेच (श्री. बापन्नार्युलुच्या घरी) श्री गणपती व श्रीपाद पादुकांची स्थापना श्री. पू. रामस्वामींच्या हस्ते झाली. तसेच श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ह्या अक्षर सत्य ग्रंथात श्रीपादांनी असे सांगितले आहे की जेथे माझा जन्म झाला त्याच जागी माझे पादुका मंदीर होणार व त्यांनी सांगितल्याप्रमाणे श्रीपादांच्या जन्मस्थळी श्रीपादांच्या पादुकांची स्थापना झाली.

या मंदिरात श्रीपाद श्रीवल्लभांची, श्री दत्तात्रेयांची व श्री नृसिंहसरस्वती यांच्या अप्रतिम व तेजस्वी अशा सुंदर मुर्त्या आहेत. या मुर्त्यांची स्थापना दिनांक ६/२/१९९२ ला झाली. तसेच मनमोहणारी व आकर्षणीय अशा काळ्या रंगाच्या श्रीपादांच्या पादुका आहेत व बाजुलाच औदुंबराचे झाड आहे. त्याच्या बाजुलाच श्री दत्तात्रेयांची काळ्या रंगाची मुर्ती व श्रींच्या पादुका आहेत. तेथील दृश्य फार आनंदीदायक व शांतीदायक असे आहे. हे मंदीर पहाटे ५.०० वाजता उघडते व साधारणत सात वाजल्यापासून सर्व विधींची सुरूवात केली जाते. दुपारी साधारणत एक ते चारच्या दरम्यान जाळीच्या दाराने मंदीर बंद केले जाते. संध्याकाळी सात वाजल्यानंतर श्रीपादांच्या पालखीच्या तीन प्रदक्षिणा या मंदीराभोवती केल्या जातात. यावेळी सारे वातावरण अगदी प्रफुल्लीत व आनंदीदायक असते. यावेळी भक्तांमार्फत श्रीपादांची इतर भजने तसेच पवित्र व सुखदायक सिध्द मंगल गायली जातात. या पालखी सोहळ्याचा आनंद उपभोगण्यासाठी व पालखी घेण्याचा लाभ भक्ताला मिळण्यासाठी त्या भक्ताने त्यावेळी स्वच्छ लुंगी व सोवळे नेसले पाहिजे. पालखी फुलांनी सजवलेली असते व पालखीत श्रीपाद श्रीवल्लभांची सुंदर चांदीची मुर्ती विराजमान असते. अतिशय सुंदर, दिव्य, मंगल वातावरण त्यावेळेस तेथे असते. आरती होऊन सर्व भक्तांना श्रीपादांच्या प्रसादाचे वाटप केले जाते. मंदीर लहान असल्यामुळे सध्यातरी राहण्याची व जेवण्याची सोय देवळाजवळच केली जाते. सधारणत रात्री ९.०० वाजता मंदीर बंद होते. श्रीपादांच्या तीथीप्रमाणे इथे बरेच उत्सव केले जातात. त्यापैकी १) श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी जयंती २) श्री दत्तजयंती ३) श्री गुरूद्वादशी ४) श्री कृष्णाष्टमी ५) श्री पू. वासूदेवानंद सरस्वती जयंती ६) गुरूपौर्णिमा. श्री दत्तात्रेयांचे तीन अवतार एकाच ठिकाणी असलेले एकमेव महासंस्थान व आद्यपीठ म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान. येथे भक्तांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा केल्या जातात. त्यापैकी नित्यसेवा, पालखी सेवा, बिल्वार्चना, तुळशीपत्र व ब्राह्मण भोजन इत्यादी.

पीठापुर हे पूर्व काळापासूनच सिध्द क्षेत्र आहे. म्हणून या क्षेत्रास पादगया असे म्हणतात. आर्श्चयाची गोष्ट म्हणजे श्री कुक्कुटेश्वराच्या शिवलिंगामधून विद्युतकांती प्रकाशत होती व त्यावेळी त्यातून अप्पलराजु शर्मा व सुमती महाराणी यांच्या विवाहाची आकाशवाणी झाली. या स्थानामध्ये एक तलाव असून तेथे रोज हजारो भाविक स्नान करतात. तसेच मृत पावलेल्या व्यक्तीचे पूर्ण श्रध्दाभावक पिंडदान केल्यास त्या आत्म्यास मुक्ती मिळते. या जागेलाच पादगया असे संबोधले जाते. 

तसेच श्रीपाद श्रीवल्लभ या चरित्रामध्ये अध्याय ६ पान क्र. ३८ येथे सांगितले आहे की, श्री अप्पलराजु शर्मा जेव्हा त्यांच्या घरातील कालाग्नीशमन दत्तात्रेयांची पूजा करीत असत व त्यानंतर त्या कालाग्नीशमन दत्तात्रेयांच्या लहान मुर्तीतून श्रीदत्तप्रभू मानवाच्या रूपात बाहेर येत व अप्पलराजुंच्या समोर बसून बोलत असत व श्रीदत्तप्रभु परत त्या लहान मुर्तीमध्ये विलीन होत असत. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृता मध्ये सांगितल्याप्रमाणे काही वर्षांनी पीठापूर हे महाक्षेत्र होणार असून तेथे मुंग्याप्रमाणे माणसांची रांग लागेल व विक्रीसाठी तेथे थोडीसुध्दा जागा शिल्लक राहणार नाही. हे श्रीपादांचे वाक्य काळ्या दगडावर मारलेल्या रेघेप्रमाणे आहे.

*दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा*
        *|| श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये ||*
                       🌷🌷🌷
🌸🌼🌸🌼🌷🌼🌸🌼🌸

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"