Wednesday, December 25, 2019

मन स्वाधीन होण्यासाठी मनापासून नाम घ्या.

प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

२६ डिसेंबर

मन स्वाधीन होण्यासाठी मनापासून नाम घ्या.

जगात आजपर्यंत पुष्कळ लोकांनी दानधर्म, स्वार्थत्याग केला, पण त्यांच्यामध्ये कर्तेपणाची जाणीव राहिल्याने खऱ्या अर्थाने त्यांना निःस्वार्थी बनता आले नाही. खरे म्हणजे, आमचे मन आमच्या ताब्यात आल्याशिवाय आम्हाला निःस्वार्थी बनता येणार नाही. मन कोणत्या साधनाने आम्हांला आवरता येईल ? योग, याग इत्यादि साधने त्यासाठीच सांगितली आहेत, पण ही साधने या काळात आम्हाला करता येण्यासारखी आहेत का ? ह्या साधनांसाठी लागणारी काळाची अनुकूलता आपण राहतो त्या परिस्थितीत आपल्याजवळ खास नाही. मन ताब्यात यायला सध्याच्या काळात नामस्मरणाशिवाय दुसरे साधनच नाही. कारण आज एक नामच भगवंताने अवताररूपाने आमच्यासाठी शिल्लक ठेवले आहे. तेव्हां, मन स्वाधीन होण्यासाठी सर्वांनी मनापासून नाम घ्या. नाम घेत असताना, मनाचे स्थैर्य बिघडविणारे जे विकार आहेत त्यांना आवरण्याचा प्रयत्‍न करा. मनाला सर्वांत मोठा विकार बाधत असेल तर तो म्हणजे अभिमान. ह्या अभिमानासारखा आपला घात करणारा दुसरा शत्रू कोणी नसेल. तो अभिमान सोडायला आपण शिकले पाहिजे. भगवंताने आजपर्यंत एवढे अवतार घेतले ते सर्व अभिमान मारण्यासाठीच होते. हिरण्यकश्यपूच्या वेळी भगवंताने अवतार घेतला' पण देव समोर उभे असतानासुद्धा त्याचा हात नमस्काराकडे न जाता तरवारीकडे गेला ! यावरून त्याचा अभिमान किती तीव्र असेल याची कल्पना येईल. तो अभिमान नाहीसा करण्यासाठी आपण कर्तेपणाची जाणीव सोडून नाम घेतले पाहिजे.

मनाची स्थिरता बिघडवणारा दुसरा शत्रू म्हणजे राग. हा राग फार भयंकर असतो. मोठमोठ्या तपस्वी लोकांची तपश्चर्या याने धुळीस मिळविली आहे. हा राग आवरण्यासाठी, आपल्याला राग कशामुळे येतो हे नीट समजून घेतले पाहिजे. व्यवहारात आपल्याला नीतीची बंधने घालून दिली आहेत, ती सर्व आपण पाळली पाहिजेत. नीतीच्या बंधनात राहणाऱ्या माणसाचे विकार आपोआप आवरले जातील. ही बंधने कशासाठी घातली आहेत याचे मर्म समजून घेऊन वागले तर राग आवरता येईल. आणि राग आवरला म्हणजे त्याच्या पोटात लपून बसलेले, काम, क्रोध, मोह, इत्यादि विकारांनाही पायबंद पडेल. याप्रमाणे नीतीच्या बंधनात राहून तुम्ही आपले मन भगवंताकडे विनम्र करा. भगवंताकडे जाऊ लागा, मन आपोआप तुमच्या मागे येईल, कारण तो त्याचा धर्म आहे. भगवंताला विसरू नका. तुमचे मन तुम्हाला आपण होऊन साहाय्य करील याची खात्री बाळगा.
नाम सुरुंगाप्रमाणे आहे. विकाररूपी मोठाले खडक ते फोडून टाकते.


Tuesday, December 24, 2019

काळजी करायची तर नामाची करा.

प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

१८ डिसेंबर

काळजी करायची तर नामाची करा.

