Wednesday, April 3, 2019

श्रीपाद वल्लभ चरित्र अमृत :- अध्याय -7

॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ 
अध्याय -७
खगोल वर्णन
श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचा महिमा
पहाटे श्री तिरुमल दासांनी आपले आन्हिक उरकून सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले ''अरे शंकर भट्टा ! श्रीपाद वल्लभांचे दिव्य चरित्र अद्भुत, अतर्क्य व अपूर्व असे आहे. तुझ्या वर त्यांचा अपार स्नेह असल्या कारणाने त्यांचे दिव्य चरित्र लिखाण करण्याचे महद्भाग्य तुला लाभले आहे. असा हा दिव्य योग श्रींच्या संकल्पाने तुला लाभला आहे.''
श्रीपादाचे एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रकट होणे
नरसावधानी मृत्युमुखातून बाहेर पडल्यावर त्यांच्यातील आकर्षण शक्ती क्षीणावली. पूर्वी साधना करीत असतांना ज्या मनुष्याचे ते ध्यान करीत तो कितीही दूर असला तरी आकर्षित होऊन त्यांच्या जवळ येत असे. ती शक्ति सुध्दा आता क्षीणावली होती. जे लोक पूर्वी त्यांना घाबरत होते, ते आता अजिबात घाबरेनासे झाले. वेळ पडल्यास त्यांचा उपहास करून त्यांना दुखवीत असत. त्यांची आर्थिक स्थिति सुध्दा खालावत चालली होती. दोन वेळच्या पोटभर जेवणाची सुध्दा कांही वेळा भ्रांत पडत असे. अशा कष्टमय अवस्थेत ते आक्रोश करीत घराबाहेर आले. त्यावेळी महाचार्य बापन्नाचार्युलु त्यांच्या नातवास कडेवर घेऊन आपल्या घराकडे जात होते. राजशर्माच्या घराकडून वळसा घेतल्यावर जो मार्ग येई तो थेट बापन्नाचार्युलुच्या घराकडे जात असे. श्रीपाद बालपणी आपल्या घरापेक्षा अधिक वेळ आपल्या आजोबांच्या घरीच राहात. श्री नरसिंह वर्मा व श्री वेंकटप्पा श्रेष्ठी यांच्या घरी सुध्दा स्वेच्छेने जात. श्रीपादांशी बोलावे असे नरसावधानींच्या मनात आले. त्या गोंडस आणि लडिवाळ अशा दिव्य बालकास एकदा तरी कडेवर घेऊन लाड करावे असे त्यांना वाटले. नरसावधानींची दृष्टी श्रीपादावर पडली. श्रीपादांनी नरसावधानीकडे पाहून मंद स्मित केले. ते स्मित हास्य अत्यंत मोहित करणारे होते. नरसावधानी भिक्षेसाठी श्रेष्ठींच्या घरी गेले. तेथे श्रीपाद श्रेष्ठींच्या मांडीवर खेळत असलेले दिसले. नरसावधानींकडे पाहून श्रीपाद मिस्किलपणे हसले. नरसावधानी भिक्षा घेऊन ते नरसिंह वर्माच्या घरी गेले. तेथे त्यांना श्रीपाद नरसिंह वर्माच्या खांद्यावर खेळत असलेले दिसले. नरसावधानीकडे पाहून श्रीपाद पुन्हा मिस्किलपणे हसले. एकाच वेळी बालक श्रीपाद, श्रेष्ठींच्या घरी, वर्माच्या घरी व आजोबा बापन्नाचार्युलु यांच्या घरी होते. नरसावधानींना हे स्वप्न आहे का विष्णुमाया आहे ? हे कळतच नव्हते गावातील लोक नरसावधानींचा छळ करू लागले. पादगया क्षेत्रातील स्वयंभू दत्ताची मूर्ती अदृष्य होण्यामागे नरसावधानींच्या हात आहे, अशी लोक निंदा करू लागले. या लोकनिंदेने पीडित होऊन नरसावधानी भ्रमिष्ठासारखे घरी परतले. त्यांना अशा स्थितीत पाहून त्यांची पत्नी अत्यंत दु:खी झाली. तिच्या मनातील वेदना प्रकट करण्यासाठी ती देवघरात गेली. तेंव्हा तिने पाहिलेले दृश्य आश्चर्यकारक होते. त्यांच्या देवघरात श्रीपाद बसलेले होते. त्यांना पाहून त्या पती-पत्निला अतिशय आनंद झाला. त्या उभयतांनी श्रीपादांना राजगिऱ्याच्या भाजीचे भोजन करण्याचा आग्रह केला. परंतु श्रीपादांनी जेवण्यास नकार दिला. काल, कर्म आणि कारण या तिन्हींचा एकाच वेळी संयोग झाल्यास असे अलभ्य योग जुळून येतात. विवेकवंत अशा योगांचे लाभ करून घेतात. तर अविवेकी या लाभास मुकतात. श्रीपाद प्रभुंनी त्या पती-पत्निच्या विनंतीस होकार दिला, परंतु या जन्मीसाठी नसून पुढल्या जन्मीसाठी. पुढल्या जन्मी ते महाराष्ट्राच्या पुण्य भूमीत श्रीनृसिंहसरस्वतीच्या अवतारात त्यांच्या घरी अवश्य भोजन घेतील असे त्यांनी वचन दिले होते. एखादे समयी सूर्य चंद्राच्या गती बदलणे साध्य होईल, परंतु प्रभूंच्या वचनाच्या विरूध्द जाणे पंचभुतासहित कोणत्याच जीवास शक्य नसते. जग जरी हिंदोळले, युग जरी पालटले, तरी श्रीपादांच्या लीला नित्य, सत्य व नित्य नूतन आहेत. देवघरात बसून श्रीपाद प्रभुंनी नरसावधानी आणि त्यांच्या धर्मपत्नीस हितोपदेश केला. हा उपदेश दत्तभक्ताना अत्यंत उपयोगी असा आहे.
नरसावधानी व श्रीपाद वल्लभांच्या मध्ये झालेला 
संवाद व श्रीपाद प्रभूंचा उपदेश
प्रश्न :- तू कोण आहेस ? देवता ? यक्ष ? मांत्रिक ?
उत्तर :- मी मीच आहे. पंचभूतात्मक सृष्टीतील अणुरेणूमध्ये विद्यमान असलेली अदृश्य शक्ति ती मीच. पशु पक्ष्यासहित समस्त प्राणीमात्रामध्ये मातृ व पितृ स्वरूपाने स्थित आहे तो मीच.सकल सृष्टीचा गुरुस्वरूप पण मीच आहे.
प्रश्न :- तू श्रीदत्त प्रभूंचा अवतार आहेस का ?
उत्तर :- नि:संशयाने मी दत्तच आहे. तुम्ही शरीरधारी असल्याने तुम्हाला माझी ओळख पटण्यासाठी मी शरीर धारण केले आहे. वास्तवात मी निराकार व निर्गुण आहे.
प्रश्न :- म्हणजे तुला आकार व गुण नाही एवढेच ना ?
उत्तर :- निराकार असणे सुध्दा एक आकारच आहे. तसेच निर्गुण असणे हा देखील एक गुणच आहे. साकार व निराकार, सगुण व निर्गुण यांचा आधार तो मीच आहे आणि त्याच्या पलिकडे आहे असे जाण.
प्रश्न :- सर्वस्व तूच असताना प्राणीमात्राना सुख-दु:ख का संभवतात ?
उत्तर :- तुझ्यात असलेला ''तू'' जीव आहेस व तुझ्यात असलेला ''मी'' परमात्मा आहे. तुझ्यात कर्तृत्वभावना असेपर्यंत ''तू'', ''मी'' होऊ शकत नाही. जो पर्यंत तुझ्यात कर्तृत्वभावना असेल तो पर्यंत सुख-दु:ख, पाप-पुण्य अशा द्वंद्वातून तुझी सुटका होऊ शकत नाही. तुझ्यातला ''तू'' नष्ट होऊन तुझ्यातील ''मी'' उच्च दशेत असेन, तेव्हा तू माझ्या निकट असशील. जसे जसे तू माझ्या निकट येशील तसा तसा तू सुख-दु:ख, पाप-पुण्य या द्वंद्वातून मुक्त होशील. तू माझ्या आश्रयी असता सुख संपन्न होशील.
प्रश्न :- जीवात्मा व परमात्मा हे वेगवेगळे आहेत असे काहींचे म्हणणे आहे, जीवात्मा व परमात्म्याचे घनिष्ट संबंध आहे असे काहींचे म्हणणे आहे, तर जीवच परमात्मा आहे असे काहींचे म्हणणे आहे यातील खरे काय ?
उत्तर :- तू वेगळा व मी वेगळा अशी भिन्नत्वाची भावना असली तरी हरकत नाही. तुझ्यातला अहंकार नाश पावल्यावर आपण दोघे द्वैतात स्थित असता आनंदाची प्राप्ती होईल.माझ्या अनुग्रहा मुळे सगळे चालत असून, तू केवळ निमित्तमात्र आहेस या तत्वाचे अनुसरण केल्याने सुध्दा आनंद स्थितीस पावशील. मोहाचा क्षय झाल्याने द्वैत स्थितीमध्ये असतानासुध्दा तू मोक्षसिध्दी पावशील. तुझ्यात आणि माझ्यात अत्यंत सामिप्य असताना मी तुझ्या द्वारे स्वत:स व्यक्त करतो. माझ्यातील सर्व शक्ती तुझ्या द्वारे अभिव्यक्त होत असताना, तुझ्यातला अहंकार नाश पावून, मोहक्षय झाल्याने या विशिष्ट असलेल्या अद्वैत स्थितीमध्ये पण आनंदाची प्राप्ती होईल. मोह नसल्यामुळे हा सुध्दा मोक्षच होय. तुझा अहंकार पूर्णपणे नाश पावल्याने, कर्तृत्वाची भावना नाहीशी होईल. तुझ्यात ''तू'' नसून, केवळ ''मी''असलेल्या त्या स्थितीत मनाच्या कल्पनेने आकलन न होणाऱ्या ब्रह्मानंदाचा अनुभव करत असतो. म्हणून, अद्वैत स्थितीत असला तरी मोक्ष प्राप्ती करू शकतो. द्वैत स्थितीत असला तरी, विशिष्टाद्वैत किंवा अद्वैत स्थितीत असला तरी मोक्षसिध्दी/ब्रह्मानंदस्थिती मात्र एकच. ती स्थिती मन-वाचा यांस अगोचर आहे. केवळ अनुभवाने जाणले जाते.
प्रश्न :- अवधूत स्थितीत असलेले काही जण ते स्वत: ब्रह्म असल्याचे सांगतात, तर तू अवधूत आहेस का ?
उत्तर :- नाही, मी अवधूत नाही. मी ब्रह्म आहे. आणि ब्रह्म सर्वस्व असल्याचे अवधूतांचे अनुभव आहेत. तर मी ब्रह्म असून मी सर्वांतर्यामी असल्याची स्थिती माझी आहे.
प्रश्न :- तरी या किंचित भेदाचे रहस्य मला उमजले नाही.
उत्तर :- समस्त संसार बंधनांतून मुक्त झालेले अवधूत माझ्यात लीन होऊन ब्रह्मानंद सुखाचा अनुभव घेतात. त्यांच्यात व्यक्तित्व नाही. व्यक्तित्व नसल्याने ते संकल्प रहित असतात. या सृष्टीच्या महासंकल्पात, महाशक्तीत मी आहे. जीव म्हणविणाऱ्या मायाशक्तीत पण मी आहे. माझ्यात लीन झालेले अवधूत सुध्दा ''तू परत जन्म घे'' अशी माझी आज्ञा झाल्यास त्यांना जन्म घेणे भाग आहे. संकल्पयुक्त सत्य-ज्ञानानंद स्वरूप माझे आहे. तर संकल्परहित सत्य-ज्ञानानंद स्वरूप त्यांचे आहे.
प्रश्न :- बीजास भाजल्याने परत अंकुरित होत नाही तसेच ब्रह्मज्ञान प्राप्त करून ब्रह्ममय झालेल्यांना परत जन्म घेणे कसे बरे साध्य होईल. उत्तर :- भाजलेल्या बीजांचे पुनरंकुरित न होणे हा सृष्टीचा धर्म आहे. भाजलेल्या बीजांना पुनरंकुरित करणे हे सृष्टीकर्त्याचे शक्तीसामर्थ्य आहे. खरे पाहता माझा अवतार या सिध्दांताद्वारे सत्यधर्म निरूपण करण्या पूर्वी झाला आहे.
प्रश्न :- दत्त प्रभू ! श्रीपादा ! विवरण करावे.
उत्तर :- भूत, भविष्य, वर्तमान हे अवस्थात्रय तसेच सृष्टी , स्थिती लय इत्यादी त्रयांचे अतिक्रमण करून वडील अत्रीमहर्षी प्रसिध्द झाले. सृष्टीतील कोणत्याही जीवाविषयी किंवा कुठल्याही वस्तूविषयी असूया, द्वेष लेषमात्र नसल्या कारणाने, माता अनसूया विख्यात झाली. ब्रह्मा, विष्णू, रुद्र यांस आधार व अतीत असलेल्या त्या परमज्योती स्वरूपाचे दर्शन प्राप्त करण्यासाठी अत्री महर्षीने घोर तपश्चर्या केली. त्या परमज्योती स्वरूप परमात्म्याने आपल्या अमृतदृष्टीने सृष्टीतील प्रत्येक प्राण्यास व वस्तूस अवलोकन करून अनुग्रह करावा या हेतूने, अनसूया मातेने तपाचरण केले होते. कर्मसूत्रांप्रमाणे पाप-पुण्यांस अनुसरून सुख-दु:ख प्राप्त होत असल्या कारणाने, महापापाचे फळ स्वल्प व स्वल्प पुण्याचे फळ अधिक व्हावे या संकल्पाने अनसूया प्रार्थना करीत असे. कठीण अशा लोहखंडास, जिवंत व खाण्यास योग्य अशा चण्यामधे आपल्या तपोबलाने मातेने रूपांतर केले. खनीजातील चैतन्य निद्रा अवस्थत असते. तरू-गुल्मादी मध्ये अर्धनिद्रावस्थेत असते. पशुमध्ये पूर्णचैतन्याची स्थिती असते. खनिज म्हणून जन्मास येवून मरण पावणे, नंतर, वृक्षेतर जन्म घेऊन तदनंतर, पशु जन्म पावून शेवटी मनुष्य जन्म घेतलेल्या मानवाने, विवेक, ज्ञान व वैराग्यवंत होवून त्याच्यात सुप्त असलेल्या परमात्मशक्तिस जागृत करून मोक्ष प्राप्त केला पाहिजे. प्रकृतीतील परिणामक्रमाचा धर्म परमात्म्यांच्या अनुग्रहाने बदलू शकतो असे मातेने सिध्द केले. त्रिमूर्तीच्या रूपात असलेले चैतन्य जागृत अवस्थेत असल्याकारणाने, निद्रावस्थेत बदलून, त्यांना लहान बालकांचे रूप दिले. त्रिमूर्तिंच्या शक्ति एकवटून अनघादेवी रूप धारण केले. दत्तात्रेयांचा अवतार घेवून अनघादेवीचा अर्धांगिनी म्हणून स्वीकार केला. श्रीपाद श्रीवल्लभावतारी, वामभागी अनघादेवी व दक्षिण भागी दत्तात्रेय असून अर्धनारीश्वर रूपाने प्रभुंचा जन्म झाला. अशा महोत्तर सृष्टीस आपल्या संकल्पमात्राने सृजन करण्याचे शक्तिसामर्थ्य असलेल्या प्रभूस आवश्यकतेनुसार सृष्टी धर्मांमध्ये बदल घडविणे सहज शक्य आहे, असे तू जाण.
प्रश्न :- श्रीपादा ! सृष्टी धर्मामध्ये बदल घडविण्याचे सामर्थ्य असलेला तू माझ्या दारिद्रयाचे हरण करू शकत नाही का ?
उत्तर :- अवश्य तुझे दारिद्रय हरण करीन. परंतु तुझ्या पुढच्या जन्मी. थोडेफार दारिद्रय भोगल्यावर! राजगिऱ्याचा विषय अगदी क्षुल्लक होता. तरी तुला राजगिऱ्यावर इतका मोह होता. आई, वडील किंवा आजोबा कोणाकडून याचना केली नव्हती. माझ्या सारख्या बालकाचा आहार असणार तो किती ? राजगिऱ्याची इच्छा झाल्याबरोबर तू दिले असते तर आजची स्थिति उदभवलि नसती. पण आता ती वेळ गेली. तुझ्या मनातील मालीन्य दूर करण्यासाठी तुझे हे जीवन पुरणार नाही. प्रत्येक मनुष्य आपले पुण्यफल आयुष्य, ऐश्वर्य, कीर्ती, धन, सौंदर्य इत्यादी रूपाने पावतो. पापाचे फल म्हणून दारिद्रय, अल्पायुषी, कुरूप, कुख्याती इत्यादी पावतो. तुझ्या पुण्याचा अधिक भाग काढून तुला आयुष्य दिले, जेणे करून तुझे पुण्य खर्च झाले. आता तुझे पाप जास्त असल्या कारणाने दारिद्रय भोगले पाहिजे. तरी स्वयंभू दत्ताची आराधना केल्या कारणाने, दारिद्रय असले तरी, दोन वेळचे अन्न तुला लाभेल असा तुला माझा आशिर्वाद आहे.
प्रश्न :- हे श्रीपादा ! वर्णाश्रम धर्माप्रमाणे वर्तन करावे असा शास्त्रांचा निर्धार आहे. तुमच्या आजोबांनी वैश्यांना पण वेदोक्त पध्दतीने उपनयन करता येईल, असा जो निर्णय दिला, तो चुकीचा नाही का ?
उत्तर :- सत्यऋषिश्वरांच्या निर्णयात खोट शोधण्याचा प्रयत्न केल्यामुळे तुझी जिव्हा छाटून टाकली पाहिजे. आजोबा म्हणजे तुला कोण वाटतं ? ते साक्षात भास्कराचार्य होत ! विष्णूदत्त व सुशीला, स्वार्थ म्हणजे काय ठऊक नसलेले परम पवित्र अशी दंपती. त्यांना माझे माता-पिता म्हणून जन्मास घालावे असा आदेश मी काल व कर्मदेवतांना दिला. नरसिंह वर्म्यांचे पूर्वज श्री लक्ष्मी नृसिंह स्वामींचे अनन्य भक्त . सिंहाचली होत असलेल्या यज्ञ-यागात विशिष्ट अन्न दान केलेले पवित्र घराणे. मी पीठिकापुरी जन्म घेण्यापूर्वीपासून एका क्रमपध्दतीने ही घटना घडवून आणली. त्या तीन घराण्याशी असलेले ऋणानुबंध एका जन्मात फेडले जाऊ शकत नाहीत किंवा एका अवतार काळात समाप्त करण्या सारखे नाही. माझे वरदहस्त त्यांच्यावर वंशोवंशी असेल. माझ्या छत्र-छायेत ते निश्चिंत राहतील.
