॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
अध्याय -३६
वेदांतशर्माचा वृतांत
गमातंगीचीउपासना
मी आणि धर्मगुप्त, आम्ही दोघांनी श्रीपाद प्रभूं कडून बक्षिसरूपी मिळालेले पैंजण घेऊन प्रवासास सुरुवात केली. रात्रभर त्यांच्या पायातील पैंजणांचा मधुर आवाज आमच्या हृदयात प्रतिध्वनित होत होता. हृदयातील अनाहत चक्रात ॐकार अति प्रयत्नानेच ऐकु येतो असे आम्ही ऐकले होते, गतरात्री मात्र ते प्रत्यक्षात अनुभवास आले. त्या पैंजणांचा मधुर आवाज अगदी राग, तालयुक्त संगितासारखा होता. अनाहत चक्रापासून शक्ति इतर चक्रांकडे प्रसारीत होत असते. त्या शक्तीचा प्रसार होत असताना शरीरातील सर्व नाडयातून नूतन शक्तीचा प्रादुर्भाव होत असतो.
आम्ही चाललो तितका वेळ पैंजणांचा आवाज येत असे. आम्ही थांबलो की थांबत असे. त्या भागातील शेतात आम्हाला एक आश्रम असल्याचे दिसले. त्याच्या बाजूलाच छोटेसे खेडे गांव असल्या सारखे वाटले. गावाच्या सीमेजवळ दलित लोकांची वस्ती होती. त्या वस्ती जवळच हा आश्रम होता. आम्ही आश्रमाच्या जवळ पोहंचताच पैंजणांचा आवाज थांबला. कोणता तरी दिव्य असा अनुभव येणार आणि ही सुध्दा प्रभूंची एक दिव्य लीलामात्र असणार असे आम्हाला वाटले. एवढयातच त्या आश्रमातून सुमारे 60 वर्षाचे तेजस्वी असे महर्षी बाहेर आले. त्यानंतर अंदाजे तीस वर्षे वयाची योगिनीमाता बाहेर आली. त्या दोघानी आम्हाला अत्यंत आदराने आश्रमांत नेले. आणि जलपान झाल्यावर महर्षिनी सांगण्यास सुरुवात केली. ''माझे नांव वेदांतशर्मा आहे. खरे पाहाता. मी पीठिकापुरवासी आहे. आता मी बंगारय्या या नावाने ओळखला जात आहे. हिचे नांव बंगारम्मा आहे. मी जन्मत: ब्राह्मण आहे आणि ही स्त्री जन्मत: नीच कुलिन आहे. आमच्या घरी मातंगी मातेचे पीठ आहे. दशमहाविद्येतील मातंगी माता एक आहे, तिचीच आम्ही येथे आराधना करतो.''
हे ऐकताच माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. हा ब्राह्मण आणि ती स्त्री हीन कुलातील असे असताना या दोघांचे दांपत्य कसे धर्मसम्मत झाले असेल, असा मला प्रश्न पडला. आम्हाला फल, मूल आणि कंद भोजनार्थ दिले गेले. बंगारय्याने पुढे सांगण्यास सुरुवात केली, ''बाबांनो ! वशिष्ठ महामुनींना अरुंधतीने लग्न करण्याची विनंती केली तेंव्हा वशिष्ठ मुनींनी एक अट घातली. ते म्हणाले ''मी कांही केले तर तिने त्याचा विरोध करू नये.'' त्या गोष्टीला तिने होकार दिला.
