Thursday, December 12, 2019

Show us God

Devotees, who come nowadays, simply keep on saying "Show us God". They have no spiritual practice, no prayer, no austerity — and past sins must be many. These have to be removed step by step, and then only God can be seen. 

The moon in the sky is covered with clouds; wind will blow away the clouds, and then only can you see the moon. Do the clouds scatter away all of a sudden? Exactly the same here. The Karmas get exhausted slowly. When God is realized, He illumines the soul internally — one knows this internally.

Ramkrishna Mission 
(Swami Vireswarananda "Teachings of Sri Sarada Devi - The Holy Mother", "Self-effort and Divine Grace", №9)

Thursday, December 5, 2019

नाम सहजपणे येणे याचे नाव 'अजपाजप' .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  ०५ डिसेंबर  🌸*

*नाम  सहजपणे  येणे  याचे  नाव  'अजपाजप' .*

एक चांगला गृहस्थ होता. त्याला कसलेही व्यसन नव्हते. त्या गावात एक दिवस एक बुवा आला. या सद्‌गृहस्थाला भविष्याचा नाद होता. त्याला कुणीतरी सांगितले की, हे आलेले बुवा भविष्य अति उत्तम सांगतात. तो त्यांना भेटायला गेला, परंतु ते गांजा ओढीत होते. त्याला काही तो वास सहन झाला नाही. तरीही, भविष्य ऐकण्यासाठी म्हणून तो एका कोपर्यात बसून राहिला. असे बरेच दिवस गेले. होता होता त्याला बुवा फार आवडू लागले. त्याप्रमाणे तो रोज तिथे जात असे. एक दिवस बुवांनी सांगितले म्हणून चिलमीत निखारा ठेवला; दुसरे दिवशी फडके ओले करून दिले. पुढे त्याला एकदा बुवांनी सांगितले म्हणून त्याने एक झुरका घेऊन पाहिला; आणि हळूहळू सवयीने तो इतका तरबेज झाला की त्याने गांजा ओढण्यात गुरूलाही मागे टाकले ! असा हा संगतीचा परिणाम फार मोठा होत असतो. 

ज्याची संगत केली असता भगवत्प्रेम प्रकट होते, तो संत जाणावा. अशाची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी.

श्रीरामप्रभूला आवडणारे 'नाम' घेऊन मारुतिरायांनी त्याला आपलासा करून घेतला. ते नाम तुम्ही अत्यंत श्रद्धेने घ्या, 

भगवंताला आपलासा करून घेणे तुम्हालाही अगदी शक्य आहे. नाम कुठेही घ्या, कोणत्याही वेळी घ्या, कितीही हळू घ्या, पण ते श्रद्धेने घ्या, म्हणजे ते भगवंतापर्यंत खात्रीने पोहोचू शकेल. 

परमेश्वराच्या प्राप्तिसाठी प्राणायाम, योगासने इत्यादि साधने सांगितलेली आहेत. परंतु त्याहून जास्त महत्त्वाचे म्हणजे परमेश्वराची सहजभक्ति.

 भगवंताचे नाम सहजपणे येणे याचेच नाव 'अजपाजप' होय. हा भक्तिचा प्रकार अत्यंत श्रेष्ठ आहे. यात मीपणाचा शेवट आहे. 
मीपणा जाणे हीच भगवंताची खरी अनन्यता होय. भगवंताची पूर्ण कृपा म्हणजे भगवंताची एकरूपताच होय. 
परमार्थ म्हणजे आपली 'सहजावस्था' झाली पाहिजे; आणि तशी व्हायला अंतरंगाची ओळख करून घ्यायला पाहिजे, म्हणजेच अंतर्मुख बनायला पाहिजे.

भगवंताच्या नसतेपणाने उठलेले वारे म्हणजे काळजी होय. 

मनुष्याच्या सर्व दुःखांवर, आजारांवर, आनंद आणि समाधान हेच खरे औषध आहे. जो सदाचरणात आणि भगवंताच्या नामात राहतो, त्याला हे औषध सहजी लाभत असते. या औषधाचा परिणाम नकळत आणि सहजी होत जाऊन तो शेवटपर्यंत टिकून राहतो.

आनंदमय राहण्याकरिता भगवंत हवा. भगवंताकडून येणारी शांति हेच समाधान होय. मन आणि भगवंत यांना जोडणारी साखळी म्हणजे नाम. या नामात आपले सर्वस्व गुंतवले तर आपल्याला भगवंतापर्यंत सहज जाता येईल.

