Sunday, June 30, 2019

दत्त महाराजांची अनुभूती म्हणजे नेमकं काय ?

दत्त महाराजांची अनुभूती म्हणजे नेमकं काय ? 

सगुण आणि साकार दर्शन दिले तरच त्याला अनुभूती म्हणायचे का ? कि स्वप्नात येऊन काही सांगितले त्याला अनुभूती म्हणायचे ? अनुभूती म्हणजे एक असा अनुभव जो केवळ चित्ताला प्रमाण होतो ,ग्राह्य होतो . दर्शन दिले तर ती निश्चितच मोठी अनुभूती आहे पण केवळ दर्शन म्हणजेच अनुभूती नाही . दत्त महाराजांचे नाम घेण्याची बुद्धी होणे ,ते घ्यावे हे चित्ताला वाटणे हि देखील अनुभूतीच आहे . त्यांचे कोणत्याही प्रकारे स्मरण होणे ,त्यांच्या एखाद्या क्षेत्राला जावे असे वाटणे ,त्यांच्या नाना लीलांचे अवलोकन होणे ,एखाद्या ग्रंथाचे पारायण ,वाचन होणे तात्पर्य दत्त महाराजांशी निगडित काहीही होणे हि अनुभूतीच आहे . अहो मला दत्त महाराज प्रिय आहेत हि गोष्ट आणि दत्त महाराजांना मी प्रिय आहे हि गोष्ट यात जमीन अस्मानाचा फरक आहे . अनुभूती म्हणजेच दत्त महाराजांना आपण प्रिय होणे आणखी काही नाही .

झाडाचे पान देखील त्यांच्या इच्छेशिवाय हालत नाही तेव्हा त्यांचे स्मरण होणे म्हणजेच चित्ताला दत्त महाराजांनी दिलेली चालना आहे हे निश्चित ,तेव्हा नित्य त्यांच्या कथांचे ,लीलांचे स्मरण होणे ,वाचन होणे .चिंतन मनन होणे हि सर्व लक्षणे म्हणजे दत्त महाराजांना आपली कायम आठवण असल्याचीच द्योतक आहेत .

मात्र अनेकदा ह्या उपासनेत विघ्ने कायम अडसर बनू पाहतात .कथा कादंबरी वाचताना होणारी उल्हसित चित्तवृत्ती गुरुचरित्र वाचनावेळी आळसावते ,जांभया येऊ लागतात ,डोळे मिटू लागतात .वाचनाची उरलेली पाने किती याचा बुद्धी वेध घेते .जोरजबरदस्तीने केलेली उपासना फलद्रुप का होत नाही तर चित्त वाचनात नसताना आपण केवळ शब्दांचा वेध घेत असतो . अगदी थोडक्यापासून सुरुवात करावी .लिलांच्या कथा वाचा ,नामस्मरण होऊ द्या ,एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन या ,हळूहळू हे सर्व वाढत जाईल म्हणून थोरले महाराज म्हणत पाच ओव्या तरी रोजच्या चुकवू नका ,ते नित्य पारायण करा का म्हणाले नाहीत तर किती होते यापेक्षा नेमाने काहीतरी होते याला महत्व आहे . यासाठी पुन्हा दत्त महाराजांचीच प्रार्थना करून म्हणायचे कि अहो केवळ तुमची आठवण व्हावी यावर मला मर्यादित न ठेवता नित्य नवविधेची पात्रता येऊ द्या ,कायम सान्निध्य द्या . 

श्री गुरुदेव दत्त !!!---

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २९ जून 🙏

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २९ जून  🌸*

*पुण्यतिथी  कशी  साजरी  करावी ?*

सत्पुरुषाची पुण्यतिथी कशी साजरी कराल ? या दिवशी जो नेम कराल तो सतत टिकण्यासारखा असतो. म्हणून आजपासून नामाशिवाय बोलायचे नाही असे आधीच ठरवा. नामांत राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे इथे आल्यासारखे काही केल्याचे श्रेय तरी मिळेल.

 इथे जो जो म्हणून आला त्याच्याजवळ आपण राहावे असे मला वाटते, पण तुम्हीच दार लावून ठेवले तर मी काय करणार ? 
पाहुणा घरी आला आणि त्याला दार उघडलेच नाही, तर तो काय करणार ? तसे विषयात राहून दारे बंद करून ठेवू नका. नामाचा उच्चार कंठी ठेवा, म्हणजे विषयाचा घाला होणार नाही. 

आता कली मातत चालला आहे; त्याचा घाला चुकवायचा असेल तर नामावर विश्वास ठेवा. कोणीही काहीही सांगितले तरी नाम सोडू नका. 
जसे पाण्याचा मोठा लोंढा चालू झाला की एखाद्या स्थिर झाडाला दोराने बांधून ठेवलेली वस्तू वाहून जात नाही, तसे तुम्ही नामाची कास घट्ट धरलीत म्हणजे काळ काही करू शकणार नाही.

समर्थांनी नामाच्या समासात सांगितले आहे तसे, नाम हेच रूप असे समजून घेत चला, म्हणजे रूप दिसेल. 
भगवंत हा आपल्या आतमध्ये प्रकट व्हायचा असल्यामुळे, नामस्मरणाच्या योगाने तो हळूहळू प्रकट होत जाणे हेच खरे हिताचे आणि कायमचे असते. 
डोक्यावर हात ठेवून चमत्कार होणे, काहीतरी तेज दिसणे, दृष्टांत होणे, इत्यादि गोष्टी तात्पुरत्या असतात. 

एखादा अशक्त, हाडकुळा मनुष्य लठ्ठ होण्यासाठी 'अंगाला सूज येऊ दे' असे म्हणाला तर ते वेड्यासारखे होईल; याच्या उलट, त्याने नीट औषध घेतले तर तो कदाचित लठ्ठ होणार नाही, पण त्याचे शरीर मात्र घट्ट होईल. 
तसेच परमार्थाच्या अनुभवाचे आहे; आणि हा अनुभव वाढीला लागावा याकरिताच पुण्यतिथी साजरी करावी. 

नामस्मरण सतत केल्याने आज ना उद्या भगवंताचे प्रेम येईलच येईल. प्रपंचाच्या गर्दीमध्ये भगवंताचे स्मरण ठेवण्यासाठी उत्सव, सण, पुण्यतिथ्या, वगैरे असतात. 

खरोखर, प्रापंचिकाला कितीतरी पाश आहेत ! पैसा, लौकिक, मुले, मित्र, आप्त, वगैरे सर्व पाशच आहेत. अशा अनेक पाशांमध्येही नाम आवडीने घेणे किती कठीण आहे ! त्यामध्ये टिकणारा मनुष्य चांगला भक्कम असला पाहिजे. 
नामाच्या मागे भगवंताचे अस्तित्व आहे. म्हणून नामात सत्संगतीही आहे. 
मोबदल्याची अपेक्षा न करता मनापासून नाम घ्यायचे आजच्या दिवसापासून ठरवा.

*१८१.  संतांचे  अस्तित्व  त्यांच्या  देहात  नसून  त्यांच्या  वचनात  आहे .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - ३० जून 🙏

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  ३० जून  🌸*

*ऐसा करावा काही नेम । जेणे जोडेल आत्माराम ॥* 

ऐसा करावा काही नेम । जेणे जोडेल आत्माराम ॥
नेम असावा शाश्वताचा । जेणे राम कृपा करील साचा ॥ 
नेम असावा वाचा मन । जेणे संतुष्ट होईल रघुनंदन ॥
कर्तव्यात गुंतवावे शरीर । जेणे संतोषे रघुवीर ॥
सतीला नसे दुजे दैवत जाण । तिला पति एकच प्रमाण ॥
न पाहावे त्याचे दोष गुण । आपले कर्तव्य करावे जतन ॥ 
पतिव्रताधर्म श्रेष्ठ भारी । वंदिताती संत महामुनि ॥
पतिआज्ञा प्रमाण । हेच मुख् साध्वीचे लक्षण जाण ॥
न बोलावे उणेपुरे । जे परमात्म्यास न आवडेल खरे ॥
संतति वा संपत्ति । भगवत्कृपेने ज्याची प्राप्ति ॥
त्याचे करावे रक्षण । पण न गुंतू द्यावे मन ॥
जे आवडेल पतीला पाही । तो तो आपला धर्मच राही ॥
मनाने करावे भगवंत स्मरण । जेणे चुकेल जन्ममरण ॥
अखंड राखावे समाधान । चुको न द्यावे अनुसंधान ॥
काया गुंतवावी प्रपंचात । मन असावे रघुनाथात ॥
प्रपंचात राखावी खबरदारी । मन लावावे रामावरी ।त्याचा राम होईलदाता । न करावी कशाची चिंता ॥
मुखी असावे नामस्मरण । हृदयात भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव । शुद्ध राखावे आचरण । पवित्रतम अंतःकरण ।मुखाने भगवंताचे स्मरण । त्यावर कृपा करील रघुनंदन ।हा ठेवावा विश्वास । अनुभव येईल नक्की खास ॥
पतीस करावे एकदा तरी नमन । रामरूप जाणून । त्याचे जाणावे मनोगत । तैसे वर्तणे हे आपले हित ॥
ऐसा नेम ज्याचे घरी । राम उभा त्याचे दारी ॥ आल्या अतिथा अन्न द्यावे । कोणास विन्मुख न पाठवावे ॥ 
राम कर्ता हा ठेवा भाव । कमीपणाला नाही ठाव ॥ 
सर्वांचे उगमस्थान एक । हे धरावे चित्ती । त्याला नाही कशाची भीति ॥ 
रामाविण न पाहावे जग । समाधानाची खूण हीच सत्य ॥ 
जे जे काही यावे । ते ते रामापासून आले ।हा ठेवावा भाव ॥ 
साक्षित्वाने देहाचा प्रपंच पाहावा । अंतरी? रघुनाथ भजावा ॥ 
देहाची गति प्रारब्धाचे हाती । ऐसे शास्त्रे सांगती ।परि न येई हे चित्तीं । एकच जगती माझा रघुपति ॥ 
मुखाने घ्यावे रामनाम । हृदयी परमात्म्याचे प्रेम ।याहून दुजा न करावा विचार । हा ठेवावा निर्धार ॥
चातुर्मासांत करावी सुरुवात । अखंड चालवावा हा हेत ॥ 
थोडा नेम सांगतोकांही । तो करूनिया पाही ॥ घ्यावें भगवंताचें नाम । खात पीत, करीत असता काम ।होईल तेवढे करावे जतन । परमात्मा पुरे करील हे जाणावे ॥
सर्वांस सांगावे आशीर्वाद । सर्वांनी जोडावा भगवंत॥

*१८२.  मागणे तुम्हा एकच पाही । नामावाचून दूर कधी न राही ॥*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - १ जुलै 🙏

*।।  श्री  राम  जय  राम   जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  १ जुलै  🌸* 

*गुरु  कशाला  हवा ?*

व्यवहारात सुद्धा आपल्याला गुरू करावा लागतो, तर त्याच्यापेक्षा अवघड ज्ञान होण्यासाठी गुरू नको असे म्हणून कसे चालेल ? 
प्रपंचात सुखदुःख झाले, समाधान मिळाले नाही, तर मग खरे सुख कुठे आहे आणि ते मला कोण दाखवील, अशी ज्याला तळमळ लागेल तोच गुरू करील. 
प्रपंच आम्हाला कडू वाटला तरच शिष्य होण्याचा प्रश्न.
 शिकावे असे ज्याच्या मनात येते तो शिष्य, आणि जो शिकवितो तो गुरू. मला काही कळत नाही असे ज्याला वाटतो तोच गुरू करील. 

मी 'राम राम' म्हणतो, वाईट मार्गाने जात नाही, मग गुरू कशाला हवा, असे काहीजण म्हणतात. 'मी' केले ही जाणीव आड येते, म्हणून सद्गुरूची आवश्यकता आहे. सत्कर्माचा अभिमान जर आपल्याकडे घेतला तर रामाचा विसर नाही का पडला ? अभिमान गेल्याशिवाय राम नाही भेटणार. 

देवाजवळ गेला तरी नामदेवाचा अभिमान नाही गेला, म्हणून भगवंतांनी त्याला 'गुरू कर' म्हणून सांगितले.
संतांच्या कृपेने दुखणे बरे झाले म्हणून त्याला मानणे हे खरे नव्हे. जो शिष्याला विषयात ओढील त्याला गुरू कसे म्हणावे ? जो काही चमत्कार करून दाखवील त्याला आम्ही बुवा म्हणतो. संताची परिक्षा आम्ही बाह्यांगावरून करतो. सर्वांभूती भगवंत ज्याला पाहता येईल त्याला संताची खरी ओळख होईल. 
संताच्या संगतीत आपल्या मनावर जो परिणाम होतो, त्यावरून आपण संताची परिक्षा करावी. माझे चित्त जिथे निर्विषय होईल तिथेच संताची खरी जागा म्हणता येईल.
 ज्याला भगवत्प्राप्तीची तळमळ लागली आहे, त्यालाच शिष्य म्हणावे. जो गुरूआज्ञेबाहेर जात नाही, आणि गुरू हेच भगवंतप्राप्तीचे साधन मानतो, तो सच्छिष्य होय.गुरूपरता देवधर्मच नाही मानू.

काही कानडी माणसे महाराष्ट्रात आली. त्यांना मराठी येत नव्हते. त्यांनी एक दुभाषी गाठला आणि त्याच्या मागोमाग ती पुष्कळ हिंडली. त्यांची चिंता आणि जबाबदारी त्या दुभाष्यावर पडली. तशी आपण दुभाष्याची म्हणजे सद्गुरूची संगत केली पाहिजे. तो म्हणेल तिथे जावे, तो सांगेल तसे करावे, मग परमात्मा मिळेलच. 

शास्त्रे आणि वेद अनंत आहेत; ते शिकायला आपल्याला वेळ कुठे आहे ? सद्गुरूंनी नवनीताप्रमाणे सर्व साधनांचे सार असे जे नामसाधन सांगितले, ते आपण करावे, म्हणजे भगवंताचे प्रेम लागेलच.

 बाजारात गेल्यावर जो माल आपल्याला अनुकूल आणि माफक दराचा असेल तोच घ्यावा, त्याप्रमाणे परमार्थाच्या अनेक साधनांत आपल्याला अनुकूल आणि माफक असे नामस्मरण हेच एक उत्तम साधन आहे; तेच करावे आणि आनंदाने रहावे.

*१८३.  भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणे ही खरी भाग्याची गोष्ट आहे. असा जिज्ञासू शिष्य भेटला तर संताला आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Saturday, June 29, 2019

दत्तावताराची प्रमुख वैशिष्ट्ये.....

दत्तावताराची प्रमुख वैशिष्ट्ये......

१) साधुंचे संरक्षण,दुर्जनांचे निर्दालन व धर्मसंस्थापनेसाठी सध्दमाचे आचरण हे दत्तावताराचे प्रमुख वैशिष्ठ होय!इतर अवतारांप्रम...ाणे हेतू सफल होताच निजधामास जाणारा हा अवतार नसून तो जगाच्या अंतापर्यँत असाच चालू राहणार आहे.

२) ब्रम्हदेवाचा पुत्र अत्रि व त्याच्या कठोर तपश्र्चर्येचे
फळ म्हणून दत्ताचा अवतार झाला आणि म्हणूनच तो
अयोनीसंभव मानला जातो.

३) या अवतारात ब्रम्हा,विष्णू व महेश या तीन प्रमुख
देवांचे व त्यांच्या परंपराचे ऐक्य आहे.सृष्टीची उत्पत्ती,
स्थिती व लय यासाठी प्रसिध्द असलेल्या या तीन देवांचे
एकरुपत्व म्हणजे हा दत्तप्रभूंचा अवतार होय.

४) दत्तावतार हा ब्राम्हण कुलातील असून सती
अनसूयेच्या पातिव्रत्याच्या प्रभावाने या अवतारास
महत्व आहे.

५) राम,कृष्ण इ.अवतार हे गृहस्थाश्रमी होते तर दत्तावतार हा फारच अल्पकाळ गृहस्थाश्रमात राहून नंतर
अवधूत अवस्थेतच भ्रमण करणारा आहे.

६) हा अवतार म्हणजे साक्षात परब्रम्हमूर्ती श्रीसद्गुरुंचाच
अवतार होय आणि म्हणूनच साधक "श्री गुरुदेव दत्त"असायांच्या नावाचा जयघोष करतात.

७) श्रीदत्त हे केवळ गुरुदेव नसून ते "अवधूत चिंतन
श्री गुरुदेव दत्त"या स्वरुपात आहेत।

८) श्री दत्तात्रेयांनी आपल्या भक्तांना विविध वेषात व
स्वरुपात म्हणजेच अवधूत, फकीर,मलंग,वाघ इ.दर्शने
दिली आहेत.

९) दत्तावतार हा प्रामुख्याने वर्णाश्रम पध्दतीचा पुरस्कार
करणारा असला तरी इतर जाती जमातींना त्याच्या
उपासनेस कोणताच प्रतिबंध नाही.

१०) दत्त व दत्त संप्रदायाचा नाथ,महानुभाव,वारकरी,
रामदासी इ. उपासना पंथांशी घनिष्ट संबंध आहे.
उदा. गोरक्षनाथ हे दत्तात्रेयांचे शिष्य,महानुभाव पंथात
एकमुखी दत्ताची पुजा होते. समर्थ रामदासांना
श्री दत्तात्रेयांचे साक्षात दर्शन झाले होते आणि विशेष म्हणजे स्वत: दत्तात्रेय हे निस्सिम देवीभक्त होते.

११) औदुंबरतळी वस्ती,जवळ धेनु व श्र्वानाचे सान्निध्य हे दत्तावताराचे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य.

१२) " त्रिमुखी" किंवा"एकमुखी" दत्तात्रेयांच्या मूर्तीप्रमाणेच "दत्तपादुका"चीही पूजाअर्चा अनेक दत्तस्थानांवर केली जाते

१३) "गुरुवार"हा दत्तांचा वार. याच दिवशी घराघरांतून व
दत्तस्थानांतून दत्तात्रेयांचे भजन-पूजन भक्तिभावाने केले
जाते.मार्गशीर्ष प्रौर्णिमा ही "दत्तजयंती"म्हणून महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते।

१४) श्री दत्तात्रेयांचे १६ प्रमुख अवतार आहेत.

१५) श्रीदत्त उपासनेत योगाला अनन्य साधारण महत्व आहे. शाक्त व तांत्रिकांनीही श्री दत्तात्रेयांना आपले आराध्य दैवत मानले आहे.

१६) श्री दत्तात्रेय हे शरणगत वत्सल व भक्तांवर अनुकंपा व दया करणारे आहेत आणि म्हणूनच नुसत्या स्मरणानेच
ते भक्ताची आर्त हाक ऐकून धाऊन येतात.

१७) धर्म व अध्यात्मात व्यापक व उदार दृष्टीकोन हा
दत्तावताराचा आणखी एक विशेष एक विशेष आहे.

१८)दत्त संप्रदायाचेचतत्वज्ञान उदात्त,दिव्य,भव्य,निर्मळ व सोलीव अव्दैत स्वरुप आहे.

१९) भूत-प्रेत-पिशाच्चे दत्तात्रेयांच्या वाऱ्यालाही उभी
राहात नाहीत.

२०) दत्तात्रेयांच्या व्यापक व उतार दृष्टीमुळे ही उपासना
प्रणाली किंवा संप्रदाय कल्पान्तापर्यँत खचितच
पथप्रदर्शन करीत राहील.

२१) जोपर्यँत जगामध्ये मानव हा तापत्रयांनी त्रस्त व
पीडित असा राहील तोपर्यँत दत्तात्रेय अज्ञानान्धकारात
त्यास सदैव मा र्गदर्शन करीतच राहतील.

