Sunday, September 15, 2019

देव आहे ..... देव नाही : एक अनुभव

व्हाट्सअप्प वर आलेली पण खूपच छान अनुभव ह्या ताईचा. नक्की वाचा.
श्री गुरुदेव दत्त
*देव आहे.....देव नाही*

*जय गिरनारी*
साधारण २००३ मधे मी संधीवाताने आजारी पडले. हळूहळू  *बेडरीडन* झाले. गुडघ्यात गॅप..त्यात लंबर कंप्रेशन....डॉ. नी तातडीने आॅपरेशन करायला सांगितले. काही सुचेना. अगदी पाय घासूनच चालत असे मी. पाय उचलेचना. कुणाचा मानसिक आधार नाही. प्रचंड तणावाखाली जगत होते. दादरच्या *डॉ. रामाणीं* ची ट्रिटमेंट घेत होते. त्यांनी पंधरा दिवसांची मुदत दिली ऑपरेशन साठी. मी फार देवदेव करणारी नाही पण माझी देवावर अपार श्रद्धा आहे. आणि त्याच्या कृपेने खूप सकारात्मकही आहे. दीड वर्ष जागेवर होते पण दृढ विश्र्वास होता मी ह्यातून बाहेर पडणार. माझं प्राक्तन तर मला भोगावं लागणारच होतं पण देवाने माझ्या त्रासाचं प्रमाण खूप कमी केलं. 

कोणी तरी म्हणाले सेकंड ओपिनियन घ्या. डॉ. इंगलहलीकरांचा पत्ता दिला. डॉ. इंगलहलीकर देवा सारखे भेटले. तेव्हा त्यांचे क्लिनीक ठाणे स्टेशनला लागूनच होते. मी त्यांच्या कडे गेले. मला त्यांनी पाऊण तास तपासले आणि स्पष्ट शब्दात ठणकावून सांगितले *मीच काय पण मी हिला कोणालाही हात लावू देणार नाही* हिच्या मसल्स आणि नर्व्हस विक आहेत. हिचं आॅपरेशन करायचं नाही. एका जागेवर बसेल ही. अंतर्बाह्य घाबरले पुर्ण गोठून गेले. त्यांनी माझी अवस्था बघून मला शांत केलं. काही व्यायाम प्रकार दिले. जोडीने पंचकर्म केले आणि जवळजवळ सहा महिने झोपून प्राणायाम केला. देवाला नम्रतेने सांगितले "धावले नाही तरी चालेल पण तू मला चालवणार हे नक्की. दोन वर्षांनी माझ्या पायावर उभी राहिले. 

२०१० मधे  *रेकी* चा कोर्स केला. तिनही लेवल केल्यात. तेव्हापासून आजतागायत न चुकता रेकी करतेच दिड तास, एक तास, अर्धा तास तर करतेच करते.  

आज मी *९५%* ओके आहे. तीच मी आज योगाचे क्लासेस घेते सगळी आसनं करते. देव आपली शिक्षा सुसह्य करतो हे खरं फक्त श्रद्धा आणि सत्कर्माची जोड हवी.

त्याच्याच भरवश्यावर *कर्दळीवन* केले. सात पहाड चढले. आणि तीन महिन्यांपूर्वी दत्तप्रभूंच्या भेटीला *गिरनारला* गुरूशिखरावर जाऊन आले. सगळ्यांनी समजावले होते "बघ विचार कर दहा हजार पायऱ्या आहेत." तुला गुडघ्यांचा त्रास आहे. मनातून घाबरत होते आणि माहाराजांना भेटायचे पण होते. मग रोज *स्वामी समर्थांच्या* मठात त्यांना त्रास द्यायला जायचे. अन् म्हणायचे स्वामी मला शक्ती द्या गिरनार चढायचेय. आणि लक्षात असू द्या तुम्हाला पण माझ्या सोबत यायचेय.‌ आणि  जाण्याचा दिवस उजाडला. द्वारका सोमनाथ जुनागड आणि गिरनार. पोटात गोळे यायचे सारखे आणि मनोमन स्वामी अशी हाक द्यायचे. 

