Monday, October 28, 2019

परमेश्वराकडे कर्तेपण देऊन काळजी सोडून द्यावी .

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २७ ऑक्टोबर  🌸*

*परमेश्वराकडे  कर्तेपण  देऊन  काळजी  सोडून  द्यावी .*

सर्व कर्तेपण परमात्म्याला देऊन, आपण काळजी करण्याचे अगदी सोडून द्यावे, आणि सदैव समाधानात आणि आनंदात राहावे. 

जे जे काही घडते आहे ते ते परमात्माच आपल्या हिताकरिता करतो आहे, आणि 
आपल्याकडून ज्या क्रिया होतात त्या आपण करीत नसून परमात्माच करीत आहे, अशी प्रत्येक गोष्टीमध्ये आणि प्रत्येक क्रियेमध्ये जाणीव आणि भावना ठेवावी. अशी भावना ठेवायला कुठे बिघडते ? त्यात अवघड ते काय आहे ? 

प्रयत्न अवश्य करावा आणि तो कसून करावा ; पण तो परमात्माच सर्व करीत असून, त्यात येणारे यश अगर अपयश हे सर्व आपल्या हितासाठीच आहे, अशी ठाम भावना ठेवली पाहिजे. 
अशी ठाम भावना ठेवल्यावर काळजीला जागाच कुठे राहिली ? 
आणि एकदा काळजी गेली म्हणजे आपला आनंद हा स्वयंसिद्ध आहेच आहे ! तो काही दुसर्या कुठून मिळवायचा नाही. 
आनंदाला ही काळजी झाकाळून टाकते. थोडक्यात म्हणायचे झाले तर असे सांगता येईल की,
 
मीपण, म्हणजेच कर्तेपण परमात्म्याला द्यावे, म्हणजे काळजी नाहीशी होते आणि निर्मळ आनंद उरतो, आणि अशा स्थितीत नामस्मरण चालावे. हेच 'स्वानंदात स्मरण' होय.

आपले कर्तेपण अपुरे आहे. ते आपल्या स्वाधीन नसून परमात्म्याच्या स्वाधीन आहे. म्हणून सुखदुःखाची बाधा आपल्याला न होता, ती परमात्म्याला झाली पाहिजे !
 
आपल्या सुखदुःखाचा नाश म्हणजेच आपल्या कर्तेपणाचा नाश; आणि आपल्या कर्तेपणाचा नाश म्हणजेच 'भगवंत करतो' ही भावना होय. 

आपले होते कसे ते पाहा; कर्माच्या सुरुवातीला काळजी लागते; कर्म झाल्यावर शेवटी, 'अरे, हेच का फळ मिळाले ?' म्हणून काळजी लागते; याप्रमाणे,
 
काळजी करणार्या मनुष्याला सुख-समाधान केव्हाच मिळत नाही. काळजी ही वाळवीसारखी आहे; काही खात असताना तर ती दिसत नाही, पण कपडा किंवा पुस्तक खाल्ल्यावर मात्र ती दिसते. त्याचप्रमाणे, काळजी आपली निष्ठा कमी करीत असते; त्या अवस्थेत ती दिसत नाही, परंतु नंतर मात्र ती दिसते. 

काळजी सोडायची म्हटली तर आजच सुटेल, नाहीतर ती केव्हाच सुटणार नाही. 

भारतीय युद्धात, भगवंताने जिथे रथ नेऊन उभा करावा तिथे अर्जुनाने बाण मारावे ! अर्जुनाने आपल्या रथाच्या दोर्या भगवंताच्या हाती दिल्या, त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनाच्या दोर्या भगवंताच्या हाती देऊ या. अर्जुनाच्या जागी एखादे बाण मारणारे यंत्र जरी असते तरी काम तेच झाले असते. 
तसे आपण भगवंताचे यंत्र बनू या. यंत्राला चालविणारी शक्ति आणि यंत्राकडून काम करवून घेणारी शक्ति म्हणजे भगवंत आहे. आपण आपल्या मालकावर पूर्ण विश्वास टाकून त्याच्या नामात राहू या.