।।जय श्रीराम।।
।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।

Friday, June 28, 2019

पुनर्जन्म अमी कर्म

महाभारतात भीष्मांनी शेवटी असहाय्य स्थितीत श्रीकृष्णांना विचारले, ''मी ह्या जन्मात कोणतेही कर्म स्वार्थापोटी केले नाही. प्रत्येक वेळी सत्याचरण केले. मग मला असे बाणांच्या शय्येवर का म्हणून पडावे लागले?''
श्रीकृष्णांनी यावर सांगितले, ''ह्याचे कारण तुमचे ह्या जन्माचे कर्म नसून अनेक जन्मापूर्वीचे आहे.'' नंतर त्यांनी त्यांच्या पूर्वजन्मांचे त्यांना स्मरण करून दिले. प्रत्येक जन्मात ते राजपुत्रच होते. एका जन्मात ते शिकारीला जात असताएक सरडा रस्त्यावर आला व तो घोड्याच्या टापांखाली पडणार एव्हढ्यात त्यांनी आपल्या भात्यातून एक बाण द्रुतगतीने काढला व सरड्याला दूर बाजूला फेकून दिले.
श्रीकृष्ण म्हणाले, ''हेच तुमचे कर्म ज्यामुळे तुम्हाला शरपंजरी रहावे लागले.''
भीष्म म्हणाले, ''मी तर त्या मुक्या प्राण्यावर दया दाखवून त्याला वाचवले. हे तर सत्कर्म आहे, मग मला अशी शिक्षा कां?''
श्रीकृष्ण म्हणाले, ''अगदी बरोबर! तुम्ही सरड्याला घोड्याच्या टापांखाली पडण्यापासून अवश्य वाचवले. पण मग पुढे त्याची काय अवस्था झाली हे बघितले नाही.''
मग श्रीकृष्णांनी त्यांना पुढची घटना दाखवली….'तो बिचारा सरडा एका काट्यांच्या झुडपात उलटा पडला. काटे त्याला चहूबाजूंनी टोचायला लागले. त्यामुळे तो हालूदेखील शकत नव्हता. त्याचे फारच हाल झाले. तो उपाशी राहिला व अनेक दिवसांनंतर मृत्युमुखी पडला.
श्रीकृष्ण म्हणाले, ''हेच ते तुमचे कर्म. त्या प्राण्याच्या आत्म्याला तुमच्यामुळे अत्यंत क्लेश झाले. त्याचेच फळ तुम्हाला ह्या जन्मी भोगावे लागत आहे. जितके दिवस तो काट्यांच्या झुडपात जिवंत असताना तळमळत होता तितके दिवस तुम्हालाही असेच शरपंजरी रहावे लागणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवा - तुम्हाला जरी बाण लागले व बाणांच्या शय्येवर जरी तुम्ही झोपला असला तरी तुम्हाला तेवढ्या वेदना होत नाहीत. तसेच तुम्ही उपाशी नाहीत. तुम्हाला पाणी मिळावे म्हणून अर्जुनाने भूमीत बाण मारून पाण्याची व्यवस्था केली आहे. तसेच तुमच्या सेवेसाठी सैनिक आहेत. आम्ही सर्व तुम्हाला रोज रात्री युद्धानंतर भेटायला येतो. त्याचे कारण म्हणजे सरड्याला बाजूला फेकण्यामागे तुमचा हेतू दुष्ट नव्हता. दयेपोटी तुम्ही तसे केले होते. त्याचे असे हाल होऊन तो मरावा अशीही तुमची इच्छा नव्हती. म्हणून तुमचे कृत्य दुष्कृत्य मानले गेले नाही. उलट एका सद्हेतूने ही कृती केली म्हणून आता तुमचे हाल होत नाहीत. कर्मसिद्धान्ताप्रमाणे कृती व हेतू दोन्ही गोष्टींचा सविस्तर विचार करूनच आत्म्याला तसे फळ मिळते.
इथे कर्माचे फळ अनेक जन्मांनंतर मिळाले - ही गोष्ट ध्यानात ठेवायला हवी. खरेच, कर्म व कर्मफळ ह्याबद्दलचे अटळ सत्य प्रत्येकाने जाणूनच कर्म करताना अति दक्षता घ्यायला .

Thursday, June 27, 2019

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - ३० मे 🙏

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  ३० मे  🌸*

 *सर्वांचे  विस्मरण  करून  रामच  आठवावा.*

अकर्तेपणे करीत राहावे कर्म । हाच परमात्मा आपला करून घेण्याचा मार्ग ॥
न करावा कोणाचा द्वेष मत्सर । सर्वांत पाहावा आपला रघुवीर ॥
परनिंदा टाळावी । स्वतःकडे दृष्टी वळवावी ॥
गुणांचे करावे संवर्धन । दोषांचे करावे उच्चाटन ॥
जेथे जेथे जावे । चटका लावून यावे ॥
याला उपाय एकच जाण । रघुनाथावांचून न आवड दुजी जाण ॥ 

देहाचे दुःख अत्यंत भारी । रामकृपेने त्याची जाणीव दूर करी ॥ 
मनावर कशाचाही न होऊ द्यावा परिणाम । हे पूर्ण जाणून, की माझा त्राता राम ॥ 
अभिमान नसावा तिळभरी । निर्भय असावे अंतरी ॥
जे दुःख देणे आले रामाचे मनी । ते तू सुख मानी ॥

देह टाकावा प्रारब्धावर । आपण मात्र साधनाहून नाही होऊ दूर ॥ 
मी असावे रामाचे। याहून जगी दुसरे न दिसावे साचे ॥
प्रपंचातील सुखदुःख ठेवावे देहाचे माथा । आपण न सोडावा रघुनाथा ॥
आपण नाही म्हणू कळले जाण । ज्ञानाचे दाखवावे अज्ञान ॥

दोष न पाहावे जगाचे । आपले आपण सुधारून घ्यावे साचे ॥
कोणास न लावावा धक्का । हाच नेम तुम्ही राखा ॥ 
एक रामसेवा अंतरी । सर्वांभूती भगवद्‌भाव धरी ॥ 

राम ज्याचा धनी । त्याने न व्हावे दैन्यवाणी ॥ 
नका मागू कुणा काही । भाव मात्र ठेवा रामापायी ॥

वाईटांतून साधावे आपले हित । हे ठेवावे मनी निश्चित ॥
भगवंताचे विस्मरण । हे वस्तूच्या मोहाला कारण॥
म्हणून भक्ति व नाम । याशिवाय ऐकू नये कोणाचे ज्ञान ॥
परिस्थितीचा निर्माता परमात्मा जाणे । त्यातच त्यास पाहावे आपण ॥
सर्व कर्ता राम हा भाव ठेवता चित्ती । खर्‌या विचारांची जोडेल संगति ॥

व्यवहारातील लाभ आणि हानि । मनापासून आपण न मानी ॥
मी आहे रामाचा ही जाणीव ठेवून मनी । सुखाने वर्तत जावे जनी ॥

एकच क्षण ऐसा यावा । जेणे सर्वांचे विस्मरण करून रामच आठवावा ॥ 
रामाविण उठे जी जी वृत्ति । त्यासी आपण न व्हावे सांगाती ॥
मी रामाचा हे जाणून । वृत्ति ठेवावी समाधान ॥ 
धन्य मी झालो । रामाचा होऊन राहिलो । ही बनवावी वृत्ति । जेणे संतोषेल रघुपति ।

वृत्ति बनविण्याचे साधन । राखावे परमात्म्याचे अनुसंधान ॥ 
शरीरसंपत्ति क्षीण झाली । तरी वृत्ति तशी नाही बनली ॥
विषयाधीन जरी होय वृत्ति । तरी दुरावेल तो रघुपति ॥ 
संतांची जेथे वस्ती । तेथे आपली ठेवावी वृत्ति ॥
सतत विवेक अखंड चित्ती । रामनामी मनोवृत्ति । हेचि तुम्हा परम प्राप्ति ॥
नामामध्ये ऐसी सत्ता । जेणे जोडे रघुनाथा ॥
नामापरते न मानावे हित । हेच आजवर सांगत आलो सत्य ॥

भगवंताला आपले होणे आवडते फार । श्रीरामनामी राहावे खबरदार ॥ 

*१५१.  रघुनाथस्मरणात असावे आनंदात । तेथे न चाले कोणाची मात ॥*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २८ जून 🙏

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २८ जून  🌸*

*परमार्थ  हे  कृतीचे  शास्त्र  आहे.*

एकदा जनक राजाच्या घरी एक विद्वान आला, आणि आपण आल्याची वर्दी त्याने राजाला पाठविली. 'आता राजा आपली पूजा करील' असे त्याच्या मनात आले. हा त्याचा भाव समजून जनक राजाने निरोप पाठविला की, 'आपण एकटेच यावे.' 
त्याप्रमाणे, आपण अभिमानाचे गाठोडे बाहेर ठेवून मगच रामाकडे जावे; तसेच सद्गुरूच्या घरीही आपले भांडवल बाजूला ठेवूनच जावे.

 'मी कोण' याची जाणीव जोपर्यंत राहते तोपर्यंत दुजेपण आलेच. अभिमान वाढविण्याकरिता देवाकडे नाही जाऊ.

 दुसर्याचे वाईट व्हावे असे आपल्याला वाटले की आपला अभिमान वाढीला लागला आहे असे जाणावे. 
पोराबाळांवर जितके प्रेम करता तितके प्रेम भगवंतावर करावे. 
आपली आणि भगवंताची इच्छा एकच होणे, हे परमार्थाचे सूत्र आहे. भगवंताची जी इच्छा तीच आपली करावी, आणि आनंदात राहावे. 
अगदी निःस्वार्थबुद्धीने केलेले कर्तव्य कधी वाया जात नाही. 

एखाद्या सावकाराकडे कोणाचे दागिने गहाण असले, तर त्याने आपल्या घरच्या लग्नामध्ये ते वापरणे हा अन्याय आहे. त्याचप्रमाणे, आपली मुलेबाळे ही देवाने आपल्याजवळ दिली आहेत, त्यांचे रक्षण करावे; ते कर्तव्य होईल. पण त्यांच्या ठिकाणी आपलेपणा ठेवून सुखदुःख भोगणे हे मात्र पाप आहे.

संन्याशाने भगवे वस्त्र धारण केल्यावर त्याचा थोडा तरी परिणाम बुद्धीवर होतोच. त्याचप्रमाणे आपण भजनपूजन करू लागल्यावर त्याचा परिणाम आपल्यावर दिसला पाहिजे. 

जो शहाणा असेल त्याने समजून आणि जो अडाणी असेल त्याने श्रद्धेने, बंधने पाळावीत. 
स्वतःच्या मताबद्दल आपल्याला पूर्ण खात्री असावी, त्यात घोटाळा असू नये. मनाने आपण खंबीर झाले पाहिजे. 

ज्याप्रमाणे पांढरा कपडा मळण्याचा जास्त संभव असतो, त्याप्रमाणे सत्कर्माला विघ्ने फार येतात; त्यांना न जुमानता आपण सत्कर्म करावे. आचार आणि विचार ही दोन्ही जुळली म्हणजे उच्चारही तसाच येतो.

नारळात पाणी जितके गोड तेवढी खोबर्याला चव कमी; तसे, जेवढी विद्वत्ता जास्त तेवढी निष्ठा कमी. 
फार वाचू नका; जे काही थोडे वाचाल त्याचे मनन करा; आणि ते कृतीत आणा. 
जसे वडिलांचे पत्र वाचल्यावर आपण त्यातल्या मजकुराप्रमाणे कृती करतो, तशी ग्रंथ वाचनाच्या समाप्तीनंतर कृतीला सुरुवात करावी. 

परमार्थ हे सर्वस्वी कृतीचेच शास्त्र आहे. समाधान आणि आनंद हे त्या शास्त्राचे साध्य आहे. भगवंताच्या स्मरणात कर्तव्य केले की जीवनात आनंद उत्पन्न होतो.

*१८०.  सर्व  काही  करावे  ।  पण  खरे  प्रेम  साधनावर  असावे  ॥*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।‌।*

श्रीपाद वल्लभ चरित्र अमृत :- अध्याय -6

॥  श्री  गुरुवे  नम:  ॥  ॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥  

अध्याय  -6  

नरसावधानींचे  वृत्त

दुसऱ्या  दिवशी  सकाळी  जपध्यानादि  पूर्ण  झाल्यावर  तिरुमलदास  म्हणाले.  ''बाबा  !  श्रीपाद  श्रीवल्लभ  या  चराचर  सृष्टीचे   मूल  आहेत.  ते  वटवृक्षासारखे  आहेत.  त्यांचे  अंशावतार  सगळेच  विविधता  असलेल्या  पारंब्या  प्रमाणे  आहेत  (झाडातून  निघालेले  मूळ).  तेच  मूळ  परत  भूमीमध्ये  जाऊन  स्वतंत्र  तत्त्व  असल्यासारखे  दिसते,  परंतु  त्यांना  आधार  वटवृक्षच  असतो.  देवदानवापासून  समस्त  प्राणिमात्रांना  त्यांचाच  आधार  आहे.  त्यांच्याकडूनच  समस्त  शक्तींना  आश्रय  प्राप्त  होतो.  पुनरपि  त्या  शक्ति   त्यांच्यातच  विलीन  होत  असतात.  पर्वत  शिखरावर  पोहोचलेल्या  व्यक्तीस   सगळया  वाटा  एक  सारख्याच  वाटतात.  त्याच  प्रमाणे  सगळया  प्रकारच्या  सांप्रदायाचे  लोक  दत्ततत्त्वामधेच  समन्वय  पावतात.  प्रत्येक  प्राणीमात्रास  कांतीचे  एक  वलय  असते.  मी  पीठिकापुरत   रहात  असताना  तेथे  एक  योगी  आला.  तो  विग्रहाच्या  कांतीवलया  बद्दल  माहिती  सांगत  असे.  त्याला  व्यक्तीची  कांती  कोणत्या  रंगाची  असून  किती  दूरवर  व्यापून  आहे  ते  सांगता  येत  असे.  त्याने  श्री  कुक्कुटेश्वरालयात  येऊन  स्वयंभू  दत्ताची  सूक्ष्मकांती  किती  दूर  व्यापून  आहे  आणि  कोणत्या  रंगाची  आहे,  ह्याची  परिक्षा  करण्याचे  ठरविले  त्या  योग्यास  स्वयंभू  दत्ताच्या  ठिकाणी  श्रीवल्लभांचे  दर्शन  झाले.  त्यांच्या  मस्तकाच्या  भोवताली  विद्युल्लतेच्या  तुलनेची  धवलकांती  अप्रतिमपणे  व्यापून  होती.  त्या  धवल  कांतीच्या  भोवती  खालच्या  भागात  व्यापून  असलेल्या  निळया  रंगाच्या  कांतीचे  त्यास  दर्शन  झाले.  ती  मूर्ति  त्या  योग्यास  बघून  म्हणाली,  ''बाबा  !  दुसऱ्यांचे  सूक्ष्म  शरीर  किती  दूर  व्यापलेले  आहे  याची  माहिती  काढण्याच्या  प्रयत्नात  अमूल्य  जीवन  काळ  व्यर्थ  घालवू  नकोस.  प्रथम  तुझ्या  हिताचा  विचार  कर.  थोडयाच  दिवसात  तुझा  मृत्यू   होणार  आहे.  सद्गति  संपादन  करण्याचा  विचार  कर.  सर्व  सत्यांचा,  सर्व  तत्वमूलांचा  मूल  असलेला  दत्त  मीच  आहे.  ह्या  कलियुगांत  पादगया  क्षेत्रात  महासिध्दपुरुषांच्या,  महायोग्यांच्या,  महाभक्तांच्या  प्रेमभरित  आव्हानानेच  मी  येथे  अवतार  घेतला  आहे.''

स्वामींच्या  या  उपदेशाने  त्याच्यातील  पूर्व  वासनांचा  नाश  झाला.  सूक्ष्म  शरिराच्या  कांतीची  माहिती  मिळविण्याची  त्याची  शक्ति  श्रीवल्लभांतच  विलीन  झाली,  तो  श्रीवल्लभांचे  त्यांच्याच  स्वगृहात  दर्शन  घेऊन  धन्य  झाला.  स्वच्छ  अशी  धवलकांती  असलेले  श्रीवल्लभ  निर्मळ  असून,  संपूर्ण  योगावतार  आहेत.  निळया  रंगाची  कांती  असणारे  श्रीप्रभू  अनंत  प्रेमाने,  करुणेने  भरलेले  आहेत  आणि  ह्या  गुणांचे  हे  रंग  निदर्शक  आहेत.त्या  योग्याची  विश्रांती  झाल्यावर  श्रध्दापूर्ण  चर्चा  सुरू  झाली.  चतुर्वर्ण  विभाग  असलेल्या  सुक्ष्म  शरीराच्या  कांतीचा  भेददृष्टया  निर्णय  घ्यावा  कां  ?  किंवा  जन्मसिध्द  कुलगोत्राच्या  दृष्टीने  निर्णय  घ्यावा  ?  कोणत्या  वर्णाचा  जन्म  असला  तर  वेदोक्त  पध्दतीने  उपनयन  करावे  ?  कोणत्या  वर्णाच्या  लोकांचे  शास्त्रोक्त  म्हणजे  पुराणोक्त  उपनयन  करावे  ?  उपनयनात  भृकुटी  मध्ये  असलेल्या  तिसऱ्या  डोळयाचा  संबंध  असतो  कां  ?  नसेल  तर  कांही  विशेष  आहे  कां  ?  मेधावी  लोक  म्हणजे  काय  ?  अशी  चर्चा  बराच  वेळ  गरम  गरम  चालली  होती  परंतु  पंडितांचे  मतैक्य  होत  नव्हते.  

सत्यऋषिश्वर  या  नावाचे  मल्लादि  बापन्नावधानी  ''पीठिकापुर  ब्राह्मण  परिषदेंचे''  अध्यक्ष  होते.  त्यांना  बापन्ना  आर्य  असे  सुध्दा  लोक  श्रध्देने  म्हणत  असत.  ते  मुख्यत:  सूर्याची,  अग्निची  उपासना  करीत.  पीठिकापुरत  झालेल्या  एका  यज्ञाचे  अधिपत्य  करण्याची  त्यांना  विनंती  केली  होती.  यज्ञाच्या  शेवटी  कुंभवृष्टी  झाली,  अर्थात  वर्षा  झाली.  सकल  जन  समुदाय  आनंदला.  श्री  च्छवाई  नरसिंह  वर्मा  या  नावाच्या  क्षत्रिय  गृहस्थानी  श्री  सत्यऋषिश्वरांना  त्यांच्या  गावात  रहावे  अशी  विनंती  केली.  परंतु  यज्ञयागात  मिळालेले  धन  शिधा  तेवढेच  श्रीबापन्ना  आर्य  घेत  असत.  त्या  द्रव्यास  शुध्दी  नसेल  तर  ते  स्वीकार  करीत  नसत.  श्री  वर्मांच्या  विनंतीस  त्यांनी  नकार  दिला,  श्री  वर्मांची  अत्यंत  प्रिय  असलेली  कपिला  गाय  होती.  तीचे  नांव  गायत्री  असे  होते.  ती  भरपूर  दुध  देत  असे.  ती  अत्यंत  सुशील  आणि  साधु  स्वभावाची  होती.  एकदा  गायत्री  दिसेनासी  झाली.  कुठेतरी  हरवली.  रस्ता  विसरली  असे  वर्तमान  श्री  वर्मांना  कळाले.  श्री  बापन्ना  आर्य  ज्योतिष  शास्त्राचे  पंडित  असल्याने  वर्मांनी  त्यांना  गायत्रीच्या  क्षेम-कुशला  संबंधी  प्रश्न  केला.  तेंव्हा  ''श्यामलांबापुरम्  (सामर्लकोटा)  मध्ये  खानसाहेब  नावाचा  कसाई  आहे.  त्याच्याकडे  ती  आहे.  लगेच  न  गेल्यास  तिचा  वध  होण्याची  भीती  आहे  बापन्ना  आर्य  म्हणाले.  वर्मांनी  शामलांबापुरास  मनुष्यास  पाठवण्याच्या  प्रयत्नात  बापन्ना  आर्यांना  एक  अट  घातली.  बापन्ना  आर्यांच्या  वचनानुसार  गायत्री  मिळाली  तर,  वर्मानी  तीन  एकर  भूमी,  निवासास  योग्य  असे  घर  बापन्नाआर्यांना  त्यांच्या  पांडित्याचा  बहुमान  म्हणून  द्यावे.  बापन्ना  आर्यांनी  त्याचा  अंगिकार  न  केल्यास  गोहत्येचे  पातक  प्राप्त  होईल.  बापन्ना  आर्य  संकट  स्थितीत  पडले.  त्यांनी  हे  दान  जर  नाही  घेतले  तर,  वर्मा  त्या  गाईची  हत्या  होऊ  देतील.  त्यामुळे  गोहत्येचे  पातक  लागेल.  गोहत्या  पातकापेक्षा  पंडित  बहुमानाचा  स्विकार  करणेच  श्रेयस्कर  ठरले   आणि  गायत्रीची  रक्षा  झाली.  पीठिकापुरवासियांचे  नशीब  उघडले.  श्री  बापन्नावधानी  तीन  खंडी  धान्य  देणाऱ्या  भूमीचे  मालक  झाले.  त्यांना  निवसासाठी  घराची  व्यवस्था  झाली.  श्री  बापन्ना  आर्यांना  वेंकटावधानी  नावाचा  मुलगा  व  सुमती  नावाची  मुलगी  झाली.  तिच्या  जन्मपत्रिकेत  सर्व  शुभ  लक्षण  असून  ती  चालते  वेळी  महाराणीस  लाजवील  अशी  चाल  आणि  लचक  असल्या  कारणाने  सुमती  महाराणी  असे  तिचे  नामकरण  झाले.

