Sunday, September 29, 2019

प्रपंचात असावी खबरदारी । मन लावावे रामावरी

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  ३० सप्टेंबर  🌸*

 *प्रपंचात  असावी  खबरदारी  ।  मन  लावावे  रामावरी  ॥*

सर्वांचे राखावे समाधान । पण रामाकडे लावावे मन ॥
रामाला स्मरून वागावे जगात आपण । तेथे पश्चातापाला नाही कारण॥
म्हणून कृतीस असावा साक्षी भगवंत । हा जाणावा खरा परमार्थ ॥

व्यवहार करावा व्यवहारज्ञानाने । परमार्थ करावा गुरूआज्ञेने ॥
कलि अत्यंत माजला । गलबला चोहोकडून झाला ।
चित्त ठेवावे रामावर स्थिर । कार्य घडते बरोबर ॥

स्वस्थ बसावे एके ठिकाणी । राम आणत जावा मनी ॥
प्रयत्नांती परमात्मा । ही खूण घालावी चित्ता । व्यवहारी ठेवावी दक्षता ॥

मागील झाले होऊन गेले । पुढील होणार ते होऊ द्यावे भले ।त्याचा न करावा विचार । आज चित्ती स्मरावा रघुवीर ॥

आंतबट्ट्याचा नाही व्यापार । ज्याने घरी आणला रघुवीर ॥ 
नुसत्या प्रयत्नाने जग सुखी होते । तर दुःखाचे वारे न भरते ॥ 
म्हणून परमात्मा आणि प्रयत्न । यांची घालावी सांगड । म्हणजे मनी न वाटे अवघड ॥
जेथे वाटते हित । तेथे गुंतत असते चित्त ।चित्त गुंतवावे भगवंतापाशी । देह ठेवावा व्यवहाराशी ॥
चित्ती ठेवावी एक मात । कधी न सुटावा भगवंत ॥
राम माझा धनी । तोच माझा रक्षिता जनी ।हे आणून चित्ती । विषयाची योग्यतेने करावी संगति ॥

देह करावा रामार्पण । मुखी घ्यावे नामस्मरण ॥
संतांची संगति ।रामावर प्रीति । तोच होईल धन्य जगती ॥ व्यवहार सांभाळून । करावा परमार्थ जतन ॥राम ठेवावा हृदयात । जपून असावे व्यवहारात ॥

रामाचे चिंतन, नामाचे अनुसंधान । 
वृत्ति भगवत्परायण, साधुसंतास मान ।
आल्या अतिथा अन्नदान ।
भगवंताला भिऊन वागणे जाण ।
याविण परमार्थ नाही जाण ॥

 प्रपंचात असावी खबरदारी । मन लावावे रामावरी ।त्याचा राम होईलदाता । न करावी कशाचीहि चिंता ॥

करवंटीचे कारण ।खोबरे राहावे सुखरूप जाण । तैसे आपले देहाचे संबंध ठेवून । चित्ती असावा रघुनंदन ॥
परमार्थ करावा जतन । मन करून रामाला अर्पण ॥
प्रपंची असावे सावध । कर्तव्यी असावे दक्ष । तरी न सोडावा रामाचा पक्ष ॥
प्रयत्नांती परमेश्वर हे सज्जनांचेबोल । मनी ठसवावे खोल ॥
पण आरंभी स्मरला राम । त्यालाच प्रयत्नांती राम ।हा ठेवावा विश्वास । सुखे साधावे संसारास ॥

कर्तव्यात भगवंताचे स्मरण । हेच समाधान मिळवण्याचे साधन ॥
प्रयत्न करावा मनापासून । फळाची अपेक्षा न ठेवून ॥
कर्तव्यात असावे तत्पर । निःस्वार्थबुद्धि त्याचे बरोबर ॥
जोवर देहाची आठवण । तोवर व्यवहार करणे जतन ।म्हणून प्रयत्न करावा कर्तव्य जाणून । यश देणे न देणे भगवंताचे अधीन ॥

