Saturday, April 13, 2019

श्रीपाद वल्लभ चरित्र अमृत :- अध्याय -17

॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ 
अध्याय -१७
श्रीनामानंदाचे दर्शन
मी कुरुगड्डीला जात असताना मार्गात एक स्त्री केस मोकळे सोडून विचित्र हास्य करीत माझ्या जवळ आली. तिची मन:स्थिती बरोबर नसल्याने ती काही तरी अस्पष्टसे ओरडत होती. ती माझ्याजवळ येताच मला तिची अत्यंत भीती वाटून माझे हात पाय थरथर कांपू लागले. तिच्या मागोमाग हातात काठी घेऊन दोन व्रूच्र बलिष्ठ पुरुष येत होते. त्या स्त्रीने माझ्या पायावर डोके ठेऊन तिचे त्या दोन राकट पुरुषांपासून रक्षण करण्याची विनंती केली ते दृष्य पाहून माझा चेहरा पांढरा पडला. माझ्या सारखा घरादारा पासून दूर आणि पर प्रांतात असलेला ब्राह्मण, त्या स्त्रीचे रक्षण कसे करू शकणार होता ? त्या वेळी माझ्या तोंडून अचानकपणे उद्गार निघाले ''हे माते ! तुला घाबरण्याचे मुळीच कारण नाही. या दुष्ट, दुराचारी लोकांपासून श्रीपाद श्रीवल्लभ तुझे नक्कीच रक्षण करतील. तू निर्भयतेने उठून उभी रहा. त्या स्त्रीच्या मागे आलेले पुरुष माझ्याकडे आश्चर्याने पहात होते. त्या दोन बलशाली पुरुषांच्या तुलनेत माझी शरीरयष्टी अगदीच किरकोळ होती तरी माझे धैर्य आणि दृढतेने उच्चारलेले आश्वासन ऐकून ते आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले,''हे ब्राह्मणा ! आम्ही या दुराचारी स्त्रीला मारण्यासाठी आलो आहोत. तू जर मध्ये पडलास तर तुला सुध्दा मारून टाकू. तू चांगल्या बोलाने आमच्या मार्गातून दूर हो.'' त्या दुष्टांचे हे वक्तव्य ऐकून माझ्यात एका अद्भूत शक्तीचा संचार झाला आणि मी म्हणालो,''अरे, ब्राह्मण कुलात जन्म घेऊन निर्लज्जपणे गायीचा वध करून, गोमांस भक्षण करून, मदिरापान करणाऱ्या तुमच्या सारख्या दुर्जनांना माझ्या ब्राह्मणाचा आणि या निरपराध स्त्रीचा वध करणे काहीच कठीण नाही.'' मी पुढे येणाऱ्या सर्व परिस्थितीस सामोरे जाण्यास तयार होतो. मी पुढे त्यांना म्हणालो ''तुम्ही या स्त्रीचा वध केल्यास तत्काळ कुष्ट रोगाने त्रस्त व्हाल. सर्व रोगांमध्ये हा अत्यंत भयंकर असा रोग आहे. त्याला तुम्ही स्वत: आपल्या कर्मांनी आमंत्रण देत आहात याची मला कीव येते. मी हे सारे तुमच्या हितासाठी सांगत आहे.'' माझे हे वक्तव्य ऐकून ते आपले सारे धाडस हरवून अगदी निस्तेज झाले. मी सांगितलेली त्यांच्या बद्दलची विधाने खरी असल्याने, माझी भविष्यवाणी नक्कीच खरी होईल असा त्यांना दृढ विश्वास वाटला. त्यांनी आपल्या चुका मान्य केल्या. ज्योतिष्य शास्त्राचे काहींच ज्ञान नसलेला मी त्यांच्या दृष्टीने एक विद्वान भविष्यवेत्ता ठरलो . जवळच असलेल्या एका वृक्षाच्या छायेत आम्ही बसलो मी त्यांना त्यांचा जीवनवृतांत सांगण्याची विनंती केली. ते म्हणाले ''महाराज आपण त्रिकालदर्शी आहात. आपणास अज्ञात असे या पृथ्वीवर काय आहे ? आपण विचारले म्हणून सांगतो. आम्ही दोघे सख्खे बंधु. आमचा जन्म ब्राह्मण कुलात झाला परंतु ब्राह्मणत्व आम्ही पूर्णपणे विसरून गेलो आणि भ्रष्ट झालो. गाईचे मांस खाण्यात आम्हास आनंद वाटे. त्यातच मदिरापानाचे भयंकर व्यसन आम्हास जडले. या सर्व दुर्गुणांचा व्यभिचारी वर्तनाने कहरच झाला. या सर्व दुराचारामुळे आम्ही दुरात्मा झालो. समोरील टेकडीवर पद्मासन घालून बसलेल्या या स्त्रीस पाहून आमच्या मनांत वाईट विचार आले परंतु तिने स्पष्ट नकार दिल्याने आमचा अभिमान दुखावला व आम्ही रागाने तिच्या मागे निघालो. परंतु आमच्या सुदैवाने आपणा सारख्या महान पुरुषाच्या दर्शनाचा लाभ झाला.'' तेंव्हा मी म्हणालो ''बाबांनो काय चांगले, काय वाईट आहे याचा निर्णय करणारी सद्सत विवेक बुध्दि देवाने मानवाला दिली आहे. चांगल्या मार्गाने आपण गेल्यास चांगली फळे मिळतील, वाईट मार्गाने गेल्यास वाईट अनुभव येणार, यात शंकाच नाही. ही स्त्री सदाचारी असल्याने तिने तुमचे म्हणणे मान्य केले नाही. तुमची दृष्टी दोषपूर्ण असल्याने तुम्हाला ती स्त्री दुराचारिणी वाटली. तुम्ही तिच्याकडे वाईट भावनेने गेला होता परंतु आता तुम्हास आपल्या वाईट कर्माचा पश्चाताप होतो आहे. तुमची पापे परमेश्वर क्षमा करेल किंवा नाही ते मी सांगू शकत नाही. एक शुभ वार्ता मात्र सांगतो, त्रैलोक्याचे आराध्य दैवत असलेले त्रिमूर्ति स्वरूप असणारे श्री दत्तप्रभू सध्या मानव रूपात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने कुरुगड्डी या गावी वास्तव्यास आहेत. त्यांचे दिव्य चरण तुमचा उध्दार करतील. त्यांच्या अनेक दिव्य लीला मी ऐकल्या आहेत.''
