॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
अध्याय -३१
दश महाविद्यांचे वर्णन
आम्ही रोज सायंकाळी श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेने कृष्णेच्या अलिकडील तिरावर येऊन तेथेच वास्तव्य करीत असू. प्रात:काळीच स्नान संध्या आटोपून पुन्हा श्री गुरुंच्या सान्निध्यात जात असू. या अलभ्य सत्संगात श्री प्रभूंचे प्रसादरूपी दर्शन, नित्यनूतन योगानुभव आणि अनेक दिव्य रहस्यांचा उलगडा होत असे. देवी तत्त्वाची उपासना दश महाविद्यारूपानेच होते असे आम्ही ऐकले होते या दश महाविद्यारूपांची संपूर्ण माहिती आम्हास सांगावी अशी आम्ही ''श्रीं''च्या चरणी नम्र प्रार्थना केली. श्रीपाद प्रभू म्हणाले ''अरे शंकरभट्टा, श्रीविद्येची उपासना अत्यंत श्रेष्ठ आहे. पूर्वकाळात हयग्रीवांच्या कृपा प्रसादानेच अगस्त्य महामुनींना श्री विद्येचे ज्ञान झाले. त्यांनी ही विद्या आपली पत्नी लोपमुद्रा देवीला दिली. लोपमुद्रादेवीने या विद्येचा सखोल अभ्यास करून त्याचा गुढार्थ अगस्तीऋषीना सांगितला. अशा रितीने ते उभयता एकमेकांचे गुरु झाले.''
लोपमुद्रा आणि अगस्तीऋषींचे चरित्र
विदर्भ देशाच्या राजास बरीच वर्षे पर्यंत संतान प्राप्ति झाली नव्हती. अगस्त्य महामुनींच्या तपोबलाने राजाला एक कन्यारत्न प्राप्त झाले. त्या कन्येचे नांव लोपामुद्रा असे ठेवले होते. लोपामुद्रा कालांतराने मोठी झाली त्या वेळी अगस्ती मुनींनी तिला लग्नासाठी मागणी घातली. दोघांच्या वयातील अंतर पाहून राजा विचार मग्न झाला. एवढया लहान वयाच्या मुलीचा विवाह एका वृद्ध महामुनी बरोबर कसा करावा. याच चिंतेत तो होता. शेवटी त्याने आपल्या कन्येस तिचा विचार या विवाहाबद्दल विचारला तेंव्हा क्षणाचा सुध्दा विलंब न लावता ती म्हणाली ''पिताश्री मी अगस्ती मुनींसाठीच जन्मले आहे. मी त्यांच्याशीच विवाह करणार.'' राजाने दोघांचा विवाह लावून दिला. राजकन्या लोपामुद्रा राजप्रसाद सोडून वल्कले परिधान करून अगस्ती मुनी बरोबर तपोभूमीस निघून गेली. कालांतराने अगस्ती ऋषींनी तिच्याशी शास्त्रयुक्त संग करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर लोपामुद्रा मुनींना म्हणाली ''नाथ, मी ललिता स्वरूपाची उपासना करून ललिता स्वरूपच झाले. आपण सुध्दा शिवोपासना करून शिवरूप झाल्यावरच आपली इच्छा मी पूर्ण करीन. अगस्ती ऋषींनी घोर तपस्या करून शिवरूप प्राप्त करून घेतले. नंतर त्यांनी आपली इच्छा लोपामुद्रेस सांगितली यावेळी ती म्हणाली'' नाथ मी एका राज घराण्यात जन्मले. क्षत्रियांना शोभतील असे धन, आभुषणे, रेशमी वस्त्र, सुगंधी द्रव्ये, सर्व उपभोग्य वस्तु असल्या शिवाय माझ्याशी संग करणे योग्य नाही. तेंव्हा तुम्ही सर्व वस्तूंचा संचय करून तसेच आपणासाठी भरजरी वस्त्रे आणावीत. ही सर्व भोग सामुग्री आणल्यानंतरच आपली इच्छा पूर्ण होईल. धन संपादन करण्यासाठी अगस्ती मुनी इल्वल नांवाच्या एका राक्षसाकडे गेले. त्याला आपल्या मायेने आपलेसे करून त्याच्याकडून धन, दागिने, वस्त्र आभूषणे घेऊन लोपामुद्रेकडे आले आणि पत्निची इच्छा पूर्ण केली. यथाकाली त्यांना उत्तम संतान प्राप्ति झाली. एकदा अगस्ती ऋषींनी आपल्या तपोबलाने संपूर्ण समुद्रच आपल्या कमंडलुमध्ये भरला आणि तो पिऊन टाकला होता. या अगस्ती महाऋषींनी विंध्याचल पर्वताचा गर्व हरण केला होता. अजून सुध्दा दक्षिण भारतात अगस्ती मुनींना एक महान सिध्द पुरुष मानले जाते. त्यांची अनेक ठिकाणी देवालये आहेत. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले मी जेंव्हा कल्की अवतार घेईन त्यावेळी परशुरामासाखेच अगस्ती ऋषींना गुरुस्थान देईन.
