॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
अध्याय -४९
श्रीपाद प्रभूंचे कर्मविनाशा संबंधीचे विधान तेहतीस (33) संख्या विशेष - कुरुगड्डीतील श्रीपादाचे कार्यक्रम
श्रीपाद प्रभू एकदा म्हणाले ''शंकरभट्टा ! आपण ज्याचे अनुष्ठान करतो ती अग्नि विद्या आहे. अग्नि उपासना करणे श्रोत्रिय लक्षण आहे. तुझी अग्नि उपासना म्हणजे विझलेल्या शेगडीवर स्वयंपाक करण्यासारखी आहे.'' यावर मी श्री प्रभूंचा जयजयकार करून म्हणालो, ''महाराज माझ्या जीवनानंतर सुध्दा ही शेगडी अशीच राहणार आहे.'' यावर श्रीपाद प्रभू म्हणाले ''तुझ्या विझलेल्या शेगडीत स्वत:ची शक्ति नाही. माझ्या योगशक्तिने त्या शेगडीवर केलेला स्वयंपाक प्रसादरूप होऊन भक्तांची दैन्य, दु:ख हरण करीत आहे. ही शेगडी अजून नऊ वर्षे पर्यंत पेटणार आहे. म्हणून मी तेहतीस (33) वर्षे गुप्त स्वरूपात राहिलो. त्यानंतर तीन वर्षे पर्यंत तेज स्वरूपात राहून श्रध्दाळू भत्तचनांच दर्शन देत होतो. तेंव्हा मी तेहतीस वर्षाचा होतो. योग्यांच्या जीवनात तेहतीसाव्या वर्षी अनेक बदल घडून येतात. रुद्रगणांची संख्या तेहतीस कोटी आहे.'' श्रीपाद प्रभु पुढे म्हणाले, ''आपला अग्नियज्ञ यानंतर सुध्दा चालूच राहील. कर्माला स्थूल रूप देऊन दग्ध करण्याचे प्रतिक म्हणून अग्नि आराधना करायची असते. यामुळे भक्तांचे कर्म स्थूल रूप घेण्यापूर्वी सूक्ष्म रूपात असते, त्या पूर्वी कारणरूप देह हा कारण शरीरात असतो. यामुळे तेहतीस वर्षे उलटल्यावर अशा प्रकारची अग्निपूजा करण्याची गरज नसते. त्यावेळी माझा आश्रय घेणाऱ्याची पापकर्मे सूक्ष्म शरीरात राहून आणि कारण शरीरात राहून योग अग्नीने दग्ध होऊन जातात. माझे भक्त येऊन त्यांचा ते स्वयंपाक करून आपली क्षुधा तृप्त करतील असे तीन वर्षे पर्यंत चालेल. त्यानंतर या स्थूल रूपात अग्नीपूजा करण्याची आवश्यकता नाही. पृथ्वी यज्ञाचा मी प्रारंभ केला आहे तो यशस्वी रीतीने चालू आहे. तसेच जलयज्ञ सुध्दा मी सुरु केला आहे. तो सुध्दा मोठ्या थाटात साजरा होत आहे. आता अग्निपूजा आणि अग्नि यज्ञाची सुरवात करायची आहे. तो यज्ञ सुध्दा अप्रतिम होईल यात शंकाच नाही. समस्त जीव राशीतील अग्निस्वरूप माझेच आहे. सर्वांचे शुध्दिकरण मीच करतो सर्वांचा नाश करणारा सुध्दा मीच आहे. पंचतत्वा संबंधित यज्ञाबद्दल माझ्या इतकी माहिती कोणालाच नाही. एके दिवशी एक नवदांपत्य श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आले होते. त्यांना पंचदेव पहाडावरील दरबारात राहण्याची प्रभूंनी आज्ञा केली. त्या आदेशानुसार ती दोघे पती, पत्नी पंचदेव पहाडावरील दरबारात गेली. परंतु दोन दिवसातच तो युवक गतप्राण झाला. या अकस्मात मृत्युने ती नववधु अत्यंत घाबरून गेली. ती म्हणाली ''प्रभु आपल्या भक्तांचे रक्षण करतात आणि त्यांची कृपा दृष्टी सर्वावर असते असे ऐकले होते. परंतु आज तर हे अघटितच घडले'' ती दु:खाने रडू लागली. त्यांचे नातेवाईक ही बातमी कळताच पंचदेव पहाडावर आले. त्या शवाचे दहन करावे का करू नये असा प्रश्न सर्वाना पडला. श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेशिवाय तो मृतदेह दरबाराच्या बाहेर नेता येणार नाही असे दरबारातील सेवाधारी म्हणू लागले. तेवढयात श्रीपाद प्रभू दरबारात आले. शोक सागरात बुडालेल्या त्या नववधूने श्रीपाद प्रभूंना आपल्या दुर्भाग्याची कर्म कहाणी सांगितली. श्रीपाद प्रभू म्हणाले ''कर्माचे फल भोगणे अनिवार्य असते'' यावर ती नववधू मोठ्या श्रध्दायुक्त भावाने म्हणाली ''प्रभो ! या विश्वात आपणास अशक्य असे काहींच नाही. माझे मांगल्य देऊन मला या भयंकर दु:खातून सोडवा'' त्या नववधूला श्रीपाद प्रभूच्या कारुण्यपूर्ण स्वभावावर दृढ विश्वास होता.
