॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
अध्याय -३८
बगळामुखी देवीच्या आराधनेचे विवरण
आम्ही पीठिकापुरमला जात असतांना एक बैरागी भेटला. तो एका पिंपळाच्या झाडाखाली बसला होता. त्याचे डोळे तेजस्वी दिसत होते. आम्हाला पहाताच त्या बैराग्याने विचारले, ''तुमची नावे शंकरभट्ट आणि धर्मगुप्त अशी आहेत ना ?'' आम्ही होकारार्थी मान हालविली. तो पुढे म्हणाला, ''या पिंपळाच्या झाडाखाली थोडावेळ विश्रांती घ्या. तुमच्याकडे श्रीपाद प्रभूसाठी चर्मपादुका आहेत ना, त्या मला द्या आणि माझ्याकडील कालनाग मणी स्वीकारा. आम्ही त्याच्या विनंतीस मान्यता दिली आणि चर्मपादुका देऊन तो दिव्य मणी ठेवून घेतला. मी त्या बैराग्यास म्हणालो ''अहो महाराज ! मी श्रीपादप्रभूंच्या दिव्य चरित्र लेखनाचा संकल्प केला आहे. त्यांच्या जीवनात घडलेल्या प्रत्येक वर्षीच्या घटना श्रीपाद प्रभूंचा भक्ताला वर्णन करून सांगतो. या लीलांचे श्रवण करून ते भवसागर सहजपणे तरून जातात. या सर्वासाठी मी केवळ एक निमित्तमात्र आहे.'' यावर तो बैरागी म्हणाला, ''श्रीपाद श्रीवल्लभ हे आदिभैरव व आदिभैरवी यांचे संयुक्त स्वरूप आहेत. कालावर शासन करणारे कालभैरव सुध्दा तेच आहेत. ते कालस्वरूप असून कालपुरुष हा त्यांच्या पेक्षा भिन्न नाही. महाकाल स्वरूप सुध्दा तेच आहेत. कोणत्या वेळी कोणती घटना घडेल याचे संपूर्ण ज्ञान त्यांनाच असते. त्यामुळे अव्यक्त रूपात असलेले श्रीपाद श्रीवल्लभांचे संकल्प स्वरूप कोणत्याही देश कालाने बंदिस्त असणाऱ्या जिवाला समजणे शक्य नसते. देश-काला बरोबर क्रीडा, जीवांचा विकास, धर्म, कर्म यांचे फलित आणि त्यांचा प्रभाव संपूर्णपणे श्रीपाद प्रभूंच्या आधिन असतो. ज्ञान नसताना अहंकाराने स्वत:ला महापंडित समजणाऱ्या लोकांचा गर्व ते तत्काळ हरण करून त्याना अहंकार रहित करतात. तसेच विनयी, नम्र परंतु ज्ञानाचा अभाव असणाऱ्या साधकांना ते आपल्या कृपा दृष्टीने पंडित करू शकतात. त्यांचा हा योगसंपन्न अवतार आहे. ते अवतारी पुरुष असून प्रत्यक्ष श्रीदत्तात्रेयांचे अवतार आहेत हे समजण्यासाठी आपल्या पापराशी जळून दग्ध व्हाव्या लागतात आणि पुण्य राशींचा संचय व्हावा लागतो. असा सर्व साधारण नियम आहे. त्यांचा कृपाकटाक्ष झाल्यास हा साधारण नियम दूर सारून ते भक्तांचे रक्षण करतात. ते क्षणोक्षणी लीला विहारी आहेत. श्रीपाद प्रभूंच्या चरित्राचे पारायण करणाऱ्या साधकांचा एका क्रमबध्द पध्दतीने विकास होतो. त्यांच्या जीवनातील प्रत्येक वर्षात घडलेल्या एक किंवा दोन दिव्य लीला साधकांना समजू शकतात. या क्रमा क्रमाने समजाव्या हा सुध्दा त्या दिव्य लीलांचा अंतर्भाग आहे. श्रीपाद प्रभूंनी केवळ एकाच देशाच्या किंवा एकाच प्रांताच्या लोकांच्या उध्दारासाठी अवतार घेतला नाही.
