Tuesday, August 27, 2019

उपासना अनुष्ठान व परमर्थातील सिद्धी

उपासना अनुष्ठान व परमर्थातील सिद्धी

तपश्चर्येचे सर्वांत शेवटचे फळ काही असेल तर परमेश्वराच्या ठिकाणी अनन्यभावाने शरण जाण्याची बुद्धी होय. ती बुद्धी आपल्याला झाली पाहिजे. एकदा शरण गेल्यावर आपण उरूच शकत नाही; त्यालाच शरणागती म्हणतात; आणि हीच परमार्थातली अत्यंत श्रेष्ठ गती आहे. आपण आपल्या सद्‍गुरूचे आहोत असे छातीठोकपणे सांगत चला. काही नाही केलेत तरी चालेल, पण आपले सद्‍गुरू आपल्या मागेपुढे आहेत अशी दृढ भावना असावी.

रोज नियमाने परमार्थपर काहीतरी वाचावं. थोड वाचावं पण ते रोजच्या आचरणात आणण्याचा मनापासून प्रयत्न करावा. कारण परमार्थ हे कृतीचे शास्त्र आहे. आपल्या घरातील मंडळी ही भगवंतानेच आपल्याला दिली आहेत ही भावना ठेवावी. त्यांना कसलाही त्रास होणार नाही असेच आपण वागावे. आणि त्यांच्यावर मनापासून प्रेम करावे. कोणतीही गोष्ट मनापासून करण्याची सवय लावून घ्यावी. कर्म अगदी मनापासून होऊ लागले की त्यामध्ये आपण स्वतःला विसरायला लागतो. यामध्येच फलाची आशा सुटण्याचा मार्ग आहे. स्वतःचा विसर पडण्या मधेच भगवंताच्या अस्तित्वाची खरी खूण आहे. रोज थोडावेळ तरी स्वतःला विसरायला शिकावं. हे साधण्यासाठी भगवंताच्या स्मरणाची फार आवश्यकता आहे. भगवंताच्या चरणीं वृत्ती लीन होणे यालाच समाधी असे म्हणतात.
वासनेच्या म्हणजे हवेपणाच्या तीन अवस्था आहेत, एक आस, दुसरी हव्यास, आणि तिसरी ध्यास. आस म्हणजे वस्तू नुसती हवीशी वाटणे; हव्यास मध्ये वस्तू नेहमीच आपल्या जवळ असावीशी वाटते आणि ध्यासामध्ये त्या वस्तूशिवाय इतर काहीच सुचत नाही. मोठे झाड तोडायचे असेल तर आपण त्याच्या वरच्या फांद्या आधी तोडतो, नंतर बुंधा तोडतो, त्याचप्रमाणे वासनेचे झाड तोडण्यासाठी त्याच्या फांद्या, म्हणजेच आपले हवे-नको पण, आधी तोडाव्या, आणि शेवटी वासना मारावी. आपल्याला जे मागायचे आहे ते भगवंताजवळच मागावे. त्याने ते नाही दिले, तर ते न देणेच आपल्या हिताचे आहे अशी बुद्धी उत्पन्न होईल. त्यानेच वासना मरेल; आणि वासना नष्ट झाल्यावर बुद्धी भगवद्‌स्वरूप होईल. काहीही न करता मिळावा इतका का परमार्थ सोपा आहे ? त्याच्यासाठी निदान वाईट वासना तरी मारायला नको का ? आणि चांगल्या वासनासुद्धा नीति आणि धर्माला धरून असतील तेवढ्याच भोगाव्या. श्रीमंतांच्या गरजा मरेपर्यंत भागत नाहीत, कारण त्यांना वासना जास्त असते. काळ हा आपल्याला आशेत गुंतवून ठेवतो, आणि शेवटपर्यंत सुख न देता आपले आयुष्य संपवितो. जो जिवंतपणी वासनारहित राहिला त्याला सुखदुःख नाही. आपण आपल्याच घरामध्ये पाहुण्यासारखे वागावे. असे राहण्याने वासना क्षीण होईल.