भक्तास श्रीपादांचे अभय
आता माझ्या विषयी बोलायचे असले तर काहिही किंमत नसलेला राजगिरा तू मला देऊ शकला नाही. मी भोजन केल्यास लाख ब्राह्मण भोजनाचे पुण्य तुला लाभले असते. तू खराच दुर्दैवी आहेस. धर्म कुठले , अधर्म कुठले या विषयी वाद असेल तर शास्त्रांचा आश्रय घेतला पाहिजे. शास्त्राप्रमाणे आचरण करावे किंवा करू नये ह्या विषयी मिमांसा होत असेल तेंव्हा, निर्मल अंत:करण असलेले सत्पुरुषांचे म्हणणे शास्त्र ठरते . ते म्हणतील ते वेदवाक्यासमान असून धर्म सम्मत असते. त्यांनी अधर्माने निर्णय द्यायचा प्रयत्न जरी केला तर, धर्मदेवता, त्यांना अधर्म मार्गाने परावृत्त करून धर्म सम्मत असलेले निर्णय देण्यास बाध्य करते. हिंसा करणे पाप आहे असे शास्त्र सांगते. पण श्रीकृष्ण परमात्म्याच्या समक्ष झालेले युध्द धर्मयुध्द झाले. कौरव पांडवांचे युध्द धर्मयुध्द व युध्द झालेले स्थल धर्म क्षेत्र म्हणून प्रख्यात झाले. यज्ञ करणे पुण्यफलप्रद आहे. परंतु, परमात्म्याचे स्वरूप असलेल्या शिवास आवाहन न करता केलेल्या दक्षाच्या यज्ञाचे शेवटी युध्दात रूपांतर झाले. दक्षाचे शिर धडा वेगळे झाले नंतर त्याला अजाचे शिर लावण्यात आले. रोग्यास पित्त प्रकोप झाल्यास, वैद्य लिंबू, आवळा इत्यादींनी उपचार करतो. शरीराचा जर एखादा भाग नासल्यास, तो भाग शस्त्राने छेदून, रोगाचे निदान करतो. मी पण तसाच आहे. माझ्यात देवतांचे अंश आहेत तसेच राक्षसांचे अंश पण आहेत. मी उन्मतासारखा, पिशाच्यासारखा, राक्षसासारखा पण व्यवहार करतो. माझ्या अंतर्गत जीवाविषयी अत्यंत करुणा असल्यामुळे, तुमचे स्वभाव, तुमचे शुभाशुभ कर्म यास अनुसरून मी वर्तन करीत असतो. अनन्य शरणागत झालेल्या माझ्या भक्तांचे हात मी सोडीत नाही. दूर देशी असलेल्या माझ्या भक्तास माझ्या क्षेत्री आणतो. ऋषींचे कुळ व नदीचे मूळ विचारू नये. आदी पराशक्ति कन्यकापरमेश्वरीचे वैश्यकुळात अवतरण झाले नाही का ? सिध्द असलेल्या मुनीत वैश्य मुनी नाहीत का ? ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्यच नव्हे तर शूद्र जरी निष्ठेने नियम पालन करणारा असेल तर वेदोक्त उपनयनास अधिकारी आहे. उपनयन संस्काराने तिसरे नेत्र (ज्ञान नेत्र) उघडले पाहिजे. अंत:करण शुध्द होऊन ब्रह्मज्ञानात मन मग्न झाले पाहिजे. तुझे मन शाक ज्ञानाविषयी पूर्णपणे मग्न झाले आहे. ब्रह्म हे काय बाजारात विकत मिळणारी वस्तू आहे ? या जन्मी ब्राह्मण म्हणून जन्मास आलेला पुढच्या जन्मी चांडाळ जन्म पावू शकतो. तसेच या जन्मी चांडाळ म्हणू न जन्मास आलेला पुढच्या जन्मी ब्राह्मण म्हणून जन्मास येऊ शकतो. ब्रह्मवस्तु कुल, मत, देश, काल यांच्या अतीत असलेले रहस्य आहे असे तू जाण. देव भावप्रिय असून बाह्य प्रिय नाही. तुझ्या भावास अनुसरून दैव कार्य करीत असते. ब्रह्मज्ञानाचा उपदेश करीत असता मी ब्राह्मण असतो. भक्तांचे योगक्षेम व अनुग्रह करण्यासाठी दरबारात असतो तेंव्हा क्षत्रीय असतो. प्रत्येक जीव आपापल्या पाप-पुण्य कर्माप्रमाणे फळ पावतो. प्रत्येक जीवाचा लेखा-जोखा माझ्या जवळ आहे. तोलून मापून पाप-पुण्याचे फल वाटप करताना मी वैश्य आहे. भक्तांचे कष्ट आपल्या शरीरावर घेवून त्यांना सुख-शांती प्रदान करण्याचा सेवाधर्म मी धारण केला असता शूद्र असतो. जीव मृत्यू पावल्यावर, चिताग्नी देऊन त्याच्या शरीरास भस्मीभूत करून उत्तम गती प्राप्त करून देत असताना मी डोम असतो. आता तू मला सांग मी कोणत्या कुळाचा आहे ?
प्रश्न :- श्रीपादा ! क्षमा करा. मी अज्ञानी आहे. आपण साक्षात दत्तप्रभू आहात. समस्त जीवांचा आश्रय तूच आहेस. खरे पाहता या सृष्टीची रचना कशी झाली याचे विवरण करून मला कृतार्थ करावे.
लोकालोक वर्णन :-
उत्तर :- आजोबा, स्वर्गात 88 हजार गृहस्थ मुनींचा वास असतो. पुनरावृत्ती होणे त्यांचा धर्म असून धर्म प्रचारासाठी बीजरूपाने ते विद्यमान असतात. परमात्म्याच्या अनिर्वचनीय अशा शक्तीच्या एका स्वल्प अशा अंशाने जगत सृष्टी रचण्यासाठी ब्रह्मदेवाची उत्पत्ति झाली. परमात्म्यापासून क्रमाने सर्वव्यापी असे जल निर्माण झाले. परमात्म्याच्या तेजाने, त्या जलात कोट्यावधी सुवर्णकांतियुक्त्त अंड उत्पन्न झाले. त्या अंडात एक अंड आपण निवास करीत असलेले ब्रह्मांण्ड आहे. यातील आतले भाग अंधकारमय असून तेथे परमात्म्याचे तेज मूर्तीमान झाल्याने अनिरुध्द हे नाव विख्यात झाले. त्या अंडयातील अंधकार परमात्म्याने आपल्या तेजाने नाहीसा केला. हिरण्यगर्भ, सूर्य, सविता, परंज्योती अशा अनेक संज्ञानी वेदांत त्यांचे वर्णन आले आहे. त्रेता युगात पीठिकापुरत भारद्वाज महर्षीनी, एक कोटी ब्रह्मांण्डात भरलेल्या दत्तात्रेयांच्या तेजास उद्देशून सवितृकाठकाचे आयोजन केले होते. सत्यलोकात निरामयस्थान नावाचे एक स्थान आहे. त्रिखंड सोपानात वसु, रुद्रादित्य नावाने पितृगणांचा येथे वास आहे. निरामय स्थानाचे संरक्षक म्हणून ते कार्यरत असतात. कारण ब्रह्मलोक म्हणविणाऱ्या या स्थानात, चतुर्मुख ब्रह्माचे निवास स्थान आहे. त्यास विद्यास्थान किंवा मूल प्रकृति स्थान असे जाणले जाते. त्यावर प्रख्यात असलेले श्रीनगर आहे. त्याच्यावर महा कैलास, त्यावर कारण वैकुंठ आहे. सत्यलोकात पुराणपुर नावाचे विद्याधर स्थान आहे. तपोलोकात अंजनापतिपुर मध्ये साध्यांचा वास आहे. जनलोकात अंबावतिपूर येथे सनक सनंदनादि ऋषींचा निवास आहे. महर्लोकात ज्योतिष्मतिपुरा मध्ये सिध्दादि गणांचा वास आहे. स्वर्गलोकात अमरावतीपुरा मध्ये देवेंद्रादि देवता गणाचे वास्तव्य आहे. खगोलाशी संबंधित ग्रह-नक्षत्रादि असलेले भुवर्लोकात रथंतरपुरामध्ये विश्वकर्मा नावाचा देव-शिल्पीचा वास आहे. आजोबा ! भूलोकात दोन भाग आहेत. मानवांचा निवास असलेल्या एका भागास भूगोल असे म्हणत. ह्याच्या शिवाय, महाभूमी म्हणविणारा दुसरा भाग आहे. ही महाभूमी भुगोलकाच्या दक्षिणेस पाच कोटी ब्रह्माण्ड योजन दूर स्थित आहे. मर्त्यलोक म्हणजे, भूलोक व भुवर्लोक असून त्यात महाभूमीचा पण समावेश आहे. पाताळात, अतल, वितल, सुतल, रसातल, तलातल, महातल आणि पाताल अशा प्रकारचे सात लोक आहेत. थोडक्यात, यास स्वर्ग, मर्त्य, पाताळ असे म्हणत.
आपण राहतो या भूगोलाच्या खालच्या बाजूस महाभूमी आहे, जिचे मध्यभागात उंचवटा असून चक्राकार आहे. त्यामुळे त्याच्या उपरितलावर सूर्य चंद्र सदैव झळकत असत. सतत प्रकाशमान असल्याकारणाने, तेथे कालमानाचे निर्णय नाही. या महाभूमीवर सप्त समुद्र, सप्त द्वीप आहेत. जंबुद्वीप या महाभूमीवर आहे. भूलोक व भुवर्लोक यांची संयुक्त संज्ञा मर्त्यलोक अशी आहे. भूलोकात महाभूमी व भूगोल असे दोन प्रकार आहेत.
सृष्टीच्या प्रारंभी समस्त लोक जलमय होते. प्रजापतीने सृष्टी रचण्याच्या हेतूने तपाचरण केले तेंव्हा जलावर तरंगत असलेल्या पुष्कर पर्णाचे दर्शन झाले. प्रजापतीने वराह रूप धारण करून पुष्कर पर्णाजवळ पाण्यात बुडी मारली. खाली त्यास महाभूमी आढळली. तेथून थोडी ओली माती काढून आपल्या धारदार सुळयांनी त्या मृत्तिकेचे दोन भाग पाडले. एक भाग पाण्यावर आणून पुष्कर पर्णावर ठेवल्याने ''पृथ्वी '' झाली. आजोबा ! ह्याला भूगोल असे म्हणत. महाभूमीपासून भुगोलाचे अंतर 5 कोटी ब्रह्मांण्ड योजने आहे. महाभूमीचा विस्तार 50 कोटी योजने आहे. जंबुद्वीप नावाचे द्वीप या महाभूमी वर आहे. त्याच्यात नवखंड आहेत. देवखंडी देवता व गभस्त्यखंडी भूतांचा निवास आहे. पुरुषखंडी किन्नर, भरतखंडी मानव, शरभखंडी सिध्द, गंधर्वखंडी गंधर्व, ताम्रखंडी राक्षस, शेरूखंडी यक्ष व इंदूखंडी पन्नगांचा निवास आहे. महाभूमीवर असलेल्या जंबुद्वीपाच्या दक्षिणेस असलेले भरतखंडी, भरतपुरी, वैवस्वत मनू भूऋषी व मानवासमवेत राज्य करीत आहेत. महाभूमीवर जंबुद्वीप असल्याप्रमाणे भूगोलावर सुध्दा जंबुद्वीप आहे. माझा श्रीपाद श्रीवल्लभावतार पीठिकापुरी होण्या अगोदर 100 वर्षांपूर्वी या महाभूमीत माझे आगमन झाले. महाभूमीवर असलेल्या जंबुद्वीपाचा विस्तार लक्ष योजन आहे. जंबुद्वीपावर केवळ भरत खंडी वैवस्वत मनू आहेत. इतर खंडात देवयोनींचा वास आहे. कोवळया उन्हासारखा प्रकाश असून तेथे दिवस किंवा रात्र याचे भेद नाही. लवण समुद्राचे लक्ष योजने, लक्ष द्वीपाचे दोन लक्ष योजने, ईक्षुरस समुद्राचे दोन लक्ष योजने, कुश द्वीपाचे चार लक्ष योजने, सुरा समुद्राचे चार लक्ष योजने, क्रौंच द्वीपाचे आठ लक्ष योजने, सर्पी समुद्राचे आठ लक्ष योजने, शाकद्वीपाचे 16 लक्ष योजने, दधी समुद्राचे 16 लक्ष योजने, शल्मली द्वीपाचे 32 लक्ष योजने, क्षीर समुद्राचे 32 लक्ष योजने, पुष्कर द्वीपाचे 64 लक्ष योजने, शुध्दजल समुद्राचे 64 लक्ष योजने, चलाचल पर्वताचे 128 लक्ष योजने, चक्रावळी पर्वताचे 256 लक्ष योजने, लोकालोक पर्वताचे 512 लक्ष योजने, तपोभूमिचे 1250 लक्ष योजने असा विस्तीर्ण आहे. लोकालोक पर्वताच्या पलिकडे सूर्य रश्मी जाऊ शकत नाही. म्हणून लोकालोक पर्वत व अंडांत या मध्ये अंधकार पसरलेला असतो. अंडांताचे विस्तार कोटी योजने आहे. वराहावतार किंवा नृसिंहावतार भूमीस व्याप्त करणारे असे अवतार नाहीत. वराह म्हणजे सुकर नसून एक सूळा असलेला खड्गमृग आहे.
द्वीप, द्वीपाधिपती, द्वीपाधि देवतांचे वर्णन :-
महाभूमीत असलेल्या जंबुद्वीपास स्वयंभू मनूने चक्रवर्ती म्हणून प्रथम पालन केले. त्यांचे सात पुत्र सात द्वीपांचे अधिपती झाले. प्लक्ष द्वीपाचे मेधातिथी, शल्मल द्वीपाचे वपुष्मंत, कुश द्वीपाचे ज्योतिष्मंत, क्रौंच द्वीपाचे द्युतिमंत, शाक द्वीपाचे हव्य, पुष्कर द्वीपाचे सवन हे पहिले चक्रवर्ती होत. प्लक्ष द्वीपातील चातुर्वर्ण - आर्यक, कुरर, विंदक, भाविन या नावाने प्रसिध्द आहे. चंद्राकृतीत असलेले विष्णू त्यांचे आराध्य दैवत आहेत. शल्मल द्वीपी कपिल, चारणक, पीत व कृष्ण असे चार वर्ण आहेत. त्यांचे आराध्य देव विष्णू आहे. कुश द्वीपात दमी, शुष्मीण, स्नेह व मंदेह असे चार वर्ण आहेत. त्यांचे आराध्य देव ब्रह्मा आहे. क्रौंच द्वीपात, पुष्कर, पुष्कल, धन्य व पिष्य असे चार वर्ण असून त्यांचे आराध्य दैवत रुद्र आहे. शाक द्वीपात मंग, मागध, मानस व मंद असे वर्ण असून सूर्यभगवानाची ते उपासना करीत. पुष्कर द्वीपात मात्र चातुर्वर्ण नाही. सगळे देवतांच्या सारखे, रोग व शोक मुक्त असून आनंदाने कालक्रमण करतात. त्यांचे आराध्य दैवत ब्रह्मा आहे. आपल्या भूगोलात, जंबुद्वीपामध्ये, भरत वर्ष, किंपुरुष वर्ष, हरि वर्ष, केतुमाल्य वर्ष, इलावृत वर्ष, भद्राश्व वर्ष, रम्यक वर्ष, हिरण्यक वर्ष, कुरु वर्ष या नावांचे भाग आहेत. महाभूमी गोलाकार असून, मध्यभागी, कासवाच्या पाठी प्रमाणे ऊंच आहे. ह्या उंचवट्यास भूमंडळ असे म्हणत. भूगोल मात्र लिंबा सारखे असते. महाभूमी मेरु रेखेस वळसा घेऊन ब्रह्मांडाच्या टोकापर्यंत व्यापून आहे. भूगोल मात्र ज्योतिश्चक्राच्या समानांतरावर मध्यभागी स्थित आहे. महाभूमीच्या मध्यभागी असलेले मेरु रेखेच्या भोवती जंबुद्वीप आहे. त्याच्या भोवती, सप्तसमुद्र द्वीपादि आहेत. भूगोलाच्या उत्तरार्धास देव भाग व दक्षिणार्धास असुर भाग असे म्हणत. महाभूमीच्या मध्यभागी मेरू देदिप्यमान असून, जीवांस पालन करणाऱ्या मनूचे निवास स्थान आहे. भूगोल जीवांचे निवास स्थान आहे. महाभूमीच्या भोवती असलेले चक्रवाळ पर्वतशिखरी ज्योतिश्चक्र स्थित आहे. भूगोल मात्र यापेक्षा भिन्न आहे. सप्त कक्षांनी आवृत्त असलेले ज्योतिश्चक्र भूगोलाची रोज एक प्रदक्षिणा करीत आहे. महाभूमीत, शीतोष्ण वातादि कमी असून सदैव प्रकाशमान असल्या कारणाने, नित्य दिवस असल्याने काळाचे व्यत्यास नाही. भूगोलात ह्याच्या विपरीतआहे. महाभूमी केवळ पुण्यफल अनुभवण्यास प्राप्त करण्या योग्य आहे. स्थूल शरीराने अप्राप्य आहे. भूगोल पुण्य मिळविण्यासाठी असलेली कर्मभूमी असून स्थूल शरीरधारी राहण्याची भूमी होय. महाभूमीवर मनु प्रलया शिवाय दुसरे प्रलय उद्भवत नाही. भूगोलात, युग प्रलय, महायुग प्रलय, मनु प्रलय इत्यादी घडतात.
महाभूमीस, धात्री, विधात्री अशी नावे आहेत. भूगोलास, मही, ऊर्वी, क्षिति, पृथ्वी , भूमी अशी नावे आहेत. आजोबा ! पाताळ लोकाविषयी सांगतो, ऐका ! अतल येथे पिशाच्च गण, वितल लोकात गुह्यक, सुतल लोकात राक्षस, रसातलात भूत, तलातलात यक्ष, महातलात पितर व पाताळात पन्नगांचा वास आहे.
