Sunday, June 2, 2019

कायम श्रद्धायुक्त अंतःकरणाने वागणे असावे

 कायम श्रद्धायुक्त अंतःकरणाने वागणे असावे

श्री नृसिंहसरस्वती स्वामी दत्त महाराजांनी जेव्हा जेव्हा काही मागून आपली इच्छा प्रगट केली तेव्हा ते मागणे भक्त उद्धाराकरिता होते हे निश्चित .गुरुमहाराजांच्या मनात काय आहे ते देवांना देखील कळणे अशक्य तिथे भक्तांना कसे कळणार ??

 एकदा गुरुमहाराज शिरोळच्या ब्राह्मणा घरी गेले तेव्हा तिथे केवळ त्या ब्राह्मणाची स्त्री उपस्थित होती ,महाराज म्हणाले ,हे स्त्रिये माध्यान्ह काळी भुकेची व्याधी आम्हाला उपद्रव देते तेव्हा याचा उपशम व्हावा म्हणून भिक्षा द्यावी . तिने वाढलेली भिक्षा घेऊन गुरुमहाराज त्या घरातील पापरूपी दारिद्र्य नष्ट करते झाले . 

भास्कर ब्राह्मणाच्या समाराधनेवेळी गुरुमहाराजांनी पंगत वाढताना भास्कराला अन्नशुद्धी करिता तूप घालावे असे सांगितले . गुमहाराज स्वतः त्या पंगतीस होते . भास्कराने वाढलेल्या भिक्षेच्या द्वारे महाराज अत्यंत संतुष्ट झाले आणि त्यांनी आशीर्वाद दिला ,वर देती दरिद्र दुरी l पुत्र पौत्र होती तुज ll 

सायंदेवाच्या अध्यायात गुरुमहाराज आणि सायंदेव संगमावर बसले असताना अचानक मोठा पाऊस सुरु झाला आणि वारा सुटला , हवा अत्यंत थंड झाली तेव्हा गुरुमहाराज म्हणाले ,तुवा जाऊनी मठासी l अग्नि आण शेकावया ll निराकार आणि निर्गुणाला थंडी कशी वाजेल पण सायंदेवाच्या उद्धाराची वेळ आली होती तेव्हा एका भांड्यात तो निखारे घेऊन आला . दोन सर्प रक्षणार्थ पाठवून महाराजांनी त्याला स्वस्वरूपाची ओळख दिली आणि पुढे रात्रभर सायंदेवाला महाराजांनी काशीयात्रा निरूपण केले . धन्य तो सायंदेव !! स्वप्नात देखील दुर्लभ असलेल्या परमात्म्यासोबत रात्रभर आणि पुढेही कायम संवादाची संधी मिळाली . उत्तरोत्तर वर्धिष्णू भक्तीने उद्धार झाला . 

साठ वर्षे वयाच्या निपुत्रिक स्त्रीला महाराज म्हणाले ,वृक्ष असे भीमातीरी l जेथे अमरजा संगम ll तेचि आमुचे स्थान --- म्हणजेच अश्वत्थ पूजन करताना एका परीने तू आमचेही पूजन करणार आहेस तेव्हा फलप्राप्ती होणारच . नंतर तिला कन्या पुत्र प्राप्ती झाली .अत्यंत कौतुकाने गुरुमहाराजांनी त्या आधी जन्मलेल्या कन्येस कडेवर घेतले . पुढील सर्व वंशाचा उद्धार झाला . 

कोणाकडून भिक्षा ,कोणाकडून सेवा ---- दत्त महाराज उद्धाराची वेळ येताच जे योग्य असेल ते आपल्याकडून करवून घेतात . मात्र ती वेळ अनेकदा कळू शकत नाही आणि अनेकदा आपण  त्यांच्या स्वरूपाला न ओळखता आल्याने भिक्षेला किंवा सेवेला मुकतो .दत्त महाराज बहुरूपधर आहेत तेव्हा कोणत्या रूपात येऊन काय सांगतील किंवा मागतील याचा नेम नाही तेव्हा कायम श्रद्धायुक्त अंतःकरणाने वागणे असावे म्हणजे झाले !! श्री गुरुदेव दत्त !!!---अभय आचार्य

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"