Saturday, February 16, 2019

कृष्णामाईचे हृदय स्थान म्हणजे नृसिंहवाडी 2

कृष्णामाईचे हृदय स्थान म्हणजे नृसिंहवाडी मानले जाते ,आता गंमत अशी कि कृष्णामाईच्या हृदयात नृसिंहवाडी आणि नृसिंहवाडीच्या समस्त भक्तांच्या हृदयात दत्त महाराज आहेत . आणि या दत्त महाराजांच्या सान्निध्यात विष्णुस्वरूपिणी कृष्णामाता हि अव्याहत आपल्या तीरावर असणाऱ्या तीर्थांद्वारे सर्व जनांचे पाप क्षालन करीत आहे . अशा या भगवती कृष्णामाईच्या उत्सवाला नृसिंहवाडी येथे आरंभ होत आहे . या उत्सवात देशोदेशीचे गायक ,वादक ,कीर्तनकार दत्त महाराजांच्या ,भगवती कृष्णामाईच्या समोर आपली सेवारूपी कला सादर करतात . दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात उत्साहाने ,तेजाने नृसिंवाडी अगदी फुलून गेलेली असते .

एका अखंड लाकडात कोरलेली ,हात-दीड हात उंचीची कृष्णामाईची मूर्ती शंख ,चक्र ,गदा ,पदम अशा आयुधांसहित इथे पूजनात असते . या मूर्तीच्या पूजनाचे ,प्राणप्रतिष्ठेचे ,मिरवत नेण्याचे भाग्य नृसिंहवाडीच्या समस्त पुजारी वर्गाला लाभले आहे . रथसप्तमीच्या दिवशी पहाटे इथल्या परंपरेप्रमाणे या कागलकरांच्या मूळ घरात कृष्णामाईची साग्रसंगीत पूजा केली जाते . नंतर तालवाद्यांच्या गजरात आणि छत्रचामरांच्या थाटात कृष्णावेणीची मिरवणूक निघते . पावलापावलागणिक सुवासिनी कृष्णामाईला ओवाळतात . दत्त महाराजांच्या सान्निध्यात कट्ट्यावर कृष्णामाईची प्राणप्रतिष्ठा होते .

कृष्णामाईच्या वर्णनपर ,स्तुतीपर कृष्णालहरी स्तोत्र हे थोरल्या महाराजांनी रचले आहे . हे स्तोत्र रचताना प्रत्यक्ष कृष्णामाई स्वामी महाराजांच्या समोर उभ्या होत्या आणि एकावन्न श्लोक रचताच आता पुरे असे म्हणून अंतर्धान पावल्या अशी कथा आहे . या थोरल्या महाराजांच्या अद्वितीय रचनेचे भाषांतर नृसिंहवाडीचे वेदशास्त्रसंपन्न बापूशास्त्री कोडणीकर यांनी केले आहे . हि रचना इतकी सामर्थ्य संपन्न आहे कि थोरल्या महाराजांच्या प्रश्नावलीत एक उपाय अथवा उत्तर म्हणून याची गणना होते .

दत्त महाराज, श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराज ह्या अवतारात नृसिंहवाडी आणि औदूंबर येथे कृष्णातीरी होते तर श्रीपादश्रीवल्लभ अवतारात ते कुरवपूर येथे कृष्णातीरी होते . गुरुचरित्रात तर त्रिस्थळी मध्ये कृष्णा - पंचगंगा संगमाचा उल्लेख आहे . अशा भगवती कृष्णामातेच्या उत्सवात आवर्जून नृसिंहवाडीला भेट द्या ,वातावरण थंड असले तरी दत्त महाराजांच्या सान्निध्यात भक्तवत्सलतेची उब आहे ,ती अनुभवा ---- श्री गुरुदेव दत्त !!! --- अभय आचार्य

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"