महर्षींनी तिला सातवेळा दग्ध केले तरी पण ती काहीच म्हणाली नाही. त्यामुळेच तिला अरुंधती हे नांव मिळाले त्यानंतर महर्षींनी तिचा आपली धर्मपत्नी म्हणून स्विकार केला.'' मी पीठिकापुरत असताना माझा तीन वेळा विवाह झाला. तिन्ही बायका कैलासवासी झाल्या कुणाचाही संग लाभला नाही. असे कसे माझे खडतर कर्म म्हणून मी अत्यंत दु:खी झालो. त्यावर श्रीपाद हास्य करून म्हणाले ''आजोबा मी तुमच्यासाठी अजून एक नवीन आजी पाहिली आहे. विवाह न करताच तिचा धर्मपत्नी म्हणून आपण स्विकार केल्यास तुम्हाला उत्तम जन्म प्रसाद रूपाने मिळेल.''बापनार्युलु हे पीठिकापुरातील ब्राह्मणपरिषदेचे अध्यक्ष होते. या संबंधात वेदपंडितांची बैठक परिषदेत करावी असे ब्राह्मण समाजाचे मत होते. धर्मकर्माच्या विषयी शास्त्रानुसार चर्चा करून निर्णय घ्यावा असे ठरले . दूर दूर प्रांतातील पंडितांना, आमंत्रणे पाठवली होती. कोणाकोणाला बोलवावे हा कार्यभार माझ्यावर सोपविला गेला.श्रीपादांनी उपनयन संस्कार झाल्यावर इतर मुलांप्रमाणे वेदपठन केले नाही. आजोबा जवळ किंवा त्यांच्या वडिलासमोर त्यांनी कधीही पाठंतर केले नाही आणि केलेले सांगितले नाही. परंतु कोणी परिक्षार्थ कांही विचारल्यास श्रीपाद पटकन त्याचे उत्तर सांगत. बापनार्यांचे सर्व वेदांत श्रीपादांना येत होते. एवढेच नव्हे तर वेदांत आणि त्यातील रहस्यमय गूढार्थ तर श्रीपादांच्या हातचा मळ होता. एकंदरीत श्रीपाद विद्वान पंडितच होते. त्यांना सुध्दा परिषदेत बोलविण्याचा निर्णय मी घेतला.ब्राह्मणांचा उद्देश वेगळाच होता. अप्पलराजूंना आणि बापनार्यांना कुळातून बहिष्कृत करावे असा निर्णय ब्राह्मण सभेने दिला. त्याची एक प्रत श्री शंकराचार्यांना पाठवली आणि त्यांची अनुमति मिळाल्यावर त्या दोन्ही कुटुंबियांना पीठिकापुरतून हाकलून द्यावे असे त्यांच्या मनात होते. श्रीपादांनी जेंव्हा त्यांच्या मनातले मला सांगितले तेव्हा मी पण त्या ब्राह्मणा कडून झालो. कारण ब्राह्मण परिषदेचे अध्यक्षपद मिळवण्याची विचित्र इच्छा माझ्या मनात अंकुरित झाली होती.कूल, मत भेदाची पर्वा न करता श्रीपाद स्वतंत्रपणे सगळयांच्याच घरी जात असत आणि सगळयांशी समान वर्तन करीत. पीठिकापुरत बंगारय्या आणि बंगारम्मा हे दांपत्य रहात होते. त्यांना श्रीपादांना भेटावयाची, त्यांच्याशी बोलावयाची उत्कट इच्छा होती.श्रीपादांनी मला कातडयाच्या पादुका हव्या आहेत अशी इच्छा प्रकट केली. तेंव्हा त्यांचे वय चौदा वर्षाचे होते. ब्राह्मणांनी लाकडी पादुका वापराव्यात, कातडयाच्या वापरू नयेत असे घरातील मोठ्यांनी सांगितले. हा विषय उडत उडत त्या चांभार दांपत्याच्या घरी पोहोचला. श्रीपादांना कातडयाच्या पादुका समर्पित करून जीवनाचे सार्थक करावे असा निश्चय त्या दांपत्याने केला. तितक्यात त्यांच्या घरात श्रीपाद श्रीवल्लभ प्रगट झाले. त्यांच्या दिव्यश्रीचरणांचे मोजमाप