ती स्त्री म्हणाली, ''आपण माझे या दुष्ट पापी लोकांपासून रक्षण केलेत. आपण मला पित्यासमान आहात. मी एक उच्च ब्राह्मण कुलात जन्मले. अगदी लहान वयातच माझा विवाह झाला. माझे दुर्भाग्य असे की माझा पती माझा अतिशय छळ करीत असे. मी मात्र त्याची मनोभावे सेवा करीत असे. तो माझ्यावर नको ते दोषारोपण करीत असे ज्या मुळे मला अत्यंत मानसिक पीडा होई. त्याचे आईवडिल, मोठी माणसे त्यास समजावण्याचा खूप प्रयत्न करीत. परंतु तो कोणाचेच ऐकत नसे.'' हे सांगनाना तिच्या डोळयातून घळ-घळ अश्रू वाहू लागले. थोडया वेळाने तिने स्वत:स सावरून घेतले व पुढे सांगू लागली, ''आमच्या गावात एक मांत्रिक आला होता. त्याला ज्योतिषशास्त्राचे चांगले ज्ञान होते. त्याला माझ्या सासू सासऱ्यांनी बोलावून घेतले. त्याने माझी कुंडली मांडून, चित्रविचित्र पूजाअर्चा करून म्हणाला, ''ही नीच जातीची स्त्री आहे. तिच्या हातून अनेक अमंगल कार्ये घडली आहेत. त्यामुळेच तिच्या पतीस नपुंसकत्व प्राप्त झाले. तिला घरातून बाहेर काढल्यावर तुमचे सारे गृहदोष नाहीसे होतील व माझ्या पूजाअर्चा फलित होतील. तिचा पती सुध्दा चांगला सशक्त होईल. नंतर तुम्ही त्याचा विवाह दुसऱ्या कन्येबरोबर लावून द्या. त्यांना यथाकाली संतती प्राप्त होईल.''
त्या ज्योतिष्याच्या सांगण्यावर दृढ विश्वास ठेऊन माझ्या सासू सासऱ्यांनी मला घरातून घालवून दिले. त्यांनी केलेल्या छळामुळे मी अत्यंत त्रासून गेले होते. मला काहीच मार्ग नसल्याने मी माहेरी जाण्यास निघाले. परंतु तेवढयात तो मांत्रिक आला आणि त्याने मला आडवले व वाईट नजरेने माझ्याकडे पाहू लागला. मला त्याच्या डोळयात दुष्ट वासनेचे ज्वलंत अंगारे दिसले. मी अत्यंत क्रोधायमान झाले. माझ्या शरीरात भद्रकालीची शक्ति प्रगट झाली होती. मी जवळच पडलेला एक मोठ दगड उचलला आणि त्या मांत्रिकाच्या शिरावर मारला. त्या भयंकर माराने मांत्रिकाचे डोके फुटून तो तत्काळ मृत्यूमुखी पडला. माझ्या शीलरक्षणासाठी मला दुसरा मार्ग नसल्याने मी तो दगड मारला होता. परंतु दुर्दैवाने माझ्या हातून एका ब्राह्मणाची हत्या झाली होती. माझे मन अत्यंत अशांत झाले होते. काय करावे, कोठे जावे ते कळत नव्हते. मी माहेरी जाण्याचा विचार केला परंतु तेथे जाण्याने. माझ्या समस्यांचे समाधान होणार नव्हते. माझ्या आईवडिलांनी प्रेमाने माझा संभाळ केला असता. परंतु माझे बंधु, वहिनी, भावजयी माझ्याशी चांगले वागतील याची खात्री नव्हती. मांत्रिकाने मला दिलेला त्रास कोणाला सांगणार होते ? मांत्रिकाची केलेली हत्या गावातील सर्व लोकांनी पाहिली होती. अशा बातम्या आगीप्रमाणे चोहीकडे पटकन पसरतात. या आवारातच एक औदुंबराचे झाड होते. हे झाड दत्त प्रभूंना अत्यंत प्रिय असल्याचे मी ऐकले होते. त्या झाडाखाली बसले असताना मला गाढ निद्रा लागली. थोडया वेळाने जागी होऊन पाहिले तर माझ्या दोन बाजूस दोन नाग माझे रक्षण करीत होते. मी त्या दोन्ही नागांना नमस्कार केला तेंव्हा ते नाग दुसरीकडे निघून गेले. मी दत्त दिगंबर, दत्त दिगंबर, जय गुरुदेव दत्त असा जप करीत होते. दत्त प्रभूंचे नुसते स्मरण केले तरी ते भक्तांच्या मदतीसाठी धावून येतात असे मी ऐकले होते. माझ्या भाग्याने औदुंबराच्या कृपाछायेत