श्रीबापन्ना  आर्यांची  कीर्ति  थोडयाच  काळात  दाही  दिशांना  पसरली.  घंडिकोटा  अडनावाचा  अप्पललक्ष्मी  नरसिंहराज  शर्मा  नावाचा  भारद्वाज  गोत्री,  अपस्तंभ,  वैदिकशाखेचा  एक  बालक

पीठिकापुरांत  आला.  त्यांच्या  घरी  कालाग्निशमन  नावाने  ओळखली  जाणारी  दत्ताची  मूर्ति  होती.  ती  दत्तमूर्ति  पुजेच्या  वेळी  स्पष्ट  बोलत  असे.  आदेश  सुध्दा  देत  असे.  लहाणपणीच  अप्पल  राजू  शर्माचे  मातृ –पितृ  छत्र  हरवले  असल्याने  तो  पोरका  झाला  होता.  पूजा  समयी  कालाग्निशमनाने  ''तू  पीठिकापुरत  जाऊन  हरितस  गोत्रिक,  अपस्तंभ  सूत्राच्या  वैदिक  शाखेचे  मल्लादि  बापन्नावधानी  यांच्या  कडे  विद्याभ्यास  करावा''  असा  आदेश  दिला.  श्री  बापन्ना  आर्यानी  दत्ताच्याआदेशानुसार  आपल्या  घरी  विद्यार्थी  म्हणून  आलेल्या  राजशर्मास  माधुकरी  न  मागू  देता,  आपल्याच  घरात  भोजनाची  व्यवस्था  केली.  श्री  बापन्ना  आर्य  शनिप्रदोष  समयास  शिवाराधना  करीत  असत.  घरातील  स्त्रिया  शनिप्रदोषादिवशी  शिवाचे  व्रत  करीत  असत.  पूर्वीच्या  काळी  नंदयशोदेने  शनिप्रदोष,  शिवाराधना  केल्यामुळेच  साक्षात्  श्रीकृष्णाचे  लालन  पालन  करण्याचा  सुयोग  घडून  आला.  बापन्ना  आर्याबरोबर  सुदैवाने  श्री  नरसिंह  वर्मा,  श्री  वेंकटप्पैय्या  श्रेष्ठी,  आणि  थोडे  प्रमुख  वैश्य  लोक  सहभागी  होत.

श्री  कुक्कुटेश्वर  स्वामींच्या  मुखातून  निघालेली  वाणी

सुमती  आणि  अप्पलराजुचा  विवाह 

एके  वेळी  शनिप्रदोश   शिवाराधना  झाल्या  नंतर,  श्री  कुक्कुटेश्वराच्या  शिवलिंगामधुन  विद्युत्कांति  प्रकाशत  होती.  त्यावेळी  त्यातून  वाणी  झाली.  ''बाबा  !  बापनार्या,  नि:संदेहपणे  तुझी  मुलगी  सुमती  महाराणीस  अप्पलराजु  शर्मास  देऊन  विवाह  कर,  त्यामुळे  लोककल्याण  होईल.  हा  दत्तप्रभूंचा  निर्णय  आहे.  ह्या  महानिर्णयाचे  उल्लंघन  करण्याचा  ह्या  चराचर  सृष्टीमध्ये  कुठल्याही  व्यक्तीस  अधिकार  नाही.''  ही  देववाणी  वेंकटप्पया  श्रेष्ठीला  नरसिंह  वर्माला,  तेथे  असणाऱ्या  सर्व  जन  समुदायास  ऐकण्यात  आली.  सगळे  आश्चर्यचकित  झाले.

गोदावरी  मंडलांतर्गत  आइनविल्ली  ह्या  गावातील  राजवर्माचे  बंधुमित्र  परिवारास  वर्तमान  पाठवले.  विवाहाचा  निर्णय  झाला.  राजशर्माला  घरदार  नव्हते.  त्यामुळे  थोडा  विचार  चालला  होता.  श्री  वेंकटप्पा  श्रेष्ठी  म्हणाले,  ''मला  पुष्कळ  घरे  आहेत  त्यापैकी  एखादे  मी  राजशर्मास  देईन.''  राजशर्मा  दान  घेण्यास  तयार  नव्हते.  श्री  श्रेष्ठींनी  राजशर्मांच्या  सोयऱ्यांबरोबर  बोलून  राजशर्माला  मिळणाऱ्या  वडिलोपार्जित  गृहभागाची  किंमत  लावली.  ती  एक  वराह  (जुन्या  काळातील  नाणे)  ठरविली  गेली.  श्री  श्रेष्ठींच्या  घराची  किंमत  बारा  वराह  निश्चित  केली.  अकरा  वराह  देण्यास  माझ्याकडे  एक  पै  पण  नाही  असे  राजशर्मा  म्हणाले.  तसे  असेल  तर  मी  माझ्या  घराची  किंमत  1  वराह  मात्रच  ठरवून  विकतो.''दान  घेण्यास  तुम्हास  संकोच  असेल  तर  1  वराह  मला  देऊन  हे  घर  विकत  घ्या''  असे  श्रेष्ठी  म्हणाले.  श्रेष्ठीनी  जे  सांगितले  ते  धर्मसम्मत  आहे  असा  सगळयांनी  होकार  दिला.  श्री  सुमती  महाराणी  आणि  श्री  अप्पल  लक्ष्मी  नरसिंह  शर्मा  यांचा  विवाह  महापंडितांच्या  वेदघोषाने,  मंगल  वाद्याच्या  गजरात  मोठ्या  थाटामाटात  पार  पडला.  श्रीपाद  श्रीवल्लभांचा  अवतार  अज्ञानाच्या  अंधकाराला  दूर  करण्यासच  झाला  आहे.  त्या  कारणाने  श्री  प्रभूंनी  कालदेवतेला,  कर्मदेवतेला  शाप  दिला.  त्या  शापास  अनुसरून  अज्ञानांधकाराचे  प्रतिक  स्वरूप  जन्मांध  शिशु,  आणि  अप्राकृतिक

प्रगतिचे  स्वरूप  दर्शविणारे  लंगडे  बालक  अशी  दोन  बालके  राजशर्मास  प्राप्त  झाली.  आपली  दोन्हि  मुले  अशा  रीतिने  अपंग  असल्याने  सुमति  आणि  राजशर्मा  अत्यंत  दु:खी  होते.  आइनविल्लि  गावांत  एक  प्रसिध्द  विघ्नेश्वराचे  देऊळ  आहे.  श्रीराज  शर्मा  यांच्या  दु:खाचा  परिहार  करण्यासाठी  त्यांचे  नातेवाईक  तेथील  महाप्रसाद  पीठिकापुरात  घेऊन  आले.  सुमती  आणि  राजशर्मानी  तो  प्रसाद  आदराने  घेतला.  त्या  दिवशीच  रात्री  सुमती  महाराणीला  स्वप्नात  ऐरावताचे  दर्शन  झाले.  नंतर  काही  दिवस  शंख,  चक्र,  गदा,  पद्म,  त्रिशूल,  विविध  देवतेचे,  ऋषींचे ,  सिध्दपुरुषांचे,  योग्यांचे  अशी  अनेक  दर्शने  तिला  स्वप्नात  होत  होती.  कांही  दिवसांनी  जागृतास्थेत  सुध्दा  तिला  दिव्य  दर्शन  होऊ  लागले.  डोळे  झाकले  कि  पडद्यावरील  चित्रपटासारखे  दिव्यकांतीमय  तपसमाधीत  मग्न  असलेले  योगी,  मुनी,  अद्भुत  दर्शन  देत.

देवतांचे  जन्मनक्षत्र  आणि  सुमतीच्या  प्रसवसमयाचे  नक्षत्रात

असलेला  संबंध 

सुमती  महाराणीने  आपल्या  पित्यास  दिव्य  अनुभवाबद्दल  सविस्तर  सांगितले.  ते  म्हणाले,  ''ही  सर्व  लक्षणे  महापुरुषाच्या  जननाचे  शुभसूचक  आहेत.''  सुमती  महाराणीचे  मामा  श्रीधर  पंडित  म्हणाले  ''बाई  !  सुमती  !  रवि  (सूर्य)  चे  जन्मनक्षत्र  विशाखाचा  आणि  श्रीरामावताराचा  संबंध  आहे.  कृतिका  हे  चंद्राचे  जन्मनक्षत्र  आहे.  ह्याचा  आणि  श्री  कृष्णावताराचा  संबंध  आहे.  पूर्वाषाढा  या  नक्षत्रावर  जन्मलेल्या  अंगारकाचा  श्रीलक्ष्मीनरसिंह  अवताराशी  संबंध  आहे.  श्रवण  नक्षत्रावर  जन्मलेल्या  बुधाचा,  बुध्दावताराशी  संबंध  आहे.  पूर्वाफाल्गुनी  नक्षत्रावर  जन्मलेल्या  गुरुचा  विष्णुअंशाशी  संबंध  आहे.  पुष्य  नक्षत्रावर  जन्मलेल्या  शुक्राचा  भार्गवरामाशी  संबंध  आहे.  रेवती  नक्षत्रावर  जन्मलेल्या  शनिचा  कुर्मावताराबरोबर  संबंध  आहे.  भरणी  नक्षत्रावर  जन्मलेल्या  राहूचा  वराह  अवताराशी  संबंध  आहे.  आश्लेषा  नक्षत्रावर  जन्मलेल्या  केतुचा,  मच्छावताराशी  संबंध  आहे.  तू  मला  प्रश्न  केलेला  समय  दैवी  रहस्याशी  संबंधित  आहे.  कोटयावधी  ग्रहांना,  नक्षत्रांना  ब्रह्मांडाच्या  स्थिती  गतीला  निर्देश  देणारे  दत्तप्रभूच  जन्मास  येतील  असे  मला  निश्चित  वाटते.''

दत्तप्रभु  हे  नित्य  वैभव  विभूति 

आपले  दिव्य  अनुभव  आणि  श्रीधर  पंडित  यांचे  मत  सुमती  महाराणीने  राजशर्मास  सांगितले.  तेव्हा  राजशर्मा  म्हणाले,  ''मी  पूजा  करते  समयी  कालाग्नीशमन  दत्तांना  विचारतो.  कालाग्नीशमन  दत्तात्रेयांची  पूजा  होत  असता  कोणत्याहि  माणसाने  ती  पाहू  नये  असा  नियम  आहे.  पूजेनंतर  दत्त  प्रभु  मानवाच्या  रूपात  समोर  बसून  बोलतात.  नंतर  परत  त्या  मूर्तिमध्ये  विलीन  होतात,  हा  रोजचा  आमचा  नियम  आहे.  सामान्य  विषय  किंवा  स्वार्थभरित  समस्या  आम्ही  दत्ताला  निवेदन  करीत  नाही.''  त्या  दिवशी  पूजे  समयी  दत्तमहाराज  प्रसन्न  होते.  पूजेनंतर  ते  मानवी  रूपात  समोर  बसले  आणि  श्रीधरा  !  या  !  असे  बोलविले.  दत्तमूर्तीमधून  एक  रूप  बाहेर  पडले  आणि  त्यांच्या  समोर  ध्यानस्थ  बसले.  परत  आपल्या  बोटाने  संकेत  करीत  श्रीधरा  !  या  !  असे  म्हणाले.  तत्काळ  ते  रूप त्यांच्यातच  विलीन  झाले.  राजशर्माला  हे  सगळेच  आश्चर्यजनक  होते.  श्रीदत्तप्रभू  म्हणाले,  ''तू  आता  पाहिलेले  रूप  येणाऱ्या  शताब्दीतील  येणारा  एकुलता  एक  अंशावतारच  आहे.  माझ्यात  लीन  झालेल्या  जीवनमुक्ताना  सुध्दा  मी  बोलावताच  यावे  लागते.  आणि  जा  अशी  आज्ञा  झाल्यास  पडद्याआड  झाल्यासारखे  जावे  लागते.  माझ्या  आज्ञेचे  पालन  करणे  त्यांना  चुकतच  नाही.  माझ्या  लीला  विभूति  केवळ  भूमिवरच  परिमित  नाहीत.  हे  ब्रह्मांड  सारेच  माझ्या  हातातील  खेळण्याच्या  चेंडुसारखे  आहे.  मी  एका  पायाने  लत्ताप्रहार  केल्यास  कोटयावधी  योजने  पार  करतो.  मी  जन्म  मृत्यूच्या  अतीत  आहे,  असे  म्हणत  श्री  प्रभूनी  राजशर्माच्या  भूमध्यांत  स्पर्श  केला.  लगेच  राजशर्माला  पूर्वजन्माची  स्मृति  झाली.  त्याने  एका  युगात  विष्णुदत्त  या  नावाने  जन्म  घेतला  असून  त्याची  पत्नी  सुमतीने  सोमदेवम्मा  नावाने  जन्म  घेतला  होता  असे  ज्ञात  झाले.  श्री  दत्तमहाराज  पुढे  म्हणाले,  मी  दत्त  या  रूपाने  दर्शन  देऊन  तुमची  काय  इच्छा  आहे  असे  विचारले  होते.  त्यावेळी  पितृश्राध्दाच्या  दिवशी  जेवायला  यावे  अशी  विनंती  तुम्ही  केली  होती.  सूर्याग्नि  बरोबर  मी  श्राध्दाचे  जेवण  केले.  तुमच्या  पितृदेवतांना  शाश्वत  ब्रह्मलोकांची  प्राप्ति  करून  दिली.  मी  श्रीपाद  श्रीवल्लभ  या  नावाने  अवतार  घेऊन  गेल्या  100  वर्षापासून  ह्या  भूमीवर  योग्यांना,  महापुरुषांना  दर्शन  देतच  आहे.  पीठिकापुरत  सवितृकाठक  चयन  (होम)  भारद्वाज  महार्षिने  त्रेतायुगात  केला  होता.  तेव्हाचे  त्या  होमाचे  भस्म  पर्वतासारखे  जमून  बसले.  कालांतराने  ते  भस्म  द्रोणागिरी  पर्वतावर  शिंपडले  गेले.  मारूती  द्रोणागिरी  पर्वत  घेऊन  जात  असताना  एक  छोटा  भाग  गंधर्वपुरात  (गाणगापुर)  पडला.  गंधर्वनगर  भीमा,  अमरजा  पवित्र  नद्याचा  संगम  प्रदेश  आहे.  श्रीपाद  श्रीवल्लभांच्या  अवातर  समाप्तिनंतर  मी  मीनअंश,  मीन  लग्नावर  करंज  नगरीत  शुक्ल  यजुर्वेदीय  वाजसनेय  माध्यंदिन  शाखेत,  नृसिंहसरस्वती  या  नांवाने  जन्म  घेऊन,  गंधर्वनगरात  अनेक  लीला  करीन.  श्री  शैल्यातील  कर्दळीवनात  300  वर्ष  तपोसमाधी  नंतर,  स्वामी  समर्थ  ह्या  नांवाने  प्रज्ञापुरात  निवास  करीन.  जेव्हा  शनि  मीनेत  प्रवेश  करेल  तेव्हा  त्या  शरिराचा  त्याग  करिन.''

दत्तप्रभुंचे  हे  वरील  वक्तव्य  राजशर्माने  आपल्या  धर्मपत्नीस  सांगितले.  त्यावेळी  सत्यऋषिश्वर   बापनार्य  म्हणाले  ''बाबा  !  राजशर्मा  !  तुझ्या  पूर्वीच्या  युगातील  जन्मात  श्री  दत्तप्रभूंना,  सूर्याला,  अग्निला  श्राध्द  भोजन  दिलेला  तू  पुण्यात्मा  आहेस.  ह्या  जन्मात  कोणत्याहि  रूपांत  दत्तमहाराज  भोजन  द्या  असे  विचारतील,  तो  दिवस  पितृश्राध्दाचा  असला  तरी  कसलाही  विचार  न  करता  ब्राह्मण  जेवायच्या  अगोदरच  श्री  दत्ताने  भोजन  विचारले  तर  जरूर  वाढावे.''  बाई  सुमती  !  ही  गोष्ट  लक्षात  ठेव .''

बाबा  !  शंकरभट्टा  !  दत्तप्रभुंच्या  लीला  अलौकीक  आहेत.  आतापर्यंत  कधीही  न  ऐकलेल्या  आणि  अपूर्व  आहेत.  महालया  अमावस्येचा  दिवस  होता.  राज  शर्मा  पितृश्राध्दाच्या  तयारीत  होते.  दारा  समोर  ''भवति  भिक्षांदेही''  असा  आवाज  ऐकला  आणि  त्या  अवधूताला  सुमती  महाराणीने  भिक्षा  घातली.  काही  मागणे  माग,  असे  म्हणणाऱ्या  अवधूताला  सुमती  म्हणाली.  ''बाबा  आपण  अवधूत  आहात.  आपले  वाक्य  म्हणजे  सिध्दवाक्यच  आहे.  श्रीपाद  श्रीवल्लभांचा  अवतार  लवकरच  या  भूमीवर  होईल  असे  विद्वान  लोक  सांगतात.  दत्तप्रभू  आता  कोणत्या  रूपात  संचार  करीत  आहेत?

या  शंभर  वर्षापूर्वीपासून  ह्या  भूमिवर  श्री  दत्तप्रभू  श्रीपाद  श्रीवल्लभ  या  रूपात  फिरत  आहेत  असे  ज्ञातहोत  आहे.  आपण  मला  ''काहीतरी  माग''  असे  म्हटलेत.  मला  श्रीपाद  श्रीवल्लभांचे  रूप  पहाण्याची  फार  तीव्र  इच्छा  आहे.''