द्वारकाधिशाचं दोनदा मनभरून दर्शन घेतले. सोमनाथाला प्रेमळ विनवणी केली. चल बाबा गड चढायला म्हणून. सोमनाथाचं दर्शन घेताना दोन गृहस्थ भेटले म्हणाले दत्तप्रभूंच्या मागे पंचधातूची कमान बसवली..कालंच गिरनार उतरलो. अहो काय सांगावे प्रचंड पाऊस वारा आणि थंडीने गारठून गेलो आम्ही. गोरक्षशिखरावर तर थंडी,वाऱ्यामुळे चालता येईना. सांभाळून जा काहीतरी गरम कपडे न्या. पुन्हा पोटात गोळा. पुन्हा स्वामींना डोळे बंद करून पाचारण. तितक्यात एक तेजःपुंज पस्तीशीचे गृहस्थ आले हातात चांदीची पेटी आणि त्या पेटीत *माहाराजांच्या* चांदीच्या पादुका. काय वर्णू तो आनंद. नमस्कारा आधी श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा जयघोष केला. आणि नवऱ्याकडे वळून आपली गिरनार वारी सक्सेस होणार असं आपल्याला सांगायला माहाराज स्वत: आलेत बघा असं म्हणाले आणि त्या सद्गृहस्थांना "दादा मी स्पर्श करून नमस्कार करू?" असे विचारले. ते सुंदर हसले..करा हो म्हणाले. मी मस्तक टेकवले आणि संपुर्ण शरीरात काहीतरी शिरतय असं जाणवलं. डोकं वर करवेचना. प्रयासाने दूर झाले. मनात अवधूताना, स्वामींना आळवत. 

लॉजवर येवून सामान घेऊन जुनागड साठी निघालो. छातीत धडधड, पोटात गोळा आणि मुखात स्वामीजप. पहिल्या पाचशे पायऱ्यात पाय जाम झाले. पुन्हा "स्वामी मी डोली करणार नाही तुम्ही मला चढवणार" असं दृढ निश्चयाने सांगितलं. धावा केला. आणि मग भरभर स्वामींनी उचलून नेलं. पाच तास दहा मिनिटात दत्तमहाराजांच्या पुढ्यात. काही सुचेना. नुसतीच चरणकमल बघत होते. ह्यांनी पुजेचं सामान दे म्हंटल्यावर उपरण, चाफ्याची फुले, हिना अत्तर, पेढे यंत्रवत पुजाऱ्याच्या हाती दिले. दिढमुढ अवस्था झाली होती. साक्षात श्रीदत्तप्रभूंनी बारा हजार वर्षे उभं राहून जिथे तपश्र्चर्या केली त्या पवित्र पावन जागेवर आता मी उभी होते..प्रचंड आनंदाचा क्षण होता तो. चलो आगे असे शब्द ऐकून पुढे झाले. गुरूशिखर उतरू लागले. मन माहाराजांच्या धुंदीतच मग्न. 

आणखी एक उपरण नेलं होतं कोणा दिव्यव्यक्तिस देण्यासाठी. आतापर्यंत कोणी तसं जाणवलं नव्हतं. उतरताना *चला* असा मोठ्याने आवाज आला. मी आणि स्मिताताई बाजूला झालो. तेजःपुंज, किरकोळ शरीरयष्टीच्या त्या तरुणात मला चक्क जटाधारी शंकर दिसले कमंडलू सहित. ताई ह्यांना मी उपकरणं देते म्हणेपर्यंत वाऱ्यासारखी ती मुर्ती दिसेनाशी झाली सुद्धा. आम्ही दोघी एकमेकींकडे बघतच राहिलो.
त्यांना मी विचारलं ताई तुम्हाला काही जाणवलं काहो ?? त्या म्हणाल्या माहात्मा वाटतं होते ते. तुम्ही उपरण हातातच ठेवायला हवं होतं.

मी ऐकून होते की गिरनारला प्रत्येकाला दत्तमाहाराज दर्शन देतात आणि बहुतेकांना शंकराच्या वेशात दिसतात. मी स्वत: ती अनुभूती घेतलीय.
तीन दिवस माझे पाय आणि गुडघे एकदम ठणठणीत होते. संधीवाताचा जबरदस्त त्रास असलेली मी कशी काय दहा हजार पायऱ्या चढले..उतरले? आश्र्चर्य होतं खरं. पण हे कोडं नाही तर स्वामींची कृपा आहे.

आहे हो..खरंच आहे..कलियुगातही *देव आहे*.. फक्त श्रद्धापूर्वक अंत:चक्षूने बघा.

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏

भारती वार्डेकर....
नेरुळ, नवी मुंबई....

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"