घेण्यात आले. बंगारम्मा म्हणाली,''महाप्रभो ! माझेच कातडे काढून त्यांची चप्पल शिवून द्यावी असे माझ्या मनांत आहे.'' त्यावर श्रीपाद श्रीवल्लभांनी मंदहास्य केले आणि अंतर्धान पावले. आमच्या घरी एक चांगली गाय होती, तिला असाध्य रोग जडला आणि त्यातच ती मरण पावली. त्या मरण पावलेल्या गाईचे कातडे काढून, त्यास शुध्द करून, त्याच्या श्रीपाद प्रभूंना देण्यास चर्मपादुका तयार केल्या गेल्या. ठरल्या प्रमाणे वेदपंडितांची बैठक भरली, चर्चा सुरु झाली. चर्चेचा मुख्य विषय आदिशंकरांचा काशी मध्ये झालेला मंडनमिश्रा बरोबरचा वादविवाद हा होता. वाद विवादात स्वत: उभय भारती देवीला सुध्दा जिंकले तर परिक्षा पूर्ण होईल असे भारती देवी म्हणाली. कामशास्त्र या विषयावर उभय भारतीने प्रश्न विचारला. त्या शास्त्रात आदिशंकराचे ज्ञान शून्यच होते.त्यासाठी सहा महिन्यांचा अवधि त्यांनी मागितला. आपण धर्मविरुध्द न जाता कामशास्त्राचे ज्ञान मिळवावे असा विचार शंकरचार्यानी केला. त्याच वेळी राज्यातील महाराजाचा देहांत झाला होता. आदिशंकरांनी परकाया प्रवेश विद्येचा वापर केला आणि त्या राजाच्या शरीरात त्यांनी सूक्ष्म शरिराने प्रवेश केला. त्यांची भौतिक काया सांभाळुन ठेवावी , कांही अति महत्वाचे सांगावयाचे असेल तर राजप्रासादा जवळ येऊन सांकेतिक भाषेने मला सांगावे असा श्रीशंकराचार्यानी आपल्या शिष्यास आदेश दिला. महाराणीला आपल्या महाराजात कांही तरी बदल, नविनपण जाणवला एखाद्या महापुरुषाच्या आत्म्याचा प्रवेश तिच्या पतीच्या शरिरात झालेला आहे, हे तिने ओळखले. मरण पावलेल्या तिच्या पतीच्या शरिरात प्राणमय जगतातील चैतन्यास आकर्षित करून, राजा-राणींच्या दांपत्य सुखाचा अनुभव तो दिव्यात्मा केवळ साक्ष भावानेच बघून ज्ञान मिळवत आहे, असे सुध्दा त्या राणीला समजले. जो पर्यंत त्या दिव्यात्म्याचे वास्तव्य माझ्या पतीच्या शरिरात आहे तोपर्यंत त्यांचे प्राण त्याच्या शरिरात रहातील हे तिने ओळखले. तिने आदेश दिला की नगरात दहन न केलेले मृत शरीर असल्यास, त्या शरीराचे दहन करावे. शंकराचार्यांचे शरीर दहन करण्यास नेण्यात आले. तेंव्हा शिष्यगणांनी त्वरीत राजवेशात असलेल्या शंकरांना सांकेतीक भाषेत हा विषय सूचित करण्याचा प्रयत्न केला परंतु उशीर झाला होता. अग्नित जळालेले हात, पाय श्रीलक्ष्मी नरसिंहाच्या कृपाकटाक्षाने आदिशंकरांनी परत मिळविले.
ब्राह्मण परिषदेत श्रीपादांचा अद्भूत संवाद
श्रीपादांनी परिषदेला प्रश्न केला.''आत्मा हा एका शरीरातून एका वेळेस ते शरीर सोडल्या नंतरच दुसऱ्या शरीरात प्रवेश करू शकतो असे तुम्ही सांगता, पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आत्मा एकाच वेळी तीन चार शरीरातून तीन चार जन्मांचे कर्मफळासहित अनुभव घेऊ शकतो का?'' ''हा फार जटील विषय आहे आजपर्यंत आशारीतीचे झाल्याचे पुरावे नाहीत'' असे उत्तर परिषदेने दिले.