*२७४ .   दाता  राम  हे  आणून  चित्ती ।   आपण  वर्तावे  जगती ॥*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Saturday, September 28, 2019

शास्त्रवचन, थोरवचन आणि आत्मसंशोधन

२३ सप्टेंबर
शास्त्रवचन, थोरवचन आणि आत्मसंशोधन.
एकदा उद्धवाने श्रीकृष्णाला विचारले की, "तू आपल्या मुखानेच सांग की आम्हाला तुझी प्राप्ती कशी होईल." तेव्हा परमात्मा म्हणाला, "भक्ती केल्यानेच माझी प्राप्ती होऊ शकते." भक्तीची तीन साधने आहेत - शास्त्रवचन, थोरवचन आणि आत्मसंशोधन. आपले सध्या सगळे विपरीत झाले आहे. शास्त्रवचन म्हणावे, तर आपण आता इतके सुधारक झालो आहोत की, हल्लीच्या ज्ञानाने आपल्याला पुराणावर विश्वास ठेवण्याची लाज वाटते, 'मी या गावंढळ बापाचे कसे ऐकू ? यापासून माझा काय फायदा होणार?' तसेच आत्मसंशोधनाचे. आपण शोधन करतो ते कसले, तर पांडव कुठे राहात होते ? रामाचा जन्म कोणत्या गावी झाला ? कौरव-पांडवांचे युद्ध कोणत्या ठिकाणी झाले ? मला सांगा, अशा संशोधनापासून आपला कसा फायदा होणार ? एक प्राध्यापक मला म्हणाले, "मी कृष्णाबद्दलचे पुष्कळ संशोधन केले आहे आणि कृष्णाचे जन्मस्थळ कोणते, निर्याणस्थळ कोणते, याची आता खात्री झाली." मी म्हणतो की, ते करतात ते ठिक आहे. पण संतांना कृष्णप्राप्तीसाठी, कृष्णजन्म कुठे झाला या प्रश्नाच्या खात्रीची जरूरी वाटली नाही; त्यांनी दृढ उपासना करून कृष्णाला आपलेसे केले. खरे म्हणाल तर कृष्णाचा जन्म उपासनेने हृदयातच झाला पाहिजे आणि तेच खरे जन्मस्थान आहे.

आपण जर आपले वर्तन पाहिले, मनातले विचार बघितले, तर आपल्याला असे आढळून येईल की, लोकांना जर ते कळले तर लोक आपल्याकडे ढुंकूनही पाहणार नाहीत; आणि असे असूनही आपण आपल्या संशोधनाचा आणि विचारांचा अभिमान बाळगतो, याला काय म्हणावे ? अशाने का आपल्याला भगवंताचे प्रेम लाभणार ? आपला परमार्थ कसा चालला आहे हे दुसर्‍या कुणी सांगण्याची गरजच नाही. आपल्याला तो पुरता ठाऊक असतो. अभिमान खोल गेलेला, विचारांवर ताबा नाही, साधनात आळशीपणा; मग अशा परिस्थितीत आपल्याला परमात्म्याचे प्रेम कसे लाभणार ? साधुसंतांनी यावर एकच उपाय सांगितला आहे, आणि तो म्हणजे पूर्ण शरणागती. रामाला अगदी विनवणी करून सांगा की, 'रामा, आता मी तुझा झालो; ह्यापुढे जे काही होईल ती तुझीच इच्छा मानून मी राहीन, आणि तुझे नाम घेण्याचा आटोकाट प्रयत्‍न करीन; तू मला आपला म्हण.' देव खरोखरच किती दयाळू आहे ! लोकांचे शेकडो अपराध पोटात घालूनही, शरण आलेल्याला मदत करायला तो सदैव सिद्धच असतो.

२६७. नाम घेण्यात एकतानता करावी आणि स्वतःला पूर्ण विसरून जावे.

