Friday, August 16, 2019

दत्त महाराजांची अनुभूती म्हणजे नेमकं काय

दत्त महाराजांची अनुभूती म्हणजे नेमकं काय ? सगुण आणि साकार दर्शन दिले तरच त्याला अनुभूती म्हणायचे का ? कि स्वप्नात येऊन काही सांगितले त्याला अनुभूती म्हणायचे ? अनुभूती म्हणजे एक असा अनुभव जो केवळ चित्ताला प्रमाण होतो ,ग्राह्य होतो . दर्शन दिले तर ती निश्चितच मोठी अनुभूती आहे पण केवळ दर्शन म्हणजेच अनुभूती नाही . दत्त महाराजांचे नाम घेण्याची बुद्धी होणे ,ते घ्यावे हे चित्ताला वाटणे हि देखील अनुभूतीच आहे . त्यांचे कोणत्याही प्रकारे स्मरण होणे ,त्यांच्या एखाद्या क्षेत्राला जावे असे वाटणे ,त्यांच्या नाना लीलांचे अवलोकन होणे ,एखाद्या ग्रंथाचे पारायण ,वाचन होणे तात्पर्य दत्त महाराजांशी निगडित काहीही होणे हि अनुभूतीच आहे . अहो मला दत्त महाराज प्रिय आहेत हि गोष्ट आणि दत्त महाराजांना मी प्रिय आहे हि गोष्ट यात जमीन अस्मानाचा फरक आहे . अनुभूती म्हणजेच दत्त महाराजांना आपण प्रिय होणे आणखी काही नाही .

झाडाचे पान देखील त्यांच्या इच्छेशिवाय हालत नाही तेव्हा त्यांचे स्मरण होणे म्हणजेच चित्ताला दत्त महाराजांनी दिलेली चालना आहे हे निश्चित ,तेव्हा नित्य त्यांच्या कथांचे ,लीलांचे स्मरण होणे ,वाचन होणे .चिंतन मनन होणे हि सर्व लक्षणे म्हणजे दत्त महाराजांना आपली कायम आठवण असल्याचीच द्योतक आहेत .

मात्र अनेकदा ह्या उपासनेत विघ्ने कायम अडसर बनू पाहतात .कथा कादंबरी वाचताना होणारी उल्हसित चित्तवृत्ती गुरुचरित्र वाचनावेळी आळसावते ,जांभया येऊ लागतात ,डोळे मिटू लागतात .वाचनाची उरलेली पाने किती याचा बुद्धी वेध घेते .जोरजबरदस्तीने केलेली उपासना फलद्रुप का होत नाही तर चित्त वाचनात नसताना आपण केवळ शब्दांचा वेध घेत असतो . अगदी थोडक्यापासून सुरुवात करावी .लिलांच्या कथा वाचा ,नामस्मरण होऊ द्या ,एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन या ,हळूहळू हे सर्व वाढत जाईल म्हणून थोरले महाराज म्हणत पाच ओव्या तरी रोजच्या चुकवू नका ,ते नित्य पारायण करा का म्हणाले नाहीत तर किती होते यापेक्षा नेमाने काहीतरी होते याला महत्व आहे . यासाठी पुन्हा दत्त महाराजांचीच प्रार्थना करून म्हणायचे कि अहो केवळ तुमची आठवण व्हावी यावर मला मर्यादित न ठेवता नित्य नवविधेची पात्रता येऊ द्या ,कायम सान्निध्य द्या . श्री गुरुदेव दत्त !!!---

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"