लोकांतील निवासी, लोकाधिपती व खंडांचे विवरण :-
वितल लोकाचा व नवनिधींचा अधिपती कुबेर आहे. हा ब्रह्मांडाचा कोषाधिपती असून, उत्तर दिशेस अलकापुरी येथे याचा वास आहे.
वितल लोकाच्या मेरूच्या पश्चिमेस योगिनीपुरात मय राहतो. हा राक्षसांचा शिल्पी असून त्याने त्रिपुरासुरांस आकाशात ऊंच विहार करण्यास योग्य असे त्रिपुर निर्माण करून दिले.
सुतलातील वैवस्वतपुरात, यमाचे आधिपत्य आहे. हा दक्षिण दिशेचा अधिपती आहे. या नगरात प्रवेश करण्यापूर्वी, अग्निहोत्रा नदी आहे. या नदीस वैतरणी असे म्हणतात. पुण्यवंतास ही नदी सुलभ रीतिने ओलांडता येते तर पापात्म्यांस अति कष्टदायक ठरते .
रसातलात पुण्यनगर येथे निऋति नावाचा दैत्य राज्य करतो. हा नैऋत्य दिशेचा अधिपती आहे. तलातल लोकात धनिष्ठापुरात पिशाच्च गणाबरोबर, वेताळाचे राज्य आहे. महातलात कैलासपुरी, सर्वभूत गणासहित कात्यायनीपती ईशान आहे. ते ईशान्य दिशेचा अधिपती होय. पाताळात वैकुंठ नगर आहे. त्यात श्रीमन्नारायण, पाताळात असलेल्या असुरांसहित, वासुकी इत्यादी सर्पश्रेष्ठांबरोबर, शेषशायी होऊन विराजमान आहेत. ह्यास श्वेतद्वीपात असलेले कार्यवैकुंठ असे म्हणत.
पाताळ लोकात त्रिखण्डसोपान आहे. प्रथम खंडात अनंग जीवांचा निवास आहे. द्वितीय खंडात प्रेत गणांचा वास आहे. तृतीय खंडात यातनामय शरीर प्राप्त झालेले जीव दु:खाने आक्रोश करीत असतात.
महाभूमीमध्ये सप्त समुद्र, सप्त द्वीप आहेत. यांच्या मध्यभागी, जंबूद्वीप आहे. जंबूद्वीपाचे नव खण्डामध्ये विभाजन झाले असून, दक्षिणेस असलेल्या खण्डास भरत खण्ड असे म्हणत. भरतखण्डात भरतपुर येथे, स्वयंभू मनू राहत असे. अनेक पुण्यजीव, ऋषी इत्यादी, स्वयंभू मनूच्या राज्यात वास करीत. ते लोकांचे तसेच धर्माचे यांचे पालन करीत. महाभूमिवर सप्तद्वीपाभोवती, चराचर, चक्रवाळ लोकालोक असे पर्वत स्वर्गलोकापर्यंत व्यापून आहेत. हे कांती किरणांस आपल्यामधून कधीच प्रसारित होऊ देत नाहीत. महाभूमीच्या खाली सात अधोलोक आहेत. ह्यास सप्त पाताळ असे म्हणत. अतल लोकात पिशाच्चांचा निवास
आहे. वितल लोकात अलकापुरीत कुबेर असतो व योगिनीपुरात राक्षसांसमेत मय असतो. सुतल लोकात राजा बळी आपल्या परिवारासह असतो. वैवस्वतपूर यमाचे निवास स्थान असून येथील नरकात, पापी जीव यातना भोगतात. रसातल लोकात पुण्यपूर येथे निऋती भूत गणासहित निवास करतो. तलातल लोकात धनिष्ठापुरात वेताळ राहतो व कैलासपुरी रुद्र. महातलात पितृदेवांचा वास आहे. पाताळात श्वेतद्वीपवैकुंठ आहे. यात नारायणाचे निवास आहे. मेरूस लागून अधोभागी, अनंगजीव, प्रेतगण व यातनादेह असतात. निरालंब सूच्यग्रस्थानात महापातकी असत. भोजनांती ''रौरवे अपुण्यनिलये पदमार्बुद निवासिनाम् । अर्थिनाम् उदकम् दत्तमक्षय्यमुपतिष्ठति ॥'' म्हणून उत्तरापोषणात उदक यांस प्रदान करीत असतो.
लोकाचे नाव, त्यांचे विस्तीर्ण विवरण :-
भूलोकात असलेले भुगोल व महाभूमी भिन्न आहेत. याचे स्पष्टपणे समजून घे. भूगोल बिंदुच्यावर ऊर्ध्व धु्रव स्थानापर्यंतच्या प्रदेशात मेरुरेखेस प्रकाशमान करणारे सूर्य लोक होय. हे सूर्यदेवतेचे लोक असून सूर्यग्रह मंडल नव्हे. याच प्रमाणे, चंद्र लोक, अंगारक लोक, बुध लोक, गुरु लोक, शुक्र लोक, शनैश्चर लोक, राश्यादी देवता लोक, नक्षत्र देवता लोक, सप्तऋषी लोक, ऊर्ध्व ध्रुव लोक, असे आहेत. याशिवाय आणखी अवांतर लोक सुध्दा आहेत.
भूमध्य बिंदूपासून सूर्य लोक, लक्ष ब्रह्मांड योजन आहे. हे सूर्य ग्रहाचे अधिपती असलेले सूर्य देवतेचे स्थान आहे. भूमध्य बिंदू पासून चंद्र लोक, दोन लक्ष ब्रह्मांड योजने, अंगारक लोक 3 लक्ष ब्रह्मांड योजने, बुध लोक 5 लक्ष ब्रह्मांड योजने, गुरु लोक 7 लक्ष ब्रह्मांड योजने, शुक्र लोक 9 लक्ष ब्रह्मांड योजने. शनैश्वर लोक 11 लक्ष ब्रह्मांड योजने, राश्यादि देवता लोक 12 लक्ष ब्रह्मांड योजने, नक्षत्रादि देवता लोक 13 लक्ष ब्रह्मांड योजने, सप्तऋषी लोक 14 लक्ष ब्रह्मांड योजने, ध्रुव लोक 15 लक्ष ब्रह्मांड योजने आहे. याप्रमाणे, भूमध्य बिंदूपासून विविध अंतरावर, स्वर्गलोक, महर्लोक, जनलोक, तपोलोक, सत्य लोक आहेत. भूमध्य बिंदू पासून ब्रह्मांडास भोवती भिंती सारखे म्हणजे, अंडांतापर्यंत, 24 कोटी, 50 लक्ष ब्रह्मांड योजनांचे अंतर आहे. भूमध्य बिंदूपासून, अंडांताच्या बाहेर पर्यंत, 25 कोटी, 50 लक्ष ब्रह्मांड योजनांचे अंतर आहे. भुलोक, भुवर्लोक व स्वर्लोक प्रलयकाळी नाश पावतात. स्वर्लोकावरील महर्लोक, थोडेफार नाश पावून थोडे स्थिर राहतात. त्यावर असलेले जन, तप व सत्य लोक ब्रह्माच्या आयुष्याच्या अंती नाश पावतात. स्वर्ग म्हणजे, स्वर्लोक, महर्लोक, जन लोक, तपोलोक, सत्यलोक व अंडांतापर्यतचा प्रदेश.
दत्त म्हणजे कोण ?
आजोबा ! दत्त तत्व तुला अनुभवायचे असेल तर लक्षवेळा जन्म घेतले पाहिजे. कोटयानुकोटि ब्रह्मांडास व्याप्त करून त्यांचे अतिक्रमण करून असलेले एकमेव तेजोमहाराशी म्हणजे दत्त असे समज. ते दत्तप्रभूच तुझ्या समोर असलेले श्रीपाद श्रीवल्लभ आहेत असे जाण. श्री चरणांनी केलेला हितोपदेश ऐकून नरसावधानी व त्यांची पत्नी चकित झाले. एक वर्षाच्या बालकाने साधिकाराने, येवढे महत्वपूर्ण व गहन असे विषय सांगणे व स्वत: दत्त असल्याचे निरूपण ऐकल्यावर नरसावधानी व त्यांच्या पत्नीस राहवले नाही. ते ढसढसा रडू लागले. त्या दिव्य शिशूचे श्रीचरण स्पर्श करावे अशी इच्छा व्यक्त केली. त्यास श्रीपादांनी नकार दिला. नरसावधानी व त्यांची पत्नी जागच्या जागी खिळुन राहिले.
श्रीपाद पुढे म्हणाले - मी दत्त आहे. कोटयानुकोटि ब्रह्मांडात व्याप्त असलेले एकमेव तत्वमीच आहे. दिग् हेच वस्त्र म्हणून दिगंबर आहे. जे कोणी त्रिकरणशुध्दीने दत्त दिगंबरा ! श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा ! नरसिंहसरस्वती दिगंबरा ! म्हणून भजन, कीर्तन करतात तेथे मी सूक्ष्म रूपाने सदैव असतो. माझे मातामह असलेले श्री बापन्नार्य, परप्रांतातून पादगया क्षेत्री श्राध्दादी कर्म करण्यास आलेल्या लोकांस सेवाथावाने भोजन व राहण्याची सोय करीत असताना कांही लोकांना आक्षेप घेतला कोठे आहेत तुमचे स्वयंभू दत्त ? अदृश्य झाले ना ? तेंव्हा श्रीपाद म्हणाले, ''तो दत्त मीच आहे. मी जन्म घेतलेल्या पवित्र गृहात राहण्यास आलेले नक्कीच पवित्र होतील.पितृदेवतांस अवश्य पुण्य लोकांची प्राप्ती होईल. जीवित असलेले जीवांचे, तसेच मरण पावलेल्या जीवांचे योगक्षेम वहन करणारा प्रभू मीच आहे. मला जन्म मरण दोन्ही समान आहेत. तरी तू स्वयंभू दत्ताची आराधना केल्याचे फळ हेच का ? अशी व्यथा तुझ्या मनात आहे. तुझ्यावर असलेले आळ नाहीसे करण्यास स्वयंभू दत्ताचे दर्शन शीघ्र होईल. आणि मूर्तीची प्रतिस्थापना होईल. तुला मी आयुष्य दिले. दत्त ध्यानी असू दे. पुढच्या जन्मी तुला अनुग्रह होईल असे आश्वासन देतो. या जन्मी माझ्या पादुकांस स्पर्श करण्याचे महापुण्य तुला नाही. कोटयानुकोटि ब्रह्मांडाचे सृजन , रक्षण व लय करणारा एकैक प्रभू असा मी माझ्या वरद हस्तांनी तुला आशिर्वाद देतो.'' महा भयंकर अशा ध्वनीनी श्रीचरणांचे शरीरातील अणु परमाणू विघटित होऊन, श्रीपाद अदृश्य झाले.
बाबारे ! शंकरभट्टा ! श्रीपादांनी स्वत: त्यांच्या नामाच्या शेवटी दिगंबरा नाम जोडून जप करण्याचे मर्म या प्रकारे निरोपिले. त्यांचे सर्व व्यापक तत्व, निराकार असलेले ते तत्व, साकार रूपात असे अवतरीत झाले हे आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे. लहान मुलाच्या रूपाने, गोंडस रूप धारण करून आलेल्या त्या जगत्प्रभूच्या लहानपणापासून करीत असलेल्या लीलांना अंत कोठे ?
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥

Tuesday, April 2, 2019

श्रीपाद वल्लभ चरित्र अमृत :- अध्याय -6

॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ 
अध्याय -६
नरसावधानींचे वृत्त
दुसऱ्या दिवशी सकाळी जपध्यानादि पूर्ण झाल्यावर तिरुमलदास म्हणाले. ''बाबा ! श्रीपाद श्रीवल्लभ या चराचर सृष्टीचे मूल आहेत. ते वटवृक्षासारखे आहेत. त्यांचे अंशावतार सगळेच विविधता असलेल्या पारंब्या प्रमाणे आहेत (झाडातून निघालेले मूळ). तेच मूळ परत भूमीमध्ये जाऊन स्वतंत्र तत्त्व असल्यासारखे दिसते, परंतु त्यांना आधार वटवृक्षच असतो. देवदानवापासून समस्त प्राणिमात्रांना त्यांचाच आधार आहे. त्यांच्याकडूनच समस्त शक्तींना आश्रय प्राप्त होतो. पुनरपि त्या शक्ति त्यांच्यातच विलीन होत असतात. पर्वत शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तीस सगळया वाटा एक सारख्याच वाटतात. त्याच प्रमाणे सगळया प्रकारच्या सांप्रदायाचे लोक दत्ततत्त्वामधेच समन्वय पावतात. प्रत्येक प्राणीमात्रास कांतीचे एक वलय असते. मी पीठिकापुरत रहात असताना तेथे एक योगी आला. तो विग्रहाच्या कांतीवलया बद्दल माहिती सांगत असे. त्याला व्यक्तीची कांती कोणत्या रंगाची असून किती दूरवर व्यापून आहे ते सांगता येत असे. त्याने श्री कुक्कुटेश्वरालयात येऊन स्वयंभू दत्ताची सूक्ष्मकांती किती दूर व्यापून आहे आणि कोणत्या रंगाची आहे, ह्याची परिक्षा करण्याचे ठरविले त्या योग्यास स्वयंभू दत्ताच्या ठिकाणी श्रीवल्लभांचे दर्शन झाले. त्यांच्या मस्तकाच्या भोवताली विद्युल्लतेच्या तुलनेची धवलकांती अप्रतिमपणे व्यापून होती. त्या धवल कांतीच्या भोवती खालच्या भागात व्यापून असलेल्या निळया रंगाच्या कांतीचे त्यास दर्शन झाले. ती मूर्ति त्या योग्यास बघून म्हणाली, ''बाबा ! दुसऱ्यांचे सूक्ष्म शरीर किती दूर व्यापलेले आहे याची माहिती काढण्याच्या प्रयत्नात अमूल्य जीवन काळ व्यर्थ घालवू नकोस. प्रथम तुझ्या हिताचा विचार कर. थोडयाच दिवसात तुझा मृत्यू होणार आहे. सद्गति संपादन करण्याचा विचार कर. सर्व सत्यांचा, सर्व तत्वमूलांचा मूल असलेला दत्त मीच आहे. ह्या कलियुगांत पादगया क्षेत्रात महासिध्दपुरुषांच्या, महायोग्यांच्या, महाभक्तांच्या प्रेमभरित आव्हानानेच मी येथे अवतार घेतला आहे.''
स्वामींच्या या उपदेशाने त्याच्यातील पूर्व वासनांचा नाश झाला. सूक्ष्म शरिराच्या कांतीची माहिती मिळविण्याची त्याची शक्ति श्रीवल्लभांतच विलीन झाली, तो श्रीवल्लभांचे त्यांच्याच स्वगृहात दर्शन घेऊन धन्य झाला. स्वच्छ अशी धवलकांती असलेले श्रीवल्लभ निर्मळ असून, संपूर्ण योगावतार आहेत. निळया रंगाची कांती असणारे श्रीप्रभू अनंत प्रेमाने, करुणेने भरलेले आहेत आणि ह्या गुणांचे हे रंग निदर्शक आहेत. त्या योग्याची विश्रांती झाल्यावर श्रध्दापूर्ण चर्चा सुरू झाली. चतुर्वर्ण विभाग असलेल्या सुक्ष्म शरीराच्या कांतीचा भेददृष्टया निर्णय घ्यावा कां ? किंवा जन्मसिध्द कुलगोत्राच्या दृष्टीने निर्णय घ्यावा ? कोणत्या वर्णाचा जन्म असला तर वेदोक्त पध्दतीने उपनयन करावे ? कोणत्या वर्णाच्या लोकांचे शास्त्रोक्त म्हणजे पुराणोक्त उपनयन करावे ? उपनयनात भृकुटी मध्ये असलेल्या तिसऱ्या डोळयाचा संबंध असतो कां ? नसेल तर कांही विशेष आहे कां ? मेधावी लोक म्हणजे काय ? अशी चर्चा बराच वेळ गरम गरम चालली होती परंतु पंडितांचे मतैक्य होत नव्हते.
सत्यऋषिश्वर या नावाचे मल्लादि बापन्नावधानी ''पीठिकापुर ब्राह्मण परिषदेंचे'' अध्यक्ष होते. त्यांना बापन्ना आर्य असे सुध्दा लोक श्रध्देने म्हणत असत. ते मुख्यत: सूर्याची, अग्निची उपासना करीत. पीठिकापुरत झालेल्या एका यज्ञाचे अधिपत्य करण्याची त्यांना विनंती केली होती. यज्ञाच्या शेवटी कुंभवृष्टी झाली, अर्थात वर्षा झाली. सकल जन समुदाय आनंदला. श्री च्छवाई नरसिंह वर्मा या नावाच्या क्षत्रिय गृहस्थानी श्री सत्यऋषिश्वरांना त्यांच्या गावात रहावे अशी विनंती केली. परंतु यज्ञयागात मिळालेले धन शिधा तेवढेच श्रीबापन्ना आर्य घेत असत. त्या द्रव्यास शुध्दी नसेल तर ते स्वीकार करीत नसत. श्री वर्मांच्या विनंतीस त्यांनी नकार दिला, श्री वर्मांची अत्यंत प्रिय असलेली कपिला गाय होती. तीचे नांव गायत्री असे होते. ती भरपूर दुध देत असे. ती अत्यंत सुशील आणि साधु स्वभावाची होती. एकदा गायत्री दिसेनासी झाली. कुठेतरी हरवली. रस्ता विसरली असे वर्तमान श्री वर्मांना कळाले. श्री बापन्ना आर्य ज्योतिष शास्त्राचे पंडित असल्याने वर्मांनी त्यांना गायत्रीच्या क्षेम-कुशला संबंधी प्रश्न केला. तेंव्हा ''श्यामलांबापुरम् (सामर्लकोटा) मध्ये खानसाहेब नावाचा कसाई आहे. त्याच्याकडे ती आहे. लगेच न गेल्यास तिचा वध होण्याची भीती आहे बापन्ना आर्य म्हणाले. वर्मांनी शामलांबापुरास मनुष्यास पाठवण्याच्या प्रयत्नात बापन्ना आर्यांना एक अट घातली. बापन्ना आर्यांच्या वचनानुसार गायत्री मिळाली तर, वर्मानी तीन एकर भूमी, निवासास योग्य असे घर बापन्नाआर्यांना त्यांच्या पांडित्याचा बहुमान म्हणून द्यावे. बापन्ना आर्यांनी त्याचा अंगिकार न केल्यास गोहत्येचे पातक प्राप्त होईल. बापन्ना आर्य संकट स्थितीत पडले. त्यांनी हे दान जर नाही घेतले तर, वर्मा त्या गाईची हत्या होऊ देतील. त्यामुळे गोहत्येचे पातक लागेल. गोहत्या पातकापेक्षा पंडित बहुमानाचा स्विकार करणेच श्रेयस्कर ठरले आणि गायत्रीची रक्षा झाली. पीठिकापुरवासियांचे नशीब उघडले. श्री बापन्नावधानी तीन खंडी धान्य देणाऱ्या भूमीचे मालक झाले. त्यांना निवसासाठी घराची व्यवस्था झाली. श्री बापन्ना आर्यांना वेंकटावधानी नावाचा मुलगा व सुमती नावाची मुलगी झाली. तिच्या जन्मपत्रिकेत सर्व शुभ लक्षण असून ती चालते वेळी महाराणीस लाजवील अशी चाल आणि लचक असल्या कारणाने सुमती महाराणी असे तिचे नामकरण झाले.