असताना मला श्रीपाद प्रभूंचे कृपाछत्र माझ्या शिरावर असल्याची अनुभूती आली. मी नामस्मरण करीत असताना एक वाटसरु त्या वृक्षाच्या छायेत विश्रांतीसाठी थांबला मी भयभीत होऊन त्याला विचारले, ''तू कोण आहेस ? तू येथून निघून जा. तू गेला नाहीस तर एक दगड घेऊन तुला मारून टाकीन. थोडया वेळापूर्वीच मी एका मांत्रिकाला मारले होते.'' तो वाटसरू म्हणाला ''माई, मी रजक (धोबी) कुलात जन्मलेला रविदास, श्री दत्त प्रभुंचा भक्त आहे. मी कुरवपुरात रहात असे. श्री गुरुदत्त श्रीपाद श्रीवल्लभ रूपात भूतलावर अवतरले असून सध्या ते कुरवपूर क्षेत्रात वास्तव्य करीत आहेत. दूर दूर पसरलेल्या दत्त भक्तांना ही वार्ता कळावी म्हणून ते नविन नविन लीला करीत असतात. मी सध्या कुरवपूरला जात आहे. तुझी इच्छा असल्यास माझ्या बरोबर ये. कुरवपूर येथून जवळच आहे. मी माझ्या भावाकडे जाऊन तेथून पुढे कुरवपूरला जाईन.'' तेव्हा मी म्हणाले, ''तुमच्या बोलण्यावर मी कसा विश्वास ठेवू ? तुम्ही सांगत असलेले श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत हा विषय जाणून घेण्याची सुध्दा मला गरज नाही. ते जर दत्तमूर्ती असते तर त्यांनी माझे रक्षण केले असते. ते स्वत: श्रीदत्त गुरु आहेत हे सिध्द करण्याची जवाबदारी त्यांचीच आहे. मी श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण करीत नाही परंतु श्री दत्तात्रेयांचेच नामस्मरण करते. यावर जे घडेल ते मी पाहीन. तुम्ही तत्काळ येथून निघून जा नसता कांही तरी प्रमाद घडेल.'' माझे वक्तव्य ऐकल्यावर तो गृहस्थ रोहिदास दत्तदिगंबर, श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करीत निघून गेला. त्यानंतर एका टेकडीवर मी पद्मासन घालून ध्यान करीत बसले. त्याच वेळी हे दोन दुष्ट तेथे आले. त्यांची माझ्यावर विषारी नजर पडली आणि ते माझ्या मागे लागले. आपण माझी या दोन कामी दुष्टांपासून रक्षा केली.'' तेव्हा मी म्हणालो, ''हे माते श्रीपाद प्रभूंच्या कृपेने तुझे रक्षण झाले. ते अंतर्यामी असून कालातीत आहेत. या सृष्टीमध्ये विविध कालावधित घटना घडत असतात. या सर्व घटनांच्या मागे ते स्वत: कारणरूपाने स्थित असतात. या सृष्टीत कारण नसलेले कोणतेच कर्म दिसत नाही. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींना निर्गुण, सगुण, निराकार, साकार यासारख्या कोणत्याच अवस्थेत कोणीच जाणू शकत नाही. प्रत्यक्ष वेदांनीसुध्दा त्यांच्या समोर हात टेकले व नेति-नेति, आम्ही जाणत नाही असे म्हटले आहे. वेदांची ही अवस्था झाली तर सामान्य भक्त त्यांच्या बद्दल काय जाणू शकेल ? त्यांच्या स्वरूपाचे ज्ञान त्यांना स्वत:लाच असणार यात तिळमात्र संशय नाही. आपण मात्र त्यांचे नामस्मरण करीत गेल्यास त्यांचा अनुग्रह नक्कीच होतो आणि सर्व दु:खातून आपली मुक्तता होते.'' मी, दोन्ही ब्राह्मण आणि एक ब्राह्मणी-सुशीला आम्ही चौघे मिळून कुरुगड्डीस जाण्यास निघालो. मार्गात आम्ही श्री दत्तप्रभू आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे भजन करीत, नामस्मरण करीत जात होतो. रस्त्यावरील लोकांना आम्ही भजन मंडळातील लोक असल्यासारखे वाटत होते. मार्गात असलेल्या नामानंद स्वामी या थोर महात्म्यांच्या आश्रमात पोहोचलो.