शाश्वत आनंद फक्त भगवंताजवळच .

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  :;  १४ ऑगस्ट  🌸*

*शाश्वत  आनंद  फक्त  भगवंताजवळच .*

जगात प्रत्येक मनुष्य स्वतःला आनंद मिळावा म्हणून धडपडतो आहे. किंबहुना, आनंद नको असे म्हणणारा मनुष्य मिळणारच नाही. म्हणजे मनुष्याला आनंद हवाच असतो. 
मग इतक्या धडपडीतून त्याला आनंद, समाधान, का बरे न मिळावे? 

याला कारण असे की, हा शाश्वत आनंद एका भगवंतावाचून दुसर्या कुठेही मिळणे शक्य नसल्याकारणाने त्याचे प्रयत्न व्यर्थ आहेत. त्या आनंदासाठी, मला भगवंत पाहिजे असे मनापासून वाटले पाहिजे; आणि त्यासाठीच, आपण सर्वांनी नाम घेणे आवश्यक आहे. 
आपले मन भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवावे, आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा.
 कधी तो सुखात राहील तर कधी दुःखात राहील; कधी तो बरेच दिवस सरळ जाईल, तर कधी मध्येच गचका खाऊन बुडायच्या बेताला येईल; पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम राहील. 

तुम्ही सर्व माणसे फार चांगली आहात, भगवंताचे नाम घेता, हे मला माहीत आहे. परंतु नामाचे प्रेम तुम्हाला येत नाही हे पाहून मला फार वाईट वाटते. तुमच्यापैकी प्रत्येकाने मनापासून विचार करून ठरवा, की मला नामाचे प्रेम येण्याच्या आड काय येत असेल बरे ? तुमची परिस्थिती आड येते का ? इथे मंदिरात राहणार्या माणसांनी तरी नामाचे प्रेम यायला परिस्थिती आडवी येते असे म्हणणे बरोबर नाही. 
तुम्ही इथे आनंदाने राहा, मंदिरात जेवा, आणि 'राम, राम' म्हणा असे मी सांगतो. पण या लोकांनीसुद्धा नामाचे प्रेम यायला परिस्थिती आड येते असे म्हटले तर बाहेरून येणार्या लोकांना मी काय सांगू ? 

खरोखर मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो असेच म्हणावे लागते. वस्तू ही सत्य नसल्यामुळे तिचे रूप अशाश्वत असते. अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो.
 खरा आनंद हा वस्तूमध्ये नसून वस्तूच्या पलीकडे आहे. आपण भगवंताजवळ आनंद मागावा. त्याने वस्तू आणि आनंद दोन्ही दिले तर फारच बरे. मात्र चिरकाल टिकणारा आनंद हा नेहमी वस्तूरहितच असतो. 

एका स्टेशनवर पेरू चांगले मिळतात म्हणून एकजण गाडीतून खाली उतरला; तो पेरू घेण्याच्या नादी किती लागेल, तर आपली गाडी न चुकण्याइतका ! हे जसे खरे, त्याप्रमाणे आनंदाच्या आड येणार्या वस्तूंच्या मागे लागणे बरे नाही. आनंद जोडणार्या गोष्टींचा आपण विचार करू या, आणि नामस्मरणात राहू या. 
काल जे झाले त्याबद्दल दुःख करू नये; उद्या काय होणार याची काळजी करू नये; आज मात्र आनंदात आपले कर्तव्य करावे.

*२२७ .  वेळ  सापडताच  तो  व्यर्थ  गप्पागोष्टीत  न  घालविता  नामस्मरण  करावे .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*वृत्तिचे समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  १५ ऑगस्ट  🌸*

 *वृत्तिचे  समाधान  ही  भगवंताच्या  कृपेची  खूण .*

आपला देह पंचमहाभूतांचा आहे. यामधला 'मी' कोण हे पाहावे, जे नासणार ते 'मी' कधी असणार नाही; म्हणजे पंचमहाभूतांचा 'मी' नाही हे ठरले. 

