*।। श्री राम जय राम जय जय राम ।।*
*🚩श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर🚩*
*🌸 प्रवचने :: ०५ डिसेंबर 🌸*
*नाम सहजपणे येणे याचे नाव 'अजपाजप' .*
एक चांगला गृहस्थ होता. त्याला कसलेही व्यसन नव्हते. त्या गावात एक दिवस एक बुवा आला. या सद्गृहस्थाला भविष्याचा नाद होता. त्याला कुणीतरी सांगितले की, हे आलेले बुवा भविष्य अति उत्तम सांगतात. तो त्यांना भेटायला गेला, परंतु ते गांजा ओढीत होते. त्याला काही तो वास सहन झाला नाही. तरीही, भविष्य ऐकण्यासाठी म्हणून तो एका कोपर्यात बसून राहिला. असे बरेच दिवस गेले. होता होता त्याला बुवा फार आवडू लागले. त्याप्रमाणे तो रोज तिथे जात असे. एक दिवस बुवांनी सांगितले म्हणून चिलमीत निखारा ठेवला; दुसरे दिवशी फडके ओले करून दिले. पुढे त्याला एकदा बुवांनी सांगितले म्हणून त्याने एक झुरका घेऊन पाहिला; आणि हळूहळू सवयीने तो इतका तरबेज झाला की त्याने गांजा ओढण्यात गुरूलाही मागे टाकले ! असा हा संगतीचा परिणाम फार मोठा होत असतो.
ज्याची संगत केली असता भगवत्प्रेम प्रकट होते, तो संत जाणावा. अशाची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी.
श्रीरामप्रभूला आवडणारे 'नाम' घेऊन मारुतिरायांनी त्याला आपलासा करून घेतला. ते नाम तुम्ही अत्यंत श्रद्धेने घ्या,
भगवंताला आपलासा करून घेणे तुम्हालाही अगदी शक्य आहे. नाम कुठेही घ्या, कोणत्याही वेळी घ्या, कितीही हळू घ्या, पण ते श्रद्धेने घ्या, म्हणजे ते भगवंतापर्यंत खात्रीने पोहोचू शकेल.
परमेश्वराच्या प्राप्तिसाठी प्राणायाम, योगासने इत्यादि साधने सांगितलेली आहेत. परंतु त्याहून जास्त महत्त्वाचे म्हणजे परमेश्वराची सहजभक्ति.
भगवंताचे नाम सहजपणे येणे याचेच नाव 'अजपाजप' होय. हा भक्तिचा प्रकार अत्यंत श्रेष्ठ आहे. यात मीपणाचा शेवट आहे.
मीपणा जाणे हीच भगवंताची खरी अनन्यता होय. भगवंताची पूर्ण कृपा म्हणजे भगवंताची एकरूपताच होय.
परमार्थ म्हणजे आपली 'सहजावस्था' झाली पाहिजे; आणि तशी व्हायला अंतरंगाची ओळख करून घ्यायला पाहिजे, म्हणजेच अंतर्मुख बनायला पाहिजे.
भगवंताच्या नसतेपणाने उठलेले वारे म्हणजे काळजी होय.
मनुष्याच्या सर्व दुःखांवर, आजारांवर, आनंद आणि समाधान हेच खरे औषध आहे. जो सदाचरणात आणि भगवंताच्या नामात राहतो, त्याला हे औषध सहजी लाभत असते. या औषधाचा परिणाम नकळत आणि सहजी होत जाऊन तो शेवटपर्यंत टिकून राहतो.
आनंदमय राहण्याकरिता भगवंत हवा. भगवंताकडून येणारी शांति हेच समाधान होय. मन आणि भगवंत यांना जोडणारी साखळी म्हणजे नाम. या नामात आपले सर्वस्व गुंतवले तर आपल्याला भगवंतापर्यंत सहज जाता येईल.
*३४०. नामाच्या आनंदाचा झटका आला की मनुष्य स्वतःला विसरेल आणि जगालासुद्धा विसरेल.*
*।। श्री राम जय राम जय जय राम ।।*
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"