श्रीपाद प्रभूंचे रूप परिवर्तन आणि शिष्य नामानंदास अनुग्रह
श्री नामानंद स्वामी हे त्रिकालज्ञानी महात्मा पुरुष होते. त्यांनी आमचे मोठ्या आदरपूर्वक स्वागत केले. त्यांनी आपला परिचय देण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, ''माझ्या वडिलांचे नांव मायन्नाचार्युलु आणि माझे नांव सायन्नाचार्युलु. आमचे गोत्र भारद्वाज आणि आम्ही वैष्णव संप्रदायाचे आहोत. मी संन्यास दीक्षा घेतल्यावर माझे नांव नामानंद असे ठेवले गेले. संन्यासोत्तर मी पूर्ण वैराग्य धारण करून पुण्यक्षेत्र आणि सिध्दतीर्थाच्या यात्रा केल्या, नंतर सद्गुरुंच्या शोधात निघालो. फिरत फिरत मी पीठीकापुरम् येथे येऊन पोहोचलो. आम्ही वैष्णव असल्याने श्री विष्णूचीच आराधना करतो. आमचे सोंवळे कडक असते आणि आचार विचार उच्च असतात. पीठीकापूरम् येथील कुंती-माधवाचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर समोर एक चांडाळ उभा असलेला दिसला. चांडाळाचे दर्शन आम्ही वाईट समजतो. तो चांडाळ समोर येऊन उच्च स्वरात म्हणाला ''आमची दक्षिणा देऊन पुढे जा.'' मी आश्चर्याने त्याच्याकडे पहातच राहिलो. गावातील सर्व लोक हा प्रकार पहात होते. कलियुगामुळे असा विपरीत प्रकार घडत असल्याचे सर्वांना वाटत होते. तो चांडाळ मदिरापान करून श्री वैष्णवांवर अत्याचार करीत होता. एवढयात नामानंद त्यास म्हणाले,''अरे चांडाळा, तू कोण आहेस ? मी एक वैष्णव ब्राह्मण आहे. माझे नांव नामानंद आहे. तू मला दक्षिणा मागणे योग्य वाटत नाही.'' त्या चांडाळाचे डोळे लाल झाले होते. त्याचा भयंकर चेहरा कोणासही भय वाटावे असा होता. नामानंदाच्या शांत भाषणामुळे तो अधिकच क्रोधित झाला होता. तो चांडाळ नामानंदांना म्हणाला ''तू सद्गुरुच्या शोधात वेडयासारखा फिरत आहेस. तू मला ओळखत नाहीस. मीच तुझा सद्गुरु आहे. मीच तुला संन्यासोत्तर ''नामानंद'' असे नांव दिले. तू तुझ्याजवळ असलेली सारी संपत्ती मला गुरुदक्षिणा म्हणून अर्पण कर आणि सर्वासमक्ष मला साष्टांग नमस्कार करून गुरु म्हणून माझा स्वीकार कर. तू जर असे केले नाहीस तर मी तुझा सर्वनाश करीन. तुझ्या शरीराचे तुकडे करून तुला मरणप्राय यातना देईन.'' श्री नामानंदाबरोबर त्या चांडाळ वर्णातील व्यक्तीने अतिशय कडक व्यवहार केला होता. तो पुढे म्हणाला, ''मी सांगेन तसे तुला वागले पाहिजे. तू देवांची कितीही आराधना केलीस तरी कोणी तुला मदत करणार नाही.'' एवढे बोलून तो चांडाळ नामानंदांवर चाल करून आला.
नामानंदांच्या मनांत नसताना, केवळ दुसरा उपाय नसल्याने त्यांनी त्या चांडाळाचे पाय धरले. त्यांचे सर्वस्व त्या चांडाळाला गुरुदक्षिणा म्हणून अर्पण केले. देवाची आपण जी कल्पना करतो त्यापेक्षा तो कसा विपरीत असतो याची कल्पना नामानंदाना आली. परंतु तितक्यातच तो चांडाळ स्वामींना दिव्य मंगल अशा स्वरूपात दर्शन देत असल्याचा भास झाला. त्याच्या त्या दिव्य नेत्रातून अनंत दया करूणा यांचा वर्षाव झाल्यासारखा वाटत होता. दिव्य मंगलमूर्ती असलेल्या त्या भगवानांनी म्हटले ''मी श्री दत्त आहे. सध्या श्रीपाद श्रीवल्लभांचे स्वरूपात मी पिठीकापूरम येथे अवतरीत झालो आहे. तू माझा भक्त आहेस आणि मी तुझा सद्गुरु आहे. तू माझे सर्वस्व झाला आहेस. मीच सत्, चित्, आनंद आहे. तू उद्यापासून नामानंद नाम धारण करून धर्मप्रचार कर. तुला सुख आणि शांती प्राप्त होईल. शेवटी माझ्या पदास येशील'' असे सांगून चांडाळाच्या वेशात असलेले दत्त प्रभू अंतर्धान पावले.
