Thursday, July 11, 2019

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - ७ जुलै 🙏

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  ७ जुलै  🌸*

*मूल  होऊन  भगवंतापाशी  जावे .*

या जगात कर्माशिवाय कोण राहतो ? पण कर्म यथासांग होत नाही याचे कारण, आपण कर्म कशाकरिता करतो याची जाणीवच होत नाही आपल्याला. अधिष्ठानाशिवाय कर्म साधत नाही. मालक पाठीशी असला की कर्म करणाऱ्याला जोर येतो. काही चांगली कर्ममार्गी माणसे भक्तिमार्गी लोकांना नावे ठेवतात. भक्तिभावाने जो राहतो तो दुसऱ्याला नावे ठेवीत नाही. 

'मी कोण' हे जाणायला ज्ञान आणि भक्ति लागतेच. तसेच, 'ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या' म्हटले तरी त्याचा अनुभव येण्यासाठी कर्म करावेच लागते. उपासना भगवंताला ओळखून करावी. 

लहान मूल आईकडे डोळे करून मुकाट्याने दूध पिते, त्याप्रमाणे समर्थांसारख्यांनी जे सांगितले ते आम्ही निमूटपणे करावे. डोळे मिटून जितके काम होईल, अंधश्रद्धेने जे होईल, ते अभिमानाने, ज्ञानाचे डोळे उघडे ठेवूनही नाही होणार. मूल होऊन भगवंताला ओळखावे. याला अडचण एकच असते; माझे 'शहाणपण' आड येते. भक्त मुलांसारखे वागतात देव त्यांचे लाड पुरवितो. कुणी असे म्हणतील की, "भगवंताची आणि आमची ओळख नाही, तर त्याची आम्ही कशी पूजा करावी ?" "त्याला ओळखल्या शिवाय मी भजन करणार नाही" असे म्हणणे वेडेपणाचेच आहे. 
भगवंताला पुष्कळ मार्गांनी ओळखता येईल. पांडुरंगाकडे जाण्यासाठी काही मार्ग आधी आक्रमणे जरूर आहे. 

संतांनी अखंड जागृत राहण्याचा मार्ग सांगितला; तो असा की, देहाने प्रपंच करा, पण मन भगवंताच्या ठिकाणी अर्पण करा. मन भगवंताच्या ठिकाणी स्थिर झाल्याशिवाय इतर काहीही करून उपयोग नाही.

ध्येय सत्य असल्याखेरीज चित्ताची स्थिरता होत नाही. पण सत्य अशा ध्येयावर अगोदर पूर्ण श्रद्धा पाहिजे. 
प्रपंचात जशी प्रेमाची गरज आहे तशी परमार्थात श्रद्धा पाहिजे. 'देव माझा आहे' असे म्हणण्या‍ऐवजी 'मी देवाचा आहे' असे म्हणावे, म्हणजे श्रद्धा उत्पन्न होते. समुद्राचा तरंग असतो, तरंगाचा समुद्र असतो असे नव्हे.

साधनात निश्चितपणा असेल तर त्यात समाधान आहे; म्हणून साधन श्रद्धेने करीत जावे. जशी श्रद्धा तशी फळे. आपण भगवंताच्या स्मरणात निर्धास्त असावे. प्रपंचात कधीच धीर सोडू नये. 

ज्याप्रमाणे मुंग्यांची राणी जागेवरून हलवली की तिच्यामागे असणाऱ्या हजारो मुंग्या तिच्याबरोबर नाहीशा होतात, त्याचप्रमाणे एक देहबुद्धी काढून टाकली, की आपल्या मनात उठणारे हजारो संकल्प नाहीसे होतात. या देहबुद्धीच्या पलीकडे गेल्यावर जे ज्ञान होते त्यालाच आत्मज्ञान म्हणतात. असे आत्मज्ञान झाल्यावर जे पूर्ण समाधान मिळते तेच खरे भगवंताचे दर्शन होय.

*१८९.  भक्तिमार्ग  हा  प्रेमाचा  मार्ग  आहे .  प्रपंचाकडचे  प्रेम  भगवंताकडे  वळविले  की  भक्ति येते .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"