श्रीपाद  श्रीवल्लभांचा  अविर्भाव  (प्राकटय) 

हे  शब्द  ऐकून  त्या  अवधूताने  भुवने  दणाणून  जाण्यासारखे,  भूकंप  आल्यासारखे  विकट  हास्य  केले.  सुमती  महाराणीला  तिच्या  सभोवतीचे  समस्त  विश्व  एका  क्षणातच  अदृष्य  झाल्यासारखे  वाटले.  समोर  16  वर्षे  वय  असलेला  सुंदर  बालक  यतीच्या  रूपात  प्रकट  झाला.  आणि  म्हणाला  ''आई  !  मीच  श्रीपाद  श्रीवल्लभ  आहे.  मीच  दत्त  आहे.  अवधूतांच्या  रूपात  असतांना  श्रीवल्लभांचे  रूप  पहाण्याची  इच्छा  व्यक्त   केलीस.  ती  इच्छा  पूर्ण  करण्यास  तुला  श्रीवल्लभांच्या  रूपात  दर्शन  दिले.  श्रीवल्लभांच्या  रूपात  असलेल्या  मला  कोणतेही  मागणे  मागु  शकतेस.  तू  मला  जेऊ  घालून  तृप्त  केलेस.  जे  मागशील  ते  वरदान  द्यावे  अशी  इच्छा  आहे.  या  जगातील  लोकांनी  संकल्प  रूपाने  पापकर्म  केल्यास  पापांचे  फळच  प्राप्त  होते.  संकल्पाने  पुण्यकर्म  केल्यास  पुण्यकर्माचे  फळ  प्राप्त  होते.  निष्काम  कर्माचे  आचरण  केल्यास  त्याला  अकर्म  म्हणतात.  ते  सुकर्म  ही  नसते  अथवा  दुष्कर्म  ही  नसते.  अकर्मास  पुण्य  किंवा  पाप  असे  कोणतेच  फळ  नाही  म्हणून  दुसरेच  फळ  द्यावे  लागते.  ते  भगवंताधिन  असते.  अर्जुनाने  अकर्म  केल्यामुळेच  श्रीकृष्णाने  त्याला  कौरवांना  मारावयास  सांगितले.  तसे  मारल्यास  पाप  लागणार  नाही  असे  श्रीकृष्णाने  अर्जुनास  सांगितले  होते.  कौरवांचा  संहार  हा  भगवंत  निर्णयच  होता.  तुम्ही  दंपतींनी  पण  विशेष  असे  अकर्म  केले  आहे.  म्हणुन  लोकहितार्थाने  काही  तरी  प्रतिफळ  दिले  पाहिजे.  निसंदेहाने  तुझी  इच्छा  मला  सांग,  न  चुकता  ती  पुरवीन.'' 

श्री  दत्तांच्या  दर्शनानंतर  सुमती  महाराणीला  स्फुरलेला  संकल्प 

ती  दिव्यमंगल  मूर्ति  पाहून  सुमती  महाराणीने  पादाभिवंदन  केले.  श्रीवल्लभांनी  सुमती  महाराणीला  उचलून  उभे  केले  व  म्हणाले  ''आई  !  मुलाच्या  पाया  पडणे  हे  अयोग्य  आहे.  याने  मुलाचे  आयुष्य  क्षीण  होते.  तेंव्हा  सुमती  म्हणाली,  ''श्रीवल्लभ  प्रभू  !  आई  म्हणून  बोलाविलेत.  आपले  हे  सिध्दवाक्य  आहे  तेच  बोल  खरे  करावे.  तू  माझा  मुलगा  म्हणून  जन्मास  यावे.''  यावर  श्रीदत्त  प्रभूंनी  ''तथास्तु''  असा  आशिर्वाद  दिला  व  म्हणाले  ''मी  श्रीपाद  श्रीवल्लभ  या  रूपाने  तुझ्या  गर्भात  येईन.  आईने  लेकरांच्या  पायावर  पडणे  हे  लेकराचे  आयुष्य  क्षीण  होणेच  होय.  म्हणून  मी  धर्मकर्माच्या  सुत्रांच्या  उलट  जात  नाही.  मी  पुत्र  रूपाने  16  वर्षापर्यंत  जीवन  व्यतित  करेन.''  त्यावर  सुमती,  म्हणाली  केवढा  हा  अविचार  16  वर्षापर्यंतच  आयुष्य  !''  असे  म्हणून  विलाप  करू  लागली.  त्यावर  श्रीचरणांनी  सांगितले,  ''आई  !  16  वर्षापर्यंत  तुम्ही,  सांगाल  तसे  ऐकून  राहीन.  ''प्राप्ते  तु  षोडशे  वर्षे  पुत्रं  मित्रवदाचरेत्''  असे  शास्त्र  वचन  आहे.  16  वर्षे  वय  असलेल्या  मुलाबरोबर  मित्रा  सारखेच  वागले  पाहिजे.  आपल्या  इच्छांचे  दडपण  त्याच्यावर  आणू  नये.  मला  लग्न  करण्यासाठी बंधन  घालू  नये.  मला  यति  होऊन  स्वेच्छेने  विहार  करण्याची  परवानगी  द्यावी.  माझ्या  या  संकल्पाच्या  विरुध्द  तुम्ही  बंधन  घातले  तर  मी  घरात  राहणार  नाही.''  असे  सांगून  त्वरित  दत्त  प्रभु  अदृश  झाले.

सुमती  महाराणी  अवाक   झाली.  तिला  कांहीच  कळेनासे  झाले.  घडलेला  सारा  वृतांत  तिने  आपल्या  पतीस  विवरण  करून  सांगितला.  तेवढयातच  अप्पलराजू  म्हणाले,  ''सुमती  विचार  करू  नकोस,  श्रीदत्त  महाराज  या  प्रकारे  आपल्या  घरी  भिक्षेस  येतील  असा  विषय  तुझ्या  वडीलांनी  सूचना  म्हणून  अगोदर  सांगून  =ठेवला  होता.  श्रीदत्त  हे  करुणेचा  महासागर  आहेत.  श्रीवल्लभांचा  जन्म  होऊ  दे,  नंतर  आपण  विचार  करू''  अप्पल  राजुच्या  घरी  अवधूत  आले  ही  वार्ता  सगळया  गावात  पसरली.  पितृदेवांची  अत्यंत  प्रमुख  असलेली  महालय  अमावस्येच्या  दिवशी  ब्राह्मण  जेवायच्या  आधी  अवधूतास  भिक्षा  दिली  ह्या  विषयाची  चर्चा  झाली.  श्री  बापन्नावधानी  म्हणाले.  ''श्रीपाद  श्रीवल्लभांचा  जन्म  होणार  हे  सगळेच  म्हणतात  !  अवधूतांना  साष्टांग  नमस्कार  करणे  विहीतच  आहे  !  त्यामध्ये  सुमतीचा  काहीच  दोष  नाही.  पुत्ररूपाने  जन्मल्यावर  त्याला  साष्टांग  नमस्कार  केल्यास  बालकाचे  आयुष्य  क्षीण  होते.  परंतु  अवधूत  वेषात  असतांना  साष्टांग  नमस्कार  करणे  चूक  नाही.''  या  प्रसंगाने  पीठिकापुरातील  सर्व  ब्राह्मणांची  इर्ष्या  वाढली  विशेषत्वाने  नरसावधानी  या  नावाच्या  पंडितांची.  अमावस्येच्या  दिवशी  सगळेच  पितृकार्यामध्ये  निमग्न  झालेले  होते.  भोक्त्याचा  दुष्काळच  होता,  ही  फार  मोठी   समस्याच  पडली.  श्री  बापन्नार्यांनी  अप्पलराजुच्या  घरी  मात्र  निर्विघ्नपणे  कार्य  पार  पडेल  असे  सांगितले.  श्री  राजशर्मा  कालाग्नी  शमनांचे  (दत्ताचे)  ध्यान  करीत  होते.  तितक्यात  भोक्त   म्हणुन  तीन  अतिथी  आले.  आणि  पितृकार्य  निर्विघ्नपणे  पार  पडले.

बाबा  !  शंकर  भट्टा  !  त्या  दिवशी  वैश्यांना  वेदोक्त्त  उपनयन  करण्याचा  अधिकार  आहे  का  ?  नाही  ?  असा  विषय  चर्चेत  मुख्यांश  होता.  ब्राह्मणांची  परिषद  जमली.  बंगाल  देशातील,  नवद्वीपाहून  आशुतोष  या  नावाचे  पंडित  पादगया  क्षेत्रास  आले  होते.  त्यांच्याकडे  अत्यंत  प्राचीन  नाडी  ग्रंथ  होते.  त्यांना  देखील  पंडित  परिषदेचे  आमंत्रण  होते.  बापन्नाचार्यांनी  सांगितले,  नियमनिष्ठेमध्ये  ब्राह्मण,  क्षत्रीय,  वैश्य  समानच  असतात.

श्रीपादांच्या  जन्मसमयी  दृग्गोचर  झालेले  अद्भूत  दृष्य 

इतक्यात  मी  म्हणालो  ''महाराज,  श्रीपाद  प्रभूंच्या  लीला  विस्तारपूर्वक  सांगून  मला  धन्य  करावे.''  अरे  शंकर  भट्टा  !  नरसावधानी  बापन्नार्यावर  क्रोधित  झाले  व  येनकेन  प्रकारेण  त्यांचा  अपमान  करण्याचे  त्यांनी  ठरविले .  त्यांची  (नरसावधानींची)  बगलामुखी  साधना  विफल  होण्याचे  एकमेव  कारण  बापन्नार्यच  आहेत  असे  त्यांच्या  मनाने  ठामपणे  घेतले  होते.  तांत्रिक  प्रयोगाने  बापन्नार्याने  त्यांची  मंत्रसिध्दि  निष्प्रभ  केली  असा  कुप्रचार  करण्यास  त्यांनी  सुरवात  केली.  नाडी  ग्रंथात  श्रीपाद  प्रभूंच्या  अवताराविषयी  जे  विवरण  होते  ते  त्यांना  विचलित  करीत  होते.  नाडीग्रंथ  हा  मुलत:  अविश्वसनीय  आहे.  बापन्नार्यानी  मत्स्याहारी  ब्राह्मणास  भोजन  दिले,  हा  अनाचार  घडला  असा  नरसावधानी  यांनी  वाद  मांडला.  मनुष्य  पूर्णब्रह्माचा  अवतार  कदापि  होऊ  शकत  नाही.  तर  तान्हे  बाळ  श्रीपाद  श्रीवल्लभ  सर्वांतर्यामी,  सर्वज्ञ,  सर्वशक्तिमान  असे  श्रीदत्त  प्रभूंचे  कसे  बरे  अवतार  होऊ  शकतील  ?  श्रीपाद  प्रभूंनी  अगदी  लहान  असताना  केलेला  प्रणवोच्चार,  पाळण्यात  असताना  केलेला

शास्त्र  प्रसंग,  आणि  वयास  न  शोभणारे  प्रज्ञेचे  प्रदर्शन  नरसावधानींना  पटले  नाही.  एखादा  विद्वानब्राह्मण  श्रीपादाच्या  शरीतात  प्रवेश  करून  असे  बोलतो  आहे  असा  त्यांनी  प्रचार  केला.  श्री  कुक्कुटेश्वराच्या  मंदिरात  असलेले  स्वयंभू  तेच  खरे  दत्तात्रय  आहेत.  तेच  वर  प्रदान  करणारे आहेत. या बालकास दत्तस्वरूप मानने चुकीचे आहे .असा नारसावधनी यांनी सर्वांचा समज करून देण्याचा प्रयत्न केला.

श्रीपादांच्या  जन्मानंतर  सतत  नऊ  दिवसापर्यंत  ज्या  जागेवर  त्यांना  निजवत  असत  त्या  जागी  एक  तीन  फण्यांचा  नाग  आपला  फणा  उभारून  बाळावर  छाया  करीत  असे.  श्रीपाद  मातेच्या  गर्भातून  साधारण  बालका  प्रमाणे  जन्मास  न  येता  ज्योति  स्वरूपाने  अवतरले  होते.  जन्म  होता  क्षणीच  महाराणी  सुमती  मर्च्छित  झाल्या.  प्रसुतीगृहातून  मंगल  वाद्यांचा  ध्वनी  येऊ  लागला.  थोडया  वेळात  आकाशवाणी  झाली  व  सर्वाना  बाहेर  जाण्याचा  आदेश  झाला.  श्रीपादांच्या  सानिध्यात  चार  वेद, अठरा  पुराणे  आणि  महापुरुष  ज्योति  रूपाने  प्रगट  झाले  व  पवित्र  वेदमंत्रांचा  घोष  बाहेर  सर्वांना  ऐकू  येऊ  लागला.  थोडया  वेळाने  सर्वत्र  शांतता  पसरली.  या  अद्भूत  घटना  बापन्नार्याना  सुध्दा  अगम्य  व  आश्चर्यकारक  वाटल्या.

श्रीपादांच्या  बाललीला 

श्रीपाद  आता  एक  वर्षाचे  झाले  होते.  ते  आठ  दहा  महिन्यांचे  असतानाच  त्यांचे  आजोबा  बापन्नार्याबरोबर  पंडितपरिषदेस  जात  असत.  आजोबा  आपल्या  नातवाला  बरोबर  घेऊन  जात.  नरसावधानी  आपल्या  घरी  राजगिऱ्याचे  पीक  काढीत.  राजगिऱ्याची  भाजी  अत्यंत  रुचकर  असते.  गावातील  लोक  नरसावधानीना  ती  भाजी  देण्याची  विनंती  करीत.  परंतु  ते  ती  भाजी  कोणालाच  देत  नसत.  कोणाकडून  काही  विशेष  काम  करून  घ्यायचे  असल्यास  त्याला  ते  ती  भाजी  देत  व  इच्छित  काम  करून  घेत.  श्रीपादांनी  एकदा  आपल्या  आईस  राजगिऱ्याची  भाजी  करण्यास  सांगितले.  ती  भाजी  सुध्दा  नरसावधानीच्या  घरचीच  त्यांना  हवी  होती.  परंतु  हे  काम  कठीण   होते.  श्रीपाद  लहान  असतानाच  स्वेच्छेने  चालत  नरसावधानींच्या  घरी  जात  असत.  त्यांच्या  घरी  शास्त्राविषयी  चर्चा  करीत,  तसेच  चित्र-विचित्र  लीला  करीत.  पीठिकापुरत  एका  महापंडिताचा  मृत्यु  झाला  होता.  त्या  पंडिताचा  प्रेतात्मा  श्रीपादाकडून  विचित्र-कार्य  करवून  घेत  आहे.  या  बालकास  योग्य  ते  उपचार  न  करता  बापन्नाचर्य व  राजशर्मा  हे  दोघे  या  बालकास  दत्तावतारी  समजत  आहेत,  असे  नरसावधानी  सर्वाना  सांगत.  पीठिकापूर   हे  पादगया  क्षेत्र  असून पितृदेवांचे  प्रधान  स्थान  आहे.  विगत  आत्म्यांशी  संपर्क  साधून  संभाषण  करण्याचे  सामर्थ्य  असलेले  तत्त्ववेत्ते  येथे  राहात  असत.  श्रीपादांच्या  शरीरात  कोणत्यातरी  महापंडिताचा  आत्माच  वास  करीत  आहे  आणि  त्यांच्याकडून  अगम्य  अशा  लीला  करवून  घेत  आहे,  अशी  धारणा पीठिकापुरम मध्ये  दृढ   होत  होती.

तिरूमलदास पुढे म्हणाले ' मी  मलयाद्रीपुरमहून  पीठिकापुरम  येथे  आलो  तेव्हा  श्रीबापन्नार्य  आणि  राजशर्मा  यांच्या  घरचा  रजक  होतो.  नरसावधानीच्या  घरचा  जो  रजक  होता  तो  वृध्दावस्थेने  मरण  पावला  होता.  त्या  रजकाचा  मुलगा  वायसपूर  अग्रहार  (सध्याचेकाकिनाडा)  येथे  निघून  गेला  होता.  यामुळे  त्यांच्या  घरचे  रजकाचे  काम  मला  मिळाले  होते.  मी  लहानपणापासून  बापन्नार्युलुच्या  सहवासात  असल्याने  माझ्यातील  सतप्रवृत्ती जागृत  झाली  होती  व  अध्यात्माची  ज्योत  प्रज्वलित  झाली  होती.  ज्या  दिवशी  मी  नरसावधानींना  पहात  असे  त्या  दिवशी  मला  पोटाचा  विकार  होऊन  अन्न  ग्रहण  न  करण्याइतकी  माझी  दीन  अवस्था  होई.  नरसावधानीचे  कपडे  मी  स्वत:  न  धुता  माझा  मुलगा  रविदास  ते  धूत  असे.  सात्विक  प्रवृतीच्या  लोकांचेच  कपडे  मी  स्वत:  धूत  असे.

नरसावधानींचे  कपडे  मी  स्वत:  न  धूता  ते  माझा  मोठ  मुलगा  रविदास  धूतो,  ही  वार्ता  त्यांच्या  कानी  गेली.  त्यांचे  कपडे  मी  स्वत:  धूवावे  अशी  त्यांनी  आज्ञा  केली.  ती  आज्ञा  मानून  मी  नरसावधानीचे  कपडे  स्वत:  धुऊ  लागलो.  मी  कपडे  धूत  असताना  श्रीपादाचे  नाम  स्मरण  करीत  असे.  मी  धुतलेले  कपडे  घेऊन  रविदास  नरसावधानींकडे  गेला.  मी  धुतलेले  कपडे  जेंव्हा  सगळयांनी  घातले,  तेंव्हा  कोणालाच  काही  झाले  नाही.  परंतु  नरसावधानींनी  ज्या  वेळी  ते  कपडे  घातले,  तेंव्हा  त्यांना  त्यांच्या  अंगावर  विंचू,  गोम  सरपटत  असल्यासारखे  वाटले.  त्या  कपडयामध्ये  त्यांचे  शरीर  अग्नीवर  ठेवल्याप्रमाणे  पोळू  लागले.  नरसावधानींनी  मला  बोलवले  व  ते  रागाने  म्हणाले,  कोणत्यातरी  क्षुद्र  विद्येचा,  मंत्राचा  प्रयोग  मी  कपडयावर  केला  आहे.  त्या  अपराधाबद्दल  त्यांनी  माझी  न्यायाधिशाकडे  तक्रार  केली.  परंतु  चतुर  न्यायाधिशांनी  मला  निर्दोष  जाहीर  करून  सोडून  दिले.  मी  आनंदात  घरी  आलो.  थोडयाच  वेळात  श्रीपाद  प्रभू  एका  सोळा  वर्षाच्या  युवकाच्या  रूपात  आमच्या  घरी  आले.  श्रीपाद  प्रभू  वाटेल  त्या  रूपात  येऊन  भक्तांना  दर्शन  देत  असत.  मी  आश्चर्याने  म्हणालो,  ''महाराज  आपण  उत्तम  अशा  ब्राह्मण  कुलामध्ये  जन्मलेले  आहात,  तेंव्हा  आमच्या  सारख्या  रजकांच्या  वस्तीत  येणे  कांही  योग्य  नाही.''  तेव्हा  प्रभू  म्हणाले  ''नरसावधानीसारखे  पापाचे  गाठोडे   डोक्यावर  वाहणारे  ब्राह्मण  खरे  तर  रजकांपेक्षा  कमी  दर्जाचे  असतात.  परंतु  तुझ्यासारखे  ब्राह्मणांची  ओढ  असलेले  रजक  त्यांच्यापेक्षा  श्रेष्ठच  असतात.''  श्रीपादांचे  ते  शब्द  ऐकून  मी  त्यांच्या  चरणांवर  नतमस्तक  झालो  आणि  ढसा  ढसा  रडलो.  श्रीप्रभूंनी  माझ्याकडे  अमृतदृष्टीने  पाहिले  व  आपल्या  दिव्य  हाताचा  स्पर्श  करून  मला  उठवले.  नंतर  त्यांनी  आपला  उजवा  हात  माझ्या  शिरावर  ठेवला  आणि  त्याच  क्षणी  मला  पुर्वीचे  जन्म  आठवले .  माझ्यातील  योग  शक्तींना  चालना  मिळाली.  कुंडलिनी  शक्ती  सुध्दा  जागृत  झाल्याचा  अनुभव  येऊ  लागला.  श्रीपाद  प्रभू  हळू  हळू  पाऊले  टाकीत  अंतर्धान  पावले.