श्री नामानंद स्वामींना श्रीपाद श्रीवल्लभांकडून भोजनाचे आमंत्रण
अशा प्रकारे नामानंद संन्यासी पिठीकापुरम येथील श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घेण्यासाठी पुढे निघाले. त्यांना मार्गात कोणी भिक्षा दिली नाही. भूकेने त्यांचा जीव व्याकूळ होत होता. सर्वजण त्यांच्या बद्दल शंका घेत होते. त्यांना वाटले हा एक वेडा आहे. एक चांडाळ येऊन याच्या कडून गुरुदक्षिणा घेऊन गेला. हा ब्राह्मण असून याने चांडाळाला आपला गुरु केला म्हणून हा अस्पृश्य झाला आहे. म्हणून याला भिक्षा देणे म्हणजे शास्त्र विरुध्द होईल. या विचाराने पीठीकपुरम गावातील लोकांनी नामानंद स्वामींना भिक्षा घातली नाही. फिरत फिरत ते अप्पळराज शर्माच्या घरी पोहोचले. अत्यंत भुकेमुळे तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते. कसे बसे ते ''ॐ भिक्षांदेही'' म्हणाले. तेवढयात दार उघडून घरातून श्रीपाद श्रीवल्लभ अन्नाचे भरलेले ताट घेऊन आले. त्यांना ओसरीवर बसवून त्यांनी स्वहस्ते नामानंद स्वामींना खाऊ घातले. केवढे ते भाग्य ! विश्व-नियंता आपल्या भक्ताला स्वहस्ते जेवण भरवित होता. धन्य ते गुरु आणि धन्य ते शिष्य. जेवण झाल्यावर त्या अनंत शक्ती स्वरूप अशा विधात्याने आपला हात नामानंदांच्या शिरावर ठेवला आणि आशिर्वाद दिला ''तुला सर्व सिध्दि प्राप्त होतील. कशासाठीही तुला हात पसरावा लागणार नाही. तू कोठेही असलास तरी मी तुझ्याबरोबर अदृष्य रूपाने असेन. मी डोळयांच्या पापणी प्रमाणे तुझे रक्षण करीन.'' असे आशिर्वाद आणि अभय वचन दिले. त्या दिवसापासून धर्म प्रसारासाठी संन्यासी होऊन नामानंद भ्रमण करीत होते अदृष्यपणे श्रीपाद प्रभूंचा दिव्य हस्त स्वामींचे रक्षण करीत असे. अशा प्रकारे स्वामींनी आम्हास त्यांच्या आश्रमात स्वत:बद्दलची संपूर्ण माहिती सांगितली.
चार प्रकारचे जीवनमुक्त प्राणी
नामानंद स्वामींच्या आश्रमात सर्व शिष्य बसलेले असताना एका शिष्याने गुरुंना प्रश्न विचारला, ''स्वामी, श्री दत्तांची आराधना केल्याने शीघ्र मोक्षप्राप्ति होते या साठी कांही साधना, मंत्र, विधाने आहेत का ? माझ्या शंकेचे समाधान करून मला कृतार्थ करावे.'' त्यावर प्रसन्न चित्ताने श्री स्वामी म्हणाले ''हे पुत्र, वासना त्याग म्हणजेच मोक्ष आहे. शरीर पतनानंतरच मोक्ष मिळतो असा नियम नाही. शरीर प्रारब्धानुसार शरीराला विविध अनुभव येत असतात. ज्या सत्पुरुषांचा जीवात्मा मुक्त अवस्थेत असतो त्यांना ''जीवन्मुक्त '' असे म्हणतात. आपल्या इष्ट देवतेच्या सतत सान्निध्यात राहणे यालाच ''सालोक्य मुक्ति '' असे म्हणतात. या अवस्थेत साधक इष्ट देवतांच्या लोकांत राहतो. या पेक्षा अधिक पुण्यवान भक्तांना इष्ट देवतांच्या समीप राहण्याचे भाग्य लाभते त्याला ''सामिप्य मुक्ति '' असे म्हणतात. त्या पेक्षा विशेष पुण्य करणाऱ्या भक्तांना इष्ट देवतांचेच स्वरूप प्राप्त होते त्याला ''सारुप्य मुक्ति '' असे नामाभिधान आहे. या पेक्षा सुध्दा उच्च स्थिति प्राप्त झाली म्हणजे भक्त , इष्ट देवतांच्या चैतन्यातच एकरूप होऊन जातो. या अवस्थेस ''सायुज्य मुक्ति '' असे म्हणतात. या अध्यात्मिक चिंतनात दत्तभक्त इहलोकी राहूनच ''सालोक्य मुक्तिचा '' अनुभव घेत असतात. ते शरीराने प्रारब्धाचे भोग घेत भोगत असले तरी मनाने ते श्री दत्तप्रभूंच्या चरणांशी सतत निमग्न असतात. त्यांना सदैव श्री दत्त प्रभूंचेच ध्यान असते. सृष्टी धर्म आणि सूक्ष्मसृष्टीतही कालचक्र हे चालूच असते. सृष्टीचा चिद्विलास अंत:दृष्टीने पाहून दत्तभक्त आनंदाने विभोर होतो. स्वार्थरहित योग्याच्या दिव्य शक्तीने विश्व कल्याण होत असते. त्यात त्यांचा निस्वार्थीपणा दिसून येतो. या प्रमाणे हा योगी इहलोकी आपले कल्याण करून ''सामिप्य मुक्ति '' प्राप्त करून घेतो. असा भक्त श्री दत्त प्रभूंच्या दिव्य लीला अंत:दृष्टीने पाहून त्यांचे मनन चिंतन करून सालोक्य मुक्तिपेक्षा श्रेष्ठत्व प्राप्त करून सर्वोच्च आनंद प्राप्त करून घेतो. जीव शरीर बंधनात असताना त्याला अनेक वासना, इच्छा आपल्या बंधनात ठेवतात. परंतु जेंव्हा त्याला मुक्त अवस्थेचे ज्ञान होते तेंव्हा त्याला खूपच हलके हलके वाटते. या प्रमाणे इच्छा, वासनारहित लघु जीव आनंदात रममाण असतात. सायुज्य मुक्तिचा लाभ झालेल्या दत्तभक्तांमध्ये श्रीदत्तलीला यथेच्छ मात्रेने प्रगट होतात. या भक्तांना आणखी कांही प्राप्त करून घ्यावे अशी इच्छाच नसते. श्रीदत्तप्रभूंचे दर्शन, स्पर्श, संभाषण आणि अनुग्रह प्राप्त झालेल्या भक्तांना त्यांचे सतत रक्षण मिळत असते. इहलोकात किंवा परलोकात प्राप्त होणारे महदैश्वर्य दोन्ही श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीच देतात. मानव विविध देवतांना वेगवेगळया स्वरूपात भजतात. ते सर्व देव श्रीपाद प्रभूंचेच दिव्य अंश असतात. त्या त्या देवतांकडून श्रीपाद श्रीवल्लभ त्या भक्तांना अनुग्रह देतात.''
