Monday, October 28, 2019

भगवंताचे होण्यास आपण निर्दोष असणे जरूर आहे .

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २९ ऑक्टोबर  🌸* 

*भगवंताचे  होण्यास  आपण  निर्दोष  असणे  जरूर  आहे .*

भगवंताचे समाधान आपणास न मिळण्याचे कारण, आम्ही ज्याचे आहोत असे वाटते ते आम्हाला सोडता येत नाही; प्रपंच आम्हाला हवासा वाटतो. 

जगाच्या तोंडाकडे पाहून समाधान मिळेल असे आपल्याला वाटते. ही प्रपंचाची आणि जगाची आस सोडून भगवंताचे दास झाल्याशिवाय आम्हाला समाधान मिळणे कठीण आहे. हे दास्यत्व येण्यासाठी भगवंताच्या प्राप्तीची उत्कंठा आम्हाला लागणे जरूर आहे. ही उत्कंठा यावी तरी कशी ? 

भगवंताचे होण्यासाठी, आम्ही अगदी निर्दोष असणे अवश्य आहे. हे निर्दोषपण येण्यासाठी, आपण खरोखरच जसे नाही तसे जगाला दिसू नये. मनाने नेहमी शुद्ध असावे. 
आपण खरोखर चांगले नाही असे आपल्याला कळत असतानासुद्धा लोक आपल्याला चांगले म्हणतात, याची आम्हाला खंत वाटणे जरूर आहे. 
जगात आपले वागणे असे असावे की, आपल्याविषयी दुसर्या कुणाला शंकाही येता कामा नये. ढोंग मुळीच करू नका. आचारविचाराने इतके पवित्र झाल्यानंतर मग आम्हाला भगवंताचे का बरे होता येणार नाही ?

भगवंताचे झाल्यावर आम्हाला काळजीचे काही कारण आहे का ? आपण सर्वजण 'आम्ही भगवंताचे आहोत' असे म्हणतो आणि काळजी करतो, हे किती विपरीत आहे ! 

ही प्रपंचाची काळजी नाहीशी होण्यासाठी, प्रपंचातले सर्व वैभव, धनदौलत ही आपली कर्तबगारी नसून, ती रामाच्या इच्छेने आली आहे असे आम्ही म्हटले पाहिजे. 'माझा प्रपंच तुझ्या इच्छेने चालला आहे, तू ठेवशील त्यात मी समाधानात राहीन,' अशी आमची वृत्ती बनायला पाहिजे. यासाठी मोठे वैराग्य पाहिजे असे नाही. 

खरोखर, वैराग्य, त्याग वगैरेंच्या भानगडीत पडू नका. भगवंत ठेवील त्या परिस्थितीमध्ये समाधानात राहणे यासारखे दुसरे वैराग्य कोणतेही नाही. 

ज्याच्यामधे भगवंताचा विसर पडेल, त्याच्यावर वैराग्य करा.
ज्याच्यामध्ये भगवंताची आठवण राहील, तो विवेक समजून आचरणात आणा. 

प्रपंच उत्तम करा, पण त्याच्या आधीन होऊ नका. आधीन होणे हे पाप आहे, 
प्रपंच करणे हे पाप नाही.
 शक्य तितके धर्माचे पालन करा; नीति प्राणाबरोबर सांभाळा.

 गोंदवल्याला तुम्ही इतकी मंडळी येता, मला संकोच असा वाटतो की, इतका पैसा खर्च करून, इतक्या अडचणी सोसून, इतके कष्ट करून तुम्ही येता, तर बरोबर काय घेऊन जाता ? 
काहीतरी बरोबर घेऊन जाऊन आचरणात आणा. नामस्मरणात तुम्ही सगळ्यांनी राहा. नामाकरिता नाम घ्या. नाम घेऊन काही मागू नका, राम कल्याण केल्याखेरीज राहणार नाही.

*३०३ .   आपल्याला  कोणी  चांगले  म्हटले  तर  आपल्या  जीवाला  धक्का  बसून  लगेच  नामाची  आठवण  व्हावी .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Sunday, October 27, 2019

परमेश्वर आपल्या हृदयात आहे .

