Friday, August 16, 2019

'जप '....एक दैवी शक्ति

'जप '....एक दैवी शक्ति 

शास्त्रानुसार 'ज' चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि 'प' चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे. कुठल्याही शब्दाचे किंवा मंत्राचे वारंवार उच्चारण करणे किंवा मनातल्या मनात वारंवार घोकणे याला जपयोग म्हणतात.

याला मंत्रयोग देखील म्हटले जाते. मंत्राचा अर्थ आहे मनाला एका तंत्रात बांधणे.

आणि ज्यावेळी मन एका तंत्रात एका नियमात बांधले जाते तेव्हा ती व्यक्ती मनाने खूप सामर्थ्यशाली बनते.

कारण नेमाला खूप महत्व आहे माऊलींनी एका ठिकाणी म्हटले आहे कि,

।। नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ ।।

जपयोग हि साधना खूप पुरातन आहे. म्हणूनच सर्व धर्मामध्ये या योगाचे अनुसरण करतात.

हा एक चमत्कारी योग आहे. याचा प्रभाव व्यक्तीच्या मनावर व मस्तकावर जबरदस्त पडतो.

जपयोगामुळे सर्व प्रकारचे रोग आणि दु:ख यातना संपतात.

जपयोगाचे चार प्रकार आहेत

१ - वैखरी - आपल्या वाणीने स्पष्ट व मोठ्याने करतात तो वैखरी जप होय.

२- मध्यमा - या मध्ये ओठातल्या ओठात जप केला जातो.

३- पश्यंती - या मध्ये मनातल्या मनात केला जातो यामध्ये ओठ हलत नाही.

४- परा - यामध्ये जप करायचा नसतो तो आपोआप होतो.

पहिल्या तीन प्रकारामध्ये जप प्रयन्त पूर्वक करायचा असतो.

चवथा प्रकार जो आहे. तो आपल्याला प्राप्त होत असतो. ती एक दैवी देणगी असते.

पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होते.

दु:ख- शोक दूर कसे होतात - ज्यावेळी व्यक्ती खूप काळजीत तणावात चिंतेत असते . त्यावेळी ती नकारात्मक विचारांनी घेरली जाते. आणि पहिल्यापेक्षा जास्त संकटात आणि दु:खात पडते. विचार करून करून हैराण होते. सर्वप्रथम या सर्व विचारातून सुटण्यासाठी मन एकाग्र झाले पाहिजे कुठल्याही देवतेच्या सततच्या मंत्र जपाने मन एकाग्र व्हायला लागते आणि मनामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण व्हायला लागते.

आणि तुमच्या सर्व दुःखाचा हळू हळू विनाश व्हायला सुरुवात होते. काही दिवसातच तुम्ही एक आनंदी आणि सामर्थ्यशाली होता.

आपल्या आराध्य देवतेच्या निरंतर जपाने मनुष्य त्या दैवी शक्तीशी जोडला जातो आणि त्या दैवी शक्तीकडून त्याला सर्व प्रकारचे सहाय्य प्राप्त होते.

जपयोगामुळे दिव्य दृष्टी प्राप्त होते. आणि तो सामर्थ्यशाली तर होतोच पण अंतर्ज्ञानी देखील बनतो.

जपयोगाच्या चमत्काराविषयी सर्व धर्म ग्रंथामध्ये उल्लेख आलेले आहेत. वेदांमध्ये विविध प्रकारच्या मंत्रांचा उल्लेख केलेला आहे. देवतेच्या नाम मंत्रामध्ये खूप शक्ती असते. त्याचा जप केला कि साधारण मनुष्य देखील दैवी शक्ती प्राप्त होऊन सामर्थ्यशाली होतो मंत्रजपाने जे ध्वनी तरंग उठतात त्याने त्या व्यक्तीचे स्थूल व सूक्ष्म अशी दोन्ही शरीरे कंपित होतात. *यालाच मंत्रयोग - जपयोग म्हणतात*


              *श्री स्वामी समर्थ*
            श्री दत्त स्मरणम

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"