Sunday, April 28, 2019

श्रीपाद वल्लभ चरित्र अमृत :- अध्याय -32

॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ 
अध्याय -३२
नवनाथांचे वर्णन
नवनाथांचा वृतांत
श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य चरणांना स्पर्श करून मी त्यांना प्रश्न केला ''महाप्रभू ! नवनाथ या नांवाने प्रसिध्द असलेले सिध्द योगी सर्व श्रीदत्त प्रभूंचे अंशावतार आहेत असे मी ऐकले होते. त्यांच्या विषयी सविस्तर माहिती आम्हास द्यावी अशी श्रीचरणी नम्र प्रार्थना.''
श्री नवनाथांचे नांव ऐकताच श्रीपाद प्रभूंच्या दोन्ही नेत्रांमधून अमृतवृष्टीचा प्रवाह बहिर्मुख होऊन सृष्टीवर पडत असल्या सारखे वाटले. त्यांच्या दृष्टीतून प्रेमचैतन्य प्रवाहित होत होते. ते अत्यंत आनंदाने म्हणाले ''श्रोत्यांनो, मच्छेंद्र, गोरक्ष, जालंधर, गहनी, अडभंग, चौरंग, भर्तरि, चर्पट आणि नागनाथ हे नवनाथ आहेत. त्यांच्या स्मरणमात्रानेच शुभफल सिध्द होते. श्रीदत्त प्रभूंची कृपा नवनाथांचे स्मरण करणाऱ्यावर अपार असते. कलियुगाच्या प्रारंभापूर्वी श्रीकृष्णाने उध्दवासारख्या महान भक्ता बरोबर तसेच समस्त यादवांबरोबर चर्चा करून, आज नवनाथ या नावाने जाणले जाणाऱ्या नवनारायणांचे स्मरण केले.''
ऋषभ चक्रवर्तीला शंभर पुत्र होते. त्यातील नारायण अंशाने जन्मलेल्या नऊ जणांना नवनारायण म्हणतात. त्यांची नांवे 1) कवि 2) हरी 3) अंतरिक्ष 4) प्रबुध्द 5) पिप्पलायन 6) अविर्होत्र 7) दुमिल 8.) चमस 9) करभाजन अशी होती. हे सगळेच अवधूत स्थितीमध्ये राहणारे सिध्दपुरुष होते. माझ्या आज्ञेप्रमाणे या नवनारायणांनी धर्म संस्थापनार्थ नवनाथ या नाम रूपाने पृथ्वीवर पुन्हा अवतार धारण केला. प्रथम पुत्र कवि हा ''मच्छेंद्रनाथ'' या नांवाने जन्मला. अंतरिक्ष ''जालंदर'' नांवाने जन्मला. यांच्या शिष्य रूपाने प्रबुध्द ''कनिफा'' या नावाने जन्मला, पिप्पलायन ''चर्पटनाथ'' या नांवाने जन्मला. अवर्होत्र हा ''नागेश नाथ'' या नांवाने जन्मला. दृमिल हा ''भर्तरिनाथ'' या नांवाने जन्मला. चमस, ''रेवणनाथ'' रूपाने आणि कारभाजन ''गहनीनाथ'' या नांवाने जन्मला. सृष्टीवर अनेक स्थानी कांही कारणास्तव ब्रह्मदेवाचे वीर्य पडले. त्यापासून अनेक ऋषी जन्मास येतील असे व्यास महर्षिंनी आपल्या भविष्य पुराणात सांगितले होते.
उपरिचर नावाचा एक वसु होता. त्याने एकदा उर्वशीला पाहिले आणि तो अत्यंत मोहित झाला. त्यावेळी त्याचे वीर्य द्रवून यमुनेच्या पाण्यात पडले. ते एका मासोळीने गिळले. ह्या मत्स्या पासून मच्छेंद्रनाथांचा जन्म झाला. कामदेव मन्मथाला शिवाने क्रोधित होऊन आपल्या ललाटाग्नीने जाळून भस्म केले. त्या भस्मामध्ये सूक्ष्म रूपाने मन्मथाचा आत्मा होता. बृहद्रथाने जेंव्हा यज्ञ केला त्या यज्ञकुंडातून जालंदर नाथांचा अविर्भाव झाला. रेवा नदी म्हणजे सध्याची नर्मदा नदी. या नदीमध्ये पडलेल्या ब्रह्मवीर्यापासून रेवण सिध्दांचा जन्म झाला. एकदा थोडे ब्रह्मवीर्य एका नागाच्या शिरावर पडले ते भक्ष्य समजून नागिणीने खाऊन टाकले. त्या योगाने ती नागीण गर्भवती झाली. त्याच वेळी जनमेजय राजा सर्व नाग, सर्पाना नष्ट करण्यासाठी सर्पयाग करीत होता. ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारा बरोबर शेकडो सर्प नाग यज्ञ कुंडात येऊन पडू लागले. या महा भयंकर सर्पयागापासून वाचण्यासाठी तक्षकाच्या मुलीस एका मोठ्या वडाच्या झाडाच्या बुंध्यातील बिळात लपविले गेले. त्या गर्भपिंडातून अविर्होत्राचा जन्म होणार असल्याने त्या अंडयास त्या बिळात ठेवून तक्षकाची मुलगी स्वस्थानी निघून गेली. यथासमयी त्या अंडयातून वटसिध्द नागनाथाचा जन्म झाला. मच्छेंद्रनाथ देशसंचार करीत असताना एका स्थळी त्याचा मुक्काम होता. त्यांच्या दर्शनसाठी अनेक लोक येत असत. एक वांझ स्त्रीने मच्छेंद्रनाथाना नमस्कार केला व आपली व्यथा सांगितली नाथांनी भस्म मंत्रून दिले. परंतु त्या स्त्रीने ते अविश्वासाने उकिरडयावर फेकून दिले. त्या भस्माच्या अमोघ अशा शक्तिसंपन्नतेने त्यामधून गोरक्षनाथांचा जन्म झाला. पार्वतीच्या विवाह समयी पौरोहित्य करणारे ब्रह्मदेव तिचे अप्रतिम लावण्य पाहून तिच्यावर मोहित झाले आणि त्यांचा वीर्यस्त्राव झाला. या कृत्याची त्यांना अत्यंत लज्जा वाटली आणि त्यांनी ते वीर्य आपल्या मांडीस पुसून टाकले. त्या क्षणीच त्या वीर्याचे साठ हजार भाग झाले आणि त्यातून वालखिल्य या नांवाचे साठ हजार ऋषी जन्मास आले. त्यातून थोडा भाग उरला होता तो कचरा समजून भागिरथी नदीत फेकला गेला. तो कचरा, नदीतील गवतात अडकून तेथेच राहिला. त्यामध्ये पिप्पलायनाचा आत्मा शिरला आणि चर्पटनाथाचा जन्म झाला. कोलिक मुनींनी त्यांच्या पर्णकुटीतून बाहेर जाताना आपले भिक्षापात्र पर्णकुटीच्या बाहेर ठेवले . त्याच वेळी सूर्याचे तेज त्या पात्रात पडले ते महर्षिंना कळाले. त्यांनी ते पात्र तेथेच संभाळून ठेवले ''भर्तरि'' या शब्दाचा अर्थ भिक्षापात्र असा होतो. त्या पात्रातूनच एका नवनाथाचा जन्म झाला यामुळे त्यांचे नांव भर्तरिनाथ असे पडले. हिमालयातील एका पर्वतावरील घनदाट अरण्यात एक हत्ती झोपला होता. एकदा ब्रह्मदेव सरस्वतीवर मोहित झाले आणि त्यांचे वीर्य द्रवित होऊन खाली पडले. ते झोपलेल्या हत्तीच्या कानात पडले. त्या कानातूनच प्रबुध्दाला जीवन प्राप्त होऊन त्याने जन्म घेतला. कानातून जन्म घेतल्याने या नाथाचे नांव कर्ण कनिफा असे पडले. गोरक्षकाने संजिवनी मंत्राचा जप करीत मातीमध्ये एक मनुष्याकार आकृती काढली. त्या आकृतीतून करभाजनाला त्या संजिवनी मंत्राच्या सहाय्याने जीवन प्राप्त झाले आणि त्याने गहनीनाथ या नावाने अवातर धारण केला. श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार या नवनारायणानी आपले स्थूल शरीर मंदपर्वतावर समाधी अवस्थेत सांभाळून ठेवले आणि अंशअवताराने नवनाथ नामरूपाने पृथ्वीवर जन्म घेतला. धर्मसंस्थापनेचे महान कार्य करण्यासाठीच या नवनाथांचा अवतार झाला होता. श्रीपाद प्रभूंचे हे नवनाथांच्या जन्मासंबंधीचे आश्चर्यजनक विवेचन ऐकून आम्ही मंत्रमुग्ध होऊन गेलो होतो. आम्ही प्रभूंच्या चरणी वंदन करून त्यांचा जयजयकार केला. यानंतर मी प्रश्न केला ''प्रभू नवनाथांचे अवतार हे नवनारायणाचे अंशअवतार आहेत असे आपण सांगितले. नवनाथ आणि नवनारायण यामध्ये कांही फरक आहे काय ?'' आमच्याकडे आपल्या दिव्य, प्रेमळ दृष्टीने पहात श्रीपाद प्रभूंनी मंदहास्य केले आणि म्हणाले ''श्रोत्यानो, समस्त सृष्टीच्या महासंकल्पाचे स्वरूप मीच आहे. देविदेवतांनी कार्य करण्याचे संकल्प सुध्दा माझ्या महासंकल्पाचे अंशमात्र असतात. या अंशमात्र संकल्पांना थोडे फार स्वातंत्र्य असते. हे स्वातंत्र्य शेतातील झाडाला दोरीने बांधलेल्या गायीस चरण्यासाठी जेवढे स्वातंत्र्य असते तसेच आहे. तसेच धर्मसूत्रांना अनुसरून अंशावतारांना स्वेच्छा दिली जाते. संकल्प मात्र मूळ तत्त्वातूनच येतात. त्यांचे योग्य प्रकारे नियंत्रण करणे हे अंशावतरातले कार्य असते. कोणतीही समस्या निर्माण झाल्यास अंशावतार त्या समस्येच्या निराकरणासाठी मूलतत्त्वाकडे निवेदन घेऊन येतात. मूलतत्त्वाकडून अनुमति घेऊन जीवांचे कल्याण करतात. या अंशावतारात, राग, लोभ, मद-मत्सर, अहंकार असे मानवी दुर्गुण नसतात. यामुळे मूलतत्त्वाची कार्य समर्थता अंशावतारात सुध्दा आढळते. या कारणामुळे अंशावतार आणि पूर्णावतार यात कांही फरक नसतो.''
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"