Tuesday, June 25, 2019

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २० जून 🙏

*।‌।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २० जून  🌸*

*ज्याला प्रपंच नाही करता आला । त्याचा परमार्थ ढिला पडला ॥*

मातापिता यांचे न पाहावे दोष । हे सर्व सत्पुत्राचे लक्षण सत्य ॥
माता-पितरांचे समाधान । हेच सुपुत्राचे खरे लक्षण ॥
आईचे अंतःकरण अत्यंत कोवळे असते । आपले दुःखीपणाने ते दुःखी होते ।
आपली आनंदी वृत्ति आईला आनंदी बनविते ।
म्हणून मुलांनी असावे नेहमी आनंदात । काहूर न माजू द्यावे चित्तात ॥
शब्दाने करावे त्यांचे समाधान । उत्तरी अपशब्दाचे न मानावे दुःख जाण ॥

नोकरी चाकरी उद्योग धंदा । पोटाकरिता करणे आहे सदा ॥
आपण पैका मिळवावा पुष्कळ । पण ते सुखाचे साधन न मानावे सकळ ॥
प्रपंचात नुकसान होईल असे काम करू नये । तसे शब्द बोलू नये ॥
आल्या अतिथा अन्न द्यावे । कोणास विन्मुख न पाठवावे ॥ 
निरुत्साही बनू नये । निराश वाटू देऊ नये ॥ अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे । त्यात रामाचे अधिष्ठान राखावे ॥
ज्याला प्रपंच नाही करता आला । त्याचा परमार्थ ढिला पडला ॥ 
प्रपंचाची काळजी । हीच परमार्थाला वाळवी ॥ परमात्म्याचा आधार ज्याला । ठाव नसे काळजीला ॥ 
शेजार असता रामाचा । दुःखाची, काळजीची, काय वार्ता ? ॥
मी कोण हे जाणले ज्याने चित्ती । त्याला काळजी न राहे अशी होईल वृत्ति ॥
राम त्राता हा भाव ठेवावा चित्ति । निर्भयता होईल याच रीती ॥
ज्याने देह केला रामाला अर्पण । त्याला नाही काळजीचे कारण ॥
कर्ता राम हे आणता चित्ति । पापपुण्याची नाही त्याला भीति ॥
ज्याचा परमात्मा झाला सखा । त्याला नाही कोठे धोका ॥

'कर्ता मी' म्हणे आपण । हे सर्व दुःख काळजीचे कारण ॥ 
झाले ते होऊन गेले । होणार ते चुकेना कोणाला भले ॥
म्हणून नाही करू काळजीला । राम साक्षी आहे त्याला ॥
जे जे काही माझे । ते ते जाणावे रामाचे ॥
राम त्यास सांभाळता । काळजीस कारण न उरले आता ॥ 
मुलाबाळांची न करावी काळजी । रामराय करावा राजी ॥
आपला प्रपंच हा रामाचा जाणून चित्ती । काळजी चिंता करणे ही योग्य नाही रीति ॥ 
शक्यतो करावे नामस्मरण । आपली काळजी न करावी आपण ॥
रामाचा म्हणून प्रपंच केला । काळजीचे कारण उरत नाही आपल्याला ॥ 
भगवंत असता पाठीराखा । काळजीची काय कथा ? ॥ 
म्हणून, मुखाने नाम, चित्तांत राम । त्याचे मनाला होईल आराम ॥
सतत ठेवावे एक चित्तीं । न सोडावा रघुपति ॥ सर्व सारांचे सार । एक भजावा रघुवीर ॥
नेमात नेम उत्तमजाण । रामावाचून न राहावे आपण ॥

*१७२.  सर्व कर्ता राम । हा भरवसा ठेवावा ठाम । मग काळजीचे उरले नाही काम ॥*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २१ जून 🙏

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २१ जून  🌸*

*भाव  असल्याशिवाय  परमार्थ  होत  नाही .*

प्रपंचात जसा पैसा लागतो त्याप्रमाणे परमार्थात भाव लागतो. प्रपंचात पैशाशिवाय चालूच शकत नाही. परमार्थही भाव असल्याशिवाय होत नाही. जसा तुमचा भाव असेल त्याप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. प्रल्हादाला खांबातही देवाची प्राप्ती झाली, तर नामदेवाने दगडाच्या मूर्तीलाही जेवू घातले. 

तुम्हा सर्वांना गोपीची गोष्ट माहीत असेलच. त्या गोपीला श्रीकृष्णाला जेवण घालायचे होते, पण तिचा नवरा तिला जाऊ देईना. त्यावर तिने सांगितले की, हा देह तुझा आहे, परंतु मनावर तुझा ताबा नाही. असे म्हणून ती त्याच्या देहाजवळ देह ठेवून श्रीकृष्णाकडे गेलीच की नाही ? त्याप्रमाणे आपण परमार्थात भाव ठेवणे जरूर आहे. पण असे आपण नुसते म्हणून काय उपयोग ? 

तो सर्वव्यापी आहे, सर्वसाक्षी आहे, असे आपण म्हणतो, पण आपण पापाचरण करायला भितो का ? तो आपल्याला पाहतो आहे असे पक्के वाटले तर आपल्याकडून कधीतरी पाप होईल का ? पण आपल्याला तसे वाटतच नाही. 

आपल्यासारख्या आस्तिकाला देव 'हवा' असे वाटते खरे, पण 'हवाच' असे वाटत नाही. आपल्या प्रपंचाच्या मदतीसाठी देव हवा असे वाटते. 
प्रपंच 'असावाच' असे आपल्याला वाटते. आणि भगवंत मात्र 'असला तर बरं' असे वाटते. याच्या उलट 'भगवंत असावाच' आणि 'प्रपंच असला तर बरा' असे वाटायला पाहिजे. 