श्री दत्त आराधनेची विशेषता
यावर मी म्हणलो ''आपण विविध रूपात असलेल्या देवांची पूजा अर्चा करावी का श्रीपाद वल्लभांची आराधना करावी ? देव श्रीपाद श्रीवल्लभांपेक्षा वेगळे आहेत ? या बद्दल आपण कृपा करून विश्लेषण करून सांगावे '' यावर नामानंद म्हणाले, ''एका मुलीचा विवाह होऊन ती आपल्या सासरी गेली. काही महिन्यानंतर त्या मुलीचे मोठे भाऊ तिला भेटायला गेले. मुलीची सासू म्हणाली ''तुमची बहिण आमच्या घरी विविध प्रकारच्या चोऱ्या करते. दूध, दही, लोणी, तूप ती चोरून खाते. एखादी चोरी मी सहन केली असती परंतु इतक्या चोऱ्या ?'' तेंव्हा त्या बहिणीचा भाऊ तिला म्हणाला ताई तू चोरी करणे सोडून दे. तू केवळ दूध घेत जा म्हणजे तुझी सासु रागावणार नाही दूधात सर्व काही असते. या प्रमाणे एकटया श्री दत्ताची आराधना केल्यास सर्व कांही मिळते. लोक आपल्या आवडीप्रमाणे वेगवेगळया देवांची आराधना करतात. शिवाची पूजा केल्याने विष्णू प्रसन्न होत नाहीत तसेच विष्णूंच्या पुजेने शिव प्रसन्न होत नाही. सगुण आणि साकार देवांची पूजा केल्याने भक्ताच्या कर्माप्रमाणे फळ मिळते. अनेक जन्मातील केलेल्या पाप-पुण्याचे फळ क्षीण स्थितीत असेल तर पुण्य महाविशेष मध्ये जमा होते. यावेळी श्रीदत्तप्रभूंची भक्ति प्राप्त होते. अशा भक्ताला सर्वसिध्दि प्राप्त होतात. ब्रह्मदेवाने लिहिलेल्या प्रारब्धास कोणी बदलू शकत नाहीत. परंतु श्रीदत्त प्रभूंच्या भक्तांच्या बाबतीत मात्र श्री दत्त ब्रह्मदेवाला आदेश देऊ शकतात. जीवाच्या शारिरीक, मानसिक, अध्यात्मिक स्थितीला श्री विष्णू कारणीभूत असतात. अपरिपक्व अवस्थेत असताना महायोग शक्तीने जीवात प्रवेश केल्यास शरीर, मन, बुध्दि त्या शक्तिस सांभाळू शकत नाहीत आणि अग्निज्वालेचा दाह झाल्यासारखे वाटते. जीवाचे जीवनमान सुरळित चालण्यासाठी भगवान विष्णु आपणास सहाय्य करतात, ते प्रत्येकाच्या कर्मानुसार. श्रीकृष्ण श्री दत्तप्रभूंचे अभिन्न अंग आहेत. श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत अंगुलीवर धारण केला होता. हे सर्वाना ज्ञात आहेच, गोकुळातील साऱ्या गोपी आणि गोप पूर्व जन्मातील महान महान ऋषि होते. त्यांनी रचलेले महान ग्रंथ पर्वत रूपाने अवतरित झाले होते. या महान ग्रंथांचे विभेदन होऊन त्यातून प्रचंड महायोग शक्ति निघते तेंव्हा जीवास खूपच हलके हलके वाटते. या सूक्ष्मस्थितित जीवाला महायोगानंद मिळतो. हा मिळविण्यासाठी कठीण तपश्चर्या लागते. श्रीकृष्ण भगवान आपल्या भक्तांचा , आश्रितांचा संपूर्ण भार स्वत: पेलून घेतात. त्यांचे ग्रंथि विभेदन करून त्यांना शक्ति प्रदान करतात. हे आध्यात्मिक रहस्य आहे. बौध्दिक दृष्टीने पाहिल्यास श्रीकृष्ण गोवर्धन पर्वत उचलून सर्वांचे रक्षण करीत आहेत असे वाटते. श्री दत्त प्रभूंचा तो संकल्पच होता. परिस्थितीला बदलायचे, परिणाम क्रमाला शीघ्रपणे करण्याचे आदेश ते श्री विष्णूंना देत असत. या प्रक्रियेत भक्तांच्या प्रारब्धामुळे मार्गात येणाऱ्या अडचणी, त्यांचे अनुभव त्यांच्या नकळत त्यांना सुसहय होत असत. श्रीपाद श्रीवल्लभ आपल्या भारी भक्कम विद्यांवर भक्तांचा भार वाहतात. श्रीपाद प्रभू किती दयाळू आणि कारूण्य मूर्ति आहेत ! श्रीपाद प्रभूंच्या अवताराचे मुख्य लक्ष्य त्यांच्या बरोबर सायुज्य स्थिती अनुभवणाऱ्या योग्यांनी एक लाख पंचविस हजार अनुयायी करण्याचा संकल्प केला होता. त्याची पूर्तता करणे हे होते. ते कर्मबंधनाच्या स्पंदनातून सर्वांना मुक्त स्थितीत आणून, रुद्राच्या अंश रूपाने प्रकट होऊन कोटयान् कोटी