मृतजीवास जीवनदान
श्रीपाद प्रभु म्हणाले ''तुझा दृढ विश्वासच फलदायक ठरेल . माझ्यावर असलेल्या तुझ्या श्रध्दा भावाने तुझा पती नक्कीच जीवित होईल. कर्म सिध्दांताचा व्यतिरेक न होता तुला एक उपाय सांगतो. तू तुझ्या पतीच्या वजना इतकी लाकडे तुझे मंगळसूत्र विकून आणुन त्या लाकडांवर स्वयंपाक कर. चुलीमध्ये ती लाकडे जशी जळतील तसे तुझे अमंगल जळून जाईल.'' श्रीपादांच्या सांगण्या प्रमाणे सर्व लाकडे जळून जाताच तो तरूण झोपीतून उठल्या प्रमाणे उठून उभा राहीला. आजूबाजूस सर्व नातेवाईक पाहून त्या नववधूच्या आनंदाला पारावर राहिला नाही. सर्व भक्तगणांनी आनंदाने श्रीपाद प्रभूंचा जयजयकार केला.
दरिद्री ब्राह्मणावर श्रीपाद प्रभूंची विशेष कृपा
एकदा एक अत्यंत गरीब ब्राह्मण श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी आला. तो परिस्थितीने एवढा गांजला होता की, श्रीपाद प्रभूंची कृपादृष्टी न झाल्यास आत्महत्या करण्याचा त्याने निश्चय केला होता. श्रीपाद प्रभूंनी त्याचा भाव जाणला. त्यांनी शेगडीतील एक जळते लाकूड आणून त्याचा त्या ब्राह्मणाच्या पाठीस स्पर्श केला. त्या जळत्या कोलीताने ब्राह्मणाची पाठ भाजली व त्या वेदना बऱ्याच वेळ होत्या. श्रीपाद प्रभू म्हणाले ''अरे ब्राह्मणा ! तू आत्महत्या करण्यास सिध्द झाला होतास. मी तुझी उपेक्षा केली असती तर तू खरोखरी आत्महत्या केली असतीस. त्या आत्महत्येच्या सबंधित सर्व पाप कर्माची स्पंदने या जळत्या लाकडाच्या स्पर्शाने नष्ट झाली. आता तुला दारिद्रयापासून मुक्तता मिळेल.'' असे म्हणून श्रीपाद प्रभूंनी थंड झालेले ते लाकूड त्या ब्राह्मणास देऊन पंचात बांधून काळजीपूर्वक घरी घेऊन जाण्यास सांगितले. प्रभूंच्या आदेशानुसार त्या ब्राह्मणाने ते लाकूड पंचात बांधून घरी नेली. घरात जाऊन त्या पंचाची गाठ सोडून पाहीले तो काय आश्चर्य ते लाकूड सोन्याचे झाले होते. अशा प्रकारे त्या गरीब ब्राह्मणावर श्रीपाद प्रभूंची विशेष कृपा झाली हाती. श्रीपाद प्रभूंनी अनेक भक्तांच्या पापाचे अग्नि यज्ञाने दहन केले होते. कांही वेळा ते भक्तांना वांगी, भेंडी भोपळा अशा फळभाज्या आणण्यास सांगत. त्या भाज्यांच्या रूपाने भक्तांच्या पापकर्माची स्पंदने आकर्षून घेत. अशा प्रकारच्या भाज्या स्वयंपाकात वापरून भक्तांना खाण्यास देत. यामुळे ते कर्म बंधनातून मुक्त होत. एकदा एक उपवर कन्या श्रीपादांच्या दर्शनासाठी आली. तिचा विवाह कोठे जमत नव्हता. तिला कुज दोष (मंगळ दोष) असल्याने प्रभूंनी तिला कंद आणावयास सांगितला. त्या कंदाची भाजी त्या मुलीसह तिच्या कुटुंबियांनी खावी असे प्रभूंनी सांगितले. त्याप्रमाणे केल्यानंतर कर्मबंधनातून मुक्तता होऊन तिचा एका योग्य वराबरोबर विवाह झाला. श्रीपाद प्रभू कांही लोकांना गायीचे तूप आणून स्वयंपाकासाठी देण्यास सांगत. तर काहींना गायीच्या तुपाचा दीप देवासमोर लावण्याचा आदेश देत. घरात अत्यंत बिकट परिस्थिती असल्यास किंवा कन्येच्या विवाहा संबंधीच्या अडचणी असल्यास त्याना श्रीपाद प्रभु दर शुक्रवारी राहुकालाच्या वेळी (सकाळी 10-30 ते 12-00) अंबिकेची पूजा करण्यास सांगत. श्रीपाद प्रभूंचा एक भक्त एकदा खूप आजारी झाला. त्याच्या कुटुंबियांना प्रभूंनी त्याच्या खोलीत एरंडयाच्या तेलाचा दिवा लाऊन तो सतत तेवत ठेवण्यास सांगितले. तो दिवा कोणत्याही परिस्थितीत विझावयास नको असे त्यांना बजावून सांगितले. असे केल्यावर तो भक्त लवकरच रोगमुक्त झाला. एका भक्ताची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. त्याला श्रीपाद प्रभूंनी गायीच्या तुपातील दिवा आठ दिवस अखंडपणे तेवत ठेवण्यास सांगितले. असे केल्यानंतर त्यांच्या घरात लक्ष्मीचा वरदहस्त प्राप्त झाला. अशा किती तरी नवीन नवीन पध्दतीद्वारा श्रीपाद प्रभूंनी आपल्या भक्तांची पापकर्मा पासून मुक्तता केली. या सर्व पध्दती समजून घेणे सामान्य मानवाला असाध्य आहे.
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"