Tuesday, May 21, 2019

श्रीपाद वल्लभ चरित्र अमृत :- अध्याय -44

॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ 
अध्याय -४४
स्वर्ण पीठिकापूर वर्णन
श्री भास्कर पंडिताने त्या दिवशी आम्हास त्यांचे आदारातिथ्य स्वीकारून घरी राहण्याचा आग्रह केला व श्रीपाद श्रीवल्लभाचे चरित्र ऐकविण्याची विनंती केली. आम्ही भास्कर पंडिताचा आग्रह मोडू शकलो नाही. रात्री त्यांचेकडे वास्तव्य करून दुसऱ्या दिवशी स्नान संध्या आटोपून त्रिपुरांतकेश्वराच्या दर्शनाला गेलो. तेथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या अत्यंत रसपूर्ण अशा चरित्राचे विवेचन झाले. वक्त्याने आपल्या मधुर वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते.
श्रीपाद प्रभूंचे जन्मस्थान
हे श्रोते हो ! श्रीपाद श्रीवल्लभ प्रत्यक्ष शिव स्वरूप आहेत. ते पीठिकापुरम् गावी अंतर्धान पावून काशी नगरीत अवतरीत होत आणि गंगेचे स्नान करीत. त्यांच्या पीठिकापुरम् मध्ये अवतरीत होण्याने तेथील भूत पिशाच्च बाधेचे निर्मूलन झाले होते. पीठिकापुरम् मधील त्यांच्या जन्म स्थळाची भूमी चैतन्यमय झाली होती. भविष्यात, कांही शतकानंतर त्यांच्या जन्मस्थळी निर्माण होणाऱ्या महासंस्थानात त्यांच्या दिव्य पादुकांची प्रतिस्थापना होईल. तेथील भूमी जागृत होऊन क्रमाक्रमाने आजूबाजूच्या भूमंडलास जागृत करील. तेथील जन समुदाय पीठापुरमच्या परिसरातील दिव्याकर्षणाने आकर्षित होतील. ज्या ज्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभांनी संचार केला आणि ज्या ज्या ठिकाणी ते संचार करतील त्या त्या प्रदेशात न कळत जागृतीचा प्रभाव दिसतो व तसा दैवी शक्तीचा अनुभव येतो.प्रत्येक मनुष्यात पृथ्वी तत्व असते. हे शब्द, स्पर्श रूप, रस, गंध या तत्त्वांनी बनलेले असते. योग दृष्टीने पहाता ज्या शरीरात पृथ्वीतत्त्व असते ते श्रीपाद प्रभूंच्या दिव्य करूणा भावामुळे पीठिकापुरम् या क्षेत्री निश्चितपणे आकर्षित होतात. यावर मी प्रश्न केला ''आर्यावर्तातील लोक त्यांच्यातील पृथ्वी तत्वाच्या जागृती मुळे पीठिकापुरमला भौतीक रूपाने येतात का ?''
सुवर्ण पीठिकापुर महिमा
श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य केले आणि म्हणाले ''तू विचारलेला प्रश्न योग्यच आहे. भौतिक दिसणाऱ्या पीठिकापुरम् मध्ये एक सुवर्ण पीठिकापूर आहे. जितकी भौतिक पीठापुरमची व्याप्ति आहे तेवढीच सुवर्ण पीठिकापुरची सीमा आहे. सुवर्ण पीठिकापुर केवळ चैतन्याने निर्माण झाले आहे. वास्तविक पहाता साधकांमध्ये असलेल्या चैतन्याच्या संबंधित पदार्थ निर्माण होताना त्याला सुवर्ण पीठिकापुरात वास्तव्य करीत असल्या सारखे वाटते. या सुवर्ण पीठिकापुरातील चैतन्यामुळे हजारो दिव्य किरणांची आभा निर्माण होते. योगी, तपस्वी, महापुरुष या सुवर्ण पीठिकापुरात राहण्यासाठी उत्सुक असतात. परंतु हे दिव्य पुरुष आपल्या सामान्य दृष्टीला अगोचर असतात. सुवर्ण पीठिकापुर केवळ योग चक्षु, ज्ञान चक्षु असलेल्या साधकांनाच गोचर असते.''