श्रीपाद  प्रभूंनी  आपल्या  आईजवळ  राजगिऱ्याची  भाजी  करून  देण्याचा  हट्ट  केला.  त्यांना  नरसावधानींच्या  घरातील  भाजी  हवी  होती.  परंतु  ती  गोष्ट  अशक्य  वाटत  होती.  या  वेळी  बापन्नार्य म्हणाले,  ''श्रीपादा  !  उद्या  सकाळी  मी  तुला  नरसावधानींच्या  घरी  घेऊन  जातो.  तू  स्वत:  त्यांना  राजगिऱ्याची  भाजी  देण्याची  विनंती  कर.  परंतु  जर  त्यांनी  ती  भाजी  देण्यास  नकार  दिला  तर  त्याभाजीसाठी  पुन्हा  कधी  हट्ट  करू  नकोस.''  दुसऱ्या  दिवशी  बापन्नार्य  बालक  श्रीपादाला  घेऊन  नरसावधानीकडे  गेले.  त्यांच्या  घरी  जाताच  बापन्नार्य  श्रीपादांना  म्हणाले,  ''श्रीपादा  !  मोठ्यांना   नमस्कार  करून  त्यांचे  आशिर्वाद  घ्यावेत.  नरसावधानी  बाहेर  ओसरीवर  बसले  होते.  त्यांची  लांब  शिखा  पाठीवर   रुळत  होती.  ती  नरसावधानींना  अत्यंत  प्रिय  होती.  श्रीपादांनी  नरसावधानींकडे  बघितले  व  दोन  हात  जोडून  त्यांना  नमस्कार  केला.  श्रीपादांची  तीक्ष्ण  नजर  नरसावधानींच्या  पाठीवर  विसावलेल्या  शिखेवर  पडली  आणि  काय  आश्चर्य  ती  आपोआप  गळून  खाली  पडली.  ती  पाहून  नरसावधानी  अगदी  गोंधळून  गेले.  या  वेळी  श्रीपाद  म्हणाले,  ''आजोबा  !  नरसावधानी  आजोबांची  अत्यंत  प्रिय  असलेली  शिखा  गळून  पडली.  आता  त्यांच्याकडे  राजगिऱ्यांची  भाजी  मागणे  योग्य  होईल  काय  ?  चला  आपण  घरी  जाऊ.''  श्रीपादांनी  राजगिऱ्याची  भाजी  पुन्हा  कधीही  विचारली  नाही.

श्रीपादांच्या  नमस्कारामुळे  झालेले  नुकसान  नरसावधानींच्या  लक्षात  आले.  ते  ध्यानात  बसले  असता  त्यांच्या  शरीरातून  त्यांच्या  सारखेच  दिसणारे  एक  तेजोवलय  बाहेर  पडले.  नरसावधानींनी  त्या  तेजोवलयास  विचारले  ''तू  कोण  ?  कोठे  चाललास  ?''  त्या  तेज:पुंज  नरसावधानी  सारखे  दिसणाऱ्या  आकृतीने  उत्तर  दिले  ''मी  तुझ्यात  राहणारे  पुण्यशरीर  आहे.  तू  आतापर्यंत  कितीतरी  वेद  पठन  केलेले  आहेस.  स्वयंभू  दत्तात्रेयांची  आराधना  केलीस,  परंतु  साक्षात  श्री  दत्तात्रेयांचे  अवतार  श्रीपाद  श्रीवल्लभांचा  अपमान  केलास.  तुला  तुझ्या  शिखेवर,  राजगिऱ्याच्या  भाजीवर  असलेले  प्रेम,  आसक्तीच्या  एक  लक्षांश  प्रेम  जरी  श्रीपादांच्या  विषयी  असते  तर  तुझ्या  जन्माचे  सार्थक  झाले  असते.  परंतु  मोहपाशांनी  स्वत:स  बांधून  घेऊन  मोक्षाची  एक  दिव्य  संधि  घालवलीस  .  तू  लवकरच  दरिद्री  होशील.  त्या  दारिद्रयाचे  हरण  करण्यासाठी  श्रीपाद  प्रभूंनी  तुला  ''शाकदान''  मागितले  होते.  त्यांना  जर  तू  ते  दान  दिले  असतेस,  तर  तुला  आता  येणारे  दारिद्रय  न  येता  उत्तम  ऐश्वर्य  प्राप्त  झाले  असते.  तू  स्वत:  आपल्या  हातांनी  ही  संधि  दवडलीस.  श्रीपाद  प्रभू  करूणेचे  सागर  आहेत.  हा  अवतार  संपल्यावर  ते  दुसरा  नृसिंहसरस्वती  नांवाने  अवतार  ग्रहण  करतील.  त्यावेळी  तू  एक  दरिद्री  ब्राह्मणाच्या  रूपात  जन्म  घेशील.  त्या  जन्मात  सुध्दा  तू  घरी  राजगिऱ्याची  भाजी  पिकवशील.  त्यावेळी  योग्य  समय  पाहून  मी  पुन्हा  तुझ्या  शरीरात  प्रवेश  करीन.  त्यावेळी  श्रीपाद  प्रभू  तुझ्या  घरी  भिक्षेसाठी येतील.  तू  प्रेमाने  वाढलेली  भिक्षा  घेऊन  तुला  ते  ऐश्वर्य  प्रदान  करतील.  सध्या  मात्र  मी  तुझे  शरीर  सोडून  जात  आहे.  श्रीपाद  प्रभूंनी  केलेला  नमस्कार  तुला  नव्हता  तर  तुझ्यातील  पुण्य  स्वरूपात  वास्तव्य  करणाऱ्या  मला  होता. त्यांनी  मला,  तुला  सोडून  देऊन  त्यांच्या  स्वरूपात  लीन  होण्याची  आज्ञा  केली  होती.  त्यानुसार  मी  श्रीपादाच्या  स्वरूपात  लीन  होण्यास  जात  आहे.  आता  तुझ्या  शरीरात  केवळ  पाप  पुरुषच  उरला  आहे.''  असे  बोलून  तो  पुण्यात्मा  श्रीपादांमध्ये  विलीन  झाला.

कालांतराने  नरसावधानींची  प्रकृती  क्षीण  होत  गेली.  लोक  त्यांच्या  शब्दांचा  निरादर  करू  लागले.  त्यांच्या  चेहऱ्यावर  विलसणारे  विद्वत्तेचे  तेज  लोप  पावले.  याच  वेळी  पीठिकापूरात  विषूचि (कॉलराची)  साथ  पसरली.  यात  अनेक  ग्रामवासी  या  रोगास  बळी  पडले.  दूषित  पाण्यामुळे  हा  रोग  बळावत  असल्याचा  निष्कर्ष  गावातील  वैद्यांनी  काढला.  भयभीत  झालेल्या  ग्रामवासियांनी  यामहामारीच्या  रोगावर  शास्त्रीय  रीतिने  निर्मूलन  पध्दती  काढावी  अशी  प्रार्थना  श्री  बापन्नार्यांना  केली.  श्री  बापन्नार्यानी  आपल्या  अंतर  दृष्टीने  जाणले  की  महामारी  जलदोषाने  झालेली  नसून  वायुमंडल  कलुषित  झाल्याने  झाली  आहे.  परंतु  बापन्नार्याचे  हे  मत  गावातील  वैद्यांना  पटले  नाही.  ग्रामस्थानी  ग्रामदेवतेस  पशुबली  देऊन  तांत्रिकाकडून  विविध  प्रकारच्या  पूजा,  महामारीच्या  निर्मूलनासाठी   केल्या.  पशूचा  बळी  दिल्याने  त्यांच्यातील  प्राणशक्ती बळजबरीने  बाहेर  काढली  जाते  व  तिला  मंत्रोच्चाराने  वश  करून  घेतात.  प्राणशक्तीस  वृध्दिंगत  करण्यासाठी   योगाच्या  प्रक्रिया  किंवा  सात्विक  आराधनेचा  अवलंब  करणे  अधिक  योग्य  आहे  असे  श्री  बापन्नार्यांचे  मत  होते.  त्यांनी  ग्रामवासियांना  असे  सुचविले  परंतु  अंधश्रध्देने  त्यांनी  पशुबळी  देण्याचे  थांबवले  नाही.  गावातील  कांही  मंडळींनी  पशुबळीचा  विषय  श्रीपाद  प्रभूंपुढे  काढला.  त्यावर  श्रीपाद  म्हणाले  ''ग्रामदेवतेस  विनंती  केली  आहे  की  तिने  पशुबळीचा  स्वीकार  करू  नये.''  श्रीपादांच्या  आज्ञेनुसार  ग्रामदेवता  समुद्रस्नान  करण्यास  गेली  आहे.  आता  दूध  उतू  घालून  देवतेस  नैवेद्य  अर्पण  केल्यास  या  रोगराई  पासून  तुमची  सुटका  होईल.  कालिकेचे  रूप  धारण  केलेली  ग्राम  देवता  शांत  होईल.  ही  वार्ता  गावातील  सर्व  लोकांना  कळविण्यासाठी  एका  चर्मकारास  बोलावून  चर्मवाद्यावर  दवंडी  पिटविण्यास  सांगितले.  दवंडी  कोणी  पिटायची  असे  विचारल्यावर  श्रीपाद  म्हणाले  विषुचि  रोगाने  ग्रस्त  वेंकय्या  याने  दवंडी  पिटावी,  असा  माझा  निरोप  त्यास  सांगा.  ते  सर्व  ग्रामवासी  वेंकय्याजवळ  गेले,  तो  मरणासन्न   होता.  त्याला  हा  निरोप  देताच  तो  मुरच्छित  पडला.  एका  घटकेनंतर  जेव्हा  तो  शुध्दिवर  आला  तेव्हा  तो  पूर्णपणे  बरा  झाला  होता.  ही  बातमी  हा  हा  म्हणता  संपूर्ण  पीठापुरममध्ये  चर्चेचा  विषय  झाली.  व्यंकय्याने  गावात  फिरून  चोहिकडे  दवंडी  पिटली.  बापन्नार्यानी  आपल्या  सेवकास,  पाण्याने  भरलेले  एक  मोठे   भांडे  त्यांच्या  समोर  आणून  ठेवण्यास   सांगितले.  वायुमंडलातील  विषारी  किटाणूंचा  नाश  करण्यासाठी  योग्य  त्या  मंत्राचे  संधान  केले.  आणि  तत्काळ  हवेतील  विषारी  किटाणू  पाण्यात  टप  टप  येऊन  पडले.  अशा  प्रकारे  वायुमंडल  शुध्द  झाले  आणि  महामारी  रोगाचे  निर्मुलन  झाले.

श्रीपादांच्या  जन्मतिथीस  (वाढदिवसाच्या  दिवशी)  राजशर्मा  पत्निसह  श्रीपादांना  घेऊन,  बाळाचे  आजोबा  श्री  बापन्नार्य  यांच्याकडे  आले.  ज्या  ज्या  वेळी  बापन्नार्यानी  श्रीपादांच्या  चरणावरील  शुभचिन्हे  पहाण्याचा  प्रयत्न  केला,  त्या  त्या  वेळी  त्यांना  कोटी  कोटी  सूर्याच्या  तेजस्वितेचा  अनुभव  येई  व  ती  शुभचिन्हे  त्या  तीव्र  प्रकाशात  दिसत  नसत.  याचे  त्यांना  राहून  राहून  आश्चर्य  वाटे.  परंतु  त्या  दिवशी  उष:काली  साळीच्या  कोंडयावर  दिव्य  असे  पदचिन्ह  दिसले.  त्यांनी  आपली  कन्या  सुमतीस  विचारले,  ''बाळ  या  कोंडयावरुन  कोण  गेले.  तुमचा  लाडका  नातूच  येथून  गेला.  आणखी  कोण  बाबा''  सुमतीने  उत्तर  दिले.  ते  पदचिन्ह  षोडशवर्षीय  कुमाराच्या  पदचिन्हासारखे  होते.  आजोबांनी  श्रीपादांना  आपल्या  मांडीवर  घेतले  व  त्याच्या  चरण  कमलांचे  ते  निरिक्षण  करू  लागले.  या  वेळी  त्यांना  दिव्य  प्रकाश  न  दिसता  मीच  साक्षात  दत्तात्रेयांचा  अवतार  आहे  असे  सूचित  करणाऱ्या  सुस्पष्ट अशा  चिन्हांचे  दर्शन  झाले.  त्या  दिव्य  चरणांचे  बापन्नार्यांनी  कौतुकाने  चुंबन  घेतले.  हा  बालक  श्री  दत्तात्रेयाचा  अवतार  असल्याचा  त्यांचा  निर्धार  दृढ  झाला.  त्याच  वेळी  त्यांच्या  मुखातून  श्री  दत्ताच्यास्तुतीपर  पद  आपोआप  निघाले.  त्या  दिव्य  चरणांच्या  दर्शनाने  बापन्नार्याच्या  अंगी  अष्टभाव  सिध्द  झाले.  त्यांच्या  डोळयातून  आनंदाश्रू  वाहू  लागले.  ते  श्रीपादांच्या  गालावर  ओघळले  आणि  मोत्याच्या  बिंदु  सारखे  चमकत  होते.  आजोबानी  आपल्या  उपरण्याने  हळुवारपणे  श्रीपादाच्या  गालावरील  ते  थेंब  पुसले.  या  वेळी  श्रीपाद  म्हणाले.  आजोबा  तुम्ही  सौरमंडलातून  शक्तिपात   करून  ती  शक्ति  श्रीशैल्यस्थित  श्री  मल्लिकार्जुन  शिवलिंगात  आकर्षित  केली  होती.  त्याच  वेळी  सूर्यमंडलातील  ती  शक्ति  गोकर्ण  महाबळेश्वरी  व  पादगया  क्षेत्री  स्थित  असलेल्या  स्वयंभू  श्रीदत्तात्रेयांच्या  ठायी   सुध्दा  आकर्षित  झाली.  गोकर्ण  महाबळेश्वर  क्षेत्रास  अधिक  शक्तिसंपन्न   करण्याचा  संकल्प  आहे.  प्राणी  मात्रातून  जे  अनिष्ट  स्पंदन  बाहेर  पडतात  त्या  स्पंदनाना  माझ्यात  लय  पावून,  जे  माझे  साधक,  आश्रित  आहेत  त्यांच्या  प्रति  शुभ  स्पंदनांचे  प्रसारण  व्हावे  असा  माझा  संकल्प  आहे.  गोकर्ण  महाबळेश्वर  हे  परमेश्वराचे  ''आत्मलिंग''  आहे.  त्याच्या  केवळ  दर्शनाने  मुक्ति   साध्य  होते.  तसेच  श्रीशैल्याच्या  दर्शनाने  सुध्दा  मुक्तिचे   फळ  प्राप्त  होते.  येथील  मल्लिकार्जुनास  शक्तिसंपन्न  करण्याचा  संकल्प  आहे.  तुम्ही  सत्यऋषी  आहात.  मी  यतीच्या  रूपात  होतो  तेव्हा  आईने  मला  नमस्कार  केला,  त्यामुळे  मी  अल्पायुषी  होणार  असे  आपले  मत  होते.  परंतु  आईने  मला  श्रीपाद  रूपात  नमस्कार  केला  म्हणून  मी  अल्पायुषी  होणार  असे  म्हणालो  तेंव्हा  आपल्या  दोघांचेही  म्हणणे  खोटे  होऊ  नये  म्हणून  मी  केवळ  सोळा  वर्षे  पर्यंत  तुमच्या  घरी  राहण्याचे  ठरविले   आहे.  संसार  बंधनातून  मुक्तीची  इच्छा  करणाऱ्या  मुमुक्षूंना  अनुग्रह  देण्याचे  कार्य  पुढे  आहे.  मी  चिरंजीव  असावे  असा  तुमचा  संकल्प  आहे,  तो  मी  पूर्तीस  नेईन.  श्रीपाद  श्रीवल्लभ  हे  स्वरूप  गुप्त  करेन.  नृसिंह   सरस्वती  हा  अवतार  घेतला  तरी  श्रीपाद  श्रीवल्लभ  रूप  हेच  नित्य  सत्य  रूप  म्हणून  राहील.  नृसिंह  सरस्वतीचे  अवतारकार्य  पूर्ण  करून  श्रीशैल्यास  असलेल्या  कदलीवनात  तीनशे  वर्षे  पर्यंत  तपश्चर्या  करून  प्रज्ञापूर  (अक्कलकोट)  येथे  स्वामी  समर्थ  रूपात  प्रकट  होईन.  तेथील  वटवृक्षामध्ये  माझी  प्राण  शक्ति   प्रवेश  करवून  मल्लिकार्जुन  शिवलिंगात  विलिन  होईन.

बापन्नार्याना  हे  सगळे  आश्चर्यकारक  व  अद्भूत  असे  वाटले.  आजोबांच्या  घरी  पहिल्या  वर्षीचा  वाढदिवस  अति  आनंदात  व  थाटाने  साजरा  झाला.  पीठिकापुरमला   त्या  दिवशी  आणखी  एक  आश्चर्य  घडले.  नरसावधानी,  देवळाचे  पुजारी  आणि  अजून  कांही  मंडळी  कुक्कटेश्वराच्या  मंदिरात  दर्शनाला  गेले  असताना,  त्यांना  तेथे  स्वयंभू  दत्तात्रेयांची  मूर्ती  दिसली  नाही.  मंदिरातील  मूर्ती  दिसेनाशी  झाल्याची  वार्ता  गावात  दावानलासारखी  पसरली.  नरसावधानींच्या  विरूध्द  असलेला  एक  तांत्रिक  मूर्ती  अदृश्य  होण्याचे  कारण  नरसावधानींच  आहेत  असे  मोठ्या   तावातावाने  म्हणू  लागला.  नरसावधानी  क्षुद्र  विद्येचे  उपासक  आहेत  त्यांनीच  मूर्ती  अदृश्य  केली,  असा  प्रचार  गावात  करण्यास  त्याने  सुरुवात  केली. पिठपुर पीठापुरमच्या  ब्राह्मणांनी  नरसावधानींच्या  घराची  झडती  घेण्याचे  ठरविले .  ते  ब्राह्मण  श्री  बापनार्यांना  भेटले  व  झालेला  प्रकार  सांगितला.  तेव्हा  बापन्नार्य  त्या  ब्राह्मणास  म्हणाले,  सत्य  प्रत्ययास  येईपर्यंत  मौन  राहावे.  योग्य  वेळी  या  प्रश्नाचे  समाधान  होईल.  नरसावधानींच्या  घराची  झडती  घेऊन  संशयित  स्थळी  खोदकाम  केल्यावर  तेथे  मानव  कपाल  व  क्षुद्र  विद्येस  उपयोगी  पडणाऱ्या  कांही  वस्तु  सापडल्या,  परंतु  श्रीदत्तात्रेयांची  मूर्ती  मात्र  मिळाली  नाही.  श्री  नरसावधानी  मूर्तीच्या  चोरीच्या  आरोपापासून  मुक्त  झाले.  परंतु  ते  क्षुद्र  विद्येचे  उपासक  असल्याचे  सिध्द  झाले.  दिवसेंदिवस  त्यांची  प्रकृति  क्षीण  होत  होती.  त्यांच्याकडे  एक  वांझ  गाय  होती.  तिला  बैलाप्रमाणे  शेतीच्या  कामासाठी  वापरीत  व  वेळेवर  दाणा-पाणी  सुध्दा  देत  नसत.  एके  दिवशी,  नरसावधानींच्या  विरूध्द  असलेल्या  तांत्रिकाने  त्या  गायीच्या  शरीरात  क्षुधा शक्तीचे   आवाहान  केले.  त्यामुळे  त्या  गायीने  खुंटाचे  बंधन  तोडून  टाकून  ती  घरात  शिरली  व  घरच्या  लोकांना  शिंगाने  मारू  लागली.  नरसावधानींनी  अतिप्रेमाने  लावलेला  राजगिऱ्याच्या  भाजीचा  मळा  तिने  उध्वस्त  केला.  त्या  गायीच्याजवळ  जाऊन  तिला  दोरीने  बांधणे  कोणासच  शक्य  झाले  नाही.  त्याच  दिवशी  नरसावधानींच्या  घरी  त्यांच्या  आईचे  श्राध्द  होते.  श्राध्दाचा  संपूर्ण  स्वयंपाक  झाला  होता.  श्राध्दाच्या  ब्राह्मणांचे  भोजन  झाले  होते.  घरच्या  मंडळीचे  मात्र  जेवण  अजून  झाले  नव्हते.  त्या  गायीने  सारे  अन्न  व  वडे  खाऊन  टाकले.  याच  वेळी  बालक  श्रीपाद  प्रभु  आपल्या  वडिलांना  नरसावधानींच्या  घरी  घेऊन  जाण्याचा  हट्ट  करू  लागले.  श्रीराज  शर्मा  त्यांना  घेऊन  नरसावधानींच्या  घरासमोर  जाऊन  उभे  राहिले.  तेवढयात  ती  गाय  नरसावधानींच्या  घरातून  बाहेर  आली.  तिने  अंगणात  उभे  असलेल्या  श्रीपादांना  तीन  प्रदक्षिणा  घातल्या  व  नंतर  त्यांच्या  चरणी  नतमस्तक  झाली  व  त्याच  अवस्थेत  गतप्राण  झाली.