प्रपंचाची आवड असू नये, पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी. देहाने ते कर्तव्य करावे, आणि मनाने मात्र अनुसंधान ठेवावे. 

ज्या गोष्टी आपल्या मनाला खातात त्या न केल्या की आपला आपल्या विकारांवर ताबा येईल. भगवंताच्या देखत आपल्याला करायला लाज वाटणार नाही, अशीच कृती आपण करावी.

ज्यांना व्याप आहे ते लोक रडतात, आणि ज्यांना व्याप नाही तेही लोक रडतात; मग सुख कशात आहे ? 
पैसा सुख देतो का ? पैसा मिळविणे कठीण, मिळाला तर तो कायम राहील का त्याची शाश्वती नाही. पैशाप्रमाणेच इतर सर्व वस्तूंची गोष्ट आहे.

सर्वसुखी असा प्रपंचात कोण ? प्रत्येकाचे काहीना काही तरी गार्हाणे आहेच. प्रत्येकाला आशा वाटते की मी उद्या आजच्यापेक्षा सुखी होईन. तो कधी पूर्ण सुखी होत नाही, त्याचे गार्हाणे संपत नाही ! प्रपंचातल्या सर्व वस्तू नाशवंत आणि दुःखरूप अशा आहेत. म्हणूनच प्रपंच असत्य आहे, हा अनुभव प्रपंच देतो. त्या अनुभवाने प्रपंचात जो आसक्त होत नाही तो सुखी; अनुभव विसरून जो आसक्त होतो तो दुःखी. 

सुख हे समजुतीमध्ये आहे, आणि भगवंताचे होणे हीच समजूत तेवढी खरी आहे.

*१७३.  प्रपंच अनासक्तिने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ.*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।‌।*

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २६ जून 🙏

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २६ जून  🌸* 

*नियम  थोडा  करावा,  पण  तो  शाश्वताचा  असावा .*

ज्या झाडाची वाढ व्हावी असे आपल्याला वाटते, त्या झाडाला आपण पाणी घालतो, त्याची मशागत करतो, त्या झाडाकडे लक्ष पुरवितो. परंतु जे झाड वाढू नये असे वाटते, किंवा ज्या झाडाचे विशेष महत्त्व आपल्याला वाटत नाही, त्या झाडाकडे आपण दुर्लक्ष करतो. 
तसे, जेणेकरून परमेश्वराच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होईल, त्याची जोपासना करावी. देहाकडे, विचारांकडे, विषयांकडे दुर्लक्ष करावे, म्हणजे आपोआपच त्यांचा विसर पडेल. 

ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची जोपासना करताना, त्याला गुराढोरांनी खाऊ नये म्हणून त्याच्याभोवती कुंपण घालावे लागते, त्याप्रमाणे परमार्थ हा खरा कुंपणातच ठेवावा; तो जितका गुप्त राहील तितका चांगला. त्याचे प्रदर्शन झाले तर त्याला दृष्ट लागते. म्हणून परमार्थ हा कोणाच्या न कळत, परंतु अत्यंत आवडीने करावा. 

झाड लावल्यावर ते किती वाढले आहे हे कुणी रोज उकरून पाहात नाही,  त्याप्रमाणे अनुभवाच्या, प्रचीतीच्या मागे लागू नका; त्यामुळे प्रगती खुंटेल.

हट्टी आणि व्यसनी माणसे एका दृष्टीने मला आवडतात; कारण त्यांचा हट्ट भगवंताच्या मार्गाला लावला की झाले. 
परमार्थात नियम थोडाच करावा, पण तो शाश्वताचा असावा; म्हणजे, जेणेकरून भगवंताचे प्रेम लागेल याबद्दलचा असावा, आणि तो प्राणाबरोबर सांभाळावा.

 जे अत्यंत थोर भाग्याचे असतात त्यांनाच ध्यानमार्ग साधतो. हा मार्ग फार थोरांचा आहे. ध्यानामध्ये जगाचाच विसर पडतो; त्या अवस्थेमध्ये दिवस काय पण वर्षेसुद्धा जातील, पण त्याच्या देहाला काही होणार नाही. 

आपल्या सारख्याला साधनांत साधन म्हणजे भगवंताचे नाम; दानांत दान म्हणजे अन्नदान; आणि उपासनांत उपासना म्हणजे सगुणाची उपासना होय; या तिन्हींमुळे देहाचा विसर पडतो. म्हणून शक्यतो या तीन गोष्टींची कास धरा. 

मनुष्याची साहजिक प्रवृत्ती व्याप वाढविण्याकडे असते. द्वैत वाढवून त्यात अद्वैत पाहण्यात आनंद असतो हेही खरे. साधे मधमाश्यांचे उदाहरण घ्या. त्या अनेक झाडांवरून मध गोळा करतात आणि नंतर पोवळ्यात एकत्र करतात. असा एकत्र केलेल्या मधाचा केवढा गोड साठा होऊ शकतो बरे ! अशा रीतीने सर्व द्वैतामध्ये एक अद्वैत, म्हणजे एक राम, पहायला शिकावे; आणि 
ज्याला सर्वत्र राम पाहणे असेल त्याने स्वतःमध्येच राम पाहून, प्रत्येक कृती ही रामाची समजावी. स्वतःमध्ये राम पाहिल्याशिवाय तो सर्वत्र पाहता येणार नाही. तेव्हा स्वतःचा म्हणजेच देहाचा विसर पडल्याशिवाय सुख लाभणार नाही, आणि हा देहाचा विसर राममय झाल्यानेच होईल. म्हणून अखंड भगवंताच्या अनुसंधानात राहा.

*१७८.  परमार्थाला  अगदी  स्वतःपासून  सुरुवात  करायची  असते .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*