''श्रीपाद प्रभू परिषदेस उद्देशून म्हणाले, ''पूर्वी असे झाले आहे. परंतु तुम्हाला ते माहित नाही. शापामुळेच देवेंद्राला पंचपांडवांचा जन्म घ्यावा लागला आणि शचिदेवीला द्रौपदीच्या रूपाने जन्म ध्यावा लागला, तिला पांडवांची पत्नी व्हावे लागले. शचिपुरंदरांनी भूमीवर जन्म घेतला तरी त्यांचे मूलतत्व स्वर्गात नक्कीच होते. द्रौपदीचे शय्या सुख केवळ अर्जुनालाच मिळाले. मंत्रांग विषयांवर ती धर्मराजा बरोबर चर्चा करीत असे. भीमास माते सारखे रूचकर भोजन करून देत असे. नकुलास ती लक्ष्मीस्वरूपिणी दिसे. सहदेवास भूत, भविष्य, वर्तमान काळाचे ज्ञान होते त्यामुळे पुढे घडणाऱ्या घटना लवकर लवकर घडून क्षेत्र संग्राम लवकर संपावा अशी इच्छा तो दर्शवित असे, त्या मुळे भूमातेपेक्षाहि जास्त सहनशील वृत्तिने ती त्यांच्या बरोबर वागत असे. देवता धर्म, मनुष्य धर्म आणि जंतु धर्म हे वेगवेगळे असतात. त्या सर्वांना एकत्रित मिसळु नये.'' त्यावर मी म्हणालो पुराण काळात अशा अनेक आश्चर्याच्या गोष्टी घडल्या असतील, परंतु प्रस्तुत काळात तसे कांही घडत नाही. श्रीपादांची तीक्ष्ण दृष्टि माझ्यावर पडली. ते म्हणाले, ''तुझा तीन स्त्रीया बरोबर विवाह झाला. त्या तिन्ही स्त्रिया मरण पावल्या. तिघींना तीन वेगवेगळे आत्मे होते का ? नसेल तर एकच आत्मा होता का ? पुरुषांनी तीन स्त्रियांशी विवाह करणे धर्मसम्मत आहे. पण एका स्त्रीने तीन पुरुषांशी विवाह करणे धर्म सम्मत आहे का ? खरे पहाता आत्मा म्हणजे काय ? दांपत्य धर्म म्हणजे काय?''
तेवढयात मी म्हणालो, ''पुरुष किती ही स्त्रियां बरोबर विवाह करू शकतो पण स्त्रीला मात्र तो हक्क नाही.'' श्रीपाद प्रभू म्हणाले ''ओहो ! तू जगन्नियंत्या पेक्षा मोठा आहेस का ? मंदोदरी पातिव्रत्याच्या गुणासाठी प्रसिध्द होती. ती वालिची पत्नी असताना तिचे शरिराणु वेगळे होते. रावणाची पत्नी असताना तिचे शरिराणु वेगळे होते. विभीषणाची पत्नी असतानाचे शरिराणु वेगळे होते. आत्मा निर्विकार असल्याने कोणत्याही गुणांशी त्याचा संगम नसतो म्हणूनच आत्मा नित्य निर्विकार, सत्ययुक्त शुध्द आणि अत्यंत पवित्र आहे. तमोगुणी रावणा बरोबर त्याला अनुसरूनच मंदोदरीने व्यवहार केला. विभीषणा बरोबर असताना तिने सत्वगुण प्रधान होऊन जवाबदारी पार पाडली.''