अनेक कोटी ब्रह्मांड प्रति क्षणी निर्माण, स्थिति आणि लय पावत असतात. त्यांच्यातील परिणाम क्रम सुध्दा श्रीपाद प्रभूंच्या अधिकारात असतो. त्यांच्या दिव्य नेत्र गोलकात कोटयावधि ब्रह्मांडाची वृद्धी आणि क्षय होत असतो. हेच त्यांचे निजतत्त्व स्वरूप आहे. त्यांचे निराकार स्वरूप म्हणजेच परतत्त्व होय. अव्यक्त स्वरूपात असलेले त्यांचे रूप कोणीच जाणू शकत नाही. त्यांचे महातत्त्व साकार रूपात पीठिकापुरत अवतरीत होणे हीच त्यांची एक दिव्य लीला आहे. श्रीपाद प्रभूंच्या लीला अत्यंत अद्भूत आणि अनाकलनीय आहेत. त्या लीलांना अंत नाही. वेद सुध्दा त्यांचे वर्णन करताना मौन झाले. श्रीपाद प्रभूंचा जन्म अनंत आहे. वेदातील ज्ञान परिमित आहे परंतु श्रीपादांचे ज्ञान, दिव्य शक्ति आणि करूणा अनंत आहे. ते सर्व देशात, सर्व काळात स्थित असतात. सत्याचे सत्य, ज्ञानाचे ज्ञान आणि अनंताला सुध्दा न कळणारे त्यांचे महा अनंत स्वरूप आहे.
बगलामुखी देवीची उपासना
बैरागी म्हणाला, मी वास्तविक पहाता बंगाल देशाचा रहिवासी आहे. मी बगलामुखी देवीची आराधना करतो. ही देवी दशमहाविद्यां पैकी एक आहे. शत्रूंचा नाश इच्छिणाऱ्यांनी या बगलादेवीची आराधना करावी. सर्व रूपातील परमेश्वराची संहार शक्ति बगलादेवीच आहे. या देवीची आराधना केल्याने वाकसिध्दि प्राप्त होते. मनोवाक्य आणि कर्ममूल या दोघांच्या ऐक्य भावाने धर्मबध्द जीवन जगणाऱ्या लोकांनी उच्चारलेले प्रत्येक वाक्य खरेच मानले जाते. वाक्याला सुध्दा परा, पश्यंति, मध्यमा असे भेद असतात.''सत्ययुगात सर्व जगताचा नाश करणारे एक भयंकर वादळ आले होते. पृथ्वीवरील आलेल्या या संकटाने विष्णु भगवान चिंतित झाले होते. त्यानी तेंव्हा तपस्या करण्यास आरंभ केला. त्यावेळी विद्या महादेवी बगलामुखी रूप घेऊन अवतरली. श्रीमन् नारायणांना दर्शन देऊन तिने ते सृष्टींचा विध्वंस करणारे वादळ थांबविले. या देवीला कांही लोक वैष्णवी देवी असे सुध्दा मानतात. मंगळवारी चतुर्दशीच्या अर्धरात्रीच्या वेळी ही प्रकट झाली. ही स्तंभन शक्ति रूपिणी आहे. तिच्या मुळेच सूर्यमंडळ स्थित आहे. तसेच स्वर्गसुध्दा स्थित आहे. इहलोक आणि परलोकातील सर्व सुखे ही देवी कृपेने आपल्या भक्तांना प्रदान करते. साधकांच्या जीवनात हलकल्लोळ माजविणाऱ्या दुष्ट शक्ति आणि अंधशक्तींचे ही देवी निर्मूलन करून प्रगतीचे अभयदान देते. बगलामुखी देवीस ''वडवामुखी'' ''जातवेदमुखी'' ''उल्कामुखी'' ''ज्वालामुखी'' ''बृहद्भानु मुखी'' अशा नांवाने सुध्दा संबोधिले जाते. सर्वप्रथम ब्रह्मदेवाने बगला महाविद्योपासना केली. या देवीने ब्रह्मदेवांस बालरूपात दर्शन दिले. तिरुपती तिरुमलै या क्षेत्रात त्यांनी तिची अर्चना केली. या देवीच्या मूर्तीची. वेंकटेश्वर, पद्मावतीच्या मूर्ती समवेत ब्रह्मोत्सवाच्या मंगल समयी अर्चना केली जाते. ह्या महाविद्येचा ब्रह्मदेवांनी सनकादिक ऋषींना उपदेश केला होता. ब्रह्मानंतर या देवीची उपासना भगवान विष्णूंनी केली होती. भगवान परशुरामाने सुध्दा आपल्या शत्रूंचा नाश करण्यासाठी या देवीची उपासना केली होती. मी तीर्थयात्रा करीत असता पीठिकापुरमला येऊन पोहोचलो. श्री कुक्कुटेश्वराच्या देवस्थानात अर्चना केली. त्यानंतर अत्यंत मधुर बोलणाऱ्या एका सुंदर बालकास पाहिले. तो बालक मला म्हणाला ''हे महोदया ! आपण बंगाल देशातून आला आहात हे मला माहित आहे. मी बऱ्याच काळापासून आतापर्यंत या मंदिरात स्वयंभू दत्तात्रेयांच्या रूपात या स्थानी स्थित आहे. माझी लवकरात लवकर एका अर्चकाकडून नित्य पूजा करण्याची व्यवस्था करा''. त्या बालकाच्या सांगण्यानुसार एका उत्तम ब्राह्मणाद्वारे अर्चना करवून त्यांचा यथोचित बहुमान करण्यात आला. त्या अर्चकाचे नाव कलवर असे होते. त्याने कुक्कुटेश्वर आणि स्वयंभू दत्तात्रेय या दोन्ही देवतांची मनोभावाने, कष्टांची तमा न बाळगता आराधना केली होती. त्याला यासाठी भरपूर दक्षिणा व स्वयपाकासाठी दक्षिणा दिली होती. ती त्याने घरी नेऊन पेटीत ठेवली आणि आश्चर्य असे की सकाळ पर्यंत ती अदृश्य झाली होती. स्वयंपाकातील सारे पदार्थ अदृश्य झाले होते परंतु तेथील ब्राह्मणांची पोटे रोजच्या पेक्षा, दुप्पट तिप्पटीने भरली असल्याचा त्यांना अनुभव येत होता. या मुळे ते सुस्त होऊन आळसावले होते. सुस्ती येणे, धन-दक्षिणा स्वयंपाक अदृश्य होणे हा सर्वसामान्याना अनाकलनीय विषय होता. कलवर एक निष्ठावंत, नियम निष्ठ, वेद-शास्त्र जाणणारा आणि त्याचा प्रचार करणारा अर्चक होता. परंतु यक्षिणींच्या प्रभावामुळे तो अत्यंत क्षीण झाला होता. या मुळे त्याची स्थिती लाजिरवाणी झाली होती. परंतु सर्व ब्राह्मण या बद्दल चर्चा न करता मौन राहात.