*॥ संवाद॥*
*३४. खरा गुरू / मार्गदर्शक कसा ओळखावा?*
शिष्याला त्याच्या चैतन्यस्वरूपाचं ज्ञान व्हावं यासाठी त्यासंबंधीचा विचार आणि ते अंतरात अनुभवण्यासाठी सुयोग्य साधना हे मुख्यतः गुरूंनी सांगायला हवं. या गोष्टी ते सांगत नसतील तर, किंवा हे सांगण्याच्या मोबदल्याची अपेक्षा करीत असतील तर, ते सद्गुरू नाहीत असं समजावं. सद्गुरू लोकव्यवहाराविरुद्ध वागायला सांगत नाहीत. ऐहिक संपन्नता प्राप्त व्हावी किंवा सांसारिक विशिष्ट गोष्ट प्राप्त व्हावी या शिष्यांच्या इच्छेच्या पूर्तीसाठी शिष्याला विशिष्ट देवतेची उपासना, मंत्र, तंत्र, पाठ, यज्ञ-याग, व्रतं, भोजनं घालणं असलं काहीही ते सांगत नाहीत. ते स्वतः आपलं प्राप्त कर्तव्यकर्म योग्य रीतीने करणारे आणि शिष्यांनाही तसंच करायला सांगणारे असतात. ते चमत्कार, अद्भुतता यांकडे शिष्याचं मन वेधू पाहत असतील, शास्त्र-विरुद्ध बोलत असतील तरीही ते सद्गुरू नाहीत असं समजतं. सद्गुरू स्वतः बाह्य साधकाचे परी। आणि स्वरूपाकार अंतरी। असे असतात. त्यांच्या समाधान आणि शांतीवरून ते ओळखता येतं. त्यांच्या सान्निध्यात आपल्या अंतःकरणात ईश्वरभाव विशेषत्वाने जागृत होतो, शांतीचा अनुभव येतो, सात्त्विकतेने अंतःकरण भरून जातं- या सर्व गोष्टींवरून सद्गुरू ओळखावेत. त्यांची लक्षणं दासबोधात पाचव्या दशकातल्या 'गुरुलक्षण' या दुसऱ्या समासात वर्णन केलेली आहेत. ती जरूर वाचावीत, समजून घ्यावीत, ताडून पाहावीत.
*संदर्भ - स्वामी माधवानंद (डॉ. माधव नगरकर) लिखित "संवाद" (Dialogue with youth) या पुस्तिकेतून.*
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"