काशीतील पंचकोश यात्रा विशेष
सुवर्ण पीठिकापुरा प्रमाणेच सुवर्ण काशी नावाचे एक दिव्य क्षेत्र आहे. ते भौतिक काशीच्या विस्तारा एवढेच आहे. सुवर्ण काशी चैतन्यमय पदार्थानी निर्मित आहे.''काशि यात्रां गमीष्यामि तत्रैव निवसाम्यहम् । इतिब्रुवाणस्सततं काशीवास फलं लभेत् ॥'' असे शास्त्र वचन आहे. ''मी काशीला जात आहे आणि तेथेच राहण्याचा विचार आहे.'' असे सतत म्हणणाऱ्या लोकाना सुध्दा काशीवासाचे फल प्राप्त होते. सुवर्ण काशीत निवास करण्यासाठी आणि काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी प्रत्येकांने त्यांचे निरंतर, मोठ्या श्रध्दाभावाने, चिंतन केले पाहिजे. तुझ्या अन्नमय कोषाच्या संबंधित एक भौतिक पीठिकापुर आहे तसेच एक भौतिक काशी सुध्दा आहे. प्राणमय कोषाच्या संबंधीत एक भौतिक पीठिकापुर आहे तसेच एक भौतिक प्राणमय काशी सुध्दा आहे. मनोमय कोष, विज्ञानमय कोष आणि आनंदमय कोष, या प्रत्येक कोषाच्या संबंधाने एक एक पीठिकापुर व काशी आहे. या आनंदमय पीठिकापुरमलाच सुवर्ण पीठिकापुर असे म्हणतात. तसेच या आनंदमय काशीलाच सुवर्ण काशी असे म्हणतात. या वक्तव्यावर मी म्हणालो, ''महोदया, मी अल्पज्ञ आहे. कृपा करून माझ्यावर अनुग्रह करा आणि या विषयाचे सुबोध विवेचन करून सांगा. काही लोक काशीतील पंचक्रोष यात्रेच्या फला बद्दल सांगतात ती यात्रा कोणती ?'' माझ्या प्रश्नाचे समाधान करण्यासाठी श्री भास्कर पंडित म्हणाले ''बाळा, पंचक्रोश यात्रा म्हणजे भौतिक यात्रा असते. वास्तविक पाहता आपण करावयाची असते ती यात्रा अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोष म्हणविली जाणारी ही पंचक्रोष यात्रा. ही आपण चैतन्य रूपानेच करायची असते. हेच या पंचक्रोषमय यात्रेचे गूढमय दैवरहस्य आहे. श्रीपादांच्या अनुग्रहामुळेच साधकाला पंचक्रोष यात्रा करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते त्यामुळेच पंचभूतांशी संबंधित पंचमहायज्ञ श्रीपाद प्रभूंच्या योगशक्तीने सिध्द होतात. या पंचमहायज्ञाचे प्रतिक म्हणून कुरुगड्डीजवळ पंचदेव पहाड सुशोभित केलेला आहे. दैव रहस्याचे अनुष्ठान ज्यांनी केले, ज्यांची योगदृष्टी आहे अशा साधकालाच हे सर्व आकलन होते. इतर सर्व सामान्य मानवांना त्या बद्दल कांहींच बोध होत नाही.''श्रीपाद प्रभूंनी काशीत गंगास्नान केले तेंव्हा गंगामाता प्रत्यक्ष प्रगट झाली आणि तिने श्रीपाद प्रभूना रोज गंगा स्नान करण्याची प्रार्थना केली. त्या वेळी श्रीपादांनी ''मी दररोज गंगेत स्नान करीन'' असा वर दिला यामुळेच गंगामातेचे चैतन्य सुध्दा पंचक्रोषात सामावलेले आहे. तसेच गंगामातेचे वास्तव्य पंचक्रोशात आहे. यावर मी म्हणालो महाराज ''गंगामाता जल स्वरूप असते असते ना ? ती पंच कोशात कशी असेल ? मला हे समजत नाही.'' यावर हसून भास्कर पंडित म्हणाले, ''बाळा, देवता या मंत्रस्वरूप असतात. त्या भौतिक स्वरूपात नसतात मंत्रस्वरूप म्हणजे शब्दब्रह्माचे शक्तीरूप होय. गंगामाता ही शक्ति देवता आहे. चैतन्य स्वरूप असलेली ही देवता असा याचा अर्थ आहे. ती भौतिक स्वरूपातील गंगानदी ही तादात्म्यस्थितीतील अभिमान देवता आणि चैतन्य स्वरूपातील देवता आहे. त्याच प्रमाणे सूर्यदेवता (चैतन्य स्वरूप) जे सृष्टीत दिसतात ते सूर्य खगोलात तादात्म्य स्थितीतील चैतन्यरूप देवता असतात. हे धर्मसूक्ष्म गूढ असलेले दिव्य रहस्य तुला आता चांगले समजले असेल.