जन्मानंतर येणाऱ्या त्या जन्मांचा विनाश करून त्या जीवात्म्याला मुक्ति देतात. त्यांच्या मधील ब्रह्मा, विष्णू आणि रुद्राचा अंश स्फुट होऊन त्या त्या ईश्वरी गुणांनी भक्तांचे रक्षण होते. हे त्या त्या आत्म्याच्या संकल्पाने होत असते. भक्तांनी संकल्प सिध्दिसाठी भक्तिमार्गाचा अवलंब करणे आवश्यक आहे. एकदा पिठापुरम् मध्ये श्रीपाद प्रभूंच्या एका भक्तास , घोडयावर बसत असता घोडयाने पाडून टाकले व पायाने तुडविले. त्याला भयंकर जखमा होऊन तो रक्तबंबाळ झाला. त्या जखमी भक्ताला श्रीपादानी आपला अभय हस्त दर्शविला आणि त्याच क्षणी सर्व जखमा पूर्णपणे बऱ्या झाल्या. जणु कांही झाल्याच नव्हत्या. त्याच दिवशी श्रीपाद श्रीवल्लभांवर दृढ श्रध्दा आणि भक्तीभाव असणाऱ्या एका भक्ताला कल्पना नसतांना शंभर मोहरांनी भरलेला एक हंडा सापडला. श्री वेंकट अप्पयांनी प्रभूंना या घटनेविषयी विवरण करून सांगण्याची विनंती केली. त्यावर श्रीपाद स्वामी म्हणाले,''मी माझ्या एका अनन्य भक्ताचे आयुष्य वीस वर्षानी वाढविले. त्याच्या भक्तीवर संतुष्ट होऊन मी त्याला हे फळ दिले होते. आज त्याला शंभर मोहरांनी भरलेला हंडा मिळाला हा त्याचा महत् भाग्याचा दिवस आहे. ज्याची माझ्यावर मनापासून अनन्य भक्ति असते त्याचा मी दास होतो. जे भक्त मला हृदयात प्रस्थापित करतात ते मला अत्यंत प्रिय असतात. त्रिलोकपती परमेश्वर सुध्दा अशा भक्ताच्या आधिन होऊन त्यांच्या बरोबरच संचार करतात.''
श्री नामानंद स्वामींच्या दिव्य सत्संगाचा लाभ झाल्याने सर्वाना अत्यंत आनंद झाला. ते दोन ब्राह्मण नामानंदाना म्हणाले,''आम्ही केलेल्या पापांचा आम्हास पश्चाताप होत आहे. आपण आम्हास उपदेश द्यावा'' यावर श्रीनामानंद स्वामी म्हणाले ''तुम्ही एक-भुक्त व्रत करा". कष्ट करून धन संपादन करा आणि त्या धनाचा उपयोग सद्ब्राह्मणांना अन्नदान करण्यासाठी करा. त्यामुळे तुमच्या पापांचे क्षालन होईल. असे वर्तन केल्यास श्रीपादप्रभूंचे प्रत्यक्ष अथवा स्वप्नामध्ये दर्शन होईल. मंत्रदिक्षा मिळाल्यावर सुध्दा तुम्ही सदाचाराने वागले पाहिजे. जर तुम्ही पूर्वीच्या सवयीनुसार पुन्हा दुराचारास प्रवृत्त झाल्यास श्रीपाद स्वामी तुम्हास दुप्पट शिक्षा देतील याचे ध्यान असू द्यावे.''
दत्तात्रेयांच्या आराधनेचे फल
सुशिला नांवाच्या ब्राह्मण स्त्रीने श्री नामानंदाना विचारले ''स्वामी ! संकटातून कशी सुटका करून घ्यावी ?'' त्यावर त्या प्रसन्न चित्त नामानंद स्वामींनी सांगितले, ''आत्मा हा निरंतर असतो. त्याला जन्म मरण नसते. त्याला अग्नि जाळू शकत नाही, शस्त्र इजा करू शकत नाही. पाणी त्याला भिजवू शकत नाही. वारा त्याला सुकवू शकत नाही. मनुष्य मात्र कोटयावधी वेळा मृत्यु पाऊन पुन्हा जन्म घेतो. तू अनघा देवीचे व्रत केल्यास तू संसारात सुखी होशील. तसेच तू देवी समवेत श्री दत्तात्रेयांची आराधन करून त्यांना संतुष्ट करून घे. असे केल्याने श्री दत्तात्रेय नक्कीच तुझ्यावर अनुग्रह करतील. श्री बापनाचार्युलुंना श्री दत्तात्रेयांचे दर्शन घडले व त्यांनी ''सिध्दमंगल'' स्तोत्र लिहिले. प्रत्यक्ष दत्ताच्या दर्शनाच्या अनुभूतीने गायिली जाणारी या स्तोत्रातील अक्षरे अत्यंत प्रभावशाली आहेत. त्या अक्षरांमधील चैतन्य हे युगानुयुगे विलसत राहील. या स्तोत्रात व्याकरण दृष्टया कोणताही दोष अथवा त्रुटी नाही. या स्तोत्राचे पठन करण्यासाठी कोणताही विधिनिषेध नाही. मला ते स्तोत्र श्री बापनाचार्युलूच्या मुखातून ऐकण्याचे भाग्य लाभले. हे स्तोत्र माझ्या हृदयावर अंकित झाले आहे.