मी निरूत्तर झालो. पण थोडा वेळ विचार करून म्हणालो, तुम्ही सांगितलेल्या गोष्टीचा स्वीकार केला तर बहु पतित्वास स्वीकारावे लागेल. यावर श्रीपाद म्हणाले, ''हे कलियुग आहे. येथे किती तरी निरनिराळया अवांतर जातीचा आविर्भाव होत असतो. पशुपक्षी, वृक्ष , कृमी-कीटक मानवजन्मास येत आहेत. त्यांच्या त्यांच्या स्वभावानुसार निरनिराळी नाती जुळत आहेत. धर्मविरूध्द नाते जुळले असता अवांतर कुल निर्माण होते. कलियुगांतात अशा कुलांचा नाश होणारच. हे अवांतर कुल असुरी शक्तिमुळे निर्माण होते. त्या साठीच असुरध्वंस करावा लागतो. एकदा असुराचा ध्वंस झाला असता त्याला परत जन्म मिळत नाही. परंतु एका असुराच्या जागी दहा असुरांचा जन्म त्या स्थानात होऊ लागला आहे. धर्मबध्द संबंधच कायमचे टिकुन राहातात या साठी संगळयांनी विधिने कुलगोत्र, वर्णाश्रम धर्माचे पालन करावे.
दिव्यात्म्याचा आविर्भाव तुरळकपणे होत असतो. त्यांना आत्मा एकच असतो. त्या आत्म्याचा पुरुषरूपात आविर्भाव झाल्यास, स्त्रीरूपात त्याच आत्म्याच्या शक्तीचा आविर्भाव होतो. त्यांनाच दिव्यदंपत असे म्हणतात. असे दिव्यात्मे सृष्टींच्या आदिपासुन ते अंतापर्यंत असतात. पराशक्ति आणि परब्रह्म हेच अद्वितीय स्वरूपांत सायुज्य स्थितीत असतात.'' श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले आता बघ, वेदांतशर्मा नावाचा तूच ब्राह्मण होतास. बंगारय्या नावाने चांभार कुलात जन्मला आहेस, हे सारे एका काळीच घडले. तुझीच स्त्री शक्ति तुझ्या तीन पत्नी रूपाने चांभाराची स्त्री बंगारअम्मा नावाने जन्मली. नुकतीच तुमच्या घरी मरण पावलेली गाय एकेकाळी तुझी पत्नीच होती. तुझ्या दिवंगत पत्नीचे चैतन्य आणि त्या गोमातेचे चैतन्य प्रस्तुत बंगारम्मा या नावाच्या महान वनितेच्या चैतन्यात मिळून गेलेले आहे. चैतन्य हे जेथून येते तेथेच मूलचैतन्यात जाऊन मिळुन जाणे हे निश्चितच. सृष्टींचे रहस्य अती गहन आहे. हे समजण्यास सप्तऋषींची शक्ति सुध्दा अपुरी पडते. बंगारअम्माचे शरीर बंगारअय्या साठीच नेमलेले आहे. यामुळे हे कांही धर्मविरूध्द नाही, तू तिच्या बरोबर संसार कर. तिच्याकडून तुला शरीर सौख्य मिळणार नाही. मी हा निर्णय धर्मस्थानात बसून केलेला आहे. प्रकृत्ती मध्ये आल्यास प्रकृत्तीचा धर्म, मर्यादा यांचे पालन विधिवत करावेच लागते. आपल्या अंगावरचे कातडे काढून मला त्याची चप्पल शिऊन देते असे बंगारम्मा म्हणाली मी त्याला होकार दिला. ती बंगारम्मा जीवित असतानाच तिला नकळत तिने गाईचा जन्म घेतला. तिला माहीत नसताच ती तुझ्या तिन्ही बायकांच्या रूपात जन्मली. जेंव्हा चैतन्य तीन चार शरीरात विभाजित झाले. तेंव्हा त्या प्रत्येक शरीरातील चैतन्याला मीच आहे असा भाव होतो. त्यातील एकत्व लक्षात येत नाही. ''कलौ पंचसहस्राणि जायते वर्णसंकर:'' असे सांगितले गेले आहे. त्याचा अर्थ असा की कुलसांकर्य सांगितलेले नाही, वर्णसांकर्यच सांगितले गेले आहे. कुलसांकर्य झाल्यास नीच जन्मास जावे लागते. वर्णसांकर्य झाले असता. नूतन शक्तियुक्त अशा नवीन जाती उद्भवतात. त्याच्या परिणामत: नवीन मानव जातीस दैवत्व लाभते. ह्या भूमीवर दैवत्त्व लाभलेल्या जाती उत्पन्न करावयाच्या आहेत.
