*।। श्री राम जय राम जय जय राम ।।*
*🚩श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर🚩*
*🌸 प्रवचने :: २९ जुलै 🌸*
*मला कुणाचे दुःख पाहवत नाही.*
पुष्कळ मंडळी यावीत, आलेल्याला खायला घालावे, आणि भगवंताचे नाम घ्यावे, ह्या तीन गोष्टी मला फार आवडतात. त्या जो करील त्याच्या हयातीत त्याला कधीही कमी पडणार नाही.
जो माझ्या स्मरणात प्रपंच करतो, त्याच्या प्रपंचात मी आहे. माझ्या माणसाने प्रपंचात हेळसांड केलेली मला आवडायची नाही. उलट, इतरांच्या पेक्षा त्याने जास्त दक्षता दाखवली पाहिजे.
कमी आहे त्याची काळजी न करता, जास्त असेल तर त्याविषयी ममत्व न ठेवता, जो येईल तसा खर्च करतो, तो मनुष्य ते सर्व मला देतो.
मला विकत-श्राद्ध घ्यायची सवय आहे. मला स्वतःचा प्रपंच करता आला नाही; पण दुसऱ्याचा मात्र चांगला करता येतो.
माझ्याजवळ एकही पैसा नव्हता आणि खाणारी माणसे खूप होती; पण मी कधीही काळजी केली नाही.
मी आजपर्यंत पैशासाठी कुणापुढे जीभ विटाळली नाही. उद्या जर कोणी एक लाख रुपये माझ्या नकळत माझ्या उशाशी आणून ठेवले, तर मी ते विष्ठेसारखे बाजूला सारीन आणि स्वतःच्या श्रमाचे चार आणे मिळवून पोट भरीन.
मला आवडते की, एक लंगोटी घालावी, मारुतीच्या देवळात राहावे, भिक्षा मागावी, आणि अखंड नाम घ्यावे. हे करायला कोण तयार आहे ?
मी आपला नामाचा हट्ट कधी सोडला नाही. मी जरी जास्त गरीबांचा आहे, तरी मला प्रपंचांत कधी दैन्यपणा आवडत नाही. दुसर्याकरिता निःस्वार्थी पणाने भीक मागण्याची मला कधीच लाज वाटली नाही.
व्यवहार दृष्ट्या माझ्यामध्ये एकच दोष आहे की, मला कुणाचे दुःख पाहवत नाही. माझ्यामध्ये प्रेमाशिवाय दुसरे काही सापडायचे नाही. माझ्यातले प्रेम काढले तर मग 'मी' नाहीच !
मला फक्त आईच्याच प्रेमाची कल्पना आहे. माझ्याकडे येणार्या माणसाला माहेरी आल्यासारखे वाटले पाहिजे; तो परत जाताना त्याच्या डोळ्यांत पाणी आले पाहिजे.
दुसर्याला आपला आधार वाटला पाहिजे. मी असून काहीच होत नाही; ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच असतात. पण आपण असण्यात एक आधार आहे असे इतरांना वाटावे.
माझे आता किती दिवस आहेत कुणास ठाऊक ! मी पुढे असो वा नसो, जे मी सुरुवातीला सांगितले तेच मी शेवटीही सांगतो :
तुम्ही कसेही असा पण भगवंताच्या नामाला सोडू नका.
रामरायाने तुम्हा सर्वांवर कृपा करावी, ही माझी त्याला प्रार्थना आहे.
तुम्ही माझ्यासाठी इतक्या आपलेपणाने कष्ट करता याची जाणीव मला आहे. या कष्टांचा मोबदला रामरायच तुम्हाला देईल. तुम्ही सर्वजण आनंदात राहा, हा माझा तुम्हा सर्वांना आशिर्वाद आहे.
*२११. माझा असा अनुभव आहे की, जो मनुष्य आपले आहे ते रामाला देतो त्याला राम पुरवतो.*
*।। श्री राम जय राम जय जय राम ।।*
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"