Monday, May 27, 2019

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २७ मे 🙏


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २७ मे  🌸*

 *निरभिमानी  परोपकार  ही  भगवंताची  सेवाच .*

प्रत्येक मनुष्याला परोपकाराची बुद्धी असणे अत्यंत जरूर आहे. पण तो कुणाला शक्य आहे आणि कुणी करावा, याचा विचार करायला पाहिजे. 

ज्या शेतात पाणी भरपूर पुरून उरत असेल त्याच शेतातले पाणी बाहेर टाकता येते, आणि ते हितावहही होते.
इतर शेतांच्या बाबतीत ते होत नाही, अशा शेताला पुरेसे पाणी कसे मिळेल याचाच आधी विचार करणे जरूर आहे. हीच दृष्टी परोपकार करणार्या व्यक्तीने ठेवावी. 

ज्या महात्म्यांनी स्वतःचा उद्धार करून घेतला, जगाच्या कल्याणाकरिताच जन्म घेतला, त्यांनाच परोपकाराचा अधिकार. 

मग प्रश्न येतो की, इतरांनी परोपकाराची बुद्धी ठेवू नये आणि तसा प्रयत्नही करू नये की काय ? 
तर तसे नाही. परोपकाराची बुद्धी आणि प्रयत्न असणेच जरूर आहे. 

परंतु परोपकार म्हणजे काय, आणि त्याचा दुष्परिणाम न होऊ देता तो कसा करता येईल, हे पाहणे आवश्यक आहे. 

भगवंताची सेवा या भावनेने दुसर्याकरिता केलेली मेहनत याला परोपकार म्हणता येईल, आणि त्यापासून नुकसान होण्याची भिती नाही. 

परंतु हे वाटते तितके सोपे नाही. कारण मनुष्याची सहज प्रवृत्ती अशी की, थोडेसे काही आपल्या हातून झाले की, "ते मी केले, मी असा चांगला आहे," अशा तर्हेचा विचार येऊन तो अभिमानाला बळी पडतो. 

सबब, ज्या ज्या वेळी दुसर्याकरिता काही करण्याची संधी मिळेल त्या त्या वेळी तिचा फायदा घेऊन मनाला शिकवण द्यावी की, "देवा, तुझ्या सेवेचा लाभ मला दिलास ही कृपा झाली. अशीच कृपा ठेवून आणखी सेवा करवून घे." 
ही विचारसरणी जागृत राहिली नाही, तर आपला कसा घात होईल याचा पत्ताच लागणार नाही. म्हणून अत्यंत जपून वागणे जरूर आहे. 

परोपकार याचा सरळ अर्थ पर-उपकार; म्हणजे दुसर्यावर केलेला उपकार. यावरून असे लक्षात येईल की, परोपकाराला दोन व्यक्तींची गरज लागते. एक उपकार करणारा, आणि दुसरा उपकार करून घेणारा. जगातल्या सर्वसामान्य व्यक्ति पाहिल्या, तर आपल्या स्वतःवरून असे दिसते की, मी एक निराळा, आणि प्रत्येक व्यक्ति आणि वस्तुमात्र गणिक सर्व जग निराळे. मनाच्या या ठेवणीमुळेच जर आपल्या हातून दुसर्याचे कधीकाळी एखादे काम होण्याचा योग आला, तर 'मी दुसर्याचे काम केले'ही जाणीव होऊन अहंकार झपाट्याने वाढू लागतो. म्हणून परोपकाराच्या बाबतीत अत्यंत सावध राहण्याची सूचना सर्व संतांनी दिली आहे. 

नामात राहिले म्हणजे अहंकार नाहीसा होऊन सावधानता येते आणि चित्त शांत होते.

*१४८.  जगात परोपकारी म्हणून नावाजलेले, पण भगवंताचे अधिष्ठान नसलेले मोठेमोठे लोकसुद्धा मानाबिनात कोठेतरी अडकल्यावाचून राहणार नाहीत.*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"