देवीची दशमहाविद्या
श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले ''काली'' हे दशमहाविद्येतील प्रथमरूप आहे. ''महाकाली'' ही समस्त विद्यांची आदि देवता आहे. तिच्या विद्यामय विभूतीनाच महाविद्या असे म्हणतात. एके काळी, हिमालयातील मातंग ऋषींच्या आश्रमात सर्व देवतांनी महामायेची स्तुति केली. त्यावेळी अंबिकेने ''मतंगवनिता'' रूपात दर्शन दिले. ती काजळासारखी काळया रंगाची असल्याने तिचे नांव कालिका देवी पडले. तिने शुंभ-निशुंभ राक्षसांचा वध केला. तिचे रूप काळे निळे असे असल्याने तिला तारा असे नांव सुध्दा आहे. कोणताही संकल्प अथवा फलीभूत न झालेली योग साधना अल्प काळात गंतव्य स्थानास पोहोचावी यासाठी कालीमातेची उपासना करतात. या साधन काळात कालीमातेच्या साधकाच्या अंगाचा भयंकर दाह होतो तो सहन करावा लागतो. दशमहाविद्येतील दुसरे रूप ''तारा'' देवीचे आहे. ही माता मोक्षदायिनी, सर्व दु:खापासून तारण करणारी आहे त्यामुळे तिचे ''तारा'' हे नांव प्रख्यात झाले. या देवीस ''नील सरस्वती'' असे सुध्दा नामाभिधान आहे. भयंकर अशा विपत्तीतून भक्ताचे रक्षण करणारी असल्याने योगीजन हिची अग्रतारा रूपात आराधना करतात. वशिष्ठ महर्षीनी सुध्दा तारा देवीची उपासना केली होती. चैत्र शुध्द नवमीच्या रात्रीस तारारात्रि असे म्हणतात. दशमहाविद्येतील तिसरे रूप ''छिन्नमस्ता देवीचे'' आहे. हे अत्यंत गोपनीय असे रूप आहे. एके वेळी देवी आपल्या सखी बरोबर मंदाकिनी नदीवर स्नानाला गेली होती. तिच्या द्वारपालांनी भोजना विषयी विचारले तेंव्हा तिने आपल्या तलवारीने आपलाच शिरच्छेद केला. तिचे शिर वाम हस्तावर येऊन पडले. तिच्या धडातून रक्तधारा निघाल्या त्यातील दोन धारा सखींनी प्राशन केल्या व तिसरी धार देवीने स्वत:च प्राशन केली. या दिवसा पासून तिचे नांव ''छिन्नमस्ता'' असे पडले. हिरण्यकश्यपु आदि दानव या देवीचेच उपासक होते. दशमहाविद्येतील चवथे रूप ''षोडशीमहेश्वरीचे'' आहे. या देवीचे हृदय लोण्याप्रमाणे मऊ असून ती अत्यंत दयावान आहे. हिच्या आश्रयास आलेल्या साधकांना ज्ञानप्राप्ति त्वरित होते. विश्वातील सकल मंत्र-तंत्राचे निर्माते या देवीचेच उपासक आहेत. या षोडशीमहेश्वरी देवीचे वर्णन वेद, श्रुती सुध्दा करू शकले नाहीत. ते नेती, नेती असे म्हणून शांत झाले. ही प्रसन्नवदना माता भक्तांचे सकल मनोरथ पूर्ण करते. या भगवतीच्या उपासनेने भोग, मोक्ष दोन्हीची प्राप्ति होते. दशमहाविद्येतील पाचवे रूप ''भुवनेश्वरी देवीचे'' आहे. सप्तकोटी महामंत्र या देवीचे उपासक आहेत. या देवीजवळ कालीतत्त्वापासून ते कमला तत्त्वापर्यंत दहा अवस्था असतात. त्यातून अव्यक्त भुवनेश्वरी व्यक्त होऊन ब्रह्मांडाचे रूप धारण करू शकते. प्रलयकाळी कमलापासून म्हणजेच व्यक्त जगापासून क्रमाक्रमाने लय पावून काली या मूळ स्वरूपात बदलते. यामुळे या देवीला काळाची जन्मदात्री असे सुध्दा म्हणतात. दशमहाविद्येमध्ये सहावे रूप ''त्रिपुर भैरवी''चे आहे. महाकालास शांत करू शकणाऱ्या या शक्तिरूपालाच त्रिपुर भैरवी असे म्हणतात. ही त्रिपुर भैरवी नरसिंह भगवानांची अभिन्न शक्ति आहे असे शास्त्रांत सांगितले आहे. सृष्टीमध्ये परिवर्तनाची प्रक्रिया सतत चालूच असते. या प्रक्रियेस आकर्षण आणि विकर्षण हे मूल कारण स्वरूप असतात. ही क्षणोक्षणी होणारी क्रिया आहे. या त्रिपुर भैरवीचे रात्रीचे नांव कालरात्री आणि भैरवाचे नांव कालभैरव आहे. या दोघांच्या