आपण असे पाहतो की आज जे दुःखाचे वाटते तेच पुढे सुखाचे होते, आणि जे सुखाचे आहे असे वाटते तेच पुढे दुःखाला कारणीभूत होते. तुम्हांला जे सुखदुःख येते ते भगवंतापासून येते म्हटले, तर दुःखाचे कारण काय ? जोपर्यंत परक्याने दिलेले दुःख भगवंतानेंच दिले असे वाटत नाही, तोपर्यंत आपण भगवंताचे झालो नाही. आपण घाबरतो केव्हां, तर आपला आधार सुटला म्हणजे, जे जे होते ते रामाच्या इच्छेने होते असे समजावे. संकटे देवाने आणली तर ती सोसण्याची शक्तीही तोच देतो. समर्थांचे होऊन असे भ्यावे का ? समर्थांचे जे झाले त्यांनी परिस्थितीला नाही डगमगू. प्रत्यक्ष संकटाचे निवारण जर करता येते, तर मग भिती कशाची धरावी ? मुळात जी भिती नाही ती तुम्ही मनाने निर्माण करता याला काय म्हणावे ? खेळातली सोंगटी मेली म्हणजे त्याचे सुख-दुःख कोणी करतो का ? तसे व्यवहारात आपण वागावे. सुखाने हुरळून जाऊ नये आणि दुःखाने अस्वस्थ होऊ नये. असे व्हायला आपले मन शांत राहणे जरूर असते. जोपर्यंत 'मी कर्ता आहे' अशी भावना असते, तोपर्यंत सुखदुःखाचे हेलकावे मनाला बसतात. म्हणून कर्तेपण रामाकडे द्यावे, आणि देहाने कर्तव्यात राहून मन शांत ठेवावे. 'परिस्थितीचा परिणाम माझ्या मनावर घडू देऊ नको देवा' असे म्हणावे, 'परिस्थितीच बदल' असे देवाला म्हणू नये.

ज्याप्रमाणे एखादे विष रक्तात मिसळावे, त्याप्रमाणे काळजी आपल्या अंगात भिनली आहे. त्याला वरून औषध लावले तर उपयोग होत नाही. ह्यासाठी भगवंताच्या अनुसंधानाचे इंजेक्शनच पाहिजे. जे दुर्गुण भगवंताचा विसर पाडायला कारण होतात, त्या सर्वांचा संग्रह म्हणजे काळजी होय. काळजी हा फार मोठा रोग आहे. पोटात रोग वाढला आणि त्यानेच पोट भरले की रोग्याला अन्न जात नाही. त्याचप्रमाणे, ज्याला काळजी फार, त्याच्या हृदयात आनंद जाऊच शकत नाही. या काळजीचे आईबाप तरी कोण ? देहबुद्धीमुळे आपल्याला काळजी लागते. देहबुद्धी म्हणजे वासना. वासना आणि अहंकार हे काळजीचे आईबाप आहेत. अशा और स्वभावाचे आईबाप असल्यावर पोर असे विचित्र असायचेच ! भगवंताचे स्मरण करीत गेल्याने आईचा आणि मुलीचा मृत्यू बरोबर घडून येतो; वासना आणि काळजी दोघीजणी एकदम मरतात. खरे म्हणजे, एकच स्थिती कधी कायम राहात नाही म्हणून आपल्याला भिती वाटते, आणि तिच्यातून काळजी उत्पन्न होते. काळजी जितकी आपल्याला मारते, तितकेच नाम आपल्याला तारते. तरीसुद्धा आपण काळजीलाच पकडून बसतो, याला काय म्हणावे ? आपला जेवढा वेळ काळजीत गेला तेवढा वाया गेला असे समजावे. काळजी करायचीच असेल तर अनुसंधान कसे टिकेल याची करा.
नामाची काळजी घ्या, म्हणजे काळजी करायची वेळच येणार नाही.


भगवंताचे स्मरण हेच प्रत्येक साधनाचे मर्म.

प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

२५ डिसेंबर

भगवंताचे स्मरण हेच प्रत्येक साधनाचे मर्म.