श्रीबापन्ना आर्यांची कीर्ति थोडयाच काळात दाही दिशांना पसरली. घंडिकोटा अडनावाचा अप्पललक्ष्मी नरसिंहराज शर्मा नावाचा भारद्वाज गोत्री, अपस्तंभ, वैदिकशाखेचा एक बालक पीठिकापुरांत आला. त्यांच्या घरी कालाग्निशमन नावाने ओळखली जाणारी दत्ताची मूर्ति होती. ती दत्तमूर्ति पुजेच्या वेळी स्पष्ट बोलत असे. आदेश सुध्दा देत असे. लहाणपणीच अप्पल राजू शर्माचे मातृ –पितृ छत्र हरवले असल्याने तो पोरका झाला होता. पूजा समयी कालाग्निशमनाने ''तू पीठिकापुरत जाऊन हरितस गोत्रिक, अपस्तंभ सूत्राच्या वैदिक शाखेचे मल्लादि बापन्नावधानी यांच्या कडे विद्याभ्यास करावा'' असा आदेश दिला. श्री बापन्ना आर्यानी दत्ताच्याआदेशानुसार आपल्या घरी विद्यार्थी म्हणून आलेल्या राजशर्मास माधुकरी न मागू देता, आपल्याच घरात भोजनाची व्यवस्था केली. श्री बापन्ना आर्य शनिप्रदोष समयास शिवाराधना करीत असत. घरातील स्त्रिया शनिप्रदोषादिवशी शिवाचे व्रत करीत असत. पूर्वीच्या काळी नंदयशोदेने शनिप्रदोष, शिवाराधना केल्यामुळेच साक्षात् श्रीकृष्णाचे लालन पालन करण्याचा सुयोग घडून आला. बापन्ना आर्याबरोबर सुदैवाने श्री नरसिंह वर्मा, श्री वेंकटप्पैय्या श्रेष्ठी, आणि थोडे प्रमुख वैश्य लोक सहभागी होत.
श्री कुक्कुटेश्वर स्वामींच्या मुखातून निघालेली वाणी
सुमती आणि अप्पलराजुचा विवाह
एके वेळी शनिप्रदोश शिवाराधना झाल्या नंतर, श्री कुक्कुटेश्वराच्या शिवलिंगामधुन विद्युत्कांति प्रकाशत होती. त्यावेळी त्यातून वाणी झाली. ''बाबा ! बापनार्या, नि:संदेहपणे तुझी मुलगी सुमती महाराणीस अप्पलराजु शर्मास देऊन विवाह कर, त्यामुळे लोककल्याण होईल. हा दत्तप्रभूंचा निर्णय आहे. ह्या महानिर्णयाचे उल्लंघन करण्याचा ह्या चराचर सृष्टीमध्ये कुठल्याही व्यक्तीस अधिकार नाही.'' ही देववाणी वेंकटप्पया श्रेष्ठीला नरसिंह वर्माला, तेथे असणाऱ्या सर्व जन समुदायास ऐकण्यात आली. सगळे आश्चर्यचकित झाले.
गोदावरी मंडलांतर्गत आइनविल्ली ह्या गावातील राजवर्माचे बंधुमित्र परिवारास वर्तमान पाठवले. विवाहाचा निर्णय झाला. राजशर्माला घरदार नव्हते. त्यामुळे थोडा विचार चालला होता. श्री वेंकटप्पा श्रेष्ठी म्हणाले, ''मला पुष्कळ घरे आहेत त्यापैकी एखादे मी राजशर्मास देईन.'' राजशर्मा दान घेण्यास तयार नव्हते. श्री श्रेष्ठींनी राजशर्मांच्या सोयऱ्यांबरोबर बोलून राजशर्माला मिळणाऱ्या वडिलोपार्जित गृहभागाची किंमत लावली. ती एक वराह (जुन्या काळातील नाणे) ठरविली गेली. श्री श्रेष्ठींच्या घराची किंमत बारा वराह निश्चित केली. अकरा वराह देण्यास माझ्याकडे एक पै पण नाही असे राजशर्मा म्हणाले. तसे असेल तर मी माझ्या घराची किंमत 1 वराह मात्रच ठरवून विकतो.''दान घेण्यास तुम्हास संकोच असेल तर 1 वराह मला देऊन हे घर विकत घ्या'' असे श्रेष्ठी म्हणाले. श्रेष्ठीनी जे सांगितले ते धर्मसम्मत आहे असा सगळयांनी होकार दिला. श्री सुमती महाराणी आणि श्री अप्पल लक्ष्मी नरसिंह शर्मा यांचा विवाह महापंडितांच्या वेदघोषाने, मंगल वाद्याच्या गजरात मोठ्या थाटामाटात पार पडला. श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार अज्ञानाच्या अंधकाराला दूर करण्यासच झाला आहे. त्या कारणाने श्री प्रभूंनी कालदेवतेला, कर्मदेवतेला शाप दिला. त्या शापास अनुसरून अज्ञानांधकाराचे प्रतिक स्वरूप जन्मांध शिशु, आणि अप्राकृतिक प्रगतिचे स्वरूप दर्शविणारे लंगडे बालक अशी दोन बालके राजशर्मास प्राप्त झाली. आपली दोन्हि मुले अशा रीतिने अपंग असल्याने सुमति आणि राजशर्मा अत्यंत दु:खी होते. आइनविल्लि गावांत एक प्रसिध्द विघ्नेश्वराचे देऊळ आहे. श्रीराज शर्मा यांच्या दु:खाचा परिहार करण्यासाठी त्यांचे नातेवाईक तेथील महाप्रसाद पीठिकापुरात घेऊन आले. सुमती आणि राजशर्मानी तो प्रसाद आदराने घेतला. त्या दिवशीच रात्री सुमती महाराणीला स्वप्नात ऐरावताचे दर्शन झाले. नंतर काही दिवस शंख, चक्र, गदा, पद्म, त्रिशूल, विविध देवतेचे, ऋषींचे , सिध्दपुरुषांचे, योग्यांचे अशी अनेक दर्शने तिला स्वप्नात होत होती. कांही दिवसांनी जागृतास्थेत सुध्दा तिला दिव्य दर्शन होऊ लागले. डोळे झाकले कि पडद्यावरील चित्रपटासारखे दिव्यकांतीमय तपसमाधीत मग्न असलेले योगी, मुनी, अद्भुत दर्शन देत.
देवतांचे जन्मनक्षत्र आणि सुमतीच्या प्रसवसमयाचे नक्षत्रात असलेला संबंध
सुमती महाराणीने आपल्या पित्यास दिव्य अनुभवाबद्दल सविस्तर सांगितले. ते म्हणाले, ''ही सर्व लक्षणे महापुरुषाच्या जननाचे शुभसूचक आहेत.'' सुमती महाराणीचे मामा श्रीधर पंडित म्हणाले ''बाई ! सुमती ! रवि (सूर्य) चे जन्मनक्षत्र विशाखाचा आणि श्रीरामावताराचा संबंध आहे. कृतिका हे चंद्राचे जन्मनक्षत्र आहे. ह्याचा आणि श्री कृष्णावताराचा संबंध आहे. पूर्वाषाढा या नक्षत्रावर जन्मलेल्या अंगारकाचा श्रीलक्ष्मीनरसिंह अवताराशी संबंध आहे. श्रवण नक्षत्रावर जन्मलेल्या बुधाचा, बुध्दावताराशी संबंध आहे. पूर्वाफाल्गुनी नक्षत्रावर जन्मलेल्या गुरुचा विष्णुअंशाशी संबंध आहे. पुष्य नक्षत्रावर जन्मलेल्या शुक्राचा भार्गवरामाशी संबंध आहे. रेवती नक्षत्रावर जन्मलेल्या शनिचा कुर्मावताराबरोबर संबंध आहे. भरणी नक्षत्रावर जन्मलेल्या राहूचा वराह अवताराशी संबंध आहे. आश्लेषा नक्षत्रावर जन्मलेल्या केतुचा, मच्छावताराशी संबंध आहे. तू मला प्रश्न केलेला समय दैवी रहस्याशी संबंधित आहे. कोटयावधी ग्रहांना, नक्षत्रांना ब्रह्मांडाच्या स्थिती गतीला निर्देश देणारे दत्तप्रभूच जन्मास येतील असे मला निश्चित वाटते.''
दत्तप्रभु हे नित्य वैभव विभूति
आपले दिव्य अनुभव आणि श्रीधर पंडित यांचे मत सुमती महाराणीने राजशर्मास सांगितले. तेव्हा राजशर्मा म्हणाले, ''मी पूजा करते समयी कालाग्नीशमन दत्तांना विचारतो. कालाग्नीशमन दत्तात्रेयांची पूजा होत असता कोणत्याहि माणसाने ती पाहू नये असा नियम आहे. पूजेनंतर दत्त प्रभु मानवाच्या रूपात समोर बसून बोलतात. नंतर परत त्या मूर्तिमध्ये विलीन होतात, हा रोजचा आमचा नियम आहे. सामान्य विषय किंवा स्वार्थभरित समस्या आम्ही दत्ताला निवेदन करीत नाही.'' त्या दिवशी पूजे समयी दत्तमहाराज प्रसन्न होते. पूजेनंतर ते मानवी रूपात समोर बसले आणि श्रीधरा ! या ! असे बोलविले. दत्तमूर्तीमधून एक रूप बाहेर पडले आणि त्यांच्या समोर ध्यानस्थ बसले. परत आपल्या बोटाने संकेत करीत श्रीधरा ! या ! असे म्हणाले. तत्काळ ते रूप त्यांच्यातच विलीन झाले. राजशर्माला हे सगळेच आश्चर्यजनक होते. श्रीदत्तप्रभू म्हणाले, ''तू आता पाहिलेले रूप येणाऱ्या शताब्दीतील येणारा एकुलता एक अंशावतारच आहे. माझ्यात लीन झालेल्या जीवनमुक्ताना सुध्दा मी बोलावताच यावे लागते. आणि जा अशी आज्ञा झाल्यास पडद्याआड झाल्यासारखे जावे लागते. माझ्या आज्ञेचे पालन करणे त्यांना चुकतच नाही. माझ्या लीला विभूति केवळ भूमिवरच परिमित नाहीत. हे ब्रह्मांड सारेच माझ्या हातातील खेळण्याच्या चेंडुसारखे आहे. मी एका पायाने लत्ताप्रहार केल्यास कोटयावधी योजने पार करतो. मी जन्म मृत्यूच्या अतीत आहे, असे म्हणत श्री प्रभूनी राजशर्माच्या भूमध्यांत स्पर्श केला. लगेच राजशर्माला पूर्वजन्माची स्मृति झाली. त्याने एका युगात विष्णुदत्त या नावाने जन्म घेतला असून त्याची पत्नी सुमतीने सोमदेवम्मा नावाने जन्म घेतला होता असे ज्ञात झाले. श्री दत्तमहाराज पुढे म्हणाले, मी दत्त या रूपाने दर्शन देऊन तुमची काय इच्छा आहे असे विचारले होते. त्यावेळी पितृश्राध्दाच्या दिवशी जेवायला यावे अशी विनंती तुम्ही केली होती. सूर्याग्नि बरोबर मी श्राध्दाचे जेवण केले. तुमच्या पितृदेवतांना शाश्वत ब्रह्मलोकांची प्राप्ति करून दिली. मी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेऊन गेल्या 100 वर्षापासून ह्या भूमीवर योग्यांना, महापुरुषांना दर्शन देतच आहे. पीठिकापुरत सवितृकाठक चयन (होम) भारद्वाज महार्षिने त्रेतायुगात केला होता. तेव्हाचे त्या होमाचे भस्म पर्वतासारखे जमून बसले. कालांतराने ते भस्म द्रोणागिरी पर्वतावर शिंपडले गेले. मारूती द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना एक छोटा भाग गंधर्वपुरात (गाणगापुर) पडला. गंधर्वनगर भीमा, अमरजा पवित्र नद्याचा संगम प्रदेश आहे. श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवातर समाप्तिनंतर मी मीनअंश, मीन लग्नावर करंज नगरीत शुक्ल यजुर्वेदीय वाजसनेय माध्यंदिन शाखेत, नृसिंहसरस्वती या नांवाने जन्म घेऊन, गंधर्वनगरात अनेक लीला करीन. श्री शैल्यातील कर्दळीवनात 300 वर्ष तपोसमाधी नंतर, स्वामी समर्थ ह्या नांवाने प्रज्ञापुरात निवास करीन. जेव्हा शनि मीनेत प्रवेश करेल तेव्हा त्या शरिराचा त्याग करिन.''
दत्तप्रभुंचे हे वरील वक्तव्य राजशर्माने आपल्या धर्मपत्नीस सांगितले. त्यावेळी सत्यऋषिश्वर बापनार्य म्हणाले ''बाबा ! राजशर्मा ! तुझ्या पूर्वीच्या युगातील जन्मात श्री दत्तप्रभूंना, सूर्याला, अग्निला श्राध्द भोजन दिलेला तू पुण्यात्मा आहेस. ह्या जन्मात कोणत्याहि रूपांत दत्तमहाराज भोजन द्या असे विचारतील, तो दिवस पितृश्राध्दाचा असला तरी कसलाही विचार न करता ब्राह्मण जेवायच्या अगोदरच श्री दत्ताने भोजन विचारले तर जरूर वाढावे.'' बाई सुमती ! ही गोष्ट लक्षात ठेव .''
बाबा ! शंकरभट्टा ! दत्तप्रभुंच्या लीला अलौकीक आहेत. आतापर्यंत कधीही न ऐकलेल्या आणि अपूर्व आहेत. महालया अमावस्येचा दिवस होता. राज शर्मा पितृश्राध्दाच्या तयारीत होते. दारा समोर ''भवति भिक्षांदेही'' असा आवाज ऐकला आणि त्या अवधूताला सुमती महाराणीने भिक्षा घातली. काही मागणे माग, असे म्हणणाऱ्या अवधूताला सुमती म्हणाली. ''बाबा आपण अवधूत आहात. आपले वाक्य म्हणजे सिध्दवाक्यच आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार लवकरच या भूमीवर होईल असे विद्वान लोक सांगतात. दत्तप्रभू आता कोणत्या रूपात संचार करीत आहेत? या शंभर वर्षापूर्वीपासून ह्या भूमिवर श्री दत्तप्रभू श्रीपाद श्रीवल्लभ या रूपात फिरत आहेत असे ज्ञातहोत आहे. आपण मला ''काहीतरी माग'' असे म्हटलेत. मला श्रीपाद श्रीवल्लभांचे रूप पहाण्याची फार तीव्र इच्छा आहे.''
श्रीपाद श्रीवल्लभांचा अविर्भाव (प्राकटय)
हे शब्द ऐकून त्या अवधूताने भुवने दणाणून जाण्यासारखे, भूकंप आल्यासारखे विकट हास्य केले. सुमती महाराणीला तिच्या सभोवतीचे समस्त विश्व एका क्षणातच अदृष्य झाल्यासारखे वाटले. समोर 16 वर्षे वय असलेला सुंदर बालक यतीच्या रूपात प्रकट झाला. आणि म्हणाला ''आई ! मीच श्रीपाद श्रीवल्लभ आहे. मीच दत्त आहे. अवधूतांच्या रूपात असतांना श्रीवल्लभांचे रूप पहाण्याची इच्छा व्यक्त केलीस. ती इच्छा पूर्ण करण्यास तुला श्रीवल्लभांच्या रूपात दर्शन दिले. श्रीवल्लभांच्या रूपात असलेल्या मला कोणतेही मागणे मागु शकतेस. तू मला जेऊ घालून तृप्त केलेस. जे मागशील ते वरदान द्यावे अशी इच्छा आहे. या जगातील लोकांनी संकल्प रूपाने पापकर्म केल्यास पापांचे फळच प्राप्त होते. संकल्पाने पुण्यकर्म केल्यास पुण्यकर्माचे फळ प्राप्त होते. निष्काम कर्माचे आचरण केल्यास त्याला अकर्म म्हणतात. ते सुकर्म ही नसते अथवा दुष्कर्म ही नसते. अकर्मास पुण्य किंवा पाप असे कोणतेच फळ नाही म्हणून दुसरेच फळ द्यावे लागते. ते भगवंताधिन असते. अर्जुनाने अकर्म केल्यामुळेच श्रीकृष्णाने त्याला कौरवांना मारावयास सांगितले. तसे मारल्यास पाप लागणार नाही असे श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितले होते. कौरवांचा संहार हा भगवंत निर्णयच होता. तुम्ही दंपतींनी पण विशेष असे अकर्म केले आहे. म्हणुन लोकहितार्थाने काही तरी प्रतिफळ दिले पाहिजे. निसंदेहाने तुझी इच्छा मला सांग, न चुकता ती पुरवीन.''