या  प्रसंगानंतर  गावातील  लोक  अनेक  मते  व्यक्त   करू  लागले.  गायीने  खाल्लेल्या  वडयामध्ये  विष  होते  व  ते  खाल्याने  गाय  मरण  पावली.  आता  नरसावधानींना  गोहत्येचे  पातक  लागेल  असे  नाना  लोकापवाद  उठू   लागले.  यामुळे  नरसावधानी  त्रस्त  झाले  होते.  त्या  गायीने  श्रीपादांना  तीन  प्रदक्षिणा  घातल्या  व  नंतर  त्यांच्या  चरणांवर  मस्तक  ठेऊन   प्राण  सोडले.  त्या  कारणाने  श्रीपाद  हे  दैवी  अवतार  असल्याची  सर्व  लोकांची  खात्री  झाली.  राजशर्माना  आयुर्वेद  शास्त्राचे  ज्ञान  होते.  ते  नरसावधानींच्या  विनंतीनुसार  त्यांचा  औषधोपचार  करीत  होते.  परंतु  त्यांच्या  दुर्धर  रोगावर  औषधाचा  कांही  परिणाम  दिसून  येत  नव्हता.  नरसावधानींची  प्रकृती  खालावतच  गेली  आणि  त्या  रोगातच  त्यांचा  एके  दिवशी  देहांत  झाला.

नरसावधानींच्या  मृत्यूमुळे  गावातील  लोक  श्री  राजशर्मानी  त्यांना  उत्तम  औषध  दिले  नाही.  त्यामुळे  ते  आपल्या  जीवास  मुकले  असे  बोलू  लागले.  कांहीजण  म्हणू  लागले  की  श्रीपाद  श्रीवल्लभ  नरसावधानीकडे  रोज  जात  असत.  ते  जर  दत्तावतारी  असते  तर  नरसावधानींचा  मृत्यू  कसा  झाला  ?  अनेकांनी  गोहत्येचे  पातकच  त्यांच्या  देहांताचे  कारण  असल्याचा  निर्वाळा  दिला.  नरसावधानींच्या  कुटुंबियांचे  सांत्वन  करण्यासाठी  श्री  राजशर्मा  व  श्रीपाद  गेले  असताना  नरसावधानींच्या  पत्नीने  त्यांचा  हात  धरून  म्हटले  ''अरे  बाळा  श्रीपादा  !  चिमुटभर  सौभाग्याचे  वाण  घेण्यासाठी  मी  दूर  दूर  पर्यंत  हळदी  कुंकुवास  जात  होते.  तू  दत्तात्रेयच  आहेस  तर  नरसावधानी  आजोबाना  जिवंत  करणे  तुला  शक्य  नाही  का  ?''  असे  म्हणून  ती  माउली  रडू  लागली.  नवनीतासम  मृदु   हृदय  असलेल्या

श्रीपाद  प्रभूंनी  त्या  मातेचे  अश्रु  पुसले.  शवयात्रा  सुरू  झाली.  राजशर्मा  व  श्रीपाद  त्या  अंतिम  यात्रेत  सहभागी  झाले.  नरसावधानीच्या  ज्येष्ठ  पुत्राने  पित्याच्या  चितेस  अग्नी  देण्यासाठी अग्नी  हातात  घेतला.  त्याच  वेळी  श्रीपादांच्या  नयनांतून  दोन  थेंब  बाहेर  पडले.  याच  वेळी  मेघगर्जनेसारख्या  आवाजात  श्रीपाद  म्हणाले  ''अहाहा  !  मृत   झालेल्या  पित्याच्या  शरीरास  अग्नी  देणारे  पुत्र  तर  पाहिले.  परंतु  जिवंत  पित्यास  अग्नी  देणाऱ्या  पुत्रास  पाहिले  नाही.''  हे  वक्तव्य   ऐकून  स्मशानात  जमलेले  सारे  लोक  निस्तब्धतेने  श्रीपादांकडे  पाहू  लागले.  श्रीपादांनी  चितेवर  असलेल्या  नरसावधानींच्या  भ्रूमध्यावर  अंगुष्ठाने  स्पर्श  केला,  त्या  दिव्य  स्पर्शाने  नरसावधानींच्या  अंगात  चैतन्य  स्फुरू  लागले  आणि  आश्चर्य  असे  की  कांही  क्षणातच  ते  चितेवरून  खाली  उतरले.  त्यांनी  श्रीपाद  प्रभूंना  साष्टांग  नमस्कार  केला.  नंतर  ते  सर्व  लोकांबरोबर  घरी  परतले.  त्यांना  सजीव  घरी  आलेले  पाहून  त्यांच्या  पत्नीस  अत्यंत  आनंद  झाला.  श्रीपादप्रभूंच्या  अंगुष्ठ  स्पर्शाने  नरसावधानींना  कर्मसूत्राचे  सूक्ष्म  ज्ञान  आले.  त्यांच्या  घरातील  मृत   झालेली  वांझ  गाय,  ही  गत  जन्मातील  नरसावधानींची  माता  होती.  त्यांच्या  घरी  असलेला  बैल  हे  त्यांचे  पिताश्री  होते.  या  गोष्टीचा  बोध  नरसावधानींना  झाला.  मरते  समयी  त्या  गायीने  श्रीपाद  प्रभुंना  आपले  दुध  त्यांनी  प्यावे  अशी  विनंती  केली  होती.  पुढच्या  जन्मी  जेंव्हा  वांझ  म्हैस  म्हणून  ती  जन्माला  येईल  त्यावेळी  श्रीपाद  प्रभु  नृसिंहसरस्वती  अवतारात  तिचे  दुग्धपान  करतील.  हे  श्रीपादानी  गायीस  दिलेले  वचन  नरसावधानींना  कळले.  ज्या  तांत्रिकाने  नरसावधानींवर  प्रयोग  केला  होता,  त्याचा  मृत्यू  लवकरच  होणार  असून,  पुढच्या  जन्मी  तो  ब्रह्मराक्षसाच्या  योनीत  जन्म  घेणार  असून,  त्याच्यावर  यतिरूपात  असलेल्या  श्रीपादांचा  अनुग्रह  होईल  असे  सूक्ष्म  लोकातील  विषय  नरसावधानींना  श्रीपादाच्या  कृपाप्रसादाने  ज्ञात  झाले.  त्यांना  स्वत:च्या  पुढील  जन्माची  माहिती  सुध्दा  कळली.  पुढील  जन्मात  त्यांच्या  घरी  यतीरूपाने  श्रीपाद  प्रभु  येऊन  त्यांच्याकडून  राजगिऱ्याच्या  भाजीची  भिक्षा  स्वीकारून,  राजगिऱ्याचे  पीक  स्वहस्ते  नष्ट  करून,  त्याच्या  मुळाशी  असलेला  सोन्याच्या  नाण्यांनी  भरलेला  हंडा  त्यांना  देतील.  ही  भविष्यवार्ता  नरसावधानींना  श्रीपादांच्या  अंगुली  स्पर्शाने  कळली  होती.

श्रीपादांचा  चेहरा  अतिशय  सात्विक,  सुंदर,  दैदिप्यमान  असा  होता.  त्यांची  तुलनाच  होऊ  शकत  नाही.  श्रीपाद  प्रभुंनी  नरसावधानी  आणि  त्यांच्या  पत्नीस  केलेला  उपदेश,  त्यांचा  अनुग्रह  केलेली  विधाने  मी  तुला  उद्या  सांगेन.  आता  आपण  त्यांचे  स्मरण  करीत  भजनात  रंगून  जाऊ  या.  ज्या  ठिकाणी   त्यांचे  नामस्मरण,  भजन,  कीर्तन  होते,  त्या  ठिकाणी   श्रीपाद  प्रभु  सूक्ष्म  रूपाने  संचरण  करीत  असतात,  हे  अक्षर  सत्य  आहे

तिरुमलदासासारख्या  भक्ताच्या  सत  संगतीने  आनंदाने  आम्ही  पुलकित  झालो. 