*३०१ .   आपला  देह  प्रारब्धावर  टाकून,  साधकाने  मजेत  त्याच्या  सुखदुःखाकडे  पाहावे .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

भगवंताचे होण्यास आपण निर्दोष असणे जरूर आहे .

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २९ ऑक्टोबर  🌸* 

*भगवंताचे  होण्यास  आपण  निर्दोष  असणे  जरूर  आहे .*

भगवंताचे समाधान आपणास न मिळण्याचे कारण, आम्ही ज्याचे आहोत असे वाटते ते आम्हाला सोडता येत नाही; प्रपंच आम्हाला हवासा वाटतो. 

जगाच्या तोंडाकडे पाहून समाधान मिळेल असे आपल्याला वाटते. ही प्रपंचाची आणि जगाची आस सोडून भगवंताचे दास झाल्याशिवाय आम्हाला समाधान मिळणे कठीण आहे. हे दास्यत्व येण्यासाठी भगवंताच्या प्राप्तीची उत्कंठा आम्हाला लागणे जरूर आहे. ही उत्कंठा यावी तरी कशी ? 

भगवंताचे होण्यासाठी, आम्ही अगदी निर्दोष असणे अवश्य आहे. हे निर्दोषपण येण्यासाठी, आपण खरोखरच जसे नाही तसे जगाला दिसू नये. मनाने नेहमी शुद्ध असावे. 
आपण खरोखर चांगले नाही असे आपल्याला कळत असतानासुद्धा लोक आपल्याला चांगले म्हणतात, याची आम्हाला खंत वाटणे जरूर आहे. 
जगात आपले वागणे असे असावे की, आपल्याविषयी दुसर्या कुणाला शंकाही येता कामा नये. ढोंग मुळीच करू नका. आचारविचाराने इतके पवित्र झाल्यानंतर मग आम्हाला भगवंताचे का बरे होता येणार नाही ?

भगवंताचे झाल्यावर आम्हाला काळजीचे काही कारण आहे का ? आपण सर्वजण 'आम्ही भगवंताचे आहोत' असे म्हणतो आणि काळजी करतो, हे किती विपरीत आहे ! 

ही प्रपंचाची काळजी नाहीशी होण्यासाठी, प्रपंचातले सर्व वैभव, धनदौलत ही आपली कर्तबगारी नसून, ती रामाच्या इच्छेने आली आहे असे आम्ही म्हटले पाहिजे. 'माझा प्रपंच तुझ्या इच्छेने चालला आहे, तू ठेवशील त्यात मी समाधानात राहीन,' अशी आमची वृत्ती बनायला पाहिजे. यासाठी मोठे वैराग्य पाहिजे असे नाही. 

खरोखर, वैराग्य, त्याग वगैरेंच्या भानगडीत पडू नका. भगवंत ठेवील त्या परिस्थितीमध्ये समाधानात राहणे यासारखे दुसरे वैराग्य कोणतेही नाही. 

ज्याच्यामधे भगवंताचा विसर पडेल, त्याच्यावर वैराग्य करा.
ज्याच्यामध्ये भगवंताची आठवण राहील, तो विवेक समजून आचरणात आणा. 

प्रपंच उत्तम करा, पण त्याच्या आधीन होऊ नका. आधीन होणे हे पाप आहे, 
प्रपंच करणे हे पाप नाही.
 शक्य तितके धर्माचे पालन करा; नीति प्राणाबरोबर सांभाळा.

 गोंदवल्याला तुम्ही इतकी मंडळी येता, मला संकोच असा वाटतो की, इतका पैसा खर्च करून, इतक्या अडचणी सोसून, इतके कष्ट करून तुम्ही येता, तर बरोबर काय घेऊन जाता ? 
काहीतरी बरोबर घेऊन जाऊन आचरणात आणा. नामस्मरणात तुम्ही सगळ्यांनी राहा. नामाकरिता नाम घ्या. नाम घेऊन काही मागू नका, राम कल्याण केल्याखेरीज राहणार नाही.

*३०३ .   आपल्याला  कोणी  चांगले  म्हटले  तर  आपल्या  जीवाला  धक्का  बसून  लगेच  नामाची  आठवण  व्हावी .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Sunday, October 27, 2019

परमेश्वर आपल्या हृदयात आहे .