एकदा एक बैरागी साधू कुक्कुटेश्वराच्या मंदिरात मर्च्छित पडला. परंतु त्याच्या काहीच हालचाली होत नसल्याचे पाहून लोकांनी तो मृत झाला असल्याचे अनुमान केले. थोडयाच वेळात त्याला श्रीपाद प्रभूंचे आजोबा श्रीबापनार्युलु यांच्याकडे नेले. त्यानी त्या साधूची परिक्षा करून सांगितले की तो मृत झाला नाही अथवा मूच्छित पडलेला नाही तो समाधी अवस्थेत आहे. परंतु लोकांनी बापनार्युलूंचे म्हणणे ऐकले नाही व ते त्या बैराग्यास दहन करण्यास घेऊन गेले. आश्चर्य असे की श्रीपाद प्रभूंच्या कृपा प्रसादाने त्याला अग्नि जाळू शकला नाही. तो समाधीतून जागा झाला आणि चितेवरून खाली उतरून आला. आठ दिवसातच तो साधू पूर्वी सारखा स्वस्थ झाला. यानंतर त्याला गावातील ब्राह्मण समाजाने भिक्षा देण्याचे नाकारले त्यामुळे त्याला नाइलाजाने गवळयाच्या घरी राहावे लागले. तेथे त्याच्या भिक्षेची सोय झाली. कुल, जाती, वर्ण यांचा भेदभाव न ठेवणारा तो साधू गवळी समाजात अत्यंत लोकप्रिय झाला होता. त्या ग्वाल समाजात एक युवती होती तिचे नांव लक्ष्मी असे होते. बालपणीच तिला वैधव्य प्राप्त झाले होते. तिचा पति तिच्याशी अत्यंत प्रेमाने वागत असे. तो सर्व गवळयांचा आवडता होता. त्या समाजात त्यास श्रेष्ठत्व प्राप्त झाले होते. गवळी लोकातील तंटे बखेडे तो आपल्या कुशाग्र बुध्दीने तत्काळ सोडवून उत्तम निर्णय देत असे. त्याच्या लहान वयाकडे न पहाता लोकांनी त्याला नेता निवडले होते. त्याची पत्नि लक्ष्मी मोठी पतिव्रता स्त्री होती. त्यावेळी श्री वेंकटप्पय्या श्रेष्ठींची गाय हरविली असल्याने, श्रेष्ठींच्या घरी लक्ष्मी दूध आणून देत असे. श्रीपाद प्रभू श्रेष्ठींच्या घरी नेहमी जात असत. ते आजीला भूक लागली असे म्हणताच महालक्ष्मी समान असलेली वेंकट सुब्बम्मा श्रीपादांना गरम दूध आणून देत असे. एवढेच नव्हे तर ती श्रीपादांना मोठ्या प्रेमाने साय, लोणी सुध्दा देई. एकदा लक्ष्मी गवळण दूध घेऊन आलेली असताना श्रीपाद प्रभू तेथे होते. ते ''मला खूप भूक लागली आहे'' असे म्हणू लागले. त्यावेळी वेंकट सुब्बम्माने लक्ष्मीस अजून दूध आणून देण्यास सांगितले. तिने आपल्या घरातील स्वत:साठी ठेवलेले दूध सुध्दा आणून दिले आणि स्वत: ताकावर काम भागविले. कुक्कुटेश्वराच्या मंदिरात दहा दिवस एक उत्सव चालू होता. यात ब्राह्मणांना यथोचित दक्षिणा, संभावना दिली जात होती. यामुळे यक्षिणीचा प्रभाव थोडा कमी झाला होता परंतु अजून सुध्दा ब्राह्मण भोजनासाठी केलेली पाक सामुग्री अदृश्य होत होती. यामुळे ब्राह्मणांना वेळेवर अन्न न मिळाल्याने ते क्षीण होत होते.
