25 - 30 वर्षांपूर्वी आपल्यातल्या किती जणांनी राहू काळ हा शब्दप्रयोग ऐकला होता?
अहो, दिवसातील, किंबहुना अहोरात्रातील ( दिवस + रात्र) वेगवेगळ्या वेळा वेगवेगळ्या कार्यांसाठी कशा वापराव्यात त्याचे मुहूर्त कसे ठरवावेत ह्याविषयी अनेक ऋषींनी असंख्य पर्याय ठेवले आहेत. त्यातीलच एक आहे राहूकाळ. हा जास्त करून दक्षिण भारतात प्रसिद्ध आहे. त्याचा संबंध लौकिक कार्ये जसे प्रवास, महत्त्वाची बोलणी, मोठे व्यवहार इ साठी काहीजण पाहतात. दुसरे काही लोक दुसरे मुहूर्त पाहतात. सर्वजण आपापल्या श्रद्धेने ह्या गोष्टी करतो. त्याच्या त्याच्या परंपरेनुसार प्रत्येकाने वागावे. श्रौत, स्मार्त, वैष्णव, गाणपत्य इ जसे संप्रदाय असून त्यांच्या बाह्य आचरणात श्रद्धेनुसार जसा बदल असतो तसेच हे आहे. *आपण राहूकाळ पाळण्याची आवश्यकता नाही.* त्यातही जे राहूकाळ मानणारेच असतील त्यांनीही सांवत्सरिक गणपती पूजेच्या वेळी याचा वापर करायचा संबंधच येत नाही, कारण पूजन इ देवसेवेच्या कर्मात राहूकाळाचा संबंध दक्षिणेतील शास्त्रकारांनाही अपेक्षित नाही..
दुसरा मुद्दा, विष्टी करण (भद्रा) ही (शुक्ल) चतुर्थीच्या दुस-या अर्ध्या भागात राहणारच आहे. विष्टी वगैरे विचार गणेश चतुर्थी किंवा अन्य सणवार नेमका कोणत्या दिवशी करावा याची निश्चिती करताना वापरावा लागतो. त्या सगळ्याचा विचार पंचांगकर्ते (अर्थात पर्यायाने दिनदर्शिककर्ते) आधीच आपल्यासाठी करतात. मग एकदा दिन निश्चिती झाली की, मग पूजा प्रमुख संगव काळी आणि ब्राह्ममुहूर्त (सुमारे पहाटे 4) ते अपराह्णकाळ समाप्ती पर्यंत केव्हाही गौण काळी करावी. (अतीसंकट काळी याहूनही उशिरा चालेल टाळण्यापेक्षा..)
तिसरा मुद्दा- अभिजीत मुहूर्त हा विवाहास विशिष्ट प्रसंगी घ्यावयास सांगितला आहे, त्यावेळी लग्नकाळ गौण होतो.(याविषयी जास्त सांगत नाही विषय थोडा गहन आणि ज्योतिष शास्त्रातील किचकट मुहूर्त प्रकरणातला आहे)
*थोडक्यात अभिजीत मुहूर्ताचा गणपती पूजनाशी काहीही संबंध नाही*
*तसेच राहूकाळ नि भद्रा/विष्टीकरण यांचा प्रत्यक्ष प्रतिसांवत्सरिक पार्थिव गणपती पूजनाच्या वेळेचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही*
पूर्वी जे तज्ज्ञ लोक ऊठसूठ कोणालाही शास्त्र शिकवीत नसत त्याचं कारण हेच. अर्धवट चार गोष्टी वाचून आपल्याच मनाने कुठली व्युत्पत्ती कुठे वापरावी हे लक्षात न घेता आजकाल कोणीही वास्तु विशारद, ज्योतिष भूषण/रत्न/मार्तंड/विशारद इत्यादी स्वयंघोषीत पदव्या मिळवतो वा अनेकांना आपले वर्ग चालवून वाटतोय..
यावर उपाय काय?
कृपया 80% ते 90% ज्योतिषी आणि स्वयंघोषीत विविध गूढ विद्या विषय तज्ञ (वास्तू, फेन्गशुई, टैरो, ऑरा, इ इ) मंडळी चक्क *भोंदू* आहेत. जे मूळ सनातन धर्मात सांगितलं आहे ते पोषक, होकारात्मक वा सकारात्मक, चिंता दूर करणारं आहे. घाबरवणारं नैराश्य वाढवणारं वा पैसे काढणारं नाही. खूप सात्विक, मनाला आनंद आणि उभारी आणणारं आणि आश्वासक आहे हे लक्षात ठेवा.
'मला सर्व धर्मविषयक ज्ञान आहे' असा ना मी कधी दावा करीत, ना तुम्ही तसं समजूत. पण जे माहित आहे ते पक्कं आणि पूर्ण विश्वासार्ह नसेल तर कधीच सांगणार नाही. जे माहीत नाही ते योग्य माध्यमातून जाणून घेऊन तरी सांगेन वा स्पष्ट माहित नाही म्हणेन. यावर पूर्ण विश्वास ठेवा.
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"