श्री दत्तांच्या दर्शनानंतर सुमती महाराणीला स्फुरलेला संकल्प
ती दिव्यमंगल मूर्ति पाहून सुमती महाराणीने पादाभिवंदन केले. श्रीवल्लभांनी सुमती महाराणीला उचलून उभे केले व म्हणाले ''आई ! मुलाच्या पाया पडणे हे अयोग्य आहे. याने मुलाचे आयुष्य क्षीण होते. तेंव्हा सुमती म्हणाली, ''श्रीवल्लभ प्रभू ! आई म्हणून बोलाविलेत. आपले हे सिध्दवाक्य आहे तेच बोल खरे करावे. तू माझा मुलगा म्हणून जन्मास यावे.'' यावर श्रीदत्त प्रभूंनी ''तथास्तु'' असा आशिर्वाद दिला व म्हणाले ''मी श्रीपाद श्रीवल्लभ या रूपाने तुझ्या गर्भात येईन. आईने लेकरांच्या पायावर पडणे हे लेकराचे आयुष्य क्षीण होणेच होय. म्हणून मी धर्मकर्माच्या सुत्रांच्या उलट जात नाही. मी पुत्र रूपाने 16 वर्षापर्यंत जीवन व्यतित करेन.'' त्यावर सुमती, म्हणाली केवढा हा अविचार 16 वर्षापर्यंतच आयुष्य !'' असे म्हणून विलाप करू लागली. त्यावर श्रीचरणांनी सांगितले, ''आई ! 16 वर्षापर्यंत तुम्ही, सांगाल तसे ऐकून राहीन. ''प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रं मित्रवदाचरेत्'' असे शास्त्र वचन आहे. 16 वर्षे वय असलेल्या मुलाबरोबर मित्रा सारखेच वागले पाहिजे. आपल्या इच्छांचे दडपण त्याच्यावर आणू नये. मला लग्न करण्यासाठी बंधन घालू नये. मला यति होऊन स्वेच्छेने विहार करण्याची परवानगी द्यावी. माझ्या या संकल्पाच्या विरुध्द तुम्ही बंधन घातले तर मी घरात राहणार नाही.'' असे सांगून त्वरित दत्त प्रभु अदृश झाले.
सुमती महाराणी अवाक झाली. तिला कांहीच कळेनासे झाले. घडलेला सारा वृतांत तिने आपल्या पतीस विवरण करून सांगितला. तेवढयातच अप्पलराजू म्हणाले, ''सुमती विचार करू नकोस, श्रीदत्त महाराज या प्रकारे आपल्या घरी भिक्षेस येतील असा विषय तुझ्या वडीलांनी सूचना म्हणून अगोदर सांगून =ठेवला होता. श्रीदत्त हे करुणेचा महासागर आहेत. श्रीवल्लभांचा जन्म होऊ दे, नंतर आपण विचार करू'' अप्पल राजुच्या घरी अवधूत आले ही वार्ता सगळया गावात पसरली. पितृदेवांची अत्यंत प्रमुख असलेली महालय अमावस्येच्या दिवशी ब्राह्मण जेवायच्या आधी अवधूतास भिक्षा दिली ह्या विषयाची चर्चा झाली. श्री बापन्नावधानी म्हणाले. ''श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म होणार हे सगळेच म्हणतात ! अवधूतांना साष्टांग नमस्कार करणे विहीतच आहे ! त्यामध्ये सुमतीचा काहीच दोष नाही. पुत्ररूपाने जन्मल्यावर त्याला साष्टांग नमस्कार केल्यास बालकाचे आयुष्य क्षीण होते. परंतु अवधूत वेषात असतांना साष्टांग नमस्कार करणे चूक नाही.'' या प्रसंगाने पीठिकापुरातील सर्व ब्राह्मणांची इर्ष्या वाढली विशेषत्वाने नरसावधानी या नावाच्या पंडितांची. अमावस्येच्या दिवशी सगळेच पितृकार्यामध्ये निमग्न झालेले होते. भोक्त्याचा दुष्काळच होता, ही फार मोठी समस्याच पडली. श्री बापन्नार्यांनी अप्पलराजुच्या घरी मात्र निर्विघ्नपणे कार्य पार पडेल असे सांगितले. श्री राजशर्मा कालाग्नी शमनांचे (दत्ताचे) ध्यान करीत होते. तितक्यात भोक्त म्हणुन तीन अतिथी आले. आणि पितृकार्य निर्विघ्नपणे पार पडले.
बाबा ! शंकर भट्टा ! त्या दिवशी वैश्यांना वेदोक्त्त उपनयन करण्याचा अधिकार आहे का ? नाही ? असा विषय चर्चेत मुख्यांश होता. ब्राह्मणांची परिषद जमली. बंगाल देशातील, नवद्वीपाहून आशुतोष या नावाचे पंडित पादगया क्षेत्रास आले होते. त्यांच्याकडे अत्यंत प्राचीन नाडी ग्रंथ होते. त्यांना देखील पंडित परिषदेचे आमंत्रण होते. बापन्नाचार्यांनी सांगितले, नियमनिष्ठेमध्ये ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्य समानच असतात.
श्रीपादांच्या जन्मसमयी दृग्गोचर झालेले अद्भूत दृष्य
इतक्यात मी म्हणालो ''महाराज, श्रीपाद प्रभूंच्या लीला विस्तारपूर्वक सांगून मला धन्य करावे.'' अरे शंकर भट्टा ! नरसावधानी बापन्नार्यावर क्रोधित झाले व येनकेन प्रकारेण त्यांचा अपमान करण्याचे त्यांनी ठरविले . त्यांची (नरसावधानींची) बगलामुखी साधना विफल होण्याचे एकमेव कारण बापन्नार्यच आहेत असे त्यांच्या मनाने ठामपणे घेतले होते. तांत्रिक प्रयोगाने बापन्नार्याने त्यांची मंत्रसिध्दि निष्प्रभ केली असा कुप्रचार करण्यास त्यांनी सुरवात केली. नाडी ग्रंथात श्रीपाद प्रभूंच्या अवताराविषयी जे विवरण होते ते त्यांना विचलित करीत होते. नाडीग्रंथ हा मुलत: अविश्वसनीय आहे. बापन्नार्यानी मत्स्याहारी ब्राह्मणास भोजन दिले, हा अनाचार घडला असा नरसावधानी यांनी वाद मांडला. मनुष्य पूर्णब्रह्माचा अवतार कदापि होऊ शकत नाही. तर तान्हे बाळ श्रीपाद श्रीवल्लभ सर्वांतर्यामी, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान असे श्रीदत्त प्रभूंचे कसे बरे अवतार होऊ शकतील ? श्रीपाद प्रभूंनी अगदी लहान असताना केलेला प्रणवोच्चार, पाळण्यात असताना केलेला शास्त्र प्रसंग, आणि वयास न शोभणारे प्रज्ञेचे प्रदर्शन नरसावधानींना पटले नाही. एखादा विद्वानब्राह्मण श्रीपादाच्या शरीतात प्रवेश करून असे बोलतो आहे असा त्यांनी प्रचार केला. श्री कुक्कुटेश्वराच्या मंदिरात असलेले स्वयंभू तेच खरे दत्तात्रय आहेत. तेच वर प्रदान करणारे आहेत. या बालकास दत्तस्वरूप मानने चुकीचे आहे .असा नारसावधनी यांनी सर्वांचा समज करून देण्याचा प्रयत्न केला.
श्रीपादांच्या जन्मानंतर सतत नऊ दिवसापर्यंत ज्या जागेवर त्यांना निजवत असत त्या जागी एक तीन फण्यांचा नाग आपला फणा उभारून बाळावर छाया करीत असे. श्रीपाद मातेच्या गर्भातून साधारण बालका प्रमाणे जन्मास न येता ज्योति स्वरूपाने अवतरले होते. जन्म होता क्षणीच महाराणी सुमती मर्च्छित झाल्या. प्रसुतीगृहातून मंगल वाद्यांचा ध्वनी येऊ लागला. थोडया वेळात आकाशवाणी झाली व सर्वाना बाहेर जाण्याचा आदेश झाला. श्रीपादांच्या सानिध्यात चार वेद, अठरा पुराणे आणि महापुरुष ज्योति रूपाने प्रगट झाले व पवित्र वेदमंत्रांचा घोष बाहेर सर्वांना ऐकू येऊ लागला. थोडया वेळाने सर्वत्र शांतता पसरली. या अद्भूत घटना बापन्नार्याना सुध्दा अगम्य व आश्चर्यकारक वाटल्या.
श्रीपादांच्या बाललीला
श्रीपाद आता एक वर्षाचे झाले होते. ते आठ दहा महिन्यांचे असतानाच त्यांचे आजोबा बापन्नार्याबरोबर पंडितपरिषदेस जात असत. आजोबा आपल्या नातवाला बरोबर घेऊन जात. नरसावधानी आपल्या घरी राजगिऱ्याचे पीक काढीत. राजगिऱ्याची भाजी अत्यंत रुचकर असते. गावातील लोक नरसावधानीना ती भाजी देण्याची विनंती करीत. परंतु ते ती भाजी कोणालाच देत नसत. कोणाकडून काही विशेष काम करून घ्यायचे असल्यास त्याला ते ती भाजी देत व इच्छित काम करून घेत. श्रीपादांनी एकदा आपल्या आईस राजगिऱ्याची भाजी करण्यास सांगितले. ती भाजी सुध्दा नरसावधानीच्या घरचीच त्यांना हवी होती. परंतु हे काम कठीण होते. श्रीपाद लहान असतानाच स्वेच्छेने चालत नरसावधानींच्या घरी जात असत. त्यांच्या घरी शास्त्राविषयी चर्चा करीत, तसेच चित्र-विचित्र लीला करीत. पीठिकापुरत एका महापंडिताचा मृत्यु झाला होता. त्या पंडिताचा प्रेतात्मा श्रीपादाकडून विचित्र-कार्य करवून घेत आहे. या बालकास योग्य ते उपचार न करता बापन्नाचर्य व राजशर्मा हे दोघे या बालकास दत्तावतारी समजत आहेत, असे नरसावधानी सर्वाना सांगत. पीठिकापूर हे पादगया क्षेत्र असून पितृदेवांचे प्रधान स्थान आहे. विगत आत्म्यांशी संपर्क साधून संभाषण करण्याचे सामर्थ्य असलेले तत्त्ववेत्ते येथे राहात असत. श्रीपादांच्या शरीरात कोणत्यातरी महापंडिताचा आत्माच वास करीत आहे आणि त्यांच्याकडून अगम्य अशा लीला करवून घेत आहे, अशी धारणा पीठिकापुरम मध्ये दृढ होत होती.
तिरुमल दासांवर श्रीपादांचा दिव्य अनुग्रह
तिरूमलदास पुढे म्हणाले ' मी मलयाद्रीपुरमहून पीठिकापुरम येथे आलो तेव्हा श्रीबापन्नार्य आणि राजशर्मा यांच्या घरचा रजक होतो. नरसावधानीच्या घरचा जो रजक होता तो वृध्दावस्थेने मरण पावला होता. त्या रजकाचा मुलगा वायसपूर अग्रहार (सध्याचेकाकिनाडा) येथे निघून गेला होता. यामुळे त्यांच्या घरचे रजकाचे काम मला मिळाले होते. मी लहानपणापासून बापन्नार्युलुच्या सहवासात असल्याने माझ्यातील सतप्रवृत्ती जागृत झाली होती व अध्यात्माची ज्योत प्रज्वलित झाली होती. ज्या दिवशी मी नरसावधानींना पहात असे त्या दिवशी मला पोटाचा विकार होऊन अन्न ग्रहण न करण्याइतकी माझी दीन अवस्था होई. नरसावधानीचे कपडे मी स्वत: न धुता माझा मुलगा रविदास ते धूत असे. सात्विक प्रवृतीच्या लोकांचेच कपडे मी स्वत: धूत असे.
नरसावधानींचे कपडे मी स्वत: न धूता ते माझा मोठ मुलगा रविदास धूतो, ही वार्ता त्यांच्या कानी गेली. त्यांचे कपडे मी स्वत: धूवावे अशी त्यांनी आज्ञा केली. ती आज्ञा मानून मी नरसावधानीचे कपडे स्वत: धुऊ लागलो. मी कपडे धूत असताना श्रीपादाचे नाम स्मरण करीत असे. मी धुतलेले कपडे घेऊन रविदास नरसावधानींकडे गेला. मी धुतलेले कपडे जेंव्हा सगळयांनी घातले, तेंव्हा कोणालाच काही झाले नाही. परंतु नरसावधानींनी ज्या वेळी ते कपडे घातले, तेंव्हा त्यांना त्यांच्या अंगावर विंचू, गोम सरपटत असल्यासारखे वाटले. त्या कपडयामध्ये त्यांचे शरीर अग्नीवर ठेवल्याप्रमाणे पोळू लागले. नरसावधानींनी मला बोलवले व ते रागाने म्हणाले, कोणत्यातरी क्षुद्र विद्येचा, मंत्राचा प्रयोग मी कपडयावर केला आहे. त्या अपराधाबद्दल त्यांनी माझी न्यायाधिशाकडे तक्रार केली. परंतु चतुर न्यायाधिशांनी मला निर्दोष जाहीर करून सोडून दिले. मी आनंदात घरी आलो. थोडयाच वेळात श्रीपाद प्रभू एका सोळा वर्षाच्या युवकाच्या रूपात आमच्या घरी आले. श्रीपाद प्रभू वाटेल त्या रूपात येऊन भक्तांना दर्शन देत असत. मी आश्चर्याने म्हणालो, ''महाराज आपण उत्तम अशा ब्राह्मण कुलामध्ये जन्मलेले आहात, तेंव्हा आमच्या सारख्या रजकांच्या वस्तीत येणे कांही योग्य नाही.'' तेव्हा प्रभू म्हणाले ''नरसावधानीसारखे पापाचे गाठोडे डोक्यावर वाहणारे ब्राह्मण खरे तर रजकांपेक्षा कमी दर्जाचे असतात. परंतु तुझ्यासारखे ब्राह्मणांची ओढ असलेले रजक त्यांच्यापेक्षा श्रेष्ठच असतात.'' श्रीपादांचे ते शब्द ऐकून मी त्यांच्या चरणांवर नतमस्तक झालो आणि ढसा ढसा रडलो. श्रीप्रभूंनी माझ्याकडे अमृतदृष्टीने पाहिले व आपल्या दिव्य हाताचा स्पर्श करून मला उठवले. नंतर त्यांनी आपला उजवा हात माझ्या शिरावर ठेवला आणि त्याच क्षणी मला पुर्वीचे जन्म आठवले . माझ्यातील योग शक्तींना चालना मिळाली. कुंडलिनी शक्ती सुध्दा जागृत झाल्याचा अनुभव येऊ लागला. श्रीपाद प्रभू हळू हळू पाऊले टाकीत अंतर्धान पावले.
श्रीपाद प्रभूंनी आपल्या आईजवळ राजगिऱ्याची भाजी करून देण्याचा हट्ट केला. त्यांना नरसावधानींच्या घरातील भाजी हवी होती. परंतु ती गोष्ट अशक्य वाटत होती. या वेळी बापन्नार्य म्हणाले, ''श्रीपादा ! उद्या सकाळी मी तुला नरसावधानींच्या घरी घेऊन जातो. तू स्वत: त्यांना राजगिऱ्याची भाजी देण्याची विनंती कर. परंतु जर त्यांनी ती भाजी देण्यास नकार दिला तर त्याभाजीसाठी पुन्हा कधी हट्ट करू नकोस.'' दुसऱ्या दिवशी बापन्नार्य बालक श्रीपादाला घेऊन नरसावधानीकडे गेले. त्यांच्या घरी जाताच बापन्नार्य श्रीपादांना म्हणाले, ''श्रीपादा ! मोठ्यांना नमस्कार करून त्यांचे आशिर्वाद घ्यावेत. नरसावधानी बाहेर ओसरीवर बसले होते. त्यांची लांब शिखा पाठीवर रुळत होती. ती नरसावधानींना अत्यंत प्रिय होती. श्रीपादांनी नरसावधानींकडे बघितले व दोन हात जोडून त्यांना नमस्कार केला. श्रीपादांची तीक्ष्ण नजर नरसावधानींच्या पाठीवर विसावलेल्या शिखेवर पडली आणि काय आश्चर्य ती आपोआप गळून खाली पडली. ती पाहून नरसावधानी अगदी गोंधळून गेले. या वेळी श्रीपाद म्हणाले, ''आजोबा ! नरसावधानी आजोबांची अत्यंत प्रिय असलेली शिखा गळून पडली. आता त्यांच्याकडे राजगिऱ्यांची भाजी मागणे योग्य होईल काय ? चला आपण घरी जाऊ.'' श्रीपादांनी राजगिऱ्याची भाजी पुन्हा कधीही विचारली नाही.
श्रीपादांच्या नमस्कारामुळे झालेले नुकसान नरसावधानींच्या लक्षात आले. ते ध्यानात बसले असता त्यांच्या शरीरातून त्यांच्या सारखेच दिसणारे एक तेजोवलय बाहेर पडले. नरसावधानींनी त्या तेजोवलयास विचारले ''तू कोण ? कोठे चाललास ?'' त्या तेज:पुंज नरसावधानी सारखे दिसणाऱ्या आकृतीने उत्तर दिले ''मी तुझ्यात राहणारे पुण्यशरीर आहे. तू आतापर्यंत कितीतरी वेद पठन केलेले आहेस. स्वयंभू दत्तात्रेयांची आराधना केलीस, परंतु साक्षात श्री दत्तात्रेयांचे अवतार श्रीपाद श्रीवल्लभांचा अपमान केलास. तुला तुझ्या शिखेवर, राजगिऱ्याच्या भाजीवर असलेले प्रेम, आसक्तीच्या एक लक्षांश प्रेम जरी श्रीपादांच्या विषयी असते तर तुझ्या जन्माचे सार्थक झाले असते. परंतु मोहपाशांनी स्वत:स बांधून घेऊन मोक्षाची एक दिव्य संधि घालवलीस . तू लवकरच दरिद्री होशील. त्या दारिद्रयाचे हरण करण्यासाठी श्रीपाद प्रभूंनी तुला ''शाकदान'' मागितले होते. त्यांना जर तू ते दान दिले असतेस, तर तुला आता येणारे दारिद्रय न येता उत्तम ऐश्वर्य प्राप्त झाले असते. तू स्वत: आपल्या हातांनी ही संधि दवडलीस. श्रीपाद प्रभू करूणेचे सागर आहेत. हा अवतार संपल्यावर ते दुसरा नृसिंहसरस्वती नांवाने अवतार ग्रहण करतील. त्यावेळी तू एक दरिद्री ब्राह्मणाच्या रूपात जन्म घेशील. त्या जन्मात सुध्दा तू घरी राजगिऱ्याची भाजी पिकवशील. त्यावेळी योग्य समय पाहून मी पुन्हा तुझ्या शरीरात प्रवेश करीन. त्यावेळी श्रीपाद प्रभू तुझ्या घरी भिक्षेसाठी येतील. तू प्रेमाने वाढलेली भिक्षा घेऊन तुला ते ऐश्वर्य प्रदान करतील. सध्या मात्र मी तुझे शरीर सोडून जात आहे. श्रीपाद प्रभूंनी केलेला नमस्कार तुला नव्हता तर तुझ्यातील पुण्य स्वरूपात वास्तव्य करणाऱ्या मला होता. त्यांनी मला, तुला सोडून देऊन त्यांच्या स्वरूपात लीन होण्याची आज्ञा केली होती. त्यानुसार मी श्रीपादाच्या स्वरूपात लीन होण्यास जात आहे. आता तुझ्या शरीरात केवळ पाप पुरुषच उरला आहे.'' असे बोलून तो पुण्यात्मा श्रीपादांमध्ये विलीन झाला.
