Wednesday, February 13, 2019

गुरु चे महत्व

*गुरु चे महत्व*
--मी एकाला विचारले, "गुरुची कृपा किती होऊ शकते?" तो माणूस त्या वेळी एक सफरचंद खात होता. त्याने एक सफरचंद माझ्या हाती ठेवले आणि विचारले, "सांगा पाहू यांत किती बिया असतील?" 
-- सफरचंद कापून मी त्यांतील बिया मोजल्या आणि म्हणालो, "यात तीन बिया आहेत"
त्याने त्यातील एक बी आपल्या हाती घेतली आणि मला विचारले, "या एका बियेमध्ये किती सफरचंदे असतील असे तुला वाटते?" 
मी मनातल्या मनातच हिशोब करू लागलो,एका ह्या बियेपासून एक झाड, त्या झाडावर अनेक सफरचंदे लागणार, त्या प्रत्येक सफरचंदांत पुन्हा तीन बिया, त्या प्रत्येक बियेमधून पुन्हा एक झाड, त्या झाडांना पुन्हा तशीच तीन बिया असणारी फळे लागणार. अबब! ही प्रक्रिया चालूच राहणार! कसा सांगू मी त्या बियेमध्ये असलेल्या भावी फळांची संख्या?. मी चक्रावलोच. 
माझी अशी अवस्था पाहून तो माणूस मला म्हणाला, " अशीच गुरुची कृपा आपल्यावर बरसत असते. आपण फक्त भक्तीरूपी एकाच बीजाचा उदय आपल्या मनांत करवून घेण्याची गरज आहे."
*गुरु एक तेज आहे.* गुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो.
*गुरु म्हणजे एक असा मृदंग* आहे की ज्याच्या एका झंकाराने अनाहत नाद ऐकू यायला सुरुवात होते. 
*गुरु म्हणजे असे ज्ञान* की ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते. 
*गुरु ही एक अशी दीक्षा आहे* की ज्याला गुरुदीक्षा प्राप्त झाली तो हा भवसागर तरून गेलाच म्हणून समजा. 
*गुरु ही एक अशी नदी आहे* जी सतत आपल्या प्राणांतून वाहत असते. 
*गुरु म्हणजे असा सत् चित् आनंद आहे* जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो. 
*गुरु म्हणजे एक बासरी* आहे जिच्या नुसत्या मंजुळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्मानंदात मग्न होऊन जाते.
*गुरु म्हणजे केवळ अमृतच*. ह्या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे शमते. 
*गुरु म्हणजे एक अशी कृपाच* असते जी केवळ कांही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही.
*गुरु कुबेराचा अक्षय्य खजिनाच आहे* आणि त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही.
*गुरू म्हणजे एक प्रसाद आहे*. ज्याच्या भाग्यात असेल त्याला कांहीच मागण्याची इच्छाउरत नाही. *गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः* 
*गुरुःसाक्षात् परब्रम्ह तस्मैश्रीगुरवे नमः।।"*

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"