संयुक्त स्वरूपानेच माझा येणारा नृसिंह सरस्वती अवतार होणार आहे. हा अवतार महायोग्यांसाठी त्रिपुर भैरवी आणि कालभैरवनाथ अवतार मानला जाईल. दशमहाविद्येतील सातवे रूप धुम्रावती आहे. ही धुम्रावती उग्रताराच आहे. ह्या देवीस शरण जाणाऱ्या साधकांची सारी संकटे नष्ट होऊन तिच्या कृपा प्रसादाने सकल संपदा प्राप्त होते. दशमहाविद्येतील आठवे रूप ''बगलामुखी देवी''चे आहे. ऐहिक, पारलौकिक, देश, समाजाचे अरिष्ट निवारणासाठी तसेच शत्रूच्या शमनासाठी या देवीची आराधना केली जाते. विष्णुभगवान, परशुराम हे या देवीचे भक्त होते. श्रीतिरुमला क्षेत्रातील श्रीवेंकटेश्वर स्वामींनी या देवीची मातेच्या स्वरूपात आराधना केली होती. दशमहाविद्येतील नवम रूप ''मातंगी'' मातेचे आहे. मानवाच्या गृहस्थ जीवनास सुखी करून पुरुषार्थ सिध्दिस नेण्याची शक्ति मातंगी मातेचीच असते. या देवीला मातंग ऋषींची कन्या असे सुध्दा मानतात. दशमहाविद्यतील दहावे रूप ''कमलालया'' मातेचे आहे. ही सुख, समृद्धी प्रदान करणारी देवता आहे. भार्गव मुनीनी या मातेची आराधना केली होती या कारणाने तिला भार्गवी असे सुध्दा नांव लाभले. या मातेच्या कृपेने पृथ्वीचे पतित्व तसेच पुरुषोमत्व या दोन्हींचा लाभ होतो. हीच देवी श्री वेंकटेश्वरस्वामी बरोबर पद्मावती रूपात तिरुमला क्षेत्रात असते. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले ''दशमहाविद्या स्वरूपिणी अनघा देवी आणि तिचा प्रभू अनघ (म्हणजे साक्षात दत्त प्रभु) यांची अर्चना केली असता अष्टसिध्दिंची प्राप्ति होते. प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमीस अनघाष्टमी मानून अनघा मातेची पूजा, अर्चा करावी. या तुमच्या आराधनेने सर्व मनोकामना पूर्ण होतील. प्रभू पुढे म्हणाले ''अरे शंकरभट्टा ! तु रचलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचे पारायण करून, येणाऱ्या शुक्ल अथवा कृष्णा अष्टमीस ''अनघाअष्टमीचे'' व्रत करून अकरा गृहस्थाना जेवण द्यावे अथवा त्यांना पुरेल एवढी शिधासामुग्रीचे दान करावे. अशा पारायणाने व अन्नदानाने इच्छित फल प्राप्ति निश्चित होते.''
चरित्रामृताचा पारायण महिमा
प्रभू पुढे म्हणाले ''श्री चरित्रामृत हा केवळ एक ग्रंथ आहे असे मानू नये. हा एक सजीव अशा महाचैतन्याचा प्रवाह आहे. तुम्ही याचे पारायण करीत असतांना यातील प्रत्येक अक्षरातील शक्ति माझ्या चैतन्यात प्रवाहित होते. तुमच्या न कळत माझ्याशी भावसंबंध घडतो. यामुळे तुमच्या धर्मबध्द अशा सर्व इच्छा माझ्या कृपेने पूर्ण होतात. या ग्रंथराजाला तुमच्या पूजा मंदिरात (देवघरात) नुसते ठेवले असता त्यातून शुभप्रद स्पंदने येतात. ही स्पंदने दुष्टशक्तींना , दुर्दैव आणणाऱ्या शक्तींना पिटाळून टाकतात.
श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामृताची जाणते पणे अथवा अजाणते पणे निंदा केल्यास त्या निंदा करणाऱ्या व्यक्तीचे पूर्वपुण्यफल धर्मदेवता घेते आणि योग्य अशा जीवाला वाटून टाकते. अशा रितीने श्रध्दावान गरीब भक्त भाग्यवंत होतो आणि अश्रध्दावान व्यक्ति गरीब होतो. हा अक्षरसत्य ग्रंथ आहे. याचे हा ग्रंथच स्वत: प्रमाण आहे. जिज्ञासू लोक याची परिक्षा घेऊ शकतात. मनात कांही इच्छा ठेऊन या ग्रंथाचे पारायण केले तरी चालते. आपले स्वत:चे जीवन शुध्द करण्यासाठी अत्यंत श्रध्दा भक्तीभावाने या ग्रंथाचे पठन करावे.
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"