या ब्राह्मण परिषदेचा खरा उद्देश मला माहीत आहे, माझ्या आजोबांना आणि वडीलांना कुलातून बहिष्कृत करण्याचे त्यांच्या मनात ठसून भरलेले आहे. म्हणूनच मी, वेदांतशर्माला कुलबहिष्कृत करीत आहे. आज पासून तुझे नांव बंगारय्या असे व्यवहारात येईल.''
सगळीच परिषद बुचकळयात पडली. एक ज्योति स्वरूप सगळयांच्या देखतच माझ्या मध्ये विलीन झाली. तेंव्हाच श्रीपाद श्रीवल्लभ म्हणाले ''तुमच्या डोळयासमोरच बंगारप्पाची आत्मज्योती वेदांतशर्मात विलीन झाली. हा ब्राह्मण आहे का चांडाळ आहे. हा निर्णय तुमचा तुम्हीच करावा. आम्हाला कुलबहिष्कृत करून त्यासाठी शंकराचार्याची सुध्दा अनुमती मिळविण्याचा प्रयत्न तुम्ही केलात. शंकराचार्य मला काय करतील ? तुमच्याच डोळयासमोर मी आजोबा कडून किंवा आमच्या वडिलांकडून वेदाभ्यास न करताच मी वेद उच्चारण करु शकतो. एकाच वेळी अनेक ठिकाणी दर्शन देऊ शकतो. शंकराचार्य माझ्या समोर आले तरी मला कशाची भीति ? त्यांना त्यांच्या नित्य आराधित शारदाचंद्र मौळीश्वर या रूपात दर्शन देऊन त्यांच्यावर अनुग्रह करीन. तेंव्हा तरी दुसरा कोणता मार्ग नसल्यामुळे माझा त्यांना देव म्हणून अंगीकार करावा लागेल. त्यांचा निर्णय तेंव्हा तुमच्या साठी दु:खप्रद होईल. क्षत्रिय परिषद, वैश्यपरिषद तुमच्या निर्णयाला सम्मती देणार नाहीत. पौरोहित्य, कर्मकांड, दान, शिधा, दक्षीणा जर त्यांनी देण्याचे थांबविले तर लेकरा बाळांसह तुमची दीन अवस्थाच होईल. मजबरोबर जर भांडण केलेत तर सर्वनाशाचे मूळ कारण व्हाल. मी चतुराश्रमाचे धर्मपालन करावे असे सांगत आहे. अष्टदश वर्णाच्या लोकांनी सुख संतोषाने नांदावे असे सांगत आहे. तुम्ही आपआपल्या धर्माच्या नियमांचे अचुक पालन करून धर्मसंस्थापन करण्यात हातभार लावावा. तसे न केल्यास अनेक आपत्ती कोसळतील. मी तर शांतच रहाणार, पण तुमचीच परिस्थिती कष्टप्रद होईल. प्रकृतीचे परिणाम देण्याचे दोन प्रकार असतात. पहिला एकदम सुधार करणे आणि दुसरा म्हणजे सावकाश सुधार करविणे. दुसऱ्या पध्दती प्रमाणे वेळेचा अवधि पण दिला जाईल. तुम्ही जर आपल्यात सुधारणा केली नाही तर विनाशास आमंत्रित केल्यासारखेच होईल. मी विनाश करूनहि धर्मस्थापन करीन.'' एवढे बोलून श्रीपाद प्रभूंनी मौन धारण केले. बंगारअप्पा पुढे म्हणाले, ''मला कोठेच आधार नव्हता, त्या स्थितीत मी बंगारम्माला घेऊन गावोगाव फिरत येथे पोहोंचलो. आमच्या ह्या आश्रमांत मातंगी देवीची प्रतिष्ठा करून जीवन कंठीत आहे.''