पुराण सांगणाऱ्या पंडिताची कथा
पीठिकापुरम गावात एक पुराण सांगणारा पंडित आला होता. कुक्कुटेश्वर मंदिराच्या बाहेरील प्रांगणात प्रवचनाची व्यवस्था करण्यात आली होती. पुराण श्रवणासाठी गावातील सर्व जातीचे लोक येत असत. पुराण सांगणाऱ्या पंडिताच्या जेवणाची व्यवस्था बापनाचार्युलु यांनी आपल्या घरी केली होती. पुराण कथन करण्यापूर्वी तो पुराणीक लक्ष्मी गवळणीने आणलेले दूध घेत असे. श्रीपाद प्रभू सर्व हृदयांतर्यामी असल्याने त्यांना या पंडिताबद्दल सर्व काही ज्ञात होते. हा पुराणीक महान पंडित आणि महान योगी होता. तो आपल्या योगशक्तीने त्याच्या आत्म्याने धारण केलेली पूर्वीची रूपे ओळखू शकत असे. त्या रूपातील चैतन्य तो आकर्षण करून घेत असे. दूध देणाऱ्या लक्ष्मीस तो योगदृष्टीने पहात असे. लक्ष्मीच्या पतीच्या रूपात सुध्दा त्या पंडिताला स्वत:चा आत्मा दिसत असे. लक्ष्मीचा पती मृत्युनंतर एका ब्राह्मण जमीनदाराच्या घरी बालरूपात जन्मला होता. त्या वेळी तो चार-पाच महिन्यांचा होता. पुराण पंडिताने योगशक्तीने आपले शक्ति रूप कसे आहे ते पाहिले. त्याचे मूल रूप स्त्रीसमान लक्ष्मीशी निगडित होते. हे त्यास कळाले. त्याचे स्वरूप स्त्रीतत्त्वाच्या लक्ष्मीशी विलीन होऊन राहिलेले त्याने पाहिले. आपले पुरुषतत्त्व चार महिन्याच्या बालकात असल्याचे आणि थोडेच दिवसात आपले कर्मशेष पूर्ण झाल्यासारखे जाणवले. पीठिकापुरम् मधील कर्मऋणानुबंध पूर्ण करण्यासाठी त्याने पुराण पंडिताचे रूप धारण केले होते. लक्ष्मीचे तिच्या पतीवर अनन्य साधारण प्रेम होते. तिच्या पतीचे चैतन्य भूत कालातील शरीर सोडून येणार नाही हे तिला कळले होते. लक्ष्मीच्या पतीचे चैतन्य मूल तत्व पुराण पंडितात विलीन झाले होते हा विषय सर्वज्ञानी श्रीपाद प्रभूंना माहित होता. श्रीपाद प्रभू त्या पुराण पंडितला म्हणाले ''अरे पंडिता, ही लक्ष्मी निरागस आहे. ती कांही दिवसातच आपली जीवन यात्रा संपविणार आहे. ती मृत झाल्यावर तिची काय गती होईल ? तू ज्ञानरूप ब्राह्मण होशील. किंवा अज्ञान रूपात गवळी होशील. त्या तुझ्या रूपात लक्ष्मी तुला तुझ्या कष्ट / सुखात साथ देईल. तिच्या प्रेमाने तिने आपल्या पतीचे चैतन्य स्वत:कडे आकर्षिले आहे. गवळणीच्या रूपात असलेले चैतन्य थोडया दिवसांनी शरीराचे पतन झाल्यावर ब्राह्मण चैतन्यात मिसळणार ना ? ही गवळणीच्या रूपात असलेली ब्राह्मण स्त्री आहे. तू ब्राह्मण रूपातील गवळी आहेस. तुमचे कर्म संबंध मला उत्तम रीतीने माहित आहेत. भविष्य काळात ब्राह्मणी स्वरूपात येणाऱ्या या लक्ष्मीला पद्मावती देवी स्वरूप मानून मी तिला सुवर्ण तिलक लावून आशिर्वाद देईन. तिला मांगल्य प्रदान करून हिरण्य लोकांत सुरक्षित ठेवीन . पुढील जन्मात तुम्ही आदर्श दंपती व्हाल. आणि माझे भक्त होऊन उध्दरून जाल.''एवढे बोलून श्रीपाद प्रभू थांबले. त्यांच्या लीला अति अगम्य, अद्भूत असतात.
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"