सिध्दमंगलस्तोत्र
1) श्री मदनंत श्रीविभुषीत अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
2) श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
3) माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
4) सत्यऋषीश्वरदुहितानंदन बापनाचार्यनुत श्रीचरणा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
5) सावित्र काठकचयन पुण्यफला भारद्वाज ऋषि गोत्र संभवा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
6) दौ चौपाती देव लक्ष्मीगण संख्या बोधित श्रीचरणा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
7) पुण्यरूपिणी राजमांबासुत गर्भपुण्यफलसंजाता ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
8 ) सुमतीनंदन नरहरीनंदन दत्तदेव प्रभू श्रीपादा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
9) पीठीकापुर नित्यविहारा मधुमतीदत्ता मंगलरूपा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
परम पवित्र अशा सिध्दमंगल स्तोत्राचे पठन अनघाष्टमीचे व्रत करून केल्यास सहस्त्र सद्ब्राह्मण जेवू घातल्याचे पुण्य प्राप्त होते. तसेच स्वप्नात सिध्द पुरुषांचे दर्शन होते. याच्या पठनाने मनातील सर्व कामना पूर्ण होतात. जे भक्त मन, काया आणि कर्मानी श्री दत्तात्रेयांची आराधना करून या स्तोत्राचे पठन करतात ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेस पात्र होतात. तसेच याच्या नियमितपणे गायनाने सूक्ष्म वायुमंडलातील अदृश्य रूपाने संचार करणाऱ्यास सिध्दी प्राप्त होतात.''
श्रीपाद प्रभूंचा सुशिलेच्या पतीस अनुग्रह
श्री नामानंद स्वामींची अमृतवाणी ऐकल्यावर मला एक कल्पना सुचली. मी श्री नामानंदाना म्हणालो. ''हे स्वामी, या स्तोत्राच्या पारायणात श्रीपाद प्रभूंच्या दिव्य लीलांचे वर्णन यथा प्रसंग सांगावे अशी आपल्या चरणी नम्र प्रार्थना आहे.'' आम्हा तिघांवर दयेचा सतत वर्षाव करणाऱ्या स्वामींनी आम्हावर आनंद दृष्टी टाकली आणि आमच्या विनंतीस मूक सम्मती दिली. त्या रात्री आम्ही श्रीपाद प्रभुंचे नामस्मरण केले. स्वामींनी लीला कथन करीत सिध्दमंगल स्तोत्राचे गायन केले. त्या दिव्य अनुभूतीमध्ये रात्र केव्हा संपली ते कळालेच नाही. उष:काल होताच श्रीपादांची मंगल आरती केली. थोडयाच वेळात अन्नसामुग्रीने भरलेली एक बैलगाडी आश्रमात आली. गाडीवान खाली उतरला. त्याने सारी खाद्य सामुग्री बैलगाडीतून उतरवूनआश्रमात ठेवलीनंतर तो सुशिलेस उद्देशून म्हणाला, ''थोडयाच वेळात तुझा पती, सासु सासरे दुसऱ्या बैलगाडीतून येतील.'' त्या गाडीवानाच्या बोलण्यात एक वेगळेच माधुर्य होते. तो दिसण्यास इतर गाडीवानासारखा नव्हता. सारखे त्या गाडीवानाकडे पहात रहावे असे वाटत होते परंतु तो सामान उतरवून, निरोप सांगून त्वरेने निघून गेला. त्या वेळी नामानंद स्वामी ध्यान अवस्थेत होते. त्यातून बाहेर आल्यावर त्यांनी विचारले, ''तो गाडीवान कोठे आहे ?'' तो सामान ठेवून निघून गेल्याचे आम्ही सांगितले. ते ऐकताच स्वामी म्हणाले ''तुम्ही किती भाग्यवान आहात. मीच अभागी आहे.'' ते पुढे म्हणाले ''परमकारुण्यमूर्ति श्रीपाद श्रीवल्लभ आपणासाठी गाडीवानाच्या रूपाने अन्न सामुग्री घेऊन आले. त्यांनी तुम्हाला दर्शन दिले.'' नंतर सुशिले कडे वळून म्हणाले, ''हे सुशीले ! तुझे नशीब उदयास आले. तुझ्या पतीचे नपुंसकत्व गेले. तुझे सासुसासरे आणि पती दुसऱ्या बैलगाडीतून येत आहेत.''
त्रिकालज्ञानी नामानंदानी सांगितल्या प्रमाणे सारे घडून आले. सुशिला आपला पती व सासु सासऱ्या बरोबर आपल्या घरी गेली. मी आणि त्या दोघा ब्राह्मणांनी श्रीस्वामींना कुरुगड्डीस जाण्याची अनुज्ञा मागितली. श्री नामानंद स्वामींचा आशिर्वाद घेऊन आम्ही कुरुगड्डीच्या मार्गाने निघालो.
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"