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २८ ऑक्टोबर  🌸*

*परमेश्वर  आपल्या  हृदयात  आहे .*

सरकारी नोकर वरिष्ठाच्या हुकुमाप्रमाणे चालत असल्यामुळे त्याच्यावर वैयक्तिक जबाबदारी कसलीही येत नाही आणि कर्तेपणाही त्याला शिवत नाही; 
त्याप्रमाणे गुरूवर श्रद्धा ठेवून त्याच्या आज्ञेत राहावे. लाभ-हानी देव जाणे, जबाबदारी गुरूवर; आणि 
तोच हे साधन करवीत असल्याने कर्तेपणही त्याच्यावरच असणार. त्याच्याही पुढे म्हणजे, 

जे जे काही घडतेते ते सर्व त्याच्याच इच्छेने आणि सत्तेने घडते, अशी दृढ भावना असली, म्हणजे कर्तेपण सोडून अजिबात मोकळे होता येते. असे झाले म्हणजे जे जे आपल्या हातून घडते, ती त्याचीच सेवा होते. 

मुख्य गोष्ट ही की, परमात्मा आपल्या हृदयात आहे, आपण त्याच्यात आहोत, आपण तोच आहो, अशी दृढ भावना पाहिजे. 
याच्या मधली पायरी म्हणजे परमात्म्याच्या नजरेखाली, तो पाहात असताना, आपण सर्व कर्मे करीत आहोत अशी जाणीव असणे आवश्यक आहे. यामुळे अभिमान सर्वस्वी जरी न गळला, तरी आपल्या हातून वाईट कृत्ये तरी घडायची नाहीत.

क्षेत्राला क्षेत्रत्व आपण आपल्या भावनेने जर दिले नाही तर तिथे पाणी आणि दगडच आहेत ! 'काशी', 'गंगा', असे म्हटले म्हणजे पवित्रतेचे संस्कार मनात उभे राहतात, 
पण तिथल्या राहणार्या पुष्कळ लोकांचा तसा भाव नसल्यामुळे ते वर्षावर्षात स्नानासही जात नाहीत. यावरून, त्यांना ते क्षेत्र असे वाटतच नाही असे दिसते. 
क्षेत्र हे आपल्या भावनेनेच नाही का निर्माण होत ? मग ते घरच्या घरीच नाही का निर्माण करता येणार ? याला अर्थातच दृढभाव असायला पाहिजे. तितका तो दृढ होत नसेल, तर क्षेत्रात जावे; आणि आर्थिकदृष्ट्या तेही शक्य नसेल, तर 'काशीस जावे नित्य वदावे;' म्हणजे काशीचे स्मरण तरी करावे, म्हणजे त्याने पवित्रतेचे संस्कार उद्‌भूत होऊन मन पवित्र होईल.

 देव सर्वत्र भरलेला आहे, पण तो भावाने प्रकट केला पाहिजे. प्रह्लाद, द्रौपदी यांना अगदी खात्री होती की देव आपला साह्यकारी आहे, तेव्हा देवाला प्रकट होणेच भाग पडले. 

सद्‌गुरू मला साहाय्य करतील अशी तुमची खात्री पाहिजे, म्हणजे त्यांना साहाय्य करावेच लागते. याचा अनुभव घेणे हे तुमच्याच हाती नाही का? 

स्वार्थाने कर्मे करणे याचे नाव प्रपंच, आणि निःस्वार्थपणाने करणे याचे नाव परमार्थ. जो आसक्तिमध्ये नाही तो निःस्वार्थी समजावा. आसक्ति निघण्याची पहिली पायरी असेल तर ती उदासीनता होय. 

देव आहे असे निःशंकपणे वाटणे हे ज्ञान होय. हे ज्ञान भगवंताच्या अनुसंधानात राहिल्याने सहज प्राप्त होते.