प्रत्येक मानवात जलतत्व असते त्याच्या शुध्दिकरणासाठी जलयज्ञ करण्याचा संकल्प करतात. त्यासाठी ते दररोज काशीतील गंगा स्नानास जातात. या योग प्रक्रियेमुळे भौतिक रूपात असलेल्या जलवासनेला पवित्रता येते. पवित्र अशा नद्या आपल्या अतिपवित्र जलांनी मानवांचे मालिन्य दूर करून त्यांना पवित्रता प्रदान करतात. गंगा, गोदावरी या सारख्या महानद्या पापी मानवानी केलेल्या त्यांच्यातील स्नानाने अपवित्र होतात. या नद्यांमध्ये जेंव्हा चैतन्यस्वरूप महापुरुष आणि पुण्यात्मे स्नान करतात तेंव्हा या महानद्या पूर्ववत् पवित्र होतात. जलयज्ञ करण्याचा अर्थ म्हणजे जीव राशींच्या शरीरात जल स्वरूप आणि जलतत्वांचेच शुध्दिकरण असते. श्रीपाद श्रीवल्लभ सार्वभौम आहेत. केवळ एका आदेशाने कोटयानी कोटी ब्रह्मांडांची रचना, रक्षण आणि विलय करणारे असे महान त्रिमूर्ति स्वरूप दत्त प्रभूच आहेत. त्रेता युगात भारद्वाज मुनींना दिलेल्या वचनानुसार, भारद्वाज गोत्रातील सावित्रिकाठक महायज्ञ केलेल्या पुण्य स्थळी म्हणजेच पीठिकापुरम् या गावी श्रीपाद प्रभूंनी अवतार घेतला. त्यांच्या अवताराचे प्रयोजन, महायोग्यांना, महासिध्दांना, महापुरुषांना अनुग्रहित करून त्यांच्या करवी धर्माचा उध्दार करायचा. त्यांनी या अवतारानंतर नरसिंह सरस्वती नामरूपाने अवतार घेणार असल्याचे सांगितले, या दिव्य वचनावर जे कोणी अविश्वास दाखवतील त्यांना आणि श्रीपाद प्रभूच्या अवताराची जे अवहेलना करतील त्यांना पिशाच्च योनी प्राप्त होईल. ते बलहीन आणि अत्यंत हीन दीन अवस्थेस प्राप्त होऊन नरक यातना भोगतील. अशा पापी व्यक्तींना गाणगापूर येथे श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या अवतारात विमुक्ति मिळेल असे श्रीपादांनी सांगितले आहेतू लिहित असलेला श्रीपाद श्रीवल्लभ यांचा चरित्रामृत ग्रंथ अक्षरश: अक्षर सत्य ग्रंथ आहे. हा ग्रंथ सर्व भाषेमध्ये अनुवादिला जाईल. या महान ग्रंथाचे कोणत्याही भाषेत पारायण केले असता त्याचे विशिष्ट फळ प्रत्येकाला मिळेलच. याचे भाषांतर करण्याची योग्यता असणाऱ्यांची निवड ते स्वत:च करतील. या ग्रंथाचा अनुवाद करणारे आणि अनुवाद करण्यास सहाय्य करणारे संबंधित यांच्यावरही महाराजांची विशेष कृपा होईल. हा ग्रंथ पुण्य मंदिरात ठेऊन त्यांची पूजा केल्यास त्यांना कृपालाभ होईल. या ग्रंथ पारायणाने, कलीयुगात, सर्व शुभ गोष्टी घडतील. असे महाप्रभू म्हणाले. तुझे हे ग्रंथ लेखनाचे काम श्रीचरण तुझ्या कडून पूर्ण करून घेतील.'' त्यावर मी म्हणालो ''महाराज तुम्ही सांगितलेले सर्व योग्यच आहे. पण मी पंडित मुळीच नाही. शिवाय वेद वेदांताचे ज्ञानाविषयी मी अनभिज्ञ आहे. या अल्पज्ञाकडून आपण केवढे महत्कार्य करून घेत आहात याचे मला आश्चर्य वाटते आणि आंनदही होतो.'' यावर भास्कर पंडित म्हणाले ''खरे तर असे दत्तविधानच आहे की निषिध्द पदार्थाने रोग बळावतात परंतु आश्चर्य असे की अद्भूत अशी महतकार्ये कांही न येणाऱ्या सामान्य व्यक्तीकडून करवून घेण्याचा श्रीपाद प्रभूंचा नित्य विनोदी स्वभाव आहे. हे त्यांच्या दिव्य शक्तीचेच निदर्शन आहे.''
