Monday, June 24, 2019

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २५ जून 🙏

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::२५ जून  🌸*

*सदाचरण  हा  परमार्थाचा  पाया  आहे .*

राम सहज हाती लागेल म्हणून जी काही साधने समर्थांनी सांगितली आहेत, त्यामध्ये चांगल्या ग्रंथांचे वाचन हेही एक आहे. परंतु कोणत्याही ग्रंथाचे अगर पोथीचे वाचन करताना, केवळ काहीतरी वाचायचे म्हणून वाचन करू नये. 

अर्थ कळल्याशिवाय पोथी खरी वाचल्यासारखे नाही होणार; तसेच जितका त्याचा अर्थ कळला तितके तरी कृतीत आणण्याचा प्रयत्‍न करावा. 
आपण जे करीत नाही ते प्रथम करायला सुरुवात करावी. भाराभर वाचले आणि कृती केली नाही, तर काय उपयोग ? 

चार मैलांचा रस्ता असला तर सबंध रस्ता एकदम दिसावा असे म्हटल्याने कसे होईल ? एक मैल रस्ता चालावा, म्हणजे पुढचे दिसेल. जसजशी मजल मारावी तसतसे पुढचे दिसू लागेल. परमार्थाचेही असेच आहे. 

बापासारख्या मिशा मला याव्या म्हणून लहान मुलाने हट्ट धरला तर कसे होईल ? त्याचप्रमाणे, आजच मला देवदर्शन व्हावे म्हटले तर कसे होईल ? सद्‍गुरूची आज्ञा पाळावी, साधन करू लागावे, म्हणजे सर्व काही होते. जेवायला बसले म्हणजे पोट भरायचे राहते का ?

खरोखर परमार्थाची वाट अगदी सरळ आहे; प्रपंचाचा रस्ता मात्र डोंगराळ असून काटेकुटे यांनी भरलेला आहे. 
आपला प्रपंच हा परमार्थाच्या सोयीसाठी असायला पाहिजे. पण याच्या उलट, आपला परमार्थच मुळी आपल्या प्रपंचाच्या सोयीसाठी आपण केला आहे. 

कुंपणाने शेत खावे तसे आपले झाले आहे. शेताला कुंपणाची जरूरी आहे; नाहीतर ढोरे आत येऊन शेत फस्त करतील. पण कुंपणच जर बेसुमार वाढले, तर त्यामुळे शेताचे नुकसान होते हे जाणले पाहिजे.

ज्याने व्यवहार तपासून केला, त्याला परमार्थ साधलाच. 

परमार्थ हा साखरेसारखा आहे. आपण साखरेचे कारले जरी केले तरी ते खायला गोड लागते, तसे प्रपंचातसुद्धा परमार्थ केला तरीही तो गोडच असतो. 

परमार्थ हा आपल्यासाठीच असल्याने तो आपल्याला शक्य आहे किंवा नाही हे विचार करून पाहावे; आणि तो आपल्याला शक्य आहे असे जर पटले, तर मात्र केल्याशिवाय राहू नये.

पोटात अन्न घालण्यासाठी जसे तोंड, त्याचप्रमाणे परमार्थाला सदाचरण आवश्यक आहे. 

सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. पाया म्हणजे काही घर नव्हे; परंतु पायाशिवाय मात्र घर नव्हे, हे देखील तितकेच खरे. 

आपण स्वतःच्या मुलाला जसे प्रेमाने घेतो तसा परमार्थ करावा; आणि दुसर्‍याच्या मुलाला जसे घेतो तसा प्रपंच करावा. 

भगवंताच्या स्मरणात प्रपंच सुखाचा करणे हाच खरा परमार्थ, आणि ज्याची वृत्ती सुधारून भगवंताकडे लागली त्यालाच खरा परमार्थ कळला.

*१७७.  भगवंतावर अकारण प्रेम करणे याचे नाव परमार्थ.*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Sunday, June 23, 2019

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २२ जून 🙏

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २२ जून  🌸*

*सुख  त्यागात  आहे,  भोगात  नाही.*

अमुक हवे असे वाटले आणि ते मिळाले नाही, म्हणजे दुःख होते.अमुक हवे असे वाटूच देऊ नये. परमात्मा ठेवील त्यात समाधान मानावे. याचेच नाव वैराग्य. 

आपण विषयांत बुडतो आहोत, आणि पुनः विषयाचीच कास धरली तर आपण अधिकाधिक नाही का बुडणार ? 
विषयाची आस धरणे म्हणजे त्याचे दास होण्यासारखे आहे. 
मनुष्य सुखाकरता धडपड करतो, आणि अंती दुःखमय अशा विषयाची आशा करतो. 

सुख त्यागात आहे, भोगात नाही, हे पुष्कळांना पटत नाही.
परिसाला लोखंड लागले म्हणजे त्याचे सोने होते, पण रुप्याचे काही सोने होत नाही. तसे आपण दीनाहून दीन म्हणजे अभिमानरहित झाले पाहिजे. आणि असे झाले म्हणजेच परमात्म्याला अनन्य शरण जाता येईल. हे व्हायला त्याची कृपाच पाहिजे, आणि ती नित्य भाकावी. 

एखाद्या गोष्टीने आपले मन अस्वस्थ होते ते का बरे? त्या गोष्टीला आपण सत्यत्व देतो म्हणून. हा सर्व खेळ आहे, हे मिथ्या आहे, असे जाणून, ज्याप्रमाणे नट नाटकातली आपली भूमिका अगदी खर्यासारखी करतो, त्याप्रमाणे व्यवहार करावा. सुख, समाधान, सत्यात असते, मिथ्यात नसते. 