कुटुंबात कसे वागावे ?*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २४ सप्टेंबर  🌸*

 *कुटुंबात  कसे  वागावे ?*

देहात आल्यावर, आपले ज्याच्याशी जे कर्तव्य आहे ते बरोबर करावे. घरात अत्यंत समाधान असावे. 

मुलांनी वडील माणसांचे दोष पाहू नयेत. बाप जसा सच्छील आहे तसे मुलांनी व्हावे., म्हणजे कुळाची कीर्ति वाढते. 
मोठ्या माणसाने, पेन्शन घेतल्यावर मनाने भगवंताचे नोकर होऊन राहावे. बाईनेही पतीपरते दैवत न मानावे. सर्वांनी भगवंताच्या नामात राहावे. 

जो मनुष्य तरूणपणी स्वाभाविक रीतीने वागेल त्याला म्हातारपणीही स्वाभाविक रीतीने वागता येईल; म्हणजेच म्हातारपण त्याला मुळीच दुःखदायक होणार नाही. 
आपण अस्वाभाविक रीतीने, म्हणजेच आसक्तीने वागत असल्यामुळे, म्हातारपणी कर्तेपण कमी होते आणि आसक्ती मात्र टिकते; आणि ती तापदायक बनते. 

ज्या माणसाची आसक्ती किंवा आग्रह म्हातारपणी सुटलेला असतो, त्याचा देह जरी अशक्त झाला तरी तो सर्वांना हवासा वाटेल. अशक्तपणामुळे त्याला ऐकायला कमी येईल, त्याला दिसायला कमी लागेल, त्याला मागच्या गोष्टींची आठवण राहणार नाही, त्याची झोप कमी होईल; पण हे सर्व होऊनही त्याचा कोणी कंटाळा करणार नाही, आणि त्याला स्वतःलाही जीवनाचा कंटाळा येणार नाही. 

म्हातारपणी आपण कसे मीपणाने वितळून जावे ! 
पण मी सांगतो ना !, ही कर्तेपणाची वृत्ती नाहीशी करावी, म्हणजे मग दुःख नाहीच नाही.

प्रपंचात वागत असता प्रत्येकाने अंतर्मुख होऊन, आपले दोष काय आहेत ते हुडकून काढावेत आणि ते घालविण्याचा प्रयत्न करावा. 

वयाची सोळा ते पंचवीस वर्षे हा काल असा असतो की मनुष्याची बुद्धी वाढीला लागलेलीअसते. ती वाढ योग्य मार्गाने व्हायला बंधनाची अत्यंत आवश्यकता असते. बंधनात उत्तम बंधन म्हणजे आईबाप सांगतील त्याप्रमाणे वागणे हे होय; कारण आपले हित व्हावे यापलीकडे त्यांचा दुसरा हेतू नसतो. 

जगामध्ये प्रत्येक गोष्ट आपण स्वतःच्या अनुभवाने शिकणे कसे शक्य आहे ? म्हणून आईबापांच्या अनुभवाचा फायदा आपण करून घ्यावा. आपले आईबाप एखादे वेळी चुकणार नाहीत असे नाही, कारण चुकणे हा मनुष्याचा धर्मच आहे; परंतु आपल्याविषयी त्यांची जी हितबुद्धी असते, तिच्यामुळे त्यांची चूक आपले कायमचे नुकसान करणार नाही. 

कोणता काल कुणाच्या भाग्याने येतो हे सांगता येत नाही. म्हणून आपण कधी कष्टी होऊ नये. 
सत्कर्म जेवढे मोठे तेवढी विघ्ने अधिक; भगवंताचे अनुसंधान हे सर्वात मोठे सत्कर्म आहे. आपण निश्चयाने आणि निःशंकपणे त्याचे नाव घेऊ या आणि आनंदात राहू या.

*२६८ .   आपले  अवगुण  शोधावेत  व  त्यांचा  त्याग  करून  गुण  घ्यावेत .*

*।‌।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*