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २८ ऑक्टोबर  🌸*

*परमेश्वर  आपल्या  हृदयात  आहे .*

सरकारी नोकर वरिष्ठाच्या हुकुमाप्रमाणे चालत असल्यामुळे त्याच्यावर वैयक्तिक जबाबदारी कसलीही येत नाही आणि कर्तेपणाही त्याला शिवत नाही; 
त्याप्रमाणे गुरूवर श्रद्धा ठेवून त्याच्या आज्ञेत राहावे. लाभ-हानी देव जाणे, जबाबदारी गुरूवर; आणि 
तोच हे साधन करवीत असल्याने कर्तेपणही त्याच्यावरच असणार. त्याच्याही पुढे म्हणजे, 

जे जे काही घडतेते ते सर्व त्याच्याच इच्छेने आणि सत्तेने घडते, अशी दृढ भावना असली, म्हणजे कर्तेपण सोडून अजिबात मोकळे होता येते. असे झाले म्हणजे जे जे आपल्या हातून घडते, ती त्याचीच सेवा होते. 

मुख्य गोष्ट ही की, परमात्मा आपल्या हृदयात आहे, आपण त्याच्यात आहोत, आपण तोच आहो, अशी दृढ भावना पाहिजे. 
याच्या मधली पायरी म्हणजे परमात्म्याच्या नजरेखाली, तो पाहात असताना, आपण सर्व कर्मे करीत आहोत अशी जाणीव असणे आवश्यक आहे. यामुळे अभिमान सर्वस्वी जरी न गळला, तरी आपल्या हातून वाईट कृत्ये तरी घडायची नाहीत.

क्षेत्राला क्षेत्रत्व आपण आपल्या भावनेने जर दिले नाही तर तिथे पाणी आणि दगडच आहेत ! 'काशी', 'गंगा', असे म्हटले म्हणजे पवित्रतेचे संस्कार मनात उभे राहतात, 
पण तिथल्या राहणार्या पुष्कळ लोकांचा तसा भाव नसल्यामुळे ते वर्षावर्षात स्नानासही जात नाहीत. यावरून, त्यांना ते क्षेत्र असे वाटतच नाही असे दिसते. 
क्षेत्र हे आपल्या भावनेनेच नाही का निर्माण होत ? मग ते घरच्या घरीच नाही का निर्माण करता येणार ? याला अर्थातच दृढभाव असायला पाहिजे. तितका तो दृढ होत नसेल, तर क्षेत्रात जावे; आणि आर्थिकदृष्ट्या तेही शक्य नसेल, तर 'काशीस जावे नित्य वदावे;' म्हणजे काशीचे स्मरण तरी करावे, म्हणजे त्याने पवित्रतेचे संस्कार उद्‌भूत होऊन मन पवित्र होईल.

 देव सर्वत्र भरलेला आहे, पण तो भावाने प्रकट केला पाहिजे. प्रह्लाद, द्रौपदी यांना अगदी खात्री होती की देव आपला साह्यकारी आहे, तेव्हा देवाला प्रकट होणेच भाग पडले. 

सद्‌गुरू मला साहाय्य करतील अशी तुमची खात्री पाहिजे, म्हणजे त्यांना साहाय्य करावेच लागते. याचा अनुभव घेणे हे तुमच्याच हाती नाही का? 

स्वार्थाने कर्मे करणे याचे नाव प्रपंच, आणि निःस्वार्थपणाने करणे याचे नाव परमार्थ. जो आसक्तिमध्ये नाही तो निःस्वार्थी समजावा. आसक्ति निघण्याची पहिली पायरी असेल तर ती उदासीनता होय. 

देव आहे असे निःशंकपणे वाटणे हे ज्ञान होय. हे ज्ञान भगवंताच्या अनुसंधानात राहिल्याने सहज प्राप्त होते.

*३०२ .  उपासनेचा  हेतू  असेल  तर  तो  राम  आपल्या  पाठीमागे  उभा  आहे  ही  भावना  उत्पन्न  करणे  हा  होय .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*