एका गावाहून दोन सरकारी बैलगाड्या निघाल्या. एका बैलगाडीत सोन्याची नाणी असलेल्या पिशव्या होत्या, आणि दुसऱ्या गाडीत बांधकामाचे दगड होते. सबंध दिवसभर प्रवास करून त्या बैलगाड्या तालुक्याच्या ठिकाणी पोचल्यावर गाडीवानांनी गाड्या सोडल्या, सोने आणि दगड अधिकाऱ्यांच्या हवाली केले आणि दोन्ही गाड्यांच्या बैलांना कडबाच घातला. तसे, भगवंताच्या दृष्टीने, विद्वान आणि अडाणी दोघेही सारखेच. सुंदर विचारांचा भार डोक्यात वागवला म्हणजे विद्वानाला भगवंत जवळ होतो असे मुळीच नाही. विद्वान काय किंवा अडाणी काय, दोघांनाही बुडविण्याइतका अभिमान प्रत्येकाजवळ असतो; विद्वानाला अभिमान जास्त मारक होतो, इतकेच. विद्येला जगात किंमत आहे, पण ती साधनरूप आहे; साध्यरूप नाही. विद्या ही भगवंताची दासी बनली पाहिजे. पुष्कळ वेळा विद्वान लोक व्यर्थ चिकित्सेने आपल्या आयुष्याचा नाश करून घेतात. साधेभोळे अडाणी लोक भगवंताचे नाम घेऊन मजेने तरून जातात, पण हे विद्वान लोक, भगवंत कसा आहे, त्याचे गुण काय आहेत, त्याचा आणि आपला संबंध काय आहे, त्याचे नाम त्याच्यापर्यंत पोहोचते की नाही, नामाची सुरुवात केव्हापासून झाली, नाम कोणत्या वाणीने घ्यावे, इत्यादि गोष्टींची चिकित्सा करीत बसतात. आणि ती इतकी करतात की, शेवटी आयुष्याचा अंतकाल येतो, आणि नामाची चिकित्सा तेवढी पदरात पडते. नाम घेण्याचा आनंद मिळत नाही. म्हणून शहाण्या विद्वानाने, चिकित्सा करायचीच तर नाम घेत करावी.

ज्याच्या अंगी मीपणा आहे, त्याने चूक केली तर भगवंत त्याचे प्रायश्चित्त देतो. पण ज्याच्या अंगी मीपणा नाही त्याच्या हातून चूक घडली तर भगवंत ती सांभाळून घेतो. समजा आज आपल्या हातून चूक झाली, अगदी अजाणतेपणाने झाली, तरी आपण जर पश्चात्ताप पावून भगवंताला शरण गेलो तर खात्रीने तो क्षमा करतो. आपण आपले मागले घडलेले सर्व भगवंताला अर्पण करावे, मग पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते.

प्रत्येक भक्ताने साधनाचे कष्ट स्वतःच सोसले पाहिजेत. कितीही मोठा गुरु असला तरी त्या बाबतीत तो काहीच करू शकत नाही. फार तर त्या कष्टाची त्याला जाणीव होऊ देणार नाही. आपले मन आपणच आवरले पाहिजे, आणि आपल्या वृत्तीला आपणच वळविले पाहिजे. साधन करीत असताना येणाऱ्या अवस्था आपण शांतपणे सोसल्याच पाहिजेत. भगवंताकडे जायची साधने पुष्कळ आहेत. इतर साधनांनी कष्ट करून जे साधते तेच थोडे नाम घेतल्याने साधते. पण नामावर तशी श्रद्धा मात्र पाहिजे. प्रत्येक साधनाचे मर्म म्हणजे भगवंताचे स्मरण होय. त्याचा पूर्णपणे समावेश भगवंताच्या नामात आहे. म्हणुन ज्याला लवकर भगवंत गाठायचा आहे त्याने एका नामाची कास धरावी.

नामाबद्दलच्या सर्व शंका नाम घेत गेल्याने आपोआप नाहीशा होतात.