*३०२ .  उपासनेचा  हेतू  असेल  तर  तो  राम  आपल्या  पाठीमागे  उभा  आहे  ही  भावना  उत्पन्न  करणे  हा  होय .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Wednesday, October 23, 2019

परमेश्वराची खरी पूजा .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २४ ऑक्टोबर  🌸*

*परमेश्वराची  खरी  पूजा .*

देहाभिमान नाहीसा झाला म्हणजे काळजीचे कारण उरत नाही. 'मी साधन करतो' असा अभिमान देहाभिमानामुळे उत्पन्न होतो. हा साधनाभिमानही घातुक असतो. 
तेव्हा, जे काही होते ते परमेश्वराच्या सत्तेने होते असे मानीत जावे. 
आपले हित कशात असते ते त्यालाच उत्तम कळते, आणि तो सर्व तुमच्या बर्याकरिताच करीत असतो. तेव्हा कसलीही काळजी करू नये. त्याच्यावर विश्वास टाकून आनंदात असावे, 
चित्तवृत्ती परमेश्वराकडे लावावी. तेथून ती विषयाकडे जाऊ लागली म्हणजे संधी साधावी; म्हणजे त्यावर लक्ष असावे. मन विषयाकार होऊ लागले म्हणजे माझे स्मरण करावे. बर्याच वेळाने आठवण झाली तरी माझे स्मरण करावे, म्हणजे पुढे पुढे लवकर आठवण होऊ लागेल. 

ज्याचे मन पूजेत असते त्याची खरी पूजा होते. 
सर्वांभूती भगवद्‌भाव, आणि कोणाचे मन न दुखविणे, ही पूजा खरी होय. 
पूजेला बाह्योपचाराची गरज नसते. मन मात्र अर्पण होणे जरूर आहे. पूजेत भाव असणे जरूर आहे.

भक्ति आणि वैराग्य यांच्यामध्ये तसा फरक नाही. परमेश्वराची आवड म्हणजे भक्ति, आणि विषयाची अनासक्ति म्हणजे वैराग्य. रामराय वनवासात जायला निघाले तेव्हा त्यांनी सीतामाईला बरोबर न येण्याविषयी सांगितले.त्या वेळी तिने उत्तर दिले की, 'रामा ! तुझ्याबरोबर असेन तर मला सर्व कष्ट सुखमय आहेत; आणि तुझ्याशिवाय असेन तर सर्व सुखोपभोग हे मला कष्टमय आहेत.' सीता ही रामाची मोठी भक्त होती, आणि म्हणून तिची अशी अवस्था होती. तिला परिस्थितीची जाणीव नव्हती. पण आपली गोष्ट अशी नाही.

 आपण एकीकडे परिस्थितीवर अवलंबून आहोत आणि दुसरीकडे आपल्याला भगवंत पाहिजे, म्हणून आपण मध्यम मार्ग धरावा; तो हा की, आपण म्हणावे, 'रामा, माझी परिस्थिती तुझ्या इच्छेवर अवलंबून आहे.' असे आपण मनःपूर्वक म्हटले की परिस्थिती बदलली तरी आपला आनंद टिकेल.

'माझ्या देवाला हे आवडेल का ?' अशा भावनेने जगात वागणे हाच सगुणोपासनेचा हेतू आहे. 
जसजशी आपण सगुणाची उपाधी वाढवतो तसतशी आपली इतर उपाधी कमी कमी होत जाते. 
सगुणाच्या उपासनेला आज आपण कल्पनेने प्रारंभ करू, मागून निश्चयात्मकता आपोआप येईल. 
चैतन्य सर्व ठिकाणी भरलेले आहे; ते कुठेही प्रकट होऊ शकेल. त्याला प्रकट करणे हे आपल्या भावनेवर अवलंबून आहे. 
ज्याची भावना खरी शुद्ध, म्हणजे निःसंशय असते, त्याला दगडाची मूर्तीदेखील देव बनते. भावना मात्र शंभर नंबरी पाहिजे; त्यामध्ये भेसळ उपयोगाची नाही.

*२९८ .   उपाधी  वासना  नाहीशा  करण्यासाठीच  नाम  घ्यायचे  असते .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*