*३४०.  नामाच्या  आनंदाचा  झटका  आला  की  मनुष्य  स्वतःला  विसरेल  आणि  जगालासुद्धा  विसरेल.*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Tuesday, December 3, 2019

गोंदवल्याचे महत्त्व नामाच्या प्रेमात आहे .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  ०४  डिसेंबर  🌸*

*गोंदवल्याचे  महत्त्व  नामाच्या  प्रेमात  आहे .*

ज्याप्रमाणे एखादा बाप बॅंकेत पैसे ठेवतो आणि त्याचे व्याज आपल्या मुलाला आपल्या पश्चात् मिळण्याची व्यवस्था करतो,
 त्याचप्रमाणे, ज्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे त्यांना, निदान अंतकाळी तरी, सद्‌बुद्धीचे व्याज मिळण्यासाठी भरपूर भांडवल मी गोंदवल्यास ठेवले आहे. 

मनुष्य कितीही भ्रष्ट बुद्धीचा झाला तरी गोंदवल्याला आला की त्याच्या बुद्धीचा पालट झालाच पाहिजे. निदान अंतकाळी तरी तो तिथे येऊन चांगला मरेल. अभिमान म्हणून नव्हे, परंतु गोंदवल्याचे महत्त्व कशात असेल तर ते नामाच्या प्रेमात आहे. 

राम किती दयाळू आहे! त्याच्या नामाचा प्रसार व्हावा म्हणून त्याच्या नावाने मी हा बाजार मांडला. पहिल्याने वाटले, आपला माल खपेल की नाही कुणास ठाऊक ! पण रामाने मोठी कृपा केली, आणि पुष्कळ लोक नामाला लागले. 

आपण पाहतो, प्रत्येक गावाला निरनिराळे नाव असते. तसे पाहिले तर सर्व गावे सारखीच; घरेदारे, भिंती, शाळा, धर्मशाळा, चावड्या या प्रत्येक गावात असतात. परंतु प्रत्येक गावाचे महत्त्व काही वेगळे असते. 

गोंदवल्यास पैशाचे महत्त्व नाही, परंतु तिथे नामाचे पीक भरघोस आहे. मी नेहमी हेच सांगत असतो की, 'जिथे जे उगवेल तेच तुम्ही पेरा.

'इथला कोणताही भक्त कुठेही जरी दिसला, तरी त्याच्या वागण्यावरून कळून आले पाहिजे की, हा गोंदवल्याचा भक्त असला पाहिजे.
त्याचे तोंड सारखे हलते आहे, तोंडाने रामाचा जप चालू आहे, त्याअर्थी हा अमक्या गुरूचा शिष्य असला पाहिजे, असे कळून यायला हवे. म्हणतात ना, की आपल्या वडिलांचे महत्त्व सांगू नये, ते मुलाच्या कृतीवरून कळले पाहिजे. 

म्हणून आता एकच करा, रामाला हात जोडून मनापासून सांगा," रामा ! तुझे प्रेम असू दे, आम्ही अखंड नामात राहू. प्रारब्धाचे भोग आम्ही आनंदाने भोगू, आणि तू ठेवशील त्यात आनंद मानू. तुझे गोड नाम आम्ही हृदयात सतत जतन करून ठेवू." राम खात्रीने कृपा केल्यावाचून राहणार नाही. खरोखर, या नामामध्ये आपला प्रपंच आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी सुखाचा होईल !

लढाई करणे हे अर्जुनाचे कर्तव्य असल्याने, 'तू माझे स्मरण ठेऊन लढाई कर,' असे भगवंतांनी सांगितले. 
आज नोकरी किंवा प्रपंच करणे हे आपले कर्तव्य आहे; तेच आपण भगवंताच्या स्मरणात करू. 
नीतिधर्माचे आचरण, आणि प्रारब्धाने आलेली कामे भगवंताच्या स्मरणात करणे, हेच सर्व धर्माचे, शास्त्रांचे सार आहे.

 आपण साखर खाल्ली तर आपल्याला गोड लागते, त्याचप्रमाणे आपण गोड शब्द बोललो की आपल्याला गोड शब्द ऐकायला मिळतात. 

आपल्या सर्व गोष्टी जर भगवंताच्या नामात झाल्या, तर भगवंताचे प्रेम आपल्याला का बरे मिळणार नाही ? आपण भगवंताचे नाम घ्यायला सुरुवात करू या. तेच नाम भगवंताची प्राप्ति करून द्यायला समर्थ आहे याची खात्री बाळगा. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे, पण भगवंताचा अनुभव खासच आनंदमय आहे.

*३३९ .  जो  माझा  म्हणवतो  त्याला  नामाचे  प्रेम  असलेच  पाहिजे .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*