आजपर्यंत आपण विषय उपभोगले पण त्यात आपल्याला सुख झाले नाही; मग विषय मिथ्या आहेत याची भगवंताने तुम्हाला प्रचीती नाही का दिली ? तरीसुद्धा तुम्ही या विषयांतच प्रपंच कसा सुधारेल असे मला विचारता, याला काय म्हणावे ? 
जे दुःखमयच आहे त्यात सुख कुठून मिळणार ? 

दोन लहान मुली भातुकली खेळल्या; जी मुलगी गरीब होती तिने पोळ्या आणि गुळांबा केला, पण जी श्रीमंत होती तिने मात्र श्रीखंड आणि बासुंदी केली. पहिलीचा गुळांबा जितका पोट भरण्याला उपयोगी नाही, तितकेच दुसरीचे श्रीखंडही उपयोगी नाही. तसे प्रपंचाचे खरेपण आहे. 

प्रपंच असण्यासाठी बायको आणि मुले यांची गरज आहेच असे नाही; जो दुसर्यावर अवलंबून असतो तो प्रपंचीच असतो. म्हणून एकटा असला तरी प्रपंचीच असतो.

 दुसर्यापासून सुख मिळविण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य हा प्रपंची होय.
 पाचजण मिळून प्रपंच बनतो. त्यामध्ये प्रत्येकजण स्वार्थी असतो. मग सर्व सुख एकट्यालाच मिळणे कसे शक्य आहे ? 

प्रपंचामध्ये अनेक वस्तू आहेत, पण भगवंताजवळ एकच वस्तू आहे. 
प्रपंचामध्ये कितीही वस्तू आणल्या तरी पुर्या पडत नाहीत, कारण एका वस्तूच्या आणण्यामध्येच दुसर्या वस्तूच्या आणण्याचे बीज आहे. पण भगवंताचे तसे नाही. भगवंताची वस्तू एकदा आणली की पुनः ती आणायला नको.

*१७४.  'अमुक  एक  वस्तू  आहे  म्हणून  मी  सुखी  आहे'  या  वृत्तीत  राम  नसून,  काही  नसताना  वृत्तीचे  समाधान  टिकले  पाहिजे .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २३ जून 🙏

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २३ जून  🌸*

*हेतू  शुद्ध  ठेवावा .* 

मनुष्याने शुद्ध हेतू ठेवण्याचा प्रयत्‍न करावा. हेतू शुद्ध असला की स्वाभाविकच कृती त्याला अनुरुप होऊ लागते आणि प्रगतीला मदत होते. 

हेतू हा विहिरीत असणार्‍या झर्‍याप्रमाणे आहे. झरा गोड पाण्याचा असला म्हणजे विहिरीचे पाणी स्वाभाविकच गोड असते. म्हणून हेतू शुद्ध ठेवण्याची दक्षता घ्यावी, आणि त्याकरिता रामाची प्रार्थना करावी. 

माणसाला देहरक्षणापुरते अन्न, वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी असली की असमाधानाला जागा नाही. 'नको दैन्यवाणे जिणे भक्ति उणे' हेच रामराया जवळ मागावे. 

पर्वकाळात भगवंत कामधेनूचा अवतार घेतो; जे ज्याला पाहिजे ते त्याला देतो. पर्वकाळात सज्जन तसेच दुर्जनही आपली कामे करून घेतात. जारण-मारण ही देखील पर्वकाळांतच शीघ्र साध्य होतात. आपण मात्र भगवंताचे कसे व्हावे हे पहावे. शुभेच्छा धरावी, भावना जागृत करावी. 

'काहीही कर, पण भगवंता तुझा विसर पडू देऊ नकोस.' असे भगवंताजवळ मागावे. 
'आजवर कळत नकळत जे पाप झाले ते नाहीसे कर. पुढे पुनः नाही करणार,' असे म्हणावे, म्हणजे मागली पापे नष्ट होतात. 

ज्याला विषयाची गोडी असते त्याला नाही परमार्थाची गोडी लागत. 
त्यांना 'मीच काय तो शहाणा, मोठा' असा अभिमान असतो. पण त्यांच्यापेक्षा लक्षावधी शहाणे आणि श्रीमंत जगात आहेत हे ते जाणत नाहीत. ते खालच्या लोकांकडे पाहतात आणि त्यांच्याहून मी श्रेष्ठ आहे असे म्हणतात. माझे चुकते आहे एवढे कळले तरी चालेल. 

विषयी लोकांना 'मला कुठे दुःख आहे' असे वाटते. पण दारूप्रमाणे विषयाची धुंदी उतरली म्हणजे पश्चात्ताप होतो.

'देव आहे' असे खर्‍या अर्थाने वाटणारे जगामध्ये थोडेच असतात. 
सद्‌विचार, सच्छास्त्र आणि सद्‍बुद्धि हे प्रत्येक माणसाला याच जन्मात भगवंताकडे नेण्यासाठी आहेत. 
प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे, पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे. 

तापाने आजारी असलेल्या माणसाला आपल्याला घाम यावा असे वाटत असते. पण नुसत्या वाटण्याने काही तो येत नाही, त्यासाठी डॉक्टरचे औषध घ्यावे लागते. तसे, ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते, त्याने नाम घेणे हेच एक औषध घ्यावे. भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्या आड दुसरे काही येत नाही.

खाणीतल्या दगडामध्ये जसे सोने असते, तसा आपल्यामध्ये परमात्मा आहे. दगडातली माती अनेक चाळण्यांनी आणि यंत्रांनी काढून टाकतात आणि नंतर सोने हाती लागते, त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो. आपण 'मी' पणाने मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रकट होतो.

*१७५.  शुद्ध असावे आचरण । तसेच असावे अंतःकरण । त्यात भगवंताचे स्मरण । हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन ॥*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*