॥  श्रीपाद  श्रीवल्लभांचा  जय  जयकार  ॥

श्रीपाद वल्लभ चरित्र अमृत :- अध्याय - 5

॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ 
अध्याय -५
शंकर भट्टाचे तिरुपतीला पोहोचणे काणिपाकात तिरुमलदासांची भेट 
श्रीपादांच्या अनुग्रहाने शंकर भट्टाची शनिपीडा निवारण
मी माझ्या प्रवासात परम पवित्र तिरुपती महाक्षेत्रास आलो. माझ्या मनात केव्हाही न अनुभवलेल्या शांतीचा अनुभव आला. तिरुपती महाक्षेत्रातील पुष्करणीचे स्नान करून श्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतले. मंदिराच्या अंगणातच ध्यानस्थ झालो. ध्यानात श्री वेंकटेश्वरांना स्त्रीमूर्तिरूपात पहिले. बालत्रिपुरसुंदरी या रूपात पाहिलेली मूर्ति थोडया क्षणां तच परमेश्वराच्या रूपात बदलली, आणि थोडया वेळाने महाविष्णुच्या रूपात बदलली. ध्यानात असतानाच काही वेळाने ती मूर्ती चौदा वर्षाचे वय असलेल्या अतिसुंदर काया धारण केलेल्या बालयतीच्या रूपात प्रकट झाली. त्या बाल यतीची दृष्टी अमृतमय असल्याचे जाणवले. नेत्रद्वयातून हजारो मातेच्या वाच्छल्यानुरागाची जणु वर्षाच होत होती. एवढयातच त्या बालयतीजवळ काळया रंगाचा एक कुरूप माणूस पोहोचला. तो त्या बालयतीस म्हणाला, ''श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू ! आपण साऱ्या जगाचे नियंत्रण करणारे आहात. तुमचा भक्त असलेल्या शंकर भट्टाला आजपासून साडेसातीचा प्रारंभ होत आहे. या विश्वात अनेक प्रकारचे कष्ट आहेत ते मी त्याच्या अनुभवास आणीन. प्रभूंच्या आज्ञेसाठी येथे उभा आहे.'' करुणांसागर प्रभु म्हणाले, ''अरे शनेश्चरा ! तू कर्मकारक आहेस. जीवांना कर्मफलितांचे अनुभव करवून त्यांना कर्मविमुत्तच् करतोस. तू तुझ्या धर्माला अनुसरून कर्तव्य कर. आश्रित जनांचे रक्षण करणे ही माझी प्रतिज्ञा आहे. म्हणून शंकर भट्टाला मी तुझ्या पासून झालेल्या कष्टकाळात सहाय्य करून कशी सुटका करून देतो ते तू बघ.'' श्रीपाद महाराज आणि शनैश्चराचे असे संभाषण झाल्यावर दोघेही माझ्या ध्यानातून निघून गेले. परंतु नंतर भगवन्मूर्तिचे ध्यान करणे कठीण झाले. माझ्या कष्टकाळाची सुरूवात झाली. श्रीपादांकडून माझी कष्टातून सुटका होईल याचा दृढ विश्वास होता. मी तिरुमलाहुन तिरुपतीला आलो.
तिरुपतीच्या रस्त्यावर मनाला वाटेल तसे चाललो होतो. मन चंचल होते. एक न्हावी मला बळजबरीने थांबऊन म्हणाला, ''तू वीस वर्षापूर्वी घरातून पळून गेलेला सुब्बय्या आहेस ना ? तुझे आईबाप काळजी करीत आहेत. तुझी भार्या रजस्वला झालेली आहे. ती वयात आली आहे. तू तिच्या बरोबर संसार कर. मुलाबाळासहित सुखी रहा. तेव्हाच मी म्हणालो, ''अहो, मी शंकरभट्ट नावाचा कन्नड देशात राहणारा ब्राह्मण. वाटसरू आहे आणि पुण्यक्षेत्र संचार करीत येत आहे. मी दत्तभक्त आहे. श्री दत्तप्रभू श्रीपाद श्रीवल्लभ या नामरूपाने अवतरले आहेत, असे ऐकून कुरूगड्डीला प्रयाण आरंभिले आहे. परम पवित्र गायत्रीची शपथ घेऊन सांगतो, मी ब्रह्मचारी आहे. मी तुम्ही म्हणता तो सुबय्या न्हावी नाही.''
परंतु माझा आवाज ऐकणारे कोणी नव्हते. तेथे पुष्कळ लोक जमा झाले होते. प्रत्येकजण कोणत्या न कोणत्या रीतिने माझी निंदाच करीत होता. मला सुब्बय्या नावाच्या माणसाच्या घरी नेण्यात आले. सुब्बय्याचे आई वडील मलाच त्यांचा मुलगा समजून अनेक प्रकारे माझी समजूत घालीत म्हणाले, या पुढे आम्हाला सोडून जाऊ नकोस. रजस्वला स्त्रीला सोडून जाणे हा महाअपराध आहे. त्यातील एक माणूस म्हणाला, ''सुब्बय्या दाढी आणि मिशांनी झाकला गेला आहे. याचे क्षौरकर्म केल्यास पूर्वीची कळा येईल.'' मी सुब्बय्या नाही असे अनेकदा सांगितले परंतु माझे ऐकणारे कोणीच नव्हते. बळजबरीने माझे क्षौर कर्म करण्यात आले. गुळगुळीत गुंडू केला. दाढी, मिशा पण काढून टाकल्या. माझ्या गळयातील पवित्र यज्ञोपवित सुध्दा काढून टाकले. माझ्यासाठी त्यांच्या माहितीतल्या एका भूत वैद्याला बोलावण्यात आले. त्याने चित्रविचित्र अशी वेशभूषा केली होती. त्याच्या भयंकर दृष्टीनेच माझ्या हृदयात कांपरे भरले. मला बांधून चाकूने माझ्या डोक्यावर वार केला गेला. त्यावर लिंबाचा रस आणि विविधप्रकारचे रस ओतले गेले. मला तो त्रास सहन होत नव्हता. हा सगळा छळ झाल्यावर सुब्बय्याला ब्राह्मण भूताने पछाडले आहे, म्हणूनच हा जानवे घालून मंत्र बरळतो असा निर्णय घेण्यात आला. तिरुपतीत असलेले ब्राह्मण सुध्दा स्तब्धच झाले होते. ह्या नगरात आलेला वाटसरू सुब्बय्याच आहे, त्याला एका ब्रह्मराक्षसाने बाधले आहे असेच ते समजले. मला त्या गावातील मोठ्या श्रेष्ठ ब्राह्मणांकडे नेले गेले. मी कन्नड देशीय स्मार्त ब्राह्मण आहे, भारद्वाज गोत्राचा आहे. नमक चमक मला येते, संध्या वंदन पण करतो असे माझ्या सांगण्यावर त्यांचा विश्वासच नव्हता. सुब्बय्यास एका कन्नड ब्राह्मण भूताने झपाटले आहे, त्यासाठी योग्य चिकित्सा करून परत पूर्वीसारखे करावे. असे त्या श्रेष्ठ ब्राह्मणांनी सांगीतले.
घावाने झालेल्या त्रासाने मी चक्राऊन गेलो. माझे रुदन केवळ अरण्यरुदनासारखेच झाले. शुध्दीवर आलो तेव्हा माझ्या समोर माझ्या सारखाच काळे तेज असलेला एक विकृत आकाराचा माणूस बसलेला आहे असे वाटले. तो माझ्याशी काही न बोलता माझ्यामध्ये समाऊन गेला. माझ्याशी तदाकार झाला. साडेसातीच्या प्रभावाने साडेसात वर्ष माझा कष्टकाळ आहे. याची कल्पना मला आली. श्रीपाद श्रीवल्लभच या कष्टाच्या काळात माझे रक्षण करतील असा मला दृढ विश्वास होता. तेवढया तापात सुध्दा मी मनात श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करीत होतो. श्रीचरणांचे नामस्मरण केल्याबरोबर माझा त्रास कमी होण्यास सुरुवात झाली. भूतवैद्य मात्र कोंबडया, बकऱ्यांची बळी देत, चित्रविचित्र पूजा करीत होता. मला मात्र पथ्याचा आहार दिला होता. सुब्बय्याला ब्राह्मण भूताने बाधले आहे, त्यामुळे त्याला शाकाहारच दिला पाहिजे असे मांत्रिकाने सांगितले. श्रीपादांच्या अनुग्रहानेच मला शाकाहार दिला गेला, याचे मनाला बरे वाटले. तीन दिवस मी तीव्र नरक यातना भोगल्या. त्या संकटात सुध्दा मी श्रीचरणांचे स्मरण न चुकविल्यामुळे चौथ्या दिवसापासून संकटे येणे बंद झाले. ते लोक माझ्या शरिरावर चित्रविचित्र असे प्रयोग करीत होते. मांत्रिक मधून मधून चाबकाने मारत होता. ''श्रीवल्लभा शरणं शरणं'' अशी दीनतेने हाक मारीत मी रडत होतो. श्रीदत्ताची अनन्य भक्तीने सेवा करणाऱ्याला ही अशी नरकबाधा कशी असते, याचे मला आश्चर्य वाटत होते. तेवढयातच विचित्र घडले. माझ्या शरिरावर चाबकाचा मार बसला परंतु मला किंचित सुध्दा त्रास झाला नाही. तेव्हा मांत्रिकच रडू लागला. तो मला मारत होता, पण त्याच्या माराचा त्रास त्यालाच होत होता. हे कसे घडते हे त्याला समजत नव्हते. तो माझ्याकडे वेडसर नजरेने पाहात होता. मी मात्र ही श्रींचीच लीला आहे असे समजून हसलो. मी पथ्याचेच जेवण जेवत होतो परंतु ते सुध्दा मला मधुर वाटत होते. मी पोटभर जेवण्यास सुरूवात केली. जेवण श्रीपादांच्या अनुग्रहाचा प्रसाद समजून जेवत होतो. तो मांत्रिक मात्र त्याच्या आवडीचे कोंबडया बकऱ्या खात असला तरी त्याला ते विषासाखेच भासत होते. त्याची तब्येत पण क्षीण होत होती. तो मला त्रास देण्याचे सोडून केवळ मंत्र, पूजा वगैरे करून वेळ घालवीत होता. माझा इलाज सुरू झाल्यापासून पाचव्या दिवशी त्याचे घर जळून गेले. त्या घरात अग्नी नव्हताच, तरीसुध्दा सगळयांच्या देखतच अग्नी प्रकट झाला आणि क्षणातच सगळे राख झाले. सहाव्या दिवशी तो खिन्नतेने सुब्बय्याच्या घरी येऊन म्हणाला, ''सुब्बय्याला लागलेले ब्राह्मण भूत मांत्रिक होते. त्याने माझ्या घराला मांत्रिक प्रयोगाने दग्ध केले.''
वेताळ वगैरे अनेक क्षुद्रशक्तींना प्रसन्न करण्यास, अनेक प्रकारच्या पूजा कराव्या लागतील, त्यासाठी अधिक धनराशी लागेल असे त्याने सूचित केले. मंत्रातंत्राचा काहीच उपयोग नव्हता. मांत्रिक धनाच्या आशेने असे वागत होता हे मला माहित होते. विधिचे विधान मानून मान खाली घालून, सुब्बय्याच्या पत्नीला माझीच पत्नी म्हणून स्वीकार करण्याची वेळ आल्यास त्याच्यापेक्षा अधिक लाजिरवाणी परिस्थिती काय असणार ? त्यापेक्षा मोठा विश्वासघात कोणता असू शकतो. याची मला खंत वाटली. विधी माझ्या जीवनाशी एवढया क्रूरतेने का खेळत आहे समजत नव्हते, उलगडत नव्हते. माझे काळीज कापत असल्याचा अनुभव येत होता. मी सुब्बय्याच्या आई-बापांना म्हणालो, ''माझे माय बाप ! तुमच्या सर्व स्थावर संपत्तिची विक्री करून या मांत्रिकाच्या मायाजाळात पडू नका. माझी तब्बेत चांगलीच आहे. मी तुम्हाला आई-बापासारखेच मानतो.'' तेवढयावरच मला मांत्रिकाकडून मुक्ती मिळाली. सुब्बयाचे आई-वडील अत्यानंदीत झाले. त्यांच्या डोळयातील आनंद पाहून माझे डोळे पण ओले झाले. परस्त्री मातेसमान असते म्हणून येणाऱ्या संकटातून माझी रक्षा करावी. धर्म भ्रष्ट होऊ देऊ नये, अशी अत्यंत दीनपणे मनातल्या मनातच श्रीपादांची प्रार्थना करीत होतो.
माझा इलाज सुरू झाल्यावर आठव्या दिवशी माझी सेवा करणाऱ्या सुब्बय्याच्या पत्नीला बघून म्हणालो. ''माझ्या बाबतीत तू काय समजतेस ? मी खरा खरा सुब्बय्याच आहे यावर तुझा विश्वास आहे का ?'' त्यावर ती म्हणाली. ''मी दोन वर्षाची असताना माझे लग्न झाले. आता माझे वय 22 वर्ष आहे. आपण माझे पती आहात का नाही ते त्या परमेश्वरालाच माहीत, दुसऱ्या कोणालाहि माहित नाही. नूतन यौवनांत पदार्पण केलेल्या पत्नीस पाहून पुरूष स्थिर राहू शकत नाही. आपण इतका त्रास सहन करीत असताना सुध्दा मला पत्नी या नात्याने स्विकारले नाही. स्पर्श केला नाही, हे सगळे उत्तम संस्कार असणाऱ्यालाच शक्य आहे. तुमच्या विषयी मला कसलीच भावना नाही. मी कुळाचराला अनुसरून धर्मानेच जीवन कंठायचे ठरवले आहे. आपण माझे पति असल्यास या चरण दासीला सोडून जाऊ नये. माझा नवरा पळून जाऊन 20 वर्षे झाली. माझा विवाह बालपणातच झाला तो मला नकळतच. या कारणास्तव तुम्ही मला आपली पत्नी म्हणून स्वीकार करू शकता. मी तुमच्या मार्गदर्शनाखालीच राहीन. तुम्ही नेहमी स्मरण करता ते श्रीपाद श्रीवल्लभांचे स्मरण करीन. त्या सद्गुरुंच्या चरणी ह्या जटिल समस्येचे धर्मसम्मतिपूर्वक निवारण करावे अशी मी प्रार्थना करीन.''
तिचे वक्तव्य मला युक्ति संगत असल्यासारखे वाटले. मी म्हणालो, ''श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात दत्तप्रभूच आहेत. या कलियुगात त्यांनी अवतार घेतला आहे. प्रस्तुत ते कुरवपुरांतच आहेत. आपल्या भक्तीभावास अनुसरून त्यांचे वर्तन असते. श्रीपाद श्रीवल्लभांना सद्गुरु या रूपाने स्मरण केल्यास सद्गुरुसारखेच अनुभव येतात. परमात्मा या रूपाने स्मरण केल्यास, तेच परमात्मा आहेत असे सिध्द करतात. तू सुध्दा श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण कर. अचूक कर्तव्याचा बोध होईल. सगळयांना आनंदमय परिणाम लाभतील.''
त्या दिवशी वाडयात भविष्य सांगणारा एक माला जंगम आला. जंगमाच्या वेशात असलेल्या त्या माणसाकडे ताडपत्री ग्रंथ होते. आमच्या वाडयातील सर्वजणांना थोडयाच कालावधीत तो फार आदरणीय झाला. त्याला भेटलेल्या सर्व भाविकांना तो भूत भविष्याची माहिती अत्यंत अद्भूत प्रकारे सांगत असे. त्याच्याजवळचे ताडपत्र ग्रंथ हे नाडी ग्रंथ असून, त्याला रमलशास्त्र असे नाव होते. त्यातील विषय अचूक असून त्यात सांगितलेल्या घटना बरोबर घडतात असे तो सांगत असे. सुब्बय्याच्या जनकांच्या समजूतीसाठी तो आमच्या घरीसुध्दा आला. माझ्या हातात थोडया कवडया देऊन त्या खाली टाकण्यास सांगितल्या, त्यानंतर गणित घालुन त्याच्या ताडपत्राच्या ग्रंथातून एक पत्र काढून त्याने वाचण्यास सुरूवात केली. ''प्रश्न केलेला माणूस शंकरभट्ट नावाचा कन्नड ब्राह्मण आहे. दत्तावतारी श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राचे लिखाण हाच करेल. पूर्वजन्मी हा आणि याचा एक मित्र कंदुकूर ह्या शहराच्या थोडयाच दूर असलेल्या मोगलीचर्ला ह्या ग्रामात जन्मले. जुगार खेळण्यात त्यांची विशेष आसक्ती होती. त्या ग्रामात एक प्रसिध्द स्वयंभू दत्ताचे देऊळ होते. हा श्री दत्त देवालयाच्या अर्चकाच्या भावाच्या रूपात जन्मास आला. मोठ्या भावाच्या अनुपस्थितीत पूजा वगैरे हाच करीत असे. दत्त देवालयाच्या प्रांगणात हा आणि याचा मित्र दोघेही जुगार खेळण्यात मग्न असत. हा किती अनाचार आहे याची त्यांना खंत नव्हती त्याच्या मित्राबरोबर एके दिवशी खेळताना त्याने विचित्र अशी अट ठेवली . त्याचा मित्र जिंकल्यास हयाने खेळात हरलेली रक्कम द्यावी आणि हा जिंकला तर त्याच्या मित्राने आपल्या पत्नीस ह्याला द्यावे असे ठरले . या कराराला साक्ष म्हणजे हे दत्तप्रभूच आहेत असे मानून प्रमाण करून जुगार खेळण्यास सुरूवात केली. ''
आपल्या समक्ष अत्यंत वाईट खेळ चालू असलेला दत्तप्रभू बघतच होते. खेळामध्ये शंकरभट्ट विजयी झाला. शंकराच्या मित्राने त्याच्या पत्नीस त्याला देण्याचे नाकारले. भांडण मोठ्या माणसांपर्यंत गेले. कुळातील सुज्ञ लोक एकत्रित जमले. पवित्र अशा दत्तप्रभूंसमोर एवढे मोठे दुष्कृत्य घडले, ही अत्यंत खेदपूर्ण घटना होती. परस्त्रीचा मोह करूनन तिला वक्रमार्गाने प्राप्त करून घेण्याची इच्छा दर्शविल्या बद्दल शंकर याच्या डोक्यावर गरम गरम तेल घालावे. तसेच खेळामधे आपल्या पत्नीस पणाला लावलेल्या ह्यांच्या मित्राला नपुंसकपणा येण्यासारखे अंगछेदन करावे. असे केल्यावर त्या दोघांना ग्रामातून बहिष्कृत करावे असा न्याय सूज्ञांनी दिला. त्यांच्या न्यायाची अंमलबजावणी करण्यात आली. शंकरभट्टाने त्याच्या पूर्वजन्मी थोडाकाळ दत्त सेवा केल्यामुळे ह्या जन्मी देवभक्ति असलेला जन्म प्राप्त झाला. त्याचा मित्र सुब्बय्या या नावाने क्षौर कर्म करणाऱ्यांच्या घरी परमपवित्र अशा तिरुपती क्षेत्रात जन्मला. त्याचे मन चंचल झाल्यामुळे वेडा होऊन लग्न झाल्यानंतर पळून गेला. भोळसर असलेली सुब्बय्याची पत्नी निर्दोष आहे. तिच्या पातिव्रत्याच्या प्रभावाने सुब्बय्याच्या मनाची चंचलता कमी होऊन हे रमल शास्त्र ऐकल्याच्या दुसऱ्या दिवशी सुब्बय्या परत येईल. त्या दिवशी शंकरभट्टाची सुटका होईल. शंकरभट्टाला असलेली साडेसाती श्रीपाद श्रीवल्लभांच्या अनुग्रहाने साडेसात दिवसांतच निघून जाईल. भगवंताला साक्ष ठेऊन अनुचित संकल्प केल्यास अथवा, अधर्म केल्यास दत्तप्रभूंच्याकडून कठींनातील कठीण शिक्षेस पात्र होतात. सुब्बयाच्या मन चंचलतेच्या परिहारास्तव शंकरभट्टाच्या पुण्यातील थोडा भाग खर्च झाल्याचे चित्रगुप्ताने लिहिले आहे. कर्माचा प्रभाव अत्यंत सूक्ष्म रीतिने काम करीत असतो, ह्या सत्याची जाणिव होऊन जीवाने सदैव सत्कर्मच करावे. दुष्कर्म कधीहि करू नये. श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्म पत्रिकेप्रमाणे त्यांच्या अवतार समाप्ती नंतर थोडया शतकांनी त्रिपुर देशातील अक्षयकुमार या नावाच्या जैन मतस्थाकडून श्री पीठिकापुरत श्री प्रभूंची माहिती पोहोचेल. त्या अगोदर विलासांची माहिती देणारे 'श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ' या नावाचा ग्रंथ प्रकाशीत होईल.''
श्रीवल्लभांच्या करुणेचे वर्णन कसे करावे ? दुसऱ्या दिवशीच सुब्बय्या स्वगृहास परतला. त्याच्या मनाचे चंचलत्व पूर्णपणे मिटून तो स्वस्थचित्त झाला होता. सुब्बयाच्या पत्नीस मी माझी बहिण मानले. सुब्बय्याच्या माता-पित्याची परवानगी घेऊन मी चित्तूर जिल्हयातील काणिपाकं ग्रामास पोहोंचलो.
काणिपाकं हे ग्राम चित्तूरहून थोडयाच अंतरावर आहे. त्या ग्रामात वरदराज स्वामींचे देऊळ,मणिकंठेश्वर स्वामींचे देऊळ, वरसिध्दी विनायकाचे देऊळ आहे. मी देवदर्शन घेऊन बाहेर आलो. तिथे एक उंच कुत्रे उभे होते. मला भीती वाटून मी वरसिध्दिविनायकाच्या देवळात परत गेलो. थोडावेळ देवाचे ध्यान करून बाहेर आलो. त्या कुत्र्याबरोबर अजून एक कुत्रा तेवढयाच उंचीचा होता. आज ह्या कालभैरवाकडून चावणे हे निश्चितच आहे अशी भीति वाटली. परत वरसिध्दिविनायकाच्या मंदिरात गेलो. मंदिरातील पुजाऱ्याला माझे वर्तन विचित्र वाटले. ''बाबा तू घटके घटकेला बाहेर जाऊन परत मधे येतो आहेस याचे कारण काय ?'' असे त्याने विचारले. मी माझ्या भीतीचे कारण सांगितले. ''ते निष्कारण कोणाला कांही इजा करित नाहीत. ते एका धोब्याचे पाळीव कुत्रे आहेत. तो धोबी दत्तभक्त आहे. श्रीपाद श्रीवल्लभ या नामाने श्रीदत्तांनी या भूमीवर अवतार घेतला आहे, असे तो सांगत असतो. धोब्यांना देवालयात प्रवेश निषिध्द नाही, तरी सुध्दा तो या देवळामधे येत नाही. त्याच्या कुत्र्यास पाठवतो . मी स्वामींच्या प्रसादाचे गाठोडे बांधुन देतो. ते घेऊन ते त्याला देतात. तू दोनच कुत्रे पाहिले असे सांगितलेस. एकूण चार कुत्रे आल्यावरच मी प्रसाद देतो. अजून दोन कुत्रे आले का ते पाहू या'' असे तो पुजारी म्हणाला. आम्ही बाहेर येईपर्यंत चार कुत्रे होते. पुजाऱ्यांनी प्रसादाचे गाठोडे करून दिले. ते चारी कुत्रे माझ्या चारी बाजुंनी आले आणि त्यानी मला घेरले. पुजारी म्हणाला ''कुत्र्यांच्या मर्जीप्रमाणे तू त्या धोब्याकडे जा. तुला शुभकारकच होईल.''
माझ्या जीवनातील प्रत्येक घटना श्रीपाद श्रीवल्लभांच्या निर्देशानेच घडत असते असा माझा विश्वास होता. सुब्बय्याच्या घरात घडलेल्या घटने वरून कुळ, मत भेद नसावा असे मला वाटले. एक चांडाळ ब्राह्मणकुळात जन्म घेऊ शकतो. या जन्मातील ब्राह्मण दुसऱ्या जन्मात चांडाळ रूपाने जन्म घेऊ शकतो. मानव आपण केलेल्या पापपुण्याचे गाठोडे घेऊन जन्मजन्मांतराच्या कर्म प्रवाहात वाहत जात असतो
शंकरभट्ट आणि तिरुमलदासांचा संवाद
मी धोब्याच्या राहत्या गल्लीत आलो. तिरुमलदास असे नाव असलेला तो रजक 70 वर्षाचा म्हातारा होता. तो त्याच्या झोपडीतून बाहेर आला. मी घरात गेल्यावर त्याने मला एका पलंगावर बसवले. ब्राह्मणजन्माचा माझा अहंकार पूर्णपणे गेला होता. श्रीपाद श्रीवल्लभांचे भक्त कोणीही असले तरी मला आत्मियांसारखेच दिसत होते. वरसिध्दिविनायकाच्या देवळातील प्रसाद तिरुमलदासाने मला खाण्यास दिला. मी प्रसाद ग्रहण केला. नंतर तिरुमलदासाने सांगण्यास सुरुवात केली.
आइनविल्लिचे गणपतीच श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतरले
ते म्हणाले ''बाबा ! आजचा दिवस माझ्या अत्यंत भाग्याचा आहे ! आपल्या दर्शनाचा लाभ घडला. तुम्ही माझ्याकडे कधी याल, माल्याद्रीपुराचे आणि श्रीपीठिकापुर येथील विशेष वार्ता कधी सांगाल याची उत्सुकतेने वाट पाहातो आहे. बाबा ! शंकरभट्टा ! वरसिध्दि विनायकाचा प्रसाद घेतलास. तू आजच्या दिवशीच श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामृताचा श्रीगणेशा कर. तुला श्रीवल्लभांचा आशिर्वाद कुरवपुरात लाभेल. तिरुमलदासाने ह्याचा पूर्व वृतांत सांगायला सुरुवात केली. मी पूर्वजन्मी एक प्रतिष्ठित वेद पंडित होतो. परंतु परमलोभी होतो. माझ्या मृत्यूसमयी नुकतेच जन्मलेले गाईचेवासरू जुन्या चिंधिस चघळताना पाहून त्यास जपून ठेवण्यास मुलांना सूचना दिली. मरतेवेळी मलिन वस्त्रावर नजर ठेऊन मी प्राणत्याग केला त्यामुळे रजकाच्या जन्मास आलो. मरतेवेळी ज्या संकल्पाने प्राणत्याग होतो त्याला अनुसरून त्याला दुसरा जन्म मिळतो. माझ्या पूर्वपुण्याईनेच गर्तपुरी (गुंटुरू) मंडळातील पल्यनाडू प्रांतातील माल्याद्रीपुरात मी जन्मलो. तेच मल्याद्रीपुर कालांतराने मल्लादि या नावाने ओळखले जाऊ लागले. त्या ग्रामात मल्लादि नावाची दोन घराणी होती. मल्लादि बापन्नावधानि या नांवाचे महापंडित हरितस गोत्राचे होते. मल्लादि श्रीधरअवधानी या नांवाचे महापंडित कौशिक गोत्रीक होते. श्रीधरअवधानी यांची बहिण राजमांबा हिचा विवाह बापन्नावधानी यांच्या बरोबर झाला. गोदावरी मंडलांतर्गत असलेल्या ''आइनविल्लि'' या ग्रामात झालेल्या गणपती महायागास दोघेही गेले होते. शास्त्राप्रमाणे शेवटच्या आहुतीचा गणपती आपल्या सोंडेत स्विकार करील आणि आपले स्वर्णकांतीयुक्त स्वरूपाचे दर्शन देईल असे पंडितांचे मत होते. यज्ञाच्या शेवटी स्वर्णमयकांतीने गणपतीने दर्शन दिले. शेवटची आहुती आपल्या सोंडेत घेतली आणि मी स्वत: संपूर्ण कलेने गणेशचतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने अवतार घेईन असे वचन दिले. यज्ञास आलेले सगळेच लोक आश्चर्यचकित झाले. त्या सभेत तिघे नास्तिक होते. ते म्हणाले, ''दिसते ते सगळेच इंद्रजाल आहे की महेंद्रजाल आहे, पण गणपती मात्र नाही. तसे असलेच तर परत एकदा त्याचे दर्शन घडवून आणावे.''
काणिपूर विनायकाचा महिमा
होमकुंडातील विभूतीने मानवाचा आकार घेतला. त्यानंतर ती महागणपती स्वरूपात रूपांतरित झाली. ते रूप बोलु लागले. ''मुर्खानो ! त्रिपुरासुराच्या वधाच्या वेळी शिवाने, बलिचक्रवर्तीचा निग्रह करण्यापूर्वी तसेच शिवाचे आत्मलिंग घेऊन जाणाऱ्या रावणास विरोध करते वेळी भगवान विष्णुने, महिषासुराचा वध करण्याच्या समयी पार्वतीने, भूभार घेण्यापूर्वी आदिशेषाने, सर्व सिध्दी सिध्द होण्यापूर्वी सिध्दमुनींनी, प्रंपचावर विजय साधण्याच्या निमित्ताने मन्मथाने, याच प्रमाणे सकल देवतांनी माझी आराधना करूनच अभीष्ट प्राप्त केले. सगळया शक्तींचे मीच भांडार आहे. मी सर्वशक्तिमान आहे, राक्षस शक्ति सुध्दा माझ्यामध्येच आहे. सर्व विघ्नकर्ता मीच, सर्व विघ्नहर्ता सुध्दा मीच आहे. दत्तात्रेय म्हणजे कोण समजलात ? हरिहर पुत्र असलेला धर्मशास्ता तोच. विष्णुरूपात ब्रह्मारुद्र रूप विलीन झाले तेच दत्तरूप होय. धर्मशास्तारूपात गणपती, षण्मुख रूप विलीन झालेले हे रूप सुध्दा दत्तरूपच आहे. दत्तात्रेय हे सर्वकाळ त्रिमूर्ति स्वरूपच असतात. श्रीपाद श्रीवल्लभ रूपात महागणपती असल्याने गणेशचतुर्थीच्या दिवशीच त्यांचा अवतार होईल. त्यांच्या मधे सुब्रह्मंण्याचे तत्त्व असल्याने ते केवळ ज्ञान अवतार म्हणून ओळखले जातील. धर्मशास्ता तत्त्वामुळे ते रूप समस्त धर्म, कर्माचे आदि, आणि मूळ असे समजले जातील. हा अवतार माता-पित्याच्या संयोगाचे फळ नसेल. ज्योतिस्वरूपच मानवाकृतीचे रूप घेईल.'' श्री गणपती पुढे म्हणाले मी तुम्हाला शाप देत आहे. सत्यस्वरूप पाहुन सुध्दा ते असत्यआहे असे म्हणालात, त्यामुळे तुमच्या पैकी एक आंधळा जन्मेल. सत्यस्वरूपाची प्रशंसा न करता टिंगल केल्यामुळे तुमच्या पैकी एक मुका जन्मेल. एवढा जनसमुदाय निजभक्त , त्या सत्याच्या बाबतीत सांगत असता दुर्लक्ष करून न ऐकल्यामुळे तुमच्यापैकी एक बहिरा जन्मेल. तुम्ही तिघे बंधुरूपाने जन्माल. माझ्या स्वयंभू मूर्तीचे दर्शन घेतल्यावरच तुम्ही दोषरहित व्हाल.
बाबा ! ते तिघेही या काणिपुरात भावंडाच्या रूपात जन्मले. त्रिमूर्तिना दूषण दिल्यास, घोर अनर्थ होतो. ही तीन भावंडे, एक एकर जमिनीत, याच ग्रामात उत्पन्न काढीत असत. त्या शेतात पायथ्याला एक विहीर होती. मोटेच्या सहाय्याने पिकांना पाणी देण्याची सोय केली होती. एका वर्षी दुष्काळ पडला. जमिनीतील पाणी वाळून गेले. एके दिवशी विहिरीत असलेले पाणी सारे खर्च झाले, फावडा घेऊन तिघेही वाळू काढण्याच्या प्रयत्नात होते. त्या पाण्याखालील भागात असलेल्या दगडावर फावडा लागुन रक्ताचा फवारा वर आला. रक्त हाताला लागल्याने मुक्याला वाचा फुटली. पाणीसुध्दा विहीरीत यथाविधी भरू लागले. पाण्याच्या स्पर्शाने बहिऱ्याचा दोष गेला. तिसऱ्या आंधळयाने त्या पाण्यातील दगडाला स्पर्श केल्यामुळे त्याचे अंधत्व नाहीसे झाले. त्या स्वयंभू विनायकाच्या दगडी मूर्तीच्या डोक्यावर फावडा लागून रत्तच्स्रावास आरंभ झाला. ती स्वयंभू मूर्ती बाहेर काढण्यात आली.
त्या वरसिध्दी विनायकाची प्रतिष्ठापना करण्यास सत्यऋषिश्वर असे नामांतर झालेले बापन्नावधानी आणि त्यांचा मेव्हणा श्रीधरावधानी या ग्रामास आले होते. वरसिध्दी विनायक त्यांना म्हणाले. ''महाभूमी मधून या लोकात आलो. पृथ्वीतत्त्वावर अवतार घेतला. हे तत्त्व कालांतराने अनेक रूपांत रूपांतर होईल. जलतत्त्वात, अग्नीतत्त्वात, वायुतत्त्वात, आकाशतत्त्वात माझे अवतरण झालेलेच आहे. आइनविल्ली मधे तुम्ही केलेल्या महायज्ञातील भस्मानेच हे रूप धारण केले. नंतरच्या कर्तव्याचे आदेश देतो. श्रीशैल्यामधे कळा कमी आहे. सूर्यमंडळातील तेजाचा तेथे शक्तिपात केला पाहिजे. तुम्ही श्रीशैल्यामधे शक्तिपात केल्याच्या दिवशीच गोकर्णामधे, काशीमधे, बदरीमधे, केदारामधे, एकाच वेळी माझ्या विशेष अनुग्रहाने शक्तिपात होईल. श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतरणाचा समय निकट येत आहे. श्रीधरा तुझ्या घरचे नांव श्रीपाद म्हणून बदलत आहे. कौशिक गोत्रिक तुमचे वंशज आजपासून श्रीपाद या अडनावाने ओळखले जातील.''
बाबा ! शंकरा ! मल्यादिपुरातून सत्य ऋषिश्वर आणि श्रीधर पंडित पीठिकापुरत निवास करण्यास गेले. मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या अनेक बाललीला पाहिल्या. उद्या मी तुला त्या सविस्तर सांगेन. माझ्या पहिल्या बायकोपासून मला एक मुलगा झाला. त्याचे नांव रविदास आहे. तो कुरवपुरात राहात आहे. श्रीपादांची यथामतीने सेवा करीत असतो. मी श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेनुसार काणिपुरातच दुसऱ्या पत्नी आणि मुलाबरोबर कुलवृत्तीला अनुसरून रहात आहे. तू श्री पीठिकापुरात अनेक महानुभावांना भेटशील. वेंकटप्पय्या श्रेष्ठी नावाच्या व्यक्तीस भेटशील तेंव्हा अनेक महत्वाच्या विषया बद्दल माहिती मिळेल. श्री श्रेष्ठींना श्रीपाद प्रभु, वेंकटप्पय्या श्रेष्ठी या टोपण नावाने हाक मारीत असत. श्री श्रेष्ठींच्या वंशावर श्रीपादांचा अभयहस्त आहे. वत्सवाई असे उपनाम असलेल्या नरसिंह वर्मांना सुध्दा भेट. त्यांचा श्रीपादांशी घनिष्ट संबंध आहे. तुझ्याकडून रचल्या जाणाऱ्या श्रीपादांच्या चरित्रास श्रीचरणांचा आशिर्वाद लाभेल. तू लिहीलेल्या ग्रंथाखेरीज दुसरा कोणताही ग्रंथ श्रीपादांचे चरित्र संपूर्ण रीतिने माहिती देणारा असणार नाही, ही श्री चरणांची आज्ञा आहे.
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥

Wednesday, June 26, 2019

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २७ जून 🙏

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २७ जून  🌸*

*शाश्वतचे  सुख  कसे  लाभेल ?*  🌹🌼

असे पाहा, एखादा प्रवचन करणारा घ्या; किंवा मोठा वैदिक कर्मे करणारा घ्या; त्याला त्यापासून समाधान मिळते असे नाही, तो असमाधानातच असतो. 

कळू लागल्यापासून आपण सदाचाराने वागत असून आणि देवधर्म करीत असूनही आपल्याला समाधान लाभत नाही, याचे कारण काय ? तर आपले ध्येय निश्चित झालेले नसते. 
आपण नीतिने वागतो ते लोकांच्या भितीने; कारण आपण वाईट वागलो तर लोक आपल्याला नावे ठेवतील. लौकिकासाठी केलेले कर्म कधीही समाधान देऊ शकत नाही. 
पापकर्म करणार्‍यालाही समाधान लाभत नाही, कारण त्यालासुद्धा आपण करतो हे वाईट आहे असे वाटतच असते. 

एकदा एक गृहस्थ माझ्याकडे आला आणि म्हणाला, "देवापाशी काही न्याय नाही; तो अगदी अन्यायी आहे." मी त्याला विचारले, "असे झाले तरी काय ?" त्यावर तो म्हणाला, "मी कधी कोणाचा पैसा खाल्ला नाही, सदाचरणाने वागलो; पण मी फक्त एकमजली घर बांधू शकलो, आणि माझ्या हाताखाली काम करणार्‍या एका भिकारड्या कारकुनाने पैसा खाऊन माझ्या घरासमोर दुमजली घर बांधले !" मी त्याला विचारले, "मग तुम्ही का नाही पैसा खाल्ला ?" त्यावर तो म्हणाला, "मला तसे आवडत नाही; लोक नावे ठेवतील." तेव्हा, जे कर्म लौकिकासाठी केले त्याने कधीही समाधान मिळू शकणार नाही. 

प्रपंचात सुख लाभावे म्हणून आपण देवाचे करतो, आणि लौकिकासाठी नीतिधर्माने वागतो; मग त्यातून शाश्वतचे सुख कसे लाभेल ? 
अंगावर चांगले दागिने घातले, उत्तम लुगडे नेसले, परंतु कुंकू जर कपाळाला नसेल तर या सर्वांची काय किंमत ? 
तसेच, जर देवाचे प्रेम नसेल तर त्या सत्कर्मापासून तितकासा उपयोग होणार नाही. 
या‍उलट देवाच्या ठिकाणी अत्यंत प्रेम असूनसुद्धा जर नीतिधर्माचे आचरण नसेल, तर ती परमार्थाची इमारत टिकू शकणार नाही.

खरोखर परमार्थ अत्यंत सोपा आहे, विद्वान लोक तो उगीचच अवघड करून सांगतात. चांगले काय आणि वाईट काय हे कळायला लागल्यापासून जो त्याप्रमाणे वागेल त्याला खात्रीने परमार्थ साधेल. 

परमार्थ तीनपैकी कोणत्याही एका गोष्टीने साधू शकेल : 
एक, देहाने साधूची संगत; 
दुसरी, संतांच्या वाङ्‍मयाची संगत आणि त्याचप्रमाणे पुढे आचरण; आणि 
तिसरी, भगवंताचे नामस्मरण. नाम घेतल्याने त्याची संगत आपल्याला अखंड लाभू शकेल. 

संतांनी सांगितले ते संशय न घेता विश्वासाने करणे ही पहिली पायरी, आणि ते पुढे निश्चयाने, श्रद्धेने, आणि प्रेमाने चालू ठेवणे ही शेवटची पायरी. हाच शाश्वत समाधानाचा मार्ग आहे.

*१७९.  जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार; भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव परमार्थ .*

Tuesday, June 25, 2019

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २० जून 🙏

*।‌।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २० जून  🌸*

*ज्याला प्रपंच नाही करता आला । त्याचा परमार्थ ढिला पडला ॥*

मातापिता यांचे न पाहावे दोष । हे सर्व सत्पुत्राचे लक्षण सत्य ॥
माता-पितरांचे समाधान । हेच सुपुत्राचे खरे लक्षण ॥
आईचे अंतःकरण अत्यंत कोवळे असते । आपले दुःखीपणाने ते दुःखी होते ।
आपली आनंदी वृत्ति आईला आनंदी बनविते ।
म्हणून मुलांनी असावे नेहमी आनंदात । काहूर न माजू द्यावे चित्तात ॥
शब्दाने करावे त्यांचे समाधान । उत्तरी अपशब्दाचे न मानावे दुःख जाण ॥

नोकरी चाकरी उद्योग धंदा । पोटाकरिता करणे आहे सदा ॥
आपण पैका मिळवावा पुष्कळ । पण ते सुखाचे साधन न मानावे सकळ ॥
प्रपंचात नुकसान होईल असे काम करू नये । तसे शब्द बोलू नये ॥
आल्या अतिथा अन्न द्यावे । कोणास विन्मुख न पाठवावे ॥ 
निरुत्साही बनू नये । निराश वाटू देऊ नये ॥ अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे । त्यात रामाचे अधिष्ठान राखावे ॥
ज्याला प्रपंच नाही करता आला । त्याचा परमार्थ ढिला पडला ॥ 
प्रपंचाची काळजी । हीच परमार्थाला वाळवी ॥ परमात्म्याचा आधार ज्याला । ठाव नसे काळजीला ॥ 
शेजार असता रामाचा । दुःखाची, काळजीची, काय वार्ता ? ॥
मी कोण हे जाणले ज्याने चित्ती । त्याला काळजी न राहे अशी होईल वृत्ति ॥
राम त्राता हा भाव ठेवावा चित्ति । निर्भयता होईल याच रीती ॥
ज्याने देह केला रामाला अर्पण । त्याला नाही काळजीचे कारण ॥
कर्ता राम हे आणता चित्ति । पापपुण्याची नाही त्याला भीति ॥
ज्याचा परमात्मा झाला सखा । त्याला नाही कोठे धोका ॥

'कर्ता मी' म्हणे आपण । हे सर्व दुःख काळजीचे कारण ॥ 
झाले ते होऊन गेले । होणार ते चुकेना कोणाला भले ॥
म्हणून नाही करू काळजीला । राम साक्षी आहे त्याला ॥
जे जे काही माझे । ते ते जाणावे रामाचे ॥
राम त्यास सांभाळता । काळजीस कारण न उरले आता ॥ 
मुलाबाळांची न करावी काळजी । रामराय करावा राजी ॥
आपला प्रपंच हा रामाचा जाणून चित्ती । काळजी चिंता करणे ही योग्य नाही रीति ॥ 
शक्यतो करावे नामस्मरण । आपली काळजी न करावी आपण ॥
रामाचा म्हणून प्रपंच केला । काळजीचे कारण उरत नाही आपल्याला ॥ 
भगवंत असता पाठीराखा । काळजीची काय कथा ? ॥ 
म्हणून, मुखाने नाम, चित्तांत राम । त्याचे मनाला होईल आराम ॥
सतत ठेवावे एक चित्तीं । न सोडावा रघुपति ॥ सर्व सारांचे सार । एक भजावा रघुवीर ॥
नेमात नेम उत्तमजाण । रामावाचून न राहावे आपण ॥

*१७२.  सर्व कर्ता राम । हा भरवसा ठेवावा ठाम । मग काळजीचे उरले नाही काम ॥*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २१ जून 🙏

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २१ जून  🌸*

*भाव  असल्याशिवाय  परमार्थ  होत  नाही .*

प्रपंचात जसा पैसा लागतो त्याप्रमाणे परमार्थात भाव लागतो. प्रपंचात पैशाशिवाय चालूच शकत नाही. परमार्थही भाव असल्याशिवाय होत नाही. जसा तुमचा भाव असेल त्याप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. प्रल्हादाला खांबातही देवाची प्राप्ती झाली, तर नामदेवाने दगडाच्या मूर्तीलाही जेवू घातले. 

तुम्हा सर्वांना गोपीची गोष्ट माहीत असेलच. त्या गोपीला श्रीकृष्णाला जेवण घालायचे होते, पण तिचा नवरा तिला जाऊ देईना. त्यावर तिने सांगितले की, हा देह तुझा आहे, परंतु मनावर तुझा ताबा नाही. असे म्हणून ती त्याच्या देहाजवळ देह ठेवून श्रीकृष्णाकडे गेलीच की नाही ? त्याप्रमाणे आपण परमार्थात भाव ठेवणे जरूर आहे. पण असे आपण नुसते म्हणून काय उपयोग ? 

तो सर्वव्यापी आहे, सर्वसाक्षी आहे, असे आपण म्हणतो, पण आपण पापाचरण करायला भितो का ? तो आपल्याला पाहतो आहे असे पक्के वाटले तर आपल्याकडून कधीतरी पाप होईल का ? पण आपल्याला तसे वाटतच नाही. 

आपल्यासारख्या आस्तिकाला देव 'हवा' असे वाटते खरे, पण 'हवाच' असे वाटत नाही. आपल्या प्रपंचाच्या मदतीसाठी देव हवा असे वाटते. 
प्रपंच 'असावाच' असे आपल्याला वाटते. आणि भगवंत मात्र 'असला तर बरं' असे वाटते. याच्या उलट 'भगवंत असावाच' आणि 'प्रपंच असला तर बरा' असे वाटायला पाहिजे. 

प्रपंचाची आवड असू नये, पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी. देहाने ते कर्तव्य करावे, आणि मनाने मात्र अनुसंधान ठेवावे. 

ज्या गोष्टी आपल्या मनाला खातात त्या न केल्या की आपला आपल्या विकारांवर ताबा येईल. भगवंताच्या देखत आपल्याला करायला लाज वाटणार नाही, अशीच कृती आपण करावी.

ज्यांना व्याप आहे ते लोक रडतात, आणि ज्यांना व्याप नाही तेही लोक रडतात; मग सुख कशात आहे ? 
पैसा सुख देतो का ? पैसा मिळविणे कठीण, मिळाला तर तो कायम राहील का त्याची शाश्वती नाही. पैशाप्रमाणेच इतर सर्व वस्तूंची गोष्ट आहे.

सर्वसुखी असा प्रपंचात कोण ? प्रत्येकाचे काहीना काही तरी गार्हाणे आहेच. प्रत्येकाला आशा वाटते की मी उद्या आजच्यापेक्षा सुखी होईन. तो कधी पूर्ण सुखी होत नाही, त्याचे गार्हाणे संपत नाही ! प्रपंचातल्या सर्व वस्तू नाशवंत आणि दुःखरूप अशा आहेत. म्हणूनच प्रपंच असत्य आहे, हा अनुभव प्रपंच देतो. त्या अनुभवाने प्रपंचात जो आसक्त होत नाही तो सुखी; अनुभव विसरून जो आसक्त होतो तो दुःखी. 

सुख हे समजुतीमध्ये आहे, आणि भगवंताचे होणे हीच समजूत तेवढी खरी आहे.

*१७३.  प्रपंच अनासक्तिने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ.*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।‌।*

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २६ जून 🙏

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २६ जून  🌸* 

*नियम  थोडा  करावा,  पण  तो  शाश्वताचा  असावा .*

ज्या झाडाची वाढ व्हावी असे आपल्याला वाटते, त्या झाडाला आपण पाणी घालतो, त्याची मशागत करतो, त्या झाडाकडे लक्ष पुरवितो. परंतु जे झाड वाढू नये असे वाटते, किंवा ज्या झाडाचे विशेष महत्त्व आपल्याला वाटत नाही, त्या झाडाकडे आपण दुर्लक्ष करतो. 
तसे, जेणेकरून परमेश्वराच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होईल, त्याची जोपासना करावी. देहाकडे, विचारांकडे, विषयांकडे दुर्लक्ष करावे, म्हणजे आपोआपच त्यांचा विसर पडेल. 

ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची जोपासना करताना, त्याला गुराढोरांनी खाऊ नये म्हणून त्याच्याभोवती कुंपण घालावे लागते, त्याप्रमाणे परमार्थ हा खरा कुंपणातच ठेवावा; तो जितका गुप्त राहील तितका चांगला. त्याचे प्रदर्शन झाले तर त्याला दृष्ट लागते. म्हणून परमार्थ हा कोणाच्या न कळत, परंतु अत्यंत आवडीने करावा. 

झाड लावल्यावर ते किती वाढले आहे हे कुणी रोज उकरून पाहात नाही,  त्याप्रमाणे अनुभवाच्या, प्रचीतीच्या मागे लागू नका; त्यामुळे प्रगती खुंटेल.

हट्टी आणि व्यसनी माणसे एका दृष्टीने मला आवडतात; कारण त्यांचा हट्ट भगवंताच्या मार्गाला लावला की झाले. 
परमार्थात नियम थोडाच करावा, पण तो शाश्वताचा असावा; म्हणजे, जेणेकरून भगवंताचे प्रेम लागेल याबद्दलचा असावा, आणि तो प्राणाबरोबर सांभाळावा.

 जे अत्यंत थोर भाग्याचे असतात त्यांनाच ध्यानमार्ग साधतो. हा मार्ग फार थोरांचा आहे. ध्यानामध्ये जगाचाच विसर पडतो; त्या अवस्थेमध्ये दिवस काय पण वर्षेसुद्धा जातील, पण त्याच्या देहाला काही होणार नाही. 

आपल्या सारख्याला साधनांत साधन म्हणजे भगवंताचे नाम; दानांत दान म्हणजे अन्नदान; आणि उपासनांत उपासना म्हणजे सगुणाची उपासना होय; या तिन्हींमुळे देहाचा विसर पडतो. म्हणून शक्यतो या तीन गोष्टींची कास धरा. 

मनुष्याची साहजिक प्रवृत्ती व्याप वाढविण्याकडे असते. द्वैत वाढवून त्यात अद्वैत पाहण्यात आनंद असतो हेही खरे. साधे मधमाश्यांचे उदाहरण घ्या. त्या अनेक झाडांवरून मध गोळा करतात आणि नंतर पोवळ्यात एकत्र करतात. असा एकत्र केलेल्या मधाचा केवढा गोड साठा होऊ शकतो बरे ! अशा रीतीने सर्व द्वैतामध्ये एक अद्वैत, म्हणजे एक राम, पहायला शिकावे; आणि 
ज्याला सर्वत्र राम पाहणे असेल त्याने स्वतःमध्येच राम पाहून, प्रत्येक कृती ही रामाची समजावी. स्वतःमध्ये राम पाहिल्याशिवाय तो सर्वत्र पाहता येणार नाही. तेव्हा स्वतःचा म्हणजेच देहाचा विसर पडल्याशिवाय सुख लाभणार नाही, आणि हा देहाचा विसर राममय झाल्यानेच होईल. म्हणून अखंड भगवंताच्या अनुसंधानात राहा.

*१७८.  परमार्थाला  अगदी  स्वतःपासून  सुरुवात  करायची  असते .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*