कालांतराने नरसावधानींची प्रकृती क्षीण होत गेली. लोक त्यांच्या शब्दांचा निरादर करू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर विलसणारे विद्वत्तेचे तेज लोप पावले. याच वेळी पीठिकापूरात विषूचि (कॉलराची) साथ पसरली. यात अनेक ग्रामवासी या रोगास बळी पडले. दूषित पाण्यामुळे हा रोग बळावत असल्याचा निष्कर्ष गावातील वैद्यांनी काढला. भयभीत झालेल्या ग्रामवासियांनी यामहामारीच्या रोगावर शास्त्रीय रीतिने निर्मूलन पध्दती काढावी अशी प्रार्थना श्री बापन्नार्यांना केली. श्री बापन्नार्यानी आपल्या अंतर दृष्टीने जाणले की महामारी जलदोषाने झालेली नसून वायुमंडल कलुषित झाल्याने झाली आहे. परंतु बापन्नार्याचे हे मत गावातील वैद्यांना पटले नाही. ग्रामस्थानी ग्रामदेवतेस पशुबली देऊन तांत्रिकाकडून विविध प्रकारच्या पूजा, महामारीच्या निर्मूलनासाठी केल्या. पशूचा बळी दिल्याने त्यांच्यातील प्राणशक्ती बळजबरीने बाहेर काढली जाते व तिला मंत्रोच्चाराने वश करून घेतात. प्राणशक्तीस वृध्दिंगत करण्यासाठी योगाच्या प्रक्रिया किंवा सात्विक आराधनेचा अवलंब करणे अधिक योग्य आहे असे श्री बापन्नार्यांचे मत होते. त्यांनी ग्रामवासियांना असे सुचविले परंतु अंधश्रध्देने त्यांनी पशुबळी देण्याचे थांबवले नाही. गावातील कांही मंडळींनी पशुबळीचा विषय श्रीपाद प्रभूंपुढे काढला. त्यावर श्रीपाद म्हणाले ''ग्रामदेवतेस विनंती केली आहे की तिने पशुबळीचा स्वीकार करू नये.'' श्रीपादांच्या आज्ञेनुसार ग्रामदेवता समुद्रस्नान करण्यास गेली आहे. आता दूध उतू घालून देवतेस नैवेद्य अर्पण केल्यास या रोगराई पासून तुमची सुटका होईल. कालिकेचे रूप धारण केलेली ग्राम देवता शांत होईल. ही वार्ता गावातील सर्व लोकांना कळविण्यासाठी एका चर्मकारास बोलावून चर्मवाद्यावर दवंडी पिटविण्यास सांगितले. दवंडी कोणी पिटायची असे विचारल्यावर श्रीपाद म्हणाले विषुचि रोगाने ग्रस्त वेंकय्या याने दवंडी पिटावी, असा माझा निरोप त्यास सांगा. ते सर्व ग्रामवासी वेंकय्याजवळ गेले, तो मरणासन्न होता. त्याला हा निरोप देताच तो मुरच्छित पडला. एका घटकेनंतर जेव्हा तो शुध्दिवर आला तेव्हा तो पूर्णपणे बरा झाला होता. ही बातमी हा हा म्हणता संपूर्ण पीठापुरममध्ये चर्चेचा विषय झाली. व्यंकय्याने गावात फिरून चोहिकडे दवंडी पिटली. बापन्नार्यानी आपल्या सेवकास, पाण्याने भरलेले एक मोठे भांडे त्यांच्या समोर आणून ठेवण्यास सांगितले. वायुमंडलातील विषारी किटाणूंचा नाश करण्यासाठी योग्य त्या मंत्राचे संधान केले. आणि तत्काळ हवेतील विषारी किटाणू पाण्यात टप टप येऊन पडले. अशा प्रकारे वायुमंडल शुध्द झाले आणि महामारी रोगाचे निर्मुलन झाले.
श्रीपादांच्या जन्मतिथीस (वाढदिवसाच्या दिवशी) राजशर्मा पत्निसह श्रीपादांना घेऊन, बाळाचे आजोबा श्री बापन्नार्य यांच्याकडे आले. ज्या ज्या वेळी बापन्नार्यानी श्रीपादांच्या चरणावरील शुभचिन्हे पहाण्याचा प्रयत्न केला, त्या त्या वेळी त्यांना कोटी कोटी सूर्याच्या तेजस्वितेचा अनुभव येई व ती शुभचिन्हे त्या तीव्र प्रकाशात दिसत नसत. याचे त्यांना राहून राहून आश्चर्य वाटे. परंतु त्या दिवशी उष:काली साळीच्या कोंडयावर दिव्य असे पदचिन्ह दिसले. त्यांनी आपली कन्या सुमतीस विचारले, ''बाळ या कोंडयावरुन कोण गेले. तुमचा लाडका नातूच येथून गेला. आणखी कोण बाबा'' सुमतीने उत्तर दिले. ते पदचिन्ह षोडशवर्षीय कुमाराच्या पदचिन्हासारखे होते. आजोबांनी श्रीपादांना आपल्या मांडीवर घेतले व त्याच्या चरण कमलांचे ते निरिक्षण करू लागले. या वेळी त्यांना दिव्य प्रकाश न दिसता मीच साक्षात दत्तात्रेयांचा अवतार आहे असे सूचित करणाऱ्या सुस्पष्ट अशा चिन्हांचे दर्शन झाले. त्या दिव्य चरणांचे बापन्नार्यांनी कौतुकाने चुंबन घेतले. हा बालक श्री दत्तात्रेयाचा अवतार असल्याचा त्यांचा निर्धार दृढ झाला. त्याच वेळी त्यांच्या मुखातून श्री दत्ताच्यास्तुतीपर पद आपोआप निघाले. त्या दिव्य चरणांच्या दर्शनाने बापन्नार्याच्या अंगी अष्टभाव सिध्द झाले. त्यांच्या डोळयातून आनंदाश्रू वाहू लागले. ते श्रीपादांच्या गालावर ओघळले आणि मोत्याच्या बिंदु सारखे चमकत होते. आजोबानी आपल्या उपरण्याने हळुवारपणे श्रीपादाच्या गालावरील ते थेंब पुसले. या वेळी श्रीपाद म्हणाले. आजोबा तुम्ही सौरमंडलातून शक्तिपात करून ती शक्ति श्रीशैल्यस्थित श्री मल्लिकार्जुन शिवलिंगात आकर्षित केली होती. त्याच वेळी सूर्यमंडलातील ती शक्ति गोकर्ण महाबळेश्वरी व पादगया क्षेत्री स्थित असलेल्या स्वयंभू श्रीदत्तात्रेयांच्या ठायी सुध्दा आकर्षित झाली. गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रास अधिक शक्तिसंपन्न करण्याचा संकल्प आहे. प्राणी मात्रातून जे अनिष्ट स्पंदन बाहेर पडतात त्या स्पंदनाना माझ्यात लय पावून, जे माझे साधक, आश्रित आहेत त्यांच्या प्रति शुभ स्पंदनांचे प्रसारण व्हावे असा माझा संकल्प आहे. गोकर्ण महाबळेश्वर हे परमेश्वराचे ''आत्मलिंग'' आहे. त्याच्या केवळ दर्शनाने मुक्ति साध्य होते. तसेच श्रीशैल्याच्या दर्शनाने सुध्दा मुक्तिचे फळ प्राप्त होते. येथील मल्लिकार्जुनास शक्तिसंपन्न करण्याचा संकल्प आहे. तुम्ही सत्यऋषी आहात. मी यतीच्या रूपात होतो तेव्हा आईने मला नमस्कार केला, त्यामुळे मी अल्पायुषी होणार असे आपले मत होते. परंतु आईने मला श्रीपाद रूपात नमस्कार केला म्हणून मी अल्पायुषी होणार असे म्हणालो तेंव्हा आपल्या दोघांचेही म्हणणे खोटे होऊ नये म्हणून मी केवळ सोळा वर्षे पर्यंत तुमच्या घरी राहण्याचे ठरविले आहे. संसार बंधनातून मुक्तीची इच्छा करणाऱ्या मुमुक्षूंना अनुग्रह देण्याचे कार्य पुढे आहे. मी चिरंजीव असावे असा तुमचा संकल्प आहे, तो मी पूर्तीस नेईन. श्रीपाद श्रीवल्लभ हे स्वरूप गुप्त करेन. नृसिंह सरस्वती हा अवतार घेतला तरी श्रीपाद श्रीवल्लभ रूप हेच नित्य सत्य रूप म्हणून राहील. नृसिंह सरस्वतीचे अवतारकार्य पूर्ण करून श्रीशैल्यास असलेल्या कदलीवनात तीनशे वर्षे पर्यंत तपश्चर्या करून प्रज्ञापूर (अक्कलकोट) येथे स्वामी समर्थ रूपात प्रकट होईन. तेथील वटवृक्षामध्ये माझी प्राण शक्ति प्रवेश करवून मल्लिकार्जुन शिवलिंगात विलिन होईन.
बापन्नार्याना हे सगळे आश्चर्यकारक व अद्भूत असे वाटले. आजोबांच्या घरी पहिल्या वर्षीचा वाढदिवस अति आनंदात व थाटाने साजरा झाला. पीठिकापुरमला त्या दिवशी आणखी एक आश्चर्य घडले. नरसावधानी, देवळाचे पुजारी आणि अजून कांही मंडळी कुक्कटेश्वराच्या मंदिरात दर्शनाला गेले असताना, त्यांना तेथे स्वयंभू दत्तात्रेयांची मूर्ती दिसली नाही. मंदिरातील मूर्ती दिसेनाशी झाल्याची वार्ता गावात दावानलासारखी पसरली. नरसावधानींच्या विरूध्द असलेला एक तांत्रिक मूर्ती अदृश्य होण्याचे कारण नरसावधानींच आहेत असे मोठ्या तावातावाने म्हणू लागला. नरसावधानी क्षुद्र विद्येचे उपासक आहेत त्यांनीच मूर्ती अदृश्य केली, असा प्रचार गावात करण्यास त्याने सुरुवात केली. पिठपुर पीठापुरमच्या ब्राह्मणांनी नरसावधानींच्या घराची झडती घेण्याचे ठरविले . ते ब्राह्मण श्री बापनार्यांना भेटले व झालेला प्रकार सांगितला. तेव्हा बापन्नार्य त्या ब्राह्मणास म्हणाले, सत्य प्रत्ययास येईपर्यंत मौन राहावे. योग्य वेळी या प्रश्नाचे समाधान होईल. नरसावधानींच्या घराची झडती घेऊन संशयित स्थळी खोदकाम केल्यावर तेथे मानव कपाल व क्षुद्र विद्येस उपयोगी पडणाऱ्या कांही वस्तु सापडल्या, परंतु श्रीदत्तात्रेयांची मूर्ती मात्र मिळाली नाही. श्री नरसावधानी मूर्तीच्या चोरीच्या आरोपापासून मुक्त झाले. परंतु ते क्षुद्र विद्येचे उपासक असल्याचे सिध्द झाले. दिवसेंदिवस त्यांची प्रकृति क्षीण होत होती. त्यांच्याकडे एक वांझ गाय होती. तिला बैलाप्रमाणे शेतीच्या कामासाठी वापरीत व वेळेवर दाणा-पाणी सुध्दा देत नसत. एके दिवशी, नरसावधानींच्या विरूध्द असलेल्या तांत्रिकाने त्या गायीच्या शरीरात क्षुधा शक्तीचे आवाहान केले. त्यामुळे त्या गायीने खुंटाचे बंधन तोडून टाकून ती घरात शिरली व घरच्या लोकांना शिंगाने मारू लागली. नरसावधानींनी अतिप्रेमाने लावलेला राजगिऱ्याच्या भाजीचा मळा तिने उध्वस्त केला. त्या गायीच्याजवळ जाऊन तिला दोरीने बांधणे कोणासच शक्य झाले नाही. त्याच दिवशी नरसावधानींच्या घरी त्यांच्या आईचे श्राध्द होते. श्राध्दाचा संपूर्ण स्वयंपाक झाला होता. श्राध्दाच्या ब्राह्मणांचे भोजन झाले होते. घरच्या मंडळीचे मात्र जेवण अजून झाले नव्हते. त्या गायीने सारे अन्न व वडे खाऊन टाकले. याच वेळी बालक श्रीपाद प्रभु आपल्या वडिलांना नरसावधानींच्या घरी घेऊन जाण्याचा हट्ट करू लागले. श्रीराज शर्मा त्यांना घेऊन नरसावधानींच्या घरासमोर जाऊन उभे राहिले. तेवढयात ती गाय नरसावधानींच्या घरातून बाहेर आली. तिने अंगणात उभे असलेल्या श्रीपादांना तीन प्रदक्षिणा घातल्या व नंतर त्यांच्या चरणी नतमस्तक झाली व त्याच अवस्थेत गतप्राण झाली.
या प्रसंगानंतर गावातील लोक अनेक मते व्यक्त करू लागले. गायीने खाल्लेल्या वडयामध्ये विष होते व ते खाल्याने गाय मरण पावली. आता नरसावधानींना गोहत्येचे पातक लागेल असे नाना लोकापवाद उठू लागले. यामुळे नरसावधानी त्रस्त झाले होते. त्या गायीने श्रीपादांना तीन प्रदक्षिणा घातल्या व नंतर त्यांच्या चरणांवर मस्तक ठेऊन प्राण सोडले. त्या कारणाने श्रीपाद हे दैवी अवतार असल्याची सर्व लोकांची खात्री झाली. राजशर्माना आयुर्वेद शास्त्राचे ज्ञान होते. ते नरसावधानींच्या विनंतीनुसार त्यांचा औषधोपचार करीत होते. परंतु त्यांच्या दुर्धर रोगावर औषधाचा कांही परिणाम दिसून येत नव्हता. नरसावधानींची प्रकृती खालावतच गेली आणि त्या रोगातच त्यांचा एके दिवशी देहांत झाला.
नरसावधानींच्या मृत्यूमुळे गावातील लोक श्री राजशर्मानी त्यांना उत्तम औषध दिले नाही. त्यामुळे ते आपल्या जीवास मुकले असे बोलू लागले. कांहीजण म्हणू लागले की श्रीपाद श्रीवल्लभ नरसावधानीकडे रोज जात असत. ते जर दत्तावतारी असते तर नरसावधानींचा मृत्यू कसा झाला ? अनेकांनी गोहत्येचे पातकच त्यांच्या देहांताचे कारण असल्याचा निर्वाळा दिला. नरसावधानींच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी श्री राजशर्मा व श्रीपाद गेले असताना नरसावधानींच्या पत्नीने त्यांचा हात धरून म्हटले ''अरे बाळा श्रीपादा ! चिमुटभर सौभाग्याचे वाण घेण्यासाठी मी दूर दूर पर्यंत हळदी कुंकुवास जात होते. तू दत्तात्रेयच आहेस तर नरसावधानी आजोबाना जिवंत करणे तुला शक्य नाही का ?'' असे म्हणून ती माउली रडू लागली. नवनीतासम मृदु हृदय असलेल्या श्रीपाद प्रभूंनी त्या मातेचे अश्रु पुसले. शवयात्रा सुरू झाली. राजशर्मा व श्रीपाद त्या अंतिम यात्रेत सहभागी झाले. नरसावधानीच्या ज्येष्ठ पुत्राने पित्याच्या चितेस अग्नी देण्यासाठी अग्नी हातात घेतला. त्याच वेळी श्रीपादांच्या नयनांतून दोन थेंब बाहेर पडले. याच वेळी मेघगर्जनेसारख्या आवाजात श्रीपाद म्हणाले ''अहाहा ! मृत झालेल्या पित्याच्या शरीरास अग्नी देणारे पुत्र तर पाहिले. परंतु जिवंत पित्यास अग्नी देणाऱ्या पुत्रास पाहिले नाही.'' हे वक्तव्य ऐकून स्मशानात जमलेले सारे लोक निस्तब्धतेने श्रीपादांकडे पाहू लागले. श्रीपादांनी चितेवर असलेल्या नरसावधानींच्या भ्रूमध्यावर अंगुष्ठाने स्पर्श केला, त्या दिव्य स्पर्शाने नरसावधानींच्या अंगात चैतन्य स्फुरू लागले आणि आश्चर्य असे की कांही क्षणातच ते चितेवरून खाली उतरले. त्यांनी श्रीपाद प्रभूंना साष्टांग नमस्कार केला. नंतर ते सर्व लोकांबरोबर घरी परतले. त्यांना सजीव घरी आलेले पाहून त्यांच्या पत्नीस अत्यंत आनंद झाला. श्रीपादप्रभूंच्या अंगुष्ठ स्पर्शाने नरसावधानींना कर्मसूत्राचे सूक्ष्म ज्ञान आले. त्यांच्या घरातील मृत झालेली वांझ गाय, ही गत जन्मातील नरसावधानींची माता होती. त्यांच्या घरी असलेला बैल हे त्यांचे पिताश्री होते. या गोष्टीचा बोध नरसावधानींना झाला. मरते समयी त्या गायीने श्रीपाद प्रभुंना आपले दुध त्यांनी प्यावे अशी विनंती केली होती. पुढच्या जन्मी जेंव्हा वांझ म्हैस म्हणून ती जन्माला येईल त्यावेळी श्रीपाद प्रभु नृसिंहसरस्वती अवतारात तिचे दुग्धपान करतील. हे श्रीपादानी गायीस दिलेले वचन नरसावधानींना कळले. ज्या तांत्रिकाने नरसावधानींवर प्रयोग केला होता, त्याचा मृत्यू लवकरच होणार असून, पुढच्या जन्मी तो ब्रह्मराक्षसाच्या योनीत जन्म घेणार असून, त्याच्यावर यतिरूपात असलेल्या श्रीपादांचा अनुग्रह होईल असे सूक्ष्म लोकातील विषय नरसावधानींना श्रीपादाच्या कृपाप्रसादाने ज्ञात झाले. त्यांना स्वत:च्या पुढील जन्माची माहिती सुध्दा कळली. पुढील जन्मात त्यांच्या घरी यतीरूपाने श्रीपाद प्रभु येऊन त्यांच्याकडून राजगिऱ्याच्या भाजीची भिक्षा स्वीकारून, राजगिऱ्याचे पीक स्वहस्ते नष्ट करून, त्याच्या मुळाशी असलेला सोन्याच्या नाण्यांनी भरलेला हंडा त्यांना देतील. ही भविष्यवार्ता नरसावधानींना श्रीपादांच्या अंगुली स्पर्शाने कळली होती.