जो शाश्वत असतो तोच सच्चिदानंद असतो. मी भगवंतस्वरूप व्हावे अशी प्रत्येक मनुष्याची सुप्त अगर प्रगट इच्छा असते; तेव्हा त्यापैकी थोडा तरी 'मी' असल्याशिवाय मला असे वाटणार नाही. 

भगवंताचे स्वरूप आनंदमय आहे, आणि आपण सर्व लोक आनंदात राहावे असे म्हणतो. मी या आनंदापासून वेगळा होतो तेव्हा कुठेतरी चुकले असे समजावे. 

अपूर्ण सृष्टी पूर्ण करण्यासाठीच मनुष्याची उत्पत्ती भगवंताने आपल्या अंशरूपाने केली. आपल्या आनंदात व्यत्यय आणणारे विषय जाणून घेतले, म्हणजे मग आनंदात बिघाड नाही येणार. या वाटेने चोर आहेत असे समजले, म्हणजे त्या तयारीनेच आपण जातो. 

जो भक्त झाला त्याला विघ्ने येत नाहीत. भगवंताचे म्हणून कोणतेही काम केले म्हणजे त्रास नाही होत.

आनंदाचा साठा कुठे निश्चित असेल तर तो भगवंताजवळ आहे. नाटकात राजाचे काम करणारा माणूस जसा मी खरा भिकारीच आहे हे ओळखून काम करतो, त्याप्रमाणे आपण आपले खरे स्वरूप ओळखून प्रपंच करावा.

नाशवंत वस्तूवर आपण प्रेम करतो, तसेच लहानसहान गोष्टीत अभिमान धरतो, इथेच तर आमचे चुकते. मी जे नाही ते व्हावे यात सुख आहे, असे वाटते. 

कामधेनूजवळ आपण विषय मागतो, आणि मग दुःख झाले म्हणून रडत बसतो, याला काय करावे ? जो परमार्थात जाणता, तोच खरा जाणता होय. 

परमार्थ म्हणजे बावळटपणा कसा असेल ? अनेक बुद्धिमान, विद्वान लोकांना जिथे आपल्या बाजूला वळवायचे असते, तिथे बावळटपणाला वावच नाही. 

विद्वान लोक वेदान्त अत्यंत कठीण करून जगाला उगीच फसवतात. मग सामान्य माणसाला असे वाटते की, 'अरे, हा वेदान्त आपल्यासाठी नाही.' परंतु ही चूक आहे. 

वेदान्त हा सर्वांसाठी, सर्व मनुष्यमात्रासाठी आहे. वेदान्ताशिवाय मनुष्याला जगताच येत नाही. 
घराच्या छपराखाली ज्याप्रमाणे सर्व लहान लहान खोल्या येतात, त्याप्रमाणे वेदान्तात इतर सर्व शास्त्रे येतात. 

शास्त्राचे मार्ग हे वृत्तीला भटकू न देण्यासाठी आहेत. ते वृत्तीला हलू देत नाहीत; त्यात नामाची गाठ पडली की भगवंतापर्यंत साखळी जोडली जाते. 

आपण व्यवहारासाठी जन्माला आलो नसून भगवंतासाठी आलो आहोत. म्हणून, 
आपण अमुक एक वस्तू नाही म्हणून कष्टी होण्यापेक्षा, दुसरी एखादी वस्तू आहे म्हणून समाधानात राहावे. 
समाधान ही वस्तू फक्त भगवंताजवळ मिळते, आणि ती मिळवण्याच्या आड काहीही येऊ शकत नाही.

*२२८ .  वृत्तीचे  समाधान  असणे  ही  भगवंताच्या  कृपेची  खूण  आहे ,  आणि  त्याकरिता  भगवंताचे  सतत  अनुसंधान  ठेवणे  अत्यंत  आवश्यक  आहे .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*