# सिद्धयोगाचे विश्लेषण
शक्तिपात साधना हा भारतीय-साक्षात्कार-दर्शनातील प्रमुख आणि श्रेष्ठ अभ्यास आहे. श्रुतिस्मृतिपुराणोक्त अशी साधना त्यात आहे. शक्तिपात साधनेत बंध, मुद्रा, आसन, प्राणायाम विषयक योग प्रक्रिया, जागृत शक्तीच्या आधाराने सहज, स्वाभाविकपणे घडतात. मंत्रस्वरूप ओंकार साधना, नामस्मरण घडते. लययोग घडतो. शक्तीच्या प्रेरणेने ह्या सर्व योग क्रिया घडत असतात. त्यात चित्तशुद्धी, कर्म संस्काराचा क्षय हा हेतू असतो. त्यामुळे साधकाला प्रयत्नपूर्वक कोणतीच योगसाधना करण्याचे कारण नसते.
परंतु साधनेच्या पूर्वावस्थेत साधकांचा उत्साह, कर्तृत्वभाव असतो. सद्गुरू कृपा दृष्टी असते. कर्मसंस्कार, चित्ताची मलीनता यामुळे काही साधकाची साशंक वृत्ती काही काल टिकून राहते. अशा वेळी स्वप्रेरणेने त्याला काही मंत्रसाधना, जपसाधना करावीशी वाटते. शिवाय साधनेत सातत्य नसते. बैठक नेहमीच होत नसते. अशा वेळी साधनेच्या बैठकी व्यतिरिक्त साधकाला काही करावे वाटते. म्हणून साधनेच्या बैठकीत काय घडते आणि साधनेच्या व्यतिरिक्त काळात काय करावे अशा संभ्रमात तो असतो. साधक जेव्हा असे प्रयत्नपूर्वक काही करू लागतो तेव्हा साधनेच्या काळातील शक्तीच्या आवेगास प्रतिबंध निर्माण होतो.
साधनेच्या वेळी चित्तात होणाऱ्या सर्व क्रिया शक्तीच्या द्वारे होतात हे जेव्हा साधकाच्या लक्षात येते तेव्हा साधकाचा प्रयत्न, त्याची स्वत:ची काही करण्याची धाव थांबते. त्या वेळी साधकाच्या मानसिक इच्छेपेक्षा स्वतंत्र रीतीने क्रियाशक्ती सर्व योग प्रक्रिया घडवीत असते. अशा वेळी सद्गुरू पूर्णकृपा साधकावर हळूहळू होण्यास सुरवात होते. कारण त्या वेळी साधकाची निष्ठा, प्रेम आणि सातत्य यांची जोड मिळत असते.
शक्तिपात योग साधनेत मनाने पाहणे हेच योगसाधन सांगितले आहे. योगसाधनाने मनाला मनाने पाहण्याने त्या साधनेत उन्नती होत असल्याचे प्रत्ययाला येऊ लागते. मनाने मनाला पाहणे म्हणजे मनांत कोणताही विचार आला तरी त्याकडे स्वत:च्या बुद्धीने अवलोकन न करता तो तसाच विरळ होऊ द्यावा. म्हणजे हळूहळू मन लोप पावत जाईल.
योगानेच ज्ञान उत्पन्न होते व ज्ञानानेच योग प्राप्त होतो म्हणून नित्य योगाचा व ज्ञानाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. योगाभ्यासानेच योग साध्य होतो म्हणून उत्साहपूर्वक योगाभ्यास केला तर चिरकालपर्यंत योगात रममाण होऊ शकतो.
# सामूहिक साधना
सामूहिक साधना ही ठराविक दिवशी ठराविक ठिकाणी दोन किंवा अधिक साधक एकत्र जमून सामूहिकरीत्या एखाद्याच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. या वेळी सर्वांची ऊर्जा एकत्र होऊन त्याठिकाणी शक्तीचा स्त्रोत निर्माण होत असतो. त्याचा फायदा जमलेल्या सामूहिक साधनेतील सर्व साधकांना होतो. त्यामुळे नवीन साधकांना ऊर्जा मिळून त्यांच्या प्रगतीत वाढ होते. साधकांच्या विचारांत देवाण घेवाण होते. त्यामुळे चुकीचे समज दूर होऊ शकतात. आपल्या शरीरात कोपराच्या ठिकाणी बाह्य देहात असलेले �सारिणी� हे अज्ञात चक्र ही ऊर्जा बाह्य देहात अदान प्रदान करीत साठवून ठेवते. त्याचा फायदा साधकाला होत असतो. त्यामुळे इंद्रियांच्या, मनांच्या व बुद्धीच्या शक्तीच्या सीमावाढू लागतात. साधक आपल्याला कोणते अनुभव येतात ह्याविषयी जागरूक राहून, द्रष्टेपणाने त्यांच्याकडे पाहतो. तसे करताना तो अनुभवाशी रममाण झाल्यामुळे त्याला बाह्य जगताचा विसर पडतो.
खरे तर आपली प्रगती आपल्याला ओळखता येणे शक्य आहे. साधकाने एक खासगी दैनंदिनी ठेवावी आणि रोज रात्री आपल्या आंतर जीवनाचा विचार करून त्या दैनंदिनीत साधनेविषयी लिहावे. कधीतरी एकांतात वाचलेली ही दैनंदिनी आपल्या प्रगतीचा आलेख दाखवू शकते. जागरूकपणे जर स्वत:च्या मनोवृत्तीचा शोध घेतला तर आपली श्रद्धा वाढत आहे, सात्त्विक भाव निर्माण होत आहे, व उत्साह वाढत आहे हे आपल्यालाच दिसून येते.
प्रत्येकाची उन्नती त्याच्या कलाप्रमाणे व संस्काराप्रमाणे होत असते. शक्तिपात दीक्षा झाल्यावर त्याची लक्षणे दिसतात. साधक आनंदाने हसतो, प्रसन्न असतो, प्रेमाने खेळतो, आनंदित व सुखी होतो. संसाराला भयपूर्ण मानून त्यापासून विभक्त होतो. संपत्तीला मोहित होत नाही. द्वेषाची भावना त्याला होत नाही. कामविकारांचा कार्यकारण भाव तो जाणतो. वृत्ती समाधानी बनते.
नेहमीच क्रिया घडून शरीर डोलणे वगैरे होतेच असे नाही. त्यावेळी कुंडलिनी शांतपणे क्रियाशील होत असते. प्रत्येकाचे अनुभव भिन्न असतात. त्यामुळे कोणीही असे समजू नये की आपण दीक्षा घेतली पण शक्तिपात झाला नाही. खिन्न न होता नेहमीच साधना जरूर करीत रहावे.
शक्तिपातयोगात साधनेचे एक वैशिष्ट्य असे आहे की, ह्या मार्गाचा स्वीकार करताना नियमांचीही माहिती पूर्ण करून घेणे हे प्रत्येक साधकाचे कर्तव्य आहे. एकदा सद्गुरूंच्या कृपेने शक्तिपात झाला की, शक्ती सर्व दोष नाहीसे करण्याचा प्रयत्न करते. शरीर शुद्धीनंतर शक्ती क्रियमाण होते. काही कारणाने साधकाने साधना सोडून दिली किंवा पूर्व संस्कारामुळे एखाद्या साधकाची साधना अपुरी राहिली तरी त्याचे निराकरण पुढील जन्मांमध्ये होते.
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"