श्रीपादांचा चेहरा अतिशय सात्विक, सुंदर, दैदिप्यमान असा होता. त्यांची तुलनाच होऊ शकत नाही. श्रीपाद प्रभुंनी नरसावधानी आणि त्यांच्या पत्नीस केलेला उपदेश, त्यांचा अनुग्रह केलेली विधाने मी तुला उद्या सांगेन. आता आपण त्यांचे स्मरण करीत भजनात रंगून जाऊ या. ज्या ठिकाणी त्यांचे नामस्मरण, भजन, कीर्तन होते, त्या ठिकाणी श्रीपाद प्रभु सूक्ष्म रूपाने संचरण करीत असतात, हे अक्षर सत्य आहे. तिरुमलदासासारख्या भक्ताच्या सत संगतीने आनंदाने आम्ही पुलकित झालो.
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥

Monday, April 1, 2019

श्रीपाद वल्लभ चरित्र अमृत :- अध्याय -5

॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ 
अध्याय -५
शंकर भट्टाचे तिरुपतीला पोहोचणे काणिपाकात तिरुमलदासांची भेट 
श्रीपादांच्या अनुग्रहाने शंकर भट्टाची शनिपीडा निवारण
मी माझ्या प्रवासात परम पवित्र तिरुपती महाक्षेत्रास आलो. माझ्या मनात केव्हाही न अनुभवलेल्या शांतीचा अनुभव आला. तिरुपती महाक्षेत्रातील पुष्करणीचे स्नान करून श्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतले. मंदिराच्या अंगणातच ध्यानस्थ झालो. ध्यानात श्री वेंकटेश्वरांना स्त्रीमूर्तिरूपात पहिले. बालत्रिपुरसुंदरी या रूपात पाहिलेली मूर्ति थोडया क्षणां तच परमेश्वराच्या रूपात बदलली, आणि थोडया वेळाने महाविष्णुच्या रूपात बदलली. ध्यानात असतानाच काही वेळाने ती मूर्ती चौदा वर्षाचे वय असलेल्या अतिसुंदर काया धारण केलेल्या बालयतीच्या रूपात प्रकट झाली. त्या बाल यतीची दृष्टी अमृतमय असल्याचे जाणवले. नेत्रद्वयातून हजारो मातेच्या वाच्छल्यानुरागाची जणु वर्षाच होत होती. एवढयातच त्या बालयतीजवळ काळया रंगाचा एक कुरूप माणूस पोहोचला. तो त्या बालयतीस म्हणाला, ''श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू ! आपण साऱ्या जगाचे नियंत्रण करणारे आहात. तुमचा भक्त असलेल्या शंकर भट्टाला आजपासून साडेसातीचा प्रारंभ होत आहे. या विश्वात अनेक प्रकारचे कष्ट आहेत ते मी त्याच्या अनुभवास आणीन. प्रभूंच्या आज्ञेसाठी येथे उभा आहे.'' करुणांसागर प्रभु म्हणाले, ''अरे शनेश्चरा ! तू कर्मकारक आहेस. जीवांना कर्मफलितांचे अनुभव करवून त्यांना कर्मविमुत्तच् करतोस. तू तुझ्या धर्माला अनुसरून कर्तव्य कर. आश्रित जनांचे रक्षण करणे ही माझी प्रतिज्ञा आहे. म्हणून शंकर भट्टाला मी तुझ्या पासून झालेल्या कष्टकाळात सहाय्य करून कशी सुटका करून देतो ते तू बघ.'' श्रीपाद महाराज आणि शनैश्चराचे असे संभाषण झाल्यावर दोघेही माझ्या ध्यानातून निघून गेले. परंतु नंतर भगवन्मूर्तिचे ध्यान करणे कठीण झाले. माझ्या कष्टकाळाची सुरूवात झाली. श्रीपादांकडून माझी कष्टातून सुटका होईल याचा दृढ विश्वास होता. मी तिरुमलाहुन तिरुपतीला आलो.
तिरुपतीच्या रस्त्यावर मनाला वाटेल तसे चाललो होतो. मन चंचल होते. एक न्हावी मला बळजबरीने थांबऊन म्हणाला, ''तू वीस वर्षापूर्वी घरातून पळून गेलेला सुब्बय्या आहेस ना ? तुझे आईबाप काळजी करीत आहेत. तुझी भार्या रजस्वला झालेली आहे. ती वयात आली आहे. तू तिच्या बरोबर संसार कर. मुलाबाळासहित सुखी रहा. तेव्हाच मी म्हणालो, ''अहो, मी शंकरभट्ट नावाचा कन्नड देशात राहणारा ब्राह्मण. वाटसरू आहे आणि पुण्यक्षेत्र संचार करीत येत आहे. मी दत्तभक्त आहे. श्री दत्तप्रभू श्रीपाद श्रीवल्लभ या नामरूपाने अवतरले आहेत, असे ऐकून कुरूगड्डीला प्रयाण आरंभिले आहे. परम पवित्र गायत्रीची शपथ घेऊन सांगतो, मी ब्रह्मचारी आहे. मी तुम्ही म्हणता तो सुबय्या न्हावी नाही.''
परंतु माझा आवाज ऐकणारे कोणी नव्हते. तेथे पुष्कळ लोक जमा झाले होते. प्रत्येकजण कोणत्या न कोणत्या रीतिने माझी निंदाच करीत होता. मला सुब्बय्या नावाच्या माणसाच्या घरी नेण्यात आले. सुब्बय्याचे आई वडील मलाच त्यांचा मुलगा समजून अनेक प्रकारे माझी समजूत घालीत म्हणाले, या पुढे आम्हाला सोडून जाऊ नकोस. रजस्वला स्त्रीला सोडून जाणे हा महाअपराध आहे. त्यातील एक माणूस म्हणाला, ''सुब्बय्या दाढी आणि मिशांनी झाकला गेला आहे. याचे क्षौरकर्म केल्यास पूर्वीची कळा येईल.'' मी सुब्बय्या नाही असे अनेकदा सांगितले परंतु माझे ऐकणारे कोणीच नव्हते. बळजबरीने माझे क्षौर कर्म करण्यात आले. गुळगुळीत गुंडू केला. दाढी, मिशा पण काढून टाकल्या. माझ्या गळयातील पवित्र यज्ञोपवित सुध्दा काढून टाकले. माझ्यासाठी त्यांच्या माहितीतल्या एका भूत वैद्याला बोलावण्यात आले. त्याने चित्रविचित्र अशी वेशभूषा केली होती. त्याच्या भयंकर दृष्टीनेच माझ्या हृदयात कांपरे भरले. मला बांधून चाकूने माझ्या डोक्यावर वार केला गेला. त्यावर लिंबाचा रस आणि विविधप्रकारचे रस ओतले गेले. मला तो त्रास सहन होत नव्हता. हा सगळा छळ झाल्यावर सुब्बय्याला ब्राह्मण भूताने पछाडले आहे, म्हणूनच हा जानवे घालून मंत्र बरळतो असा निर्णय घेण्यात आला. तिरुपतीत असलेले ब्राह्मण सुध्दा स्तब्धच झाले होते. ह्या नगरात आलेला वाटसरू सुब्बय्याच आहे, त्याला एका ब्रह्मराक्षसाने बाधले आहे असेच ते समजले. मला त्या गावातील मोठ्या श्रेष्ठ ब्राह्मणांकडे नेले गेले. मी कन्नड देशीय स्मार्त ब्राह्मण आहे, भारद्वाज गोत्राचा आहे. नमक चमक मला येते, संध्या वंदन पण करतो असे माझ्या सांगण्यावर त्यांचा विश्वासच नव्हता. सुब्बय्यास एका कन्नड ब्राह्मण भूताने झपाटले आहे, त्यासाठी योग्य चिकित्सा करून परत पूर्वीसारखे करावे. असे त्या श्रेष्ठ ब्राह्मणांनी सांगीतले.
घावाने झालेल्या त्रासाने मी चक्राऊन गेलो. माझे रुदन केवळ अरण्यरुदनासारखेच झाले. शुध्दीवर आलो तेव्हा माझ्या समोर माझ्या सारखाच काळे तेज असलेला एक विकृत आकाराचा माणूस बसलेला आहे असे वाटले. तो माझ्याशी काही न बोलता माझ्यामध्ये समाऊन गेला. माझ्याशी तदाकार झाला. साडेसातीच्या प्रभावाने साडेसात वर्ष माझा कष्टकाळ आहे. याची कल्पना मला आली. श्रीपाद श्रीवल्लभच या कष्टाच्या काळात माझे रक्षण करतील असा मला दृढ विश्वास होता. तेवढया तापात सुध्दा मी मनात श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करीत होतो. श्रीचरणांचे नामस्मरण केल्याबरोबर माझा त्रास कमी होण्यास सुरुवात झाली. भूतवैद्य मात्र कोंबडया, बकऱ्यांची बळी देत, चित्रविचित्र पूजा करीत होता. मला मात्र पथ्याचा आहार दिला होता. सुब्बय्याला ब्राह्मण भूताने बाधले आहे, त्यामुळे त्याला शाकाहारच दिला पाहिजे असे मांत्रिकाने सांगितले. श्रीपादांच्या अनुग्रहानेच मला शाकाहार दिला गेला, याचे मनाला बरे वाटले. तीन दिवस मी तीव्र नरक यातना भोगल्या. त्या संकटात सुध्दा मी श्रीचरणांचे स्मरण न चुकविल्यामुळे चौथ्या दिवसापासून संकटे येणे बंद झाले. ते लोक माझ्या शरिरावर चित्रविचित्र असे प्रयोग करीत होते. मांत्रिक मधून मधून चाबकाने मारत होता. ''श्रीवल्लभा शरणं शरणं'' अशी दीनतेने हाक मारीत मी रडत होतो. श्रीदत्ताची अनन्य भक्तीने सेवा करणाऱ्याला ही अशी नरकबाधा कशी असते, याचे मला आश्चर्य वाटत होते. तेवढयातच विचित्र घडले. माझ्या शरिरावर चाबकाचा मार बसला परंतु मला किंचित सुध्दा त्रास झाला नाही. तेव्हा मांत्रिकच रडू लागला. तो मला मारत होता, पण त्याच्या माराचा त्रास त्यालाच होत होता. हे कसे घडते हे त्याला समजत नव्हते. तो माझ्याकडे वेडसर नजरेने पाहात होता. मी मात्र ही श्रींचीच लीला आहे असे समजून हसलो. मी पथ्याचेच जेवण जेवत होतो परंतु ते सुध्दा मला मधुर वाटत होते. मी पोटभर जेवण्यास सुरूवात केली. जेवण श्रीपादांच्या अनुग्रहाचा प्रसाद समजून जेवत होतो. तो मांत्रिक मात्र त्याच्या आवडीचे कोंबडया बकऱ्या खात असला तरी त्याला ते विषासाखेच भासत होते. त्याची तब्येत पण क्षीण होत होती. तो मला त्रास देण्याचे सोडून केवळ मंत्र, पूजा वगैरे करून वेळ घालवीत होता. माझा इलाज सुरू झाल्यापासून पाचव्या दिवशी त्याचे घर जळून गेले. त्या घरात अग्नी नव्हताच, तरीसुध्दा सगळयांच्या देखतच अग्नी प्रकट झाला आणि क्षणातच सगळे राख झाले. सहाव्या दिवशी तो खिन्नतेने सुब्बय्याच्या घरी येऊन म्हणाला, ''सुब्बय्याला लागलेले ब्राह्मण भूत मांत्रिक होते. त्याने माझ्या घराला मांत्रिक प्रयोगाने दग्ध केले.''
वेताळ वगैरे अनेक क्षुद्रशक्तींना प्रसन्न करण्यास, अनेक प्रकारच्या पूजा कराव्या लागतील, त्यासाठी अधिक धनराशी लागेल असे त्याने सूचित केले. मंत्रातंत्राचा काहीच उपयोग नव्हता. मांत्रिक धनाच्या आशेने असे वागत होता हे मला माहित होते. विधिचे विधान मानून मान खाली घालून, सुब्बय्याच्या पत्नीला माझीच पत्नी म्हणून स्वीकार करण्याची वेळ आल्यास त्याच्यापेक्षा अधिक लाजिरवाणी परिस्थिती काय असणार ? त्यापेक्षा मोठा विश्वासघात कोणता असू शकतो. याची मला खंत वाटली. विधी माझ्या जीवनाशी एवढया क्रूरतेने का खेळत आहे समजत नव्हते, उलगडत नव्हते. माझे काळीज कापत असल्याचा अनुभव येत होता. मी सुब्बय्याच्या आई-बापांना म्हणालो, ''माझे माय बाप ! तुमच्या सर्व स्थावर संपत्तिची विक्री करून या मांत्रिकाच्या मायाजाळात पडू नका. माझी तब्बेत चांगलीच आहे. मी तुम्हाला आई-बापासारखेच मानतो.'' तेवढयावरच मला मांत्रिकाकडून मुक्ती मिळाली. सुब्बयाचे आई-वडील अत्यानंदीत झाले. त्यांच्या डोळयातील आनंद पाहून माझे डोळे पण ओले झाले. परस्त्री मातेसमान असते म्हणून येणाऱ्या संकटातून माझी रक्षा करावी. धर्म भ्रष्ट होऊ देऊ नये, अशी अत्यंत दीनपणे मनातल्या मनातच श्रीपादांची प्रार्थना करीत होतो.
माझा इलाज सुरू झाल्यावर आठव्या दिवशी माझी सेवा करणाऱ्या सुब्बय्याच्या पत्नीला बघून म्हणालो. ''माझ्या बाबतीत तू काय समजतेस ? मी खरा खरा सुब्बय्याच आहे यावर तुझा विश्वास आहे का ?'' त्यावर ती म्हणाली. ''मी दोन वर्षाची असताना माझे लग्न झाले. आता माझे वय 22 वर्ष आहे. आपण माझे पती आहात का नाही ते त्या परमेश्वरालाच माहीत, दुसऱ्या कोणालाहि माहित नाही. नूतन यौवनांत पदार्पण केलेल्या पत्नीस पाहून पुरूष स्थिर राहू शकत नाही. आपण इतका त्रास सहन करीत असताना सुध्दा मला पत्नी या नात्याने स्विकारले नाही. स्पर्श केला नाही, हे सगळे उत्तम संस्कार असणाऱ्यालाच शक्य आहे. तुमच्या विषयी मला कसलीच भावना नाही. मी कुळाचराला अनुसरून धर्मानेच जीवन कंठायचे ठरवले आहे. आपण माझे पति असल्यास या चरण दासीला सोडून जाऊ नये. माझा नवरा पळून जाऊन 20 वर्षे झाली. माझा विवाह बालपणातच झाला तो मला नकळतच. या कारणास्तव तुम्ही मला आपली पत्नी म्हणून स्वीकार करू शकता. मी तुमच्या मार्गदर्शनाखालीच राहीन. तुम्ही नेहमी स्मरण करता ते श्रीपाद श्रीवल्लभांचे स्मरण करीन. त्या सद्गुरुंच्या चरणी ह्या जटिल समस्येचे धर्मसम्मतिपूर्वक निवारण करावे अशी मी प्रार्थना करीन.''
तिचे वक्तव्य मला युक्ति संगत असल्यासारखे वाटले. मी म्हणालो, ''श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात दत्तप्रभूच आहेत. या कलियुगात त्यांनी अवतार घेतला आहे. प्रस्तुत ते कुरवपुरांतच आहेत. आपल्या भक्तीभावास अनुसरून त्यांचे वर्तन असते. श्रीपाद श्रीवल्लभांना सद्गुरु या रूपाने स्मरण केल्यास सद्गुरुसारखेच अनुभव येतात. परमात्मा या रूपाने स्मरण केल्यास, तेच परमात्मा आहेत असे सिध्द करतात. तू सुध्दा श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण कर. अचूक कर्तव्याचा बोध होईल. सगळयांना आनंदमय परिणाम लाभतील.''
