*।। श्री राम जय राम जय जय राम ।।*
*🚩श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर 🚩*
*🌸 प्रवचने :: १४ जून 🌸*
*भगवंत जोडणे हाच एक धर्म.*
भगवंत जोडत असेल तर अधर्मही करावा; भगवंत जोडणे हाच एक धर्म. अभिमानाने कोणतेही कृत्य केले तर ते नाही भगवंताला पोहोचत. दानधर्म केला, धर्मशाळा बांधल्या, हे सर्व नाव होण्याकरिता जर केले, तर त्याचा तुमच्या कल्याणाला काय उपयोग झाला ? भगवंत जवळ न येता त्यामुळे अभिमान मात्र वाढतो.
बाभळीची झाडे लावली तर त्यांना आंबे कसे येतील ? मीपणाने केलेले काम नाही उपयोगी पडत. शरणबुद्धीने केलेले काम हाच खरा धर्म. मी भगवंताच्या हातचे बाहुले आहे असे समजावे. 'राम कर्ता' असे म्हणावे. म्हणजे, देवाजवळ शरणबुद्धी धरावी.
भगवंताची निष्ठा कोणत्याही वयात आणि कोणत्याही अवस्थेत वाढवता येते. ही निष्ठा कधी कुणाला हार जाणार नाही, किंवा कधी कुणापुढे मान लवविणार नाही.
एकदा भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवल्यावर मग काळजीचे कारणच काय ?
काळजीने कार्याचा नाश होतो आणि कर्तव्याचा विसर पडतो. भगवंतावर श्रद्धा ठेवून प्रयत्न करावा, आणि जे फळ मिळेल त्यात समाधान मानावे.
व्यवहारात सौख्य कर्तव्याने मिळते, तसे परमार्थात सौख्य निष्ठेने मिळते.
परमार्थ करणार्या माणसाने कोणाचेही अंतःकरण दुखवू नये. परमार्थ हा लबाड आणि भोंदू माणसाचा नाही, तसा तो बावळ्या माणसाचाही नाही.
व्यवहारात कुणाला फसवू नये, आणि कशाला भुलू नये. आपले डावपेच किंवा लबाडी लोकांना फसविण्यासाठी नसावी. लोकांकडून न फसण्याइतकेच आपण व्यवहारी असावे.
आपल्या हातामध्ये जितका पैसा असेल, त्या मानानेच देवघेव करावी.
व्यवहाराच्या दृष्टीने देणे न राहील असे वागावे.
'कोणत्याही परिस्थितीत मी राहीन' असे जो म्हणेल त्याला कधीच अडचण पडत नाही.
आपण श्रीमंतांचा द्वेष करू नये आणि गरीबांना कमी लेखू नये. अशी वृत्ती बनायला भगवंताची निष्ठा पाहिजे.
प्रत्येकाला खायला प्यायला भरपूर मिळाले पाहिजे ही संपत्तीची समान वाटणी होय.
मोबदला न देता आपण पैसा घेतला, तर, तो ज्याचा घेतला त्याची वासना त्याला चिकटून बरोबर येते.
काय गंमत आहे बघा, इतर बाबतीत मनुष्य वचन पाळण्याची पराकाष्ठा करतो, पण तो पैशाचे वचन देतो ते सहज, आणि ते मोडतोही सहज. तेवढेच वचन पाळण्यात तो कुचराई करतो.
पैसा नसून अडते आणि तो असून नडते, अशी आपली परिस्थिती आहे.
संन्याशाने एक दिवसाचा संग्रह करावा, गृहस्थाने तीन दिवसांचा संग्रह करावा. आपल्याजवळ तीन दिवस खायला आहे असे पाहिल्यावर आपण मुळीच काळजी करू नये.
*१६६. 'मी कर्ता आहे' ही प्रपंचातली पहिली पायरी, तर 'राम कर्ता आहे' ही परमार्थातली पहिली पायरी.*
*।। श्री राम जय राम जय जय राम ।।*
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"