Friday, July 12, 2019

महायोगातील अवस्था

महायोगातील अवस्था
     महायोगाच्या आरंभावस्था, घटावस्था, परिचयावस्था आणि निष्पत्ती अशा चार अवस्था आहेत.
    आरंभावस्थेत योगमाया, कुंडलिनीशक्ती प्रथम हठयोगाला आरंभ करते. त्यामुळे नानाप्रकारच्या शारीरिक क्रिया होऊ लागतात. त्यात निरनिराळ्या प्रकारची आसने, बंध, मुद्रा, प्राणायाम यांच्या योगाने नाडीशुद्धी होते. हठयोगाने शरीर परिपक्व होते, म्हणून शरीर स्वाधीन ठेवण्याचा उपयोग होतो.
    घटावस्थेत शरीर संपूर्ण शुद्ध व सत्त्वगुणयुक्त होते. विषयवासनेचा र्हास होतो. साधक पवित्र व प्रसन्न राहतो. शरीर आरंभावस्थेत दृढ होते; तर घटावस्थेत मन दृढ होते. म्हणून कुंडलिनी शक्तीचा ब्रह्मरंध्रात जाण्याचा मार्ग सुगम व सुलभ होतो. यानंतर साधकाला परिचयावस्थेची प्राप्ती होते.
    परिचयावस्थेत साधकाचा प्राण अनंताकाशात लीन होतो. हृदयाकाशात प्राणाला स्थिरत्व प्राप्त करवून, प्राणशक्ती कुंडलिनी सहस्रार चक्रात शिवाशी संलग्न होते. त्यामुळे जोपर्यंत प्राणाचा रोध असतो तोपर्यंत साधकाची शारीरिक अवस्था निष्क्रिय व निर्जीव होते. महायोगात ही अवस्था महत्त्वाची मानली जाते. असा साधक इच्छा झाली तर तो आपले सामर्थ्य कोणालाही देऊ शकतो. हृदयग्रंथी सुटून सर्व संशय दूर होतात. अशा योगाचे ज्ञान कोणत्याही आवरणाने झाकले जात नाही.
निष्पत्ती अवस्थेत महासिद्धी आत्मज्ञानाचा उदय होतो त्या वेळी सिद्धयोगी आपल्या जीवत्वाचा त्याग करून शिवतत्त्वाचा लाभ करून घेतात. या अवस्थेत योगी कुंडलिनीशक्तीला परमशिवात विलीन करण्याला समर्थ होतो. त्यामुळे साधकाला जीवन्मुक्त  अवस्था प्राप्त होते.
      साखर जरी पांढरी, मऊ आणि गोल या तीन गुणांनी एकच असते. त्याच प्रमाणे जे सत् तेच चित् तेच आनंदरूप असते. आत्म्याचा हा आनंद प्रकृतीच्या गुणांनी झाकला जातो. उपासनेत साधकाचा सत्त्वगुण वाढून रज, तम क्षीण होतात. सत् विद्या लाभून आत्मस्वरूपाकडे लीन झाली म्हणजे त्याला मीपणा उरत नाही. मीपणा गेला की अद्वैतानुभवाने केवळ परमानंद उरतो.
   सद्गुरूंचा कृपाप्रसाद असल्याशिवाय साधकाला यश मिळत नाही. कारण साधन करीत असताना त्याच्या अंगी नाना प्रकारच्या विलक्षण शक्ती येत असतात. त्याचा अंहकार व त्याची लौकिकाची आवड गेलेली नसते. म्हणून शक्तिरूपी सिद्धी अंगी प्रकटल्यावर त्याचा उपयोग न करता साधना चालू ठेवणे महाकठीण होते. या अडचणीत सद्गुरूंच्या चरणांचा आधारच कामास येतो, कारण साधनेत या सिद्धी  विघ्न आणून साधकाचे चित्त विचलित करतात. मनाने, कर्माने जो सद्गुरूंच्या कृपेचा आश्रय करतो तोच साधक नि:स्पृह राहू शकतो.
     कोणत्याही आध्यात्मिक उपासनेत परिपूर्णतेसाठी शक्ती जागरण हाच महत्त्वाचा भाग आहे. तिच्या जागृतीशिवाय सर्व प्रयत्न कष्टप्रद होतात. योगाभ्यासात शक्ती जागरण होऊ शकते. परंतु त्यातील निरनिराळ्या प्राणायाम, बंध आदि क्रियांतून झालेली बारीक चूकही अपायकारक ठरू शकते. मंत्रयोगात जोपर्यंत मंत्रप्रभावाने चैतन्य निर्माण होत नाही, म्हणजेच शक्तिपात होत नाही तोपर्यंत सर्व कष्टदायक ठरते.
    लययोग व राजयोगातही शक्ती जागरणाची प्रक्रिया आवश्यक आहे. म्हणजेच शक्तिजागृती ही आध्यात्मिक अनुभव व त्याची परिपूर्णता येण्यासाठी आवश्यक आहे.
या सर्वांचा विचार करता शक्तिपात योगाचा गीतोक्त, शास्त्रोक्त, वेदप्रतिपाद्य प्रत्यक्ष अनुभव देणारा व कांहीही न करता होणारा सोपा असा मार्ग अवलंबिणे प्रशस्त ठरेल.

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"