त्या दिवशी वाडयात भविष्य सांगणारा एक माला जंगम आला. जंगमाच्या वेशात असलेल्या त्या माणसाकडे ताडपत्री ग्रंथ होते. आमच्या वाडयातील सर्वजणांना थोडयाच कालावधीत तो फार आदरणीय झाला. त्याला भेटलेल्या सर्व भाविकांना तो भूत भविष्याची माहिती अत्यंत अद्भूत प्रकारे सांगत असे. त्याच्याजवळचे ताडपत्र ग्रंथ हे नाडी ग्रंथ असून, त्याला रमलशास्त्र असे नाव होते. त्यातील विषय अचूक असून त्यात सांगितलेल्या घटना बरोबर घडतात असे तो सांगत असे. सुब्बय्याच्या जनकांच्या समजूतीसाठी तो आमच्या घरीसुध्दा आला. माझ्या हातात थोडया कवडया देऊन त्या खाली टाकण्यास सांगितल्या, त्यानंतर गणित घालुन त्याच्या ताडपत्राच्या ग्रंथातून एक पत्र काढून त्याने वाचण्यास सुरूवात केली. ''प्रश्न केलेला माणूस शंकरभट्ट नावाचा कन्नड ब्राह्मण आहे. दत्तावतारी श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राचे लिखाण हाच करेल. पूर्वजन्मी हा आणि याचा एक मित्र कंदुकूर ह्या शहराच्या थोडयाच दूर असलेल्या मोगलीचर्ला ह्या ग्रामात जन्मले. जुगार खेळण्यात त्यांची विशेष आसक्ती होती. त्या ग्रामात एक प्रसिध्द स्वयंभू दत्ताचे देऊळ होते. हा श्री दत्त देवालयाच्या अर्चकाच्या भावाच्या रूपात जन्मास आला. मोठ्या भावाच्या अनुपस्थितीत पूजा वगैरे हाच करीत असे. दत्त देवालयाच्या प्रांगणात हा आणि याचा मित्र दोघेही जुगार खेळण्यात मग्न असत. हा किती अनाचार आहे याची त्यांना खंत नव्हती त्याच्या मित्राबरोबर एके दिवशी खेळताना त्याने विचित्र अशी अट ठेवली . त्याचा मित्र जिंकल्यास हयाने खेळात हरलेली रक्कम द्यावी आणि हा जिंकला तर त्याच्या मित्राने आपल्या पत्नीस ह्याला द्यावे असे ठरले . या कराराला साक्ष म्हणजे हे दत्तप्रभूच आहेत असे मानून प्रमाण करून जुगार खेळण्यास सुरूवात केली. ''
आपल्या समक्ष अत्यंत वाईट खेळ चालू असलेला दत्तप्रभू बघतच होते. खेळामध्ये शंकरभट्ट विजयी झाला. शंकराच्या मित्राने त्याच्या पत्नीस त्याला देण्याचे नाकारले. भांडण मोठ्या माणसांपर्यंत गेले. कुळातील सुज्ञ लोक एकत्रित जमले. पवित्र अशा दत्तप्रभूंसमोर एवढे मोठे दुष्कृत्य घडले, ही अत्यंत खेदपूर्ण घटना होती. परस्त्रीचा मोह करूनन तिला वक्रमार्गाने प्राप्त करून घेण्याची इच्छा दर्शविल्या बद्दल शंकर याच्या डोक्यावर गरम गरम तेल घालावे. तसेच खेळामधे आपल्या पत्नीस पणाला लावलेल्या ह्यांच्या मित्राला नपुंसकपणा येण्यासारखे अंगछेदन करावे. असे केल्यावर त्या दोघांना ग्रामातून बहिष्कृत करावे असा न्याय सूज्ञांनी दिला. त्यांच्या न्यायाची अंमलबजावणी करण्यात आली. शंकरभट्टाने त्याच्या पूर्वजन्मी थोडाकाळ दत्त सेवा केल्यामुळे ह्या जन्मी देवभक्ति असलेला जन्म प्राप्त झाला. त्याचा मित्र सुब्बय्या या नावाने क्षौर कर्म करणाऱ्यांच्या घरी परमपवित्र अशा तिरुपती क्षेत्रात जन्मला. त्याचे मन चंचल झाल्यामुळे वेडा होऊन लग्न झाल्यानंतर पळून गेला. भोळसर असलेली सुब्बय्याची पत्नी निर्दोष आहे. तिच्या पातिव्रत्याच्या प्रभावाने सुब्बय्याच्या मनाची चंचलता कमी होऊन हे रमल शास्त्र ऐकल्याच्या दुसऱ्या दिवशी सुब्बय्या परत येईल. त्या दिवशी शंकरभट्टाची सुटका होईल. शंकरभट्टाला असलेली साडेसाती श्रीपाद श्रीवल्लभांच्या अनुग्रहाने साडेसात दिवसांतच निघून जाईल. भगवंताला साक्ष ठेऊन अनुचित संकल्प केल्यास अथवा, अधर्म केल्यास दत्तप्रभूंच्याकडून कठींनातील कठीण शिक्षेस पात्र होतात. सुब्बयाच्या मन चंचलतेच्या परिहारास्तव शंकरभट्टाच्या पुण्यातील थोडा भाग खर्च झाल्याचे चित्रगुप्ताने लिहिले आहे. कर्माचा प्रभाव अत्यंत सूक्ष्म रीतिने काम करीत असतो, ह्या सत्याची जाणिव होऊन जीवाने सदैव सत्कर्मच करावे. दुष्कर्म कधीहि करू नये. श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्म पत्रिकेप्रमाणे त्यांच्या अवतार समाप्ती नंतर थोडया शतकांनी त्रिपुर देशातील अक्षयकुमार या नावाच्या जैन मतस्थाकडून श्री पीठिकापुरत श्री प्रभूंची माहिती पोहोचेल. त्या अगोदर विलासांची माहिती देणारे 'श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ' या नावाचा ग्रंथ प्रकाशीत होईल.''
श्रीवल्लभांच्या करुणेचे वर्णन कसे करावे ? दुसऱ्या दिवशीच सुब्बय्या स्वगृहास परतला. त्याच्या मनाचे चंचलत्व पूर्णपणे मिटून तो स्वस्थचित्त झाला होता. सुब्बयाच्या पत्नीस मी माझी बहिण मानले. सुब्बय्याच्या माता-पित्याची परवानगी घेऊन मी चित्तूर जिल्हयातील काणिपाकं ग्रामास पोहोंचलो.
काणिपाकं हे ग्राम चित्तूरहून थोडयाच अंतरावर आहे. त्या ग्रामात वरदराज स्वामींचे देऊळ,मणिकंठेश्वर स्वामींचे देऊळ, वरसिध्दी विनायकाचे देऊळ आहे. मी देवदर्शन घेऊन बाहेर आलो. तिथे एक उंच कुत्रे उभे होते. मला भीती वाटून मी वरसिध्दिविनायकाच्या देवळात परत गेलो. थोडावेळ देवाचे ध्यान करून बाहेर आलो. त्या कुत्र्याबरोबर अजून एक कुत्रा तेवढयाच उंचीचा होता. आज ह्या कालभैरवाकडून चावणे हे निश्चितच आहे अशी भीति वाटली. परत वरसिध्दिविनायकाच्या मंदिरात गेलो. मंदिरातील पुजाऱ्याला माझे वर्तन विचित्र वाटले. ''बाबा तू घटके घटकेला बाहेर जाऊन परत मधे येतो आहेस याचे कारण काय ?'' असे त्याने विचारले. मी माझ्या भीतीचे कारण सांगितले. ''ते निष्कारण कोणाला कांही इजा करित नाहीत. ते एका धोब्याचे पाळीव कुत्रे आहेत. तो धोबी दत्तभक्त आहे. श्रीपाद श्रीवल्लभ या नामाने श्रीदत्तांनी या भूमीवर अवतार घेतला आहे, असे तो सांगत असतो. धोब्यांना देवालयात प्रवेश निषिध्द नाही, तरी सुध्दा तो या देवळामधे येत नाही. त्याच्या कुत्र्यास पाठवतो . मी स्वामींच्या प्रसादाचे गाठोडे बांधुन देतो. ते घेऊन ते त्याला देतात. तू दोनच कुत्रे पाहिले असे सांगितलेस. एकूण चार कुत्रे आल्यावरच मी प्रसाद देतो. अजून दोन कुत्रे आले का ते पाहू या'' असे तो पुजारी म्हणाला. आम्ही बाहेर येईपर्यंत चार कुत्रे होते. पुजाऱ्यांनी प्रसादाचे गाठोडे करून दिले. ते चारी कुत्रे माझ्या चारी बाजुंनी आले आणि त्यानी मला घेरले. पुजारी म्हणाला ''कुत्र्यांच्या मर्जीप्रमाणे तू त्या धोब्याकडे जा. तुला शुभकारकच होईल.''
माझ्या जीवनातील प्रत्येक घटना श्रीपाद श्रीवल्लभांच्या निर्देशानेच घडत असते असा माझा विश्वास होता. सुब्बय्याच्या घरात घडलेल्या घटने वरून कुळ, मत भेद नसावा असे मला वाटले. एक चांडाळ ब्राह्मणकुळात जन्म घेऊ शकतो. या जन्मातील ब्राह्मण दुसऱ्या जन्मात चांडाळ रूपाने जन्म घेऊ शकतो. मानव आपण केलेल्या पापपुण्याचे गाठोडे घेऊन जन्मजन्मांतराच्या कर्म प्रवाहात वाहत जात असतो
शंकरभट्ट आणि तिरुमलदासांचा संवाद
मी धोब्याच्या राहत्या गल्लीत आलो. तिरुमलदास असे नाव असलेला तो रजक 70 वर्षाचा म्हातारा होता. तो त्याच्या झोपडीतून बाहेर आला. मी घरात गेल्यावर त्याने मला एका पलंगावर बसवले. ब्राह्मणजन्माचा माझा अहंकार पूर्णपणे गेला होता. श्रीपाद श्रीवल्लभांचे भक्त कोणीही असले तरी मला आत्मियांसारखेच दिसत होते. वरसिध्दिविनायकाच्या देवळातील प्रसाद तिरुमलदासाने मला खाण्यास दिला. मी प्रसाद ग्रहण केला. नंतर तिरुमलदासाने सांगण्यास सुरुवात केली.
आइनविल्लिचे गणपतीच श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतरले
ते म्हणाले ''बाबा ! आजचा दिवस माझ्या अत्यंत भाग्याचा आहे ! आपल्या दर्शनाचा लाभ घडला. तुम्ही माझ्याकडे कधी याल, माल्याद्रीपुराचे आणि श्रीपीठिकापुर येथील विशेष वार्ता कधी सांगाल याची उत्सुकतेने वाट पाहातो आहे. बाबा ! शंकरभट्टा ! वरसिध्दि विनायकाचा प्रसाद घेतलास. तू आजच्या दिवशीच श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामृताचा श्रीगणेशा कर. तुला श्रीवल्लभांचा आशिर्वाद कुरवपुरात लाभेल. तिरुमलदासाने ह्याचा पूर्व वृतांत सांगायला सुरुवात केली. मी पूर्वजन्मी एक प्रतिष्ठित वेद पंडित होतो. परंतु परमलोभी होतो. माझ्या मृत्यूसमयी नुकतेच जन्मलेले गाईचेवासरू जुन्या चिंधिस चघळताना पाहून त्यास जपून ठेवण्यास मुलांना सूचना दिली. मरतेवेळी मलिन वस्त्रावर नजर ठेऊन मी प्राणत्याग केला त्यामुळे रजकाच्या जन्मास आलो. मरतेवेळी ज्या संकल्पाने प्राणत्याग होतो त्याला अनुसरून त्याला दुसरा जन्म मिळतो. माझ्या पूर्वपुण्याईनेच गर्तपुरी (गुंटुरू) मंडळातील पल्यनाडू प्रांतातील माल्याद्रीपुरात मी जन्मलो. तेच मल्याद्रीपुर कालांतराने मल्लादि या नावाने ओळखले जाऊ लागले. त्या ग्रामात मल्लादि नावाची दोन घराणी होती. मल्लादि बापन्नावधानि या नांवाचे महापंडित हरितस गोत्राचे होते. मल्लादि श्रीधरअवधानी या नांवाचे महापंडित कौशिक गोत्रीक होते. श्रीधरअवधानी यांची बहिण राजमांबा हिचा विवाह बापन्नावधानी यांच्या बरोबर झाला. गोदावरी मंडलांतर्गत असलेल्या ''आइनविल्लि'' या ग्रामात झालेल्या गणपती महायागास दोघेही गेले होते. शास्त्राप्रमाणे शेवटच्या आहुतीचा गणपती आपल्या सोंडेत स्विकार करील आणि आपले स्वर्णकांतीयुक्त स्वरूपाचे दर्शन देईल असे पंडितांचे मत होते. यज्ञाच्या शेवटी स्वर्णमयकांतीने गणपतीने दर्शन दिले. शेवटची आहुती आपल्या सोंडेत घेतली आणि मी स्वत: संपूर्ण कलेने गणेशचतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने अवतार घेईन असे वचन दिले. यज्ञास आलेले सगळेच लोक आश्चर्यचकित झाले. त्या सभेत तिघे नास्तिक होते. ते म्हणाले, ''दिसते ते सगळेच इंद्रजाल आहे की महेंद्रजाल आहे, पण गणपती मात्र नाही. तसे असलेच तर परत एकदा त्याचे दर्शन घडवून आणावे.''
काणिपूर विनायकाचा महिमा
होमकुंडातील विभूतीने मानवाचा आकार घेतला. त्यानंतर ती महागणपती स्वरूपात रूपांतरित झाली. ते रूप बोलु लागले. ''मुर्खानो ! त्रिपुरासुराच्या वधाच्या वेळी शिवाने, बलिचक्रवर्तीचा निग्रह करण्यापूर्वी तसेच शिवाचे आत्मलिंग घेऊन जाणाऱ्या रावणास विरोध करते वेळी भगवान विष्णुने, महिषासुराचा वध करण्याच्या समयी पार्वतीने, भूभार घेण्यापूर्वी आदिशेषाने, सर्व सिध्दी सिध्द होण्यापूर्वी सिध्दमुनींनी, प्रंपचावर विजय साधण्याच्या निमित्ताने मन्मथाने, याच प्रमाणे सकल देवतांनी माझी आराधना करूनच अभीष्ट प्राप्त केले. सगळया शक्तींचे मीच भांडार आहे. मी सर्वशक्तिमान आहे, राक्षस शक्ति सुध्दा माझ्यामध्येच आहे. सर्व विघ्नकर्ता मीच, सर्व विघ्नहर्ता सुध्दा मीच आहे. दत्तात्रेय म्हणजे कोण समजलात ? हरिहर पुत्र असलेला धर्मशास्ता तोच. विष्णुरूपात ब्रह्मारुद्र रूप विलीन झाले तेच दत्तरूप होय. धर्मशास्तारूपात गणपती, षण्मुख रूप विलीन झालेले हे रूप सुध्दा दत्तरूपच आहे. दत्तात्रेय हे सर्वकाळ त्रिमूर्ति स्वरूपच असतात. श्रीपाद श्रीवल्लभ रूपात महागणपती असल्याने गणेशचतुर्थीच्या दिवशीच त्यांचा अवतार होईल. त्यांच्या मधे सुब्रह्मंण्याचे तत्त्व असल्याने ते केवळ ज्ञान अवतार म्हणून ओळखले जातील. धर्मशास्ता तत्त्वामुळे ते रूप समस्त धर्म, कर्माचे आदि, आणि मूळ असे समजले जातील. हा अवतार माता-पित्याच्या संयोगाचे फळ नसेल. ज्योतिस्वरूपच मानवाकृतीचे रूप घेईल.'' श्री गणपती पुढे म्हणाले मी तुम्हाला शाप देत आहे. सत्यस्वरूप पाहुन सुध्दा ते असत्यआहे असे म्हणालात, त्यामुळे तुमच्या पैकी एक आंधळा जन्मेल. सत्यस्वरूपाची प्रशंसा न करता टिंगल केल्यामुळे तुमच्या पैकी एक मुका जन्मेल. एवढा जनसमुदाय निजभक्त , त्या सत्याच्या बाबतीत सांगत असता दुर्लक्ष करून न ऐकल्यामुळे तुमच्यापैकी एक बहिरा जन्मेल. तुम्ही तिघे बंधुरूपाने जन्माल. माझ्या स्वयंभू मूर्तीचे दर्शन घेतल्यावरच तुम्ही दोषरहित व्हाल.
बाबा ! ते तिघेही या काणिपुरात भावंडाच्या रूपात जन्मले. त्रिमूर्तिना दूषण दिल्यास, घोर अनर्थ होतो. ही तीन भावंडे, एक एकर जमिनीत, याच ग्रामात उत्पन्न काढीत असत. त्या शेतात पायथ्याला एक विहीर होती. मोटेच्या सहाय्याने पिकांना पाणी देण्याची सोय केली होती. एका वर्षी दुष्काळ पडला. जमिनीतील पाणी वाळून गेले. एके दिवशी विहिरीत असलेले पाणी सारे खर्च झाले, फावडा घेऊन तिघेही वाळू काढण्याच्या प्रयत्नात होते. त्या पाण्याखालील भागात असलेल्या दगडावर फावडा लागुन रक्ताचा फवारा वर आला. रक्त हाताला लागल्याने मुक्याला वाचा फुटली. पाणीसुध्दा विहीरीत यथाविधी भरू लागले. पाण्याच्या स्पर्शाने बहिऱ्याचा दोष गेला. तिसऱ्या आंधळयाने त्या पाण्यातील दगडाला स्पर्श केल्यामुळे त्याचे अंधत्व नाहीसे झाले. त्या स्वयंभू विनायकाच्या दगडी मूर्तीच्या डोक्यावर फावडा लागून रत्तच्स्रावास आरंभ झाला. ती स्वयंभू मूर्ती बाहेर काढण्यात आली.
त्या वरसिध्दी विनायकाची प्रतिष्ठापना करण्यास सत्यऋषिश्वर असे नामांतर झालेले बापन्नावधानी आणि त्यांचा मेव्हणा श्रीधरावधानी या ग्रामास आले होते. वरसिध्दी विनायक त्यांना म्हणाले. ''महाभूमी मधून या लोकात आलो. पृथ्वीतत्त्वावर अवतार घेतला. हे तत्त्व कालांतराने अनेक रूपांत रूपांतर होईल. जलतत्त्वात, अग्नीतत्त्वात, वायुतत्त्वात, आकाशतत्त्वात माझे अवतरण झालेलेच आहे. आइनविल्ली मधे तुम्ही केलेल्या महायज्ञातील भस्मानेच हे रूप धारण केले. नंतरच्या कर्तव्याचे आदेश देतो. श्रीशैल्यामधे कळा कमी आहे. सूर्यमंडळातील तेजाचा तेथे शक्तिपात केला पाहिजे. तुम्ही श्रीशैल्यामधे शक्तिपात केल्याच्या दिवशीच गोकर्णामधे, काशीमधे, बदरीमधे, केदारामधे, एकाच वेळी माझ्या विशेष अनुग्रहाने शक्तिपात होईल. श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतरणाचा समय निकट येत आहे. श्रीधरा तुझ्या घरचे नांव श्रीपाद म्हणून बदलत आहे. कौशिक गोत्रिक तुमचे वंशज आजपासून श्रीपाद या अडनावाने ओळखले जातील.''
बाबा ! शंकरा ! मल्यादिपुरातून सत्य ऋषिश्वर आणि श्रीधर पंडित पीठिकापुरत निवास करण्यास गेले. मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या अनेक बाललीला पाहिल्या. उद्या मी तुला त्या सविस्तर सांगेन. माझ्या पहिल्या बायकोपासून मला एक मुलगा झाला. त्याचे नांव रविदास आहे. तो कुरवपुरात राहात आहे. श्रीपादांची यथामतीने सेवा करीत असतो. मी श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेनुसार काणिपुरातच दुसऱ्या पत्नी आणि मुलाबरोबर कुलवृत्तीला अनुसरून रहात आहे. तू श्री पीठिकापुरात अनेक महानुभावांना भेटशील. वेंकटप्पय्या श्रेष्ठी नावाच्या व्यक्तीस भेटशील तेंव्हा अनेक महत्वाच्या विषया बद्दल माहिती मिळेल. श्री श्रेष्ठींना श्रीपाद प्रभु, वेंकटप्पय्या श्रेष्ठी या टोपण नावाने हाक मारीत असत. श्री श्रेष्ठींच्या वंशावर श्रीपादांचा अभयहस्त आहे. वत्सवाई असे उपनाम असलेल्या नरसिंह वर्मांना सुध्दा भेट. त्यांचा श्रीपादांशी घनिष्ट संबंध आहे. तुझ्याकडून रचल्या जाणाऱ्या श्रीपादांच्या चरित्रास श्रीचरणांचा आशिर्वाद लाभेल. तू लिहीलेल्या ग्रंथाखेरीज दुसरा कोणताही ग्रंथ श्रीपादांचे चरित्र संपूर्ण रीतिने माहिती देणारा असणार नाही, ही श्री चरणांची आज्ञा आहे.
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