श्रीपाद श्रीवल्लभ या मार्गाने जाताना आमच्या या आश्रमांत आले. आम्हाला त्यांनी आशिर्वाद दिला आणि ते म्हणाले. ''तुझ्या शरीरपातानंतर तू परत ऋणानुबंधाने ब्राह्मण कुलात जन्म घेशील, आणि बंगारम्मा शूद्रजातीत जन्मेल. तेंव्हा तुम्ही दोघे पति-पत्नि व्हाल, तुम्हाला संतान पण होईल. त्या संतानास कुरुगड्डीत माझी सेवा करण्याची संधी लाभेल, सुखीभव !''बाबा ! हाच आमचा वृतांत आहे. आपण या प्रातांत याल, तुमच्या जवळ त्यांचे पैंजण आहेत. ते पैंजण घेऊन, तुम्हाला चर्मपादुका द्याव्यात असा मला त्यांचा आदेश आहे.आम्ही मातंग मुनींची कन्या मातंगी देवीचे आराधक आहोत. ह्या आईची आराधना केल्यास दांपत्यसौख्य चांगले लाभते. हिला राजमातंगी कर्णमातंगी वगैरे नावांनी संबोधतात. एकदा श्रीपाद श्रीवल्लभांनी भौतिक स्वरूपात या आश्रमांत दर्शन दिले. त्या वेळी बंगारम्मा दूध गरम करीत होती. ज्या गोमातेच्या कातडयानी ह्या पादुका बनल्या, ती गोमाता सुध्दा मान हालवित समोरून गेल्याने तिला दर्शन झाले. श्रीपादांनी आमच्या कडून दूध स्वीकारले. आम्ही पूजलेली मातंगदेवीची मूर्ती, तिच्या नावाने स्थापिलेल्या संस्थानांतील औदुंबरवृक्षाच्या खाली अनेक गजापर्यंत खोलवर जाईल, आणि तेथे अनेक सिध्दपुरुषांकडून तिची सेवा होईल. ते बंगारम्माला बोलावून म्हणाले, ''बाई ! तुझा पति खूप अनुकूल आहे. पुढच्या जन्मी याच्याकडून तुला सर्व सुख लाभेल. तुझ्यासाठी सोन्याची बिंदी तयार करून ठेवली आहे. तसेच अत्यंत शुभप्रद असे मंगळसूत्र पण तयार केलेले आहे. हे दोन्ही हिरण्यलोकांत व्यवस्थितपणे ठेवले आहेत. उत्तर जन्मांत मी स्वत:च तुमच्यावर कृपा करून स्वहस्ताने तुमचा विवाह करवीन.'' एवढे बोलून श्रीपाद प्रभू अंतर्धान पावले बाबांनो ! तुम्ही आमची गाथा ऐकलीत. नेहमी सिध्द मंगलस्तोत्राचे पठन करीत रहावे, तुम्हाला महापुरुषांचा अनुग्रह नक्की प्राप्त होईल. सिध्द, महासिध्द, महायोगी हे श्रीपादांचे करचराणावयवासारखेच होय, त्यांच्या कडूनच श्रीपाद प्रभू आपल्या संकल्पांची पूर्ति करतात. एकदा त्यांनी राजमाता मातंगीदेवीच्या रूपांत दर्शन देऊन आम्हास अनुग्रहीत केले. समस्तसृष्टी , तसेच सृष्टीचे रहस्य हे सगळे त्यांच्याच हातात असते. तुम्ही सदा सर्वदा त्यांचे स्मरण करा, ध्यान करा, अर्चना करा. सर्वसिध्द तेच आहेत. माते प्रमाणे ते तुमची रक्षा करतील. कोटयावधी आईच्या प्रेमापेक्षा श्रीपादांचे आपल्या भक्तावरील प्रेम कितीतरी उच्चकोटीचे असते.
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"