Monday, June 3, 2019

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - ४ जून 🙏

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  ४ जून  🌸*

*परमार्थात अभिमान आड येतो.*

शास्त्रात दोन गोष्टी सांगितल्या आहेत; इहलोक आणि परलोक कसे साधावेत हे दोन्ही स्पष्ट केले आहे. परंतु आपण प्रपंच तडीचा आणि परमार्थ सवडीचा मानतो. या दोन्ही गोष्टींत जाणत्याची संगत लागते. 
परलोक साधून देणार्याला सद्गुरु म्हणतात.

 जो मनुष्य आपल्याला कळत नाही हे कबूल करतो, त्यालाच सद्गुरुकडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो. 
आपण भगवंताला शरण जात नाही, कारण आपला अभिमान या शरण जाण्याच्या आड येतो. गंमत अशी की, व्यवहारात सुद्धा आम्ही अभिमान सोडून, ज्याला जे समजते त्याच्याकडे जातो. 
इहलोक अनुभवाचा आणि परलोक अनुमानाचा, अशी आपली कल्पना असते. पण इहलोकाचा अनुभव दुःखाचा येतो तरी तो आम्ही सोडत नाही, मग 'परमार्थाचा अनुभव नाही म्हणून मी तो करीत नाही' हे म्हणणे लबाडीचे आहे. 

'प्रपंचात आम्ही काही पाप करीत नाही, मग परमार्थ तरी दुसरा कोणता राहिला ?' असे काहीजण विचारतात. 
प्रपंच सचोटीचा असला, तरी त्यात अभिमान असेल तर तो परमार्थ होणार नाही.

 'राम कर्ता' म्हटल्याशिवाय, म्हणजेच अभिमान सोडल्याशिवाय, परमार्थनाही साधणार. 'मी देही' म्हणू लागलो यात अभिमान आला. देहबुद्धीला कारण म्हणजे वासना. वासना हे सर्वांचे मूळ आहे.

 'माझा जन्मच जर वासनेत आहे तर ती बाजूला काढल्यावर आम्ही जिवंत कसे राहू ?'असे वाटते. जो या वासनेचा खून करतो, तोच परमार्थाला लायक होतो. अंती जी मती, ती जन्माला कारण होते. हे सगळे ज्ञानाचे बोलणे झाले, पण प्रचीतीने हे सर्व जाणावे.

बायकोपोरांचा त्रास होतो, मन एकाग्र होत नाही, म्हणून बुवा झाला; मठ केला. लोक येऊ लागले, त्यांना जेवायला घालण्याकरिता भिक्षा आणू लागला. पण भगवंत सर्वांना खायला घालतो हे विसरला ! छप्पर गळू लागले ते नीट करण्याची काळजी करू लागला. मग घरादारांनी काय केले ? असा बुवा होण्यापेक्षा प्रपंचात राहिलेले काय वाईट ! 
थोडक्यात म्हणजे,परमार्थ समजून जो त्याचे आचरण करील, त्याला तो लवकर साधेल. त्या माणसाला प्रपंच सोडून जायचे कारणच उरणार नाही. 

जगातले आपले समाधान अगर असमाधान, ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून आहे. 
परमार्थात महत्त्व, बाहेरचे ऐश्वर्य किती आहे याला नसून, वृत्ती स्थिर होण्याला आहे, आणि भगवंताचे सतत अनुसंधानहाच वृत्ती स्थिर होण्याचा एकमेव उपाय आहे.

*१५६.  परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते. आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे.*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"