एके दिवशी एक संन्यासी पीठिकापुरम् मधील कुक्कुटेश्वर मंदिरात आले. त्यावेळी श्रीपाद श्रीवल्लभ बालअवस्थेत होते. श्री नरसिंह वर्मा (महाशय) आणि वेंकटप्पय्या श्रेष्ठी (महाशय) बालक श्रीपाद श्रीवल्लभांना घेऊन घोडागाडीतून कुक्कुटेश्वराच्या मंदिरात आले. त्यावेळी ते संन्यासी स्वयंभू दत्तमंदिरात ध्यान अवस्थेत बसले होते. त्यांना पाहून श्रीपाद श्रेष्ठींना म्हणाले ''या साधूला मंदिरात का येऊ दिले ?'' नरसिंह वर्मा श्रीपादांना हलकेच म्हणाले ''अरे बाळा, ते संन्यासी आहेत. त्यांना राग आल्यास आपणास ते शाप देतील.'' श्रीपाद म्हणाले, ''म्हणजे यांना सुध्दा राग येतो तर. मासे पकडून ज्यांच्या जवळ माशांचा वास येतो त्यांना का संन्यासी म्हणावे ?'' तितक्यात त्या संन्याशाने डोळे उघडले. त्यांच्या जवळ माशांचा वास येत होता. ते त्या संन्याशांना समजले. ते खरेखुरे संन्यासी होते. त्यांनी श्रीपादांकडे पाहिले. त्यांना मत्स्य अवतारातील श्रीविष्णुंची आठवण झाली. तेंव्हा श्रीपाद म्हणाले ''तुमच्या कमंडलूत सुध्दा छोटे छोटे मासे आहेत, तुम्हीच पहा.''
संन्याशावर विशेष अनुग्रह
संन्याशाला कमंडलूत मासे पाहून खूप आश्चर्य वाटले. श्रीपाद त्या संन्याशाकडे तीव्र नजरेने पाहात होते. तितक्यात ते संन्यासी अंत:र्मुख झाले. त्यांना योग दृष्टी प्राप्त होऊन त्यांच्या शरीरातील रक्त नलिकेतील विभिन्न द्रवातील लहान लहान थेंब मत्स्याकार असल्याचे जाणवले. ते थेंब विविध प्रकारच्या अनुभूतीचे प्रदर्शन करीत होते. एक एक थेंब जणु काही एका एका वासनेचे रूप घेऊन माशाच्या आकारात तरळत होता. ''अहा ! मत्स्यावतार प्रक्रिया म्हणतात ती हीच काय ?'' असे आश्चर्यचकित होऊन ते संन्यासी ओरडले. या सूक्ष्म थेंबाविषयी ज्ञानप्राप्त झाल्यास प्रपंचातील सर्व वासनांवर नियंत्रण ठेवता येणे शक्य असल्याचे त्या संन्याशांना कळाले. संन्यासी बहिर्मुख झाले. त्यांनी मंद हास्य करीत श्रीपादांच्या मुखाकडे मोठ्या श्रध्दा भावाने पाहिले. श्रीपादांनी सुध्दा मंदहास्य करीत त्यांच्या कडे बघितले. संन्यासी श्रीपादांच्या चरण कमलावर नतमस्तक झाले. श्रीपादांनी मोठ्या प्रेमभराने आपला हात त्या संन्याशाच्या मस्तकावर ठेऊन त्यांच्यावर अनुग्रह केला. त्या स्पर्शाने त्या संन्याशाच्या शरीरातील माशाचा वास लुप्त झाला आणि त्या जागी एक दैवी सुगंध येऊ लागला. या वेळी त्या संन्याशास पराशर मुनींनी आपल्या कृपा दृष्टीने मत्स्यगंधेच्या शरीरास येणारा माशांचा दुर्गंध नष्ट करून त्या ठिकाणी सुगंध प्रस्थापित केल्याच्या घटनेची स्मृती झाली. याच प्रमाणे पतिव्रता मातलीच्या शरीरातून सुगंध येत असे म्हणूनच तिला सुवासिनी असे म्हणत. ज्या प्रमाणे शरीरातील अनुभूती सुवासात परिवर्तित होतात त्या प्रमाणे भौतिक शरीरात सुध्दा बदल होऊन सुवासाची अनुभूति येते असा श्रीपाद प्रभूंनी त्या संन्याशाला मौनबोध केला. यानंतर श्रीपाद म्हणाले, ''अरे बाबा, तुला मत्स्य अवतारा बद्दल कळाले. दैवी प्रकृती आणि असुरी प्रकृती यांना कुर्मावताराचा आधार आहे. मंदार पर्वताला कूर्मावर प्रस्थापित करून देव दानवांनी समुद्र मंथन केले होते. तू अंतर्मुख होऊन कासव ज्या प्रमाणे संकटाचे समयी आपली इंद्रिये आत ओढून घेऊन ती नियंत्रणात ठेवतो त्याच प्रमाणे तू आपल्या ज्ञानेद्रिंयांना आणि कर्मेद्रिंयांना आपल्या स्वाधीन ठेवल्यास मोठा योगी होशील. असे न केल्यास बहिर्मुख होऊन सर्व दुर्गुणांनी युक्त होऊन राक्षस होशील. तू बहिर्मुख झाल्या क्षणीच कोणी तरी तुला मारून टाकील. तुला जीवन हवे असल्यास तू अंतर्मुख होऊन योगाभ्यास कर. असे केल